मथितार्थ
गेल्या अनेक वर्षांमध्ये धर्म नावाची चीज समजून घेताना आपली गल्लत होते आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात अनेक ठिकाणी हीच स्थिती आहे. त्याचीच परिणती मग हिंसाचाराच्या रूपाने अफगाणिस्तान, पाकिस्तानपासून ते अगदी भारताच्या पूर्वेस असलेल्या म्यानमापर्यंत सर्वत्र पाहायला मिळते आहे. हा हिंसाचार काही केवळ या आशिया खंडापुरताच मर्यादित नाही तर तो अगदी युरोप अमेरिकेमध्येही पाहायला मिळतो आहे. युरोपातही अनेक ठिकाणी मुस्लीम विरुद्ध ख्रिश्चन असा संघर्ष सुरू आहे. आता तर हा हिंसाचार केवळ हिंसाचार राहिलेला नाही तर त्याने दहशतवादाचे आक्रमक रूप धारण केले असून तो संपूर्ण जगास गिळू पाहतो आहे. सुरुवातीस मुस्लीम विरुद्ध हिंदू किंवा मुस्लीम विरुद्ध ख्रिश्चन असे त्याचे स्वरूप आहे, अशी चर्चा होती. पण हा संघर्ष तेवढय़ापुरता मर्यादित नाही, तर एकाच समाजातील दोन गटांमध्येही तो पूर्णपणे रुजलेला आहे. अन्यथा मुस्लीम राष्ट्र असलेल्या पाकिस्तानमध्ये शिया आणि सुन्नी या मुस्लिमांच्या दोन गटांमध्ये संघर्ष नसता झाला. अगदी अलीकडेच जारी झालेल्या अहवालानुसार पाकिस्तानातील शिया आणि सुन्नी संघर्षांमध्ये दररोज ११० जणांचे बळी जातात. ही आकडेवारी खूपच बोलकी आहे. एकमेकांच्या मशिदींमध्ये बॉम्बस्फोट घडवले जातात. फक्त पाकिस्तानच नव्हे तर अनेक मुस्लीम राष्ट्रांमध्ये असा या दोन गटांमधील संघर्ष सुरू आहे. त्यामुळे धार्मिक संघर्ष हा धर्माधर्मामधील संघर्ष आहे, असे चित्र उभे राहात असले तरी वास्तव वेगळे आहे. एकूणच हे सारे चित्र आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्या वेळेस धर्म समजून घेतानाच गल्लत झाल्याचे चित्र समोर येते. रविवारी बोधगयेला दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या साखळी बॉम्बस्फोटांनीदेखील हीच बाब पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. बौद्ध धर्मीयांनी म्यानमारमध्ये अल्पसंख्याक असलेल्या मुस्लीम समाजाला लक्ष्य केल्याच्या निषेधार्थ हे बॉम्बस्फोट भारतात बोधगयेला घडविण्यात आले, असे दहशतवाद्यांनी म्हटले आहे. त्यामुळे यापुढे बौद्ध धर्मीयांची महत्त्वाची ठिकाणेही दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर असणार आहेत. पण त्याहीपेक्षा एक महत्त्वाची बाब आपल्या या घटनेने लक्षात आणून दिली आहे ती म्हणजे या धार्मिक दहशतवादाला वेळीच आवर घातला नाही तर तो जागतिक होण्याची शक्यता असेल आणि मग कोणत्या तरी एका देशात तेथील अल्पसंख्याकांवर अत्याचार झाल्याचे निमित्त करून इतरत्र जगात उत्पात घडवून आणले जातील. अर्थात हे सारे घडविणाऱ्यांसाठीही त्या त्या घटना या निमित्तच असतील, त्यांच्या त्या निषेधार्ह कृत्यामागे असणार