नववधूने लग्नात करायच्या साजशृंगाराच्या कल्पना बदलत्या काळानुसार बदलत आहे. मराठमोळा शालू, अंगभर सोन्याचे लखलखीत दागिने यांच्याऐवजी आजच्या मुली आजच्या काळाशी सुसंगत पर्याय निवडायला लागल्या आहेत.

आजही मुलीचा जन्म झाल्यावर तिचे आईवडील तिच्या लग्नाची स्वप्नं रंगवू लागतात. मुलीचे लग्न हा तिच्या आईवडिलांसाठी फक्त एक दिवसाचा सोहळा नसतो तर त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाचे फलित असते. साहजिकच लग्नात मुलीच्या साजशृंगारालाही लग्नात अनन्यसाधारण महत्त्व असते. लग्नाची साडी ही प्रत्येक नववधूसाठी फार महत्त्वाची गोष्ट असते. तिच्या लग्नाच्या साडीला स्वत:चा खास इतिहास असतो. कधीकधी पिढीजात वारसाही त्याला लाभून जातो. मग अशा लग्नात एखादी आजी आपल्या होणाऱ्या सुनेला किंवा परक्या घरी जाणाऱ्या नातीला तिच्याकडे परंपरेने चालून आलेली एखादी साडी किंवा दागिना देते. मनात भावना एकच असते, आपल्या घरी येणाऱ्या लक्ष्मीला किंवा परक्याच्या घरात जाणाऱ्या आपल्या मुलीला तिच्या पूर्वजांच्या आशीर्वादाची शिदोरी लाभते. कदाचित याच कारणामुळे पिढय़ानपिढय़ा आपल्याकडील कारागीरसुद्धा मुलीचा लग्नाचा पेहराव बनवताना आपला संपूर्ण जीव ओततात. त्यामुळेच ना त्या साडीची वीण तुटता तुटते, ना त्या दागिन्याची चमक कधी कमी होते. आता या विषयावर बोलण्याचे कारण म्हणजे नुकतेच लग्नसराईचे मुहूर्त आले आहेत. त्यामुळे अर्थातच लग्नाच्या शॉपिंगची तयारी सुरू झाली असणार. म्हणूनच या भागात नवनधूच्या पेहरावात काय बदल झाले आहेत यावर एक नजर टाकूयात.
काळ बदलत जातो त्याबरोबर व्यक्ती आणि पर्यायाने समाजही बदलतो. आजची स्त्री ही तिच्या आई-आजीपेक्षा स्वभावात, व्यक्तिमत्त्वात आणि राहणीमानात पूर्णपणे वेगळी आहे. रोजच्या आयुष्यात हा बदल आपल्याला प्रकर्षांने जाणवतो. तोच बदल तिच्या लग्नाच्या पेहरावापर्यंत पोहोचल्याशिवाय राहूच शकत नाही. आजची स्त्री पूर्वीप्रमाणेच आपल्या लग्नाची स्वप्ने पाहते परंतु तिची ही स्वप्नं व्यावहारिक असतात. आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र झाल्यामुळे लग्नाच्या खर्चापासून प्रत्येक बाबतीत ती जाणीवपूर्वक लक्ष घालू लागलेली आहे. तिच्या लग्नाच्या पेहरावाबाबतच्या संकल्पनाही काळाबरोबर बदलू लागल्या आहेत.
मराठी मुलगी म्हणजे लग्नात शालूच पाहिजे किंवा पंजाबी लग्नात सलवार कमीजच घालतात, अशी सूत्रे हल्ली बदलू लागलेली आहेत. आज कित्येक लग्नांत रिसेप्शनला मराठी तरुणी शालूला पर्याय म्हणून घागरा-चोळी घालू लागल्या आहेत. अगदी पाच वर्षांपूर्वीपर्यंत लग्नाचा पोशाख निवडताना तरुणी आईवडील आणि नातेवाईक यांच्या पसंतीला प्राधान्य द्यायची. परंतु आता चित्र बदललंय. आता मुलगी आपल्या लग्नाच्या पेहरावाचा विचार करते तेव्हा तिच्या संकल्पना स्पष्ट असतात. इतरांना काय आवडतं यापेक्षा आपल्यावर काय चांगलं दिसेल याचा विचार ती आधी करते. त्याचबरोबर लग्नाची साडी खरेदी करताना पारंपरिक शालूवर वीस-तीस हजार खर्च करण्यापेक्षा तेवढेच पैसे गुंतवून डिझाइनर लेहेंगा-चोळी घेणं पसंत करते. कित्येक जणी लग्नात महागडी साडी विकत घेऊन ती वर्षांनुर्वष कपाटात ठेवून देण्यापेक्षा भाडय़ाने माफक पैसे देऊन साडी किंवा लेहेंगा-चोळी घेणं पसंत करतात. तसेच सध्या साडी, घागरा-चोळी, लहेंगा-चोळी अशा पारंपरिक प्रकारांना वगळून साडी गाऊन, शेरवानी, पायघोळ अनारकलीलादेखील पसंती देतात. कित्येक लग्नांत रिसेप्शनची थीम वेस्टर्न लुक असते, मग अशा वेळी वेस्टर्न गाऊनदेखील सर्रास वापरले जातात.
लग्नाची साडी किंवा लेहेंगा-चोळी म्हटलं की त्याचं वजन सहजपणे कित्येक किलो भरतं. त्या साडीच्या वजनात ती वधू दबली जाते. त्यात भरगच्च हार, हातभार बांगडय़ा, दोन किंवा तीन मोठ्ठी मंगळसूत्रे, चेहरा पांढराफिट्ट करणारा मेकअप आणि पायात अवघडून टाकणाऱ्या खडय़ांच्या चप्पल या सगळ्यात मूळ मुलगी कुठेतरी हरवून बसते आणि समोर दिसते ती म्हणजे नखशिखांत नटलेली बाहुली. यावर पर्याय म्हणून हल्ली कटवर्क, पॅचवर्क एम्ब्रॉयडरीला प्राधान्य मिळालं आहे. घागऱ्याचा घेर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच साडीमध्ये विविध रंगांचा कल्पकतेने वापर करून एम्ब्रॉयडरीची कसर तिथे भरून काढताना दिसतात. हल्ली ब्लाउज किंवा चोळीच्या नेकलाइनवर एम्ब्रॉयडरी करून गळ्यातील हार किंवा नेकलेसला दिलेली रजा पाहायला मिळते.
लाल, नारंगी, पिवळा, सोनेरी रंग आणि लग्न यांचा नकळत संबंध जोडला जातो. या संकल्पनेला छेद देत फिक्कट गुलाबी, बदामी, फिक्कट हिरवा किंवा निळ्या अशा इंग्लिश रंगांचा वापरही होऊ लागला आहे. सफेद रंगाचा वापरही ब्राइडल कलेक्शनमध्ये दिसतोय. तसेच लग्नात सोन्याच्या दागिन्यांची जागा हिऱ्याचे दागिनेही घेऊ लागले आहेत, त्यामुळे सोनेरी रंगाशी असलेली नाळ तोडून ब्राइडल कलेक्शन चंदेरी रंगांचा वापरही करू लागलेत.

सध्या कित्येक जणी साडी, घागरा-चोळी, लेहेंगा-चोळी अशा पारंपरिक प्रकारांना वगळून साडी गाऊन, शेरवानी, पायघोळ अनारकलीलादेखील पसंती देतात.

तसे पाहिल्यास नववधू आणि कॉटन हे थोडे विजोड समीकरण आहे. लग्न म्हणजे भव्यता, झगमगीतपणा. कॉटनमध्ये ती भव्यता आणि झगमगीतपणा आणणे खूप कठीण असते. त्यामुळे लग्नात कॉटन कपडय़ाचा वापर अंतरपाट सोडल्यास इतर कुठेही केला जात नाही. परंतु हल्ली चित्र बदललंय, मूळ लग्नात नाही, पण लग्नाआधीच्या संगीत, हळदीसारख्या सोहळ्यात कॉटनचा वापर करण्यास तरुणी प्राधान्य देऊ लागल्या आहेत. मलमल, लिनन यांसारख्या फॅब्रिक्स त्यांच्यातील सुटसुटीतपणामुळे लग्नाच्या पेहरावात वापरले जाऊ लागले आहेत. तसेच वजनाने हलके असल्यामुळे कॉटनचा घेरेदार लेहेंगा घालण्यासही सोयीचा ठरतो. सध्या वेल्व्हेटचा वापरही ब्राइडल वेअरमध्ये वाढू लागला आहे. मलमलसोबत वेल्वेटचा मेळ घातलेला सध्या पाहायला मिळतो. काही काळासाठी नेट, शिफॉन, जॉर्जेट हे फॅब्रिक्स ब्राइडल वेअरमध्ये मोठय़ा प्रमाणात वापरले जात होते. परंतु कित्येकदा उन्हाळ्यात घालण्यास सोयीचे नसल्यामुळे त्यांची जागा सिल्क फॅब्रिक्सनी घेतली. सिल्क, ब्रोकेड फॅब्रिक्सवर केल्या जाणाऱ्या हातमागाच्या नक्षीमूळे साडीला किंवा लेहेंग्याला आपसूक भरजडीतपणा मिळतो आणि पर्यायाने एम्ब्रॉयडरीचे वजन टाळता येते.
लग्न म्हणजे सोन्याचे दागिने ही संकल्पना मागे पडू लागली आहे. हल्ली तरुणी पिवळ्याधम्मक सोन्याच्या दागिन्यापेक्षा २२ कॅरेट अॅन्टिक सोन्याच्या लुकला पसंती देत आहेत. या दागिन्यांमध्ये सोन्याबरोबर रंगीत खडे, मोती यांचा वापर केल्यामुळे ते इतर वेळेस वापरण्यास सोयीचे ठरतात. तसेच अनेकजणी सोन्याऐवजी प्लॅटिनम आणि हिऱ्याच्या दागिन्यांना पसंती देऊ लागल्या आहेत. तसेच व्हाइट गोल्डचा दागिन्यातील वापर वाढलेला आहे. तसेच नेहमीचा हार, बांगडय़ा, तोडे, पाटल्या या प्रकारांबरोबरच कमरबंध, मांगटिक्का, बाजुबंद यांनाही पसंती मिळू लागली आहे. तसेच हार नुसता गळ्यात घालण्याऐवजी कलात्मकरीत्या केसात माळून हेअरस्टाइलचा प्रकार केला जातो.
थोडक्यात बदलत्या मोसमाच्या बदलत्या वाऱ्यानुसार लग्नातील नववधूच्या पेहरावाच्या संकल्पना जरी बदलल्या असल्या तरी त्या दिवसाचे तिच्यासाठी असलेले महत्त्व हे अबाधित आहे. फक्त त्या दिवशी संपूर्ण सोहळ्याच्या केंद्रभागी राहून स्वत:चे मीपण जपण्याचा प्रयत्न ती तिच्या पोशाखातून करू लागलेली आहे.

Story img Loader