आहे तो त्यांच्या मनात खोलवर रुजलेला िहसाचार आणि दहशतवादच. खरे तर अफगाणिस्तानमधील बामियान बुद्धमूर्तीला तोफेच्या तोंडी देऊन दहशतवाद्यांनी त्यांचा मनसुबा अनेक वर्षांपूर्वीच स्पष्ट केला होता, मात्र त्या वेळेस खणखणलेली धोक्याची घंटा ऐकायला आपण उशीर केला. जगाला अिहसा आणि शांतीचा संदेश देणारा धर्म म्हणून बौद्ध धर्माकडे पाहिले जाते. सिद्धार्थाला बोधी प्राप्त झाली आणि मग तो गौतम बुद्ध झाला. ही बोधी ज्या वृक्षाखाली प्राप्त झाली त्या बोधगयेलाच दहशतवाद्यांनी लक्ष्य करावे हा दुर्दैवी प्रकार आहे. हे साखळी बॉम्बस्फोट म्हणजे दहशतवाद्यांनी विश्वशांतीलाच चूड लावण्याचा दिलेला संकेत आहे. तो आपण गांभीर्याने घ्यायला हवा आणि मूळ विषयाकडे वळायला हवे, तो म्हणजे धर्म समजून घेताना झालेली गफलत. त्यासाठी आपल्याला खरे तर आपलाच इतिहास पुन्हा एकदा नव्याने समजून घ्यावा लागेल. भारताचा लिखित इतिहास सापडतो त्यामध्ये अगदी अफगाणिस्तानपासून ते पार म्यानमापर्यंत एकसंध भारताचाच विस्तार होता. या भूभागाचे नंतर अनेक देशांमध्ये तुकडे झाले. या भूभागावर अगदी इसवी सनाच्या पूर्व कालखंडापासून एकात्मता नांदत होती. वैदिक धर्म, बौद्ध, जैन हे सर्व धर्म अतिशय शांततेने नांदत होते. त्याची वर्णने वेळोवेळी भारतात आलेल्या पर्यटकांनी केली आहेत. त्यांची टिपणेही आज उपलब्ध आहेत. त्यात अनेक ठिकाणी बौद्ध उत्सवामध्ये हिंदू किंवा जैन धर्मीयही सहभागी झाल्याची वर्णने आहेत किंवा िहदू अथवा जैनांच्या उत्सवांमध्ये बौद्धही सहभागी झालेले दिसतात. धर्म ही दोन माणसांमधील भिंत नव्हती, असा तो काळ होता. धर्म ही काही केवळ एकटय़ाशी निगडित अशी बाब नाही. म्हणजे ज्याने त्याने स्वत:चा धर्म स्वत:च निवडायचा असे असले तरी आपण आपला धर्म निवडत असताना, इतरांच्याही धर्मनिवडीचा हक्क तितक्याच मोकळेपणाने मान्यही करायचा असतो. आयुष्य जगण्याची धर्म ही जीवनपद्धती आहे याचाच विसर पडलेला दिसतो. केवळ भारतात आलेले पर्यटक आणि त्यांनी केलेल्या नोंदी यांचाच पुरावा नाही तर आपल्याकडे असलेली विविध धर्मीयांची लेणी हीदेखील त्याचा ढळढळीत पुरावा आहेत. या लेण्यांमधील शिलालेख वाचण्याचा प्रयत्न केला तर इसवी सनापूर्वी पहिल्या शतकापासून ते साधारणपणे सहाव्या शतकापर्यंतच्या शिलालेखांमध्ये असलेल्या वर्णनांमध्ये असे लक्षात येते की, बौद्ध लेणी खोदण्यासाठी अनेक ठिकाणी सर्वसामान्य हिंदू जनतेने किंवा हिंदू राजांनी मदत केली आहे. बौद्ध लेणींमध्ये झालेल्या उत्सवांना त्यांची हजेरीही असायची. त्यात त्यांना काहीही गर वाटायचे नाही. किंबहुना ती जीवनपद्धतीच होती त्या वेळची. जे बौद्ध लेण्यांच्या बाबतीत तेच हिंदू लेण्यांच्या बाबतीतही घडले आहे. सर्व धर्मामध्ये अतिशय उत्तम असा स्नेह असलेले वातावरण होते. आता मात्र आपण त्या परिस्थितीच्या अगदी विरुद्ध टोकावर उभे आहोत, जिथून केवळ कडेलोट होणेच बाकी आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्र वारीमय झालेला आहे. सर्वाना वेध लागले आहेत ते पंढरीच्या विठुरायाचे आणि आषाढी एकादशीचे. सध्या जगभरात जे काही सुरू आहे त्या पाश्र्वभूमीवर वारकरी संप्रदायाकडे पाहण्याचा प्रयत्न केला की ज्ञानदेवांचे महत्त्व अधोरेखित होते. ते खऱ्या अर्थाने त्या काळातील अभूतपूर्व असे क्रांतिकारक होते. वारकरी संप्रदायाच्या निमित्ताने त्यांनी त्या काळात अतिशय अवघड असलेला एक महासमन्वय घडवून आणला. ज्ञानदेवांच्या कालखंडाचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की, त्या वेळेस ज्ञानदेवांचे कार्यक्षेत्र असलेल्या समाजातील उच्चभ्रू वर्गामध्ये बौद्ध धर्म ठाण मांडून होता. तर सामान्यजनांमध्ये जैन धर्म होता. कष्टकरी समाज हा बहुसंख्येने जैन होता. त्याच वेळेस दक्षिण आणि पूर्वेकडून आक्रमक होत चाललेला शैव आणि वैष्णव संप्रदाय प्रचंड वेगात महाराष्ट्रात येऊन थडकला. मात्र ज्ञानदेव नावाच्या या महाक्रांतिकारकाने असा काही भन्नाट समन्वय घडवून आणला की, त्याचे कोडे आजही एकविसाव्या शतकात भल्याभल्यांना उलगडलेले नाही. वारकरी संप्रदायामध्ये शैव आणि वैष्णव यांचा अपूर्व मिलाफ पाहायला मिळतो. अगदी विठ्ठलाच्या मूर्तीमध्येही हा समन्वय पाहायला मिळतो. त्याच्या डोक्यावर असलेले शिविलग आणि त्याला वाहिली जाणारी तुळस हा शैव आणि वैष्णव सांप्रदायांचा अपूर्व असा मिलाफच आहे. त्याच्या वारीमध्येही शैव आणि वैष्णव दोन्ही दिंडींचा समावेश असतो. इतिहास असे सांगतो की, ज्या काळात हा समन्वय साधला गेला त्या काळात तो नसता झाला तर शैव आणि वैष्णवांचा संघर्ष देशभरात अनेक ठिकाणी झाला तसाच तो महाराष्ट्रातही झाला असता. पण महाराष्ट्रात रक्ताचा थेंबही न सांडता सारे परिवर्तन घडून आले. खरे तर इथली परिस्थिती अधिकच बिकट होती. स्वत: ज्ञानदेवांना पाश्र्वभूमी होती ती प्रसंगी अघोरी मानल्या गेलेल्या नाथ संप्रदायची. पण ज्ञानदेवांनी त्यांच्यासमोर आलेल्या सर्व धर्म-पंथ यांच्या घुसळणीतून बाहेर काढलेला मथितार्थ होतो तो शांतरसाचा. शांतरस ही ज्ञानदेवांची उभ्या महाराष्ट्राला मिळालेली अनोखी देणगी आहे. त्याच बळावर आजचा हा महाराष्ट्र उभा आहे. मात्र आपण ज्ञानदेवांना संतत्व बहाल करून फक्त त्यांची पूजा करतो आहोत. त्यांच्या पूजेबरोबरच महत्त्वाचे आहे ते त्यांच्या कर्तृत्वाची ऐतिहासिक दखल घेणे. केवळ कथित धार्मिकतेच्या आहारी न जाता ही दखल घ्यायला हवी. अन्यथा यातून कोणताही बोध न घेता ‘बोध.. गया!’ अशीच आपली स्थिती असेल!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा