काही वनस्पतींची पाने त्यांच्या फुलांपेक्षा सुंदर दिसतात. कॅलाडियम ही असलीच एक वनस्पती आहे की, जिची फुले बिलकूल आकर्षक नसतात. आजकाल नर्सरींमधून कॅलाडियमचे अनेक प्रकार उपलब्ध असतात. अळूच्या पानांसारखा आकार असणाऱ्या या वनस्पतींची पाने अनेक रंगांची असतात. अनेक रंग पानांवर शिंपडल्याप्रमाणे प्रकार आढळतात. कॅलाडियम ही वनस्पती अळूच्याच कुळातील आहे. कॅलाडियमलाही अळूच्या कंदासारखे कंद जमिनीमध्ये असतात. हे कंद म्हणजेच कॅलाडियम/अळूची खोडे असतात. जमिनीबाहेर फक्त उंच देठावर पाने दिसतात. फुलेही अधूनमधून धरत असतात. साधारण अँथुरियमच्या फुलांप्रमाणेच कॅलाडियमच्या फुलांची रचना असली तरी, त्या फुलांना शोभा नसते. कॅलाडियम, अँथुरियम, अळू, मनीप्लांट या सर्व एकाच (Araceaea) कुळातील वनस्पती.
कॅलाडियमची लागवड करण्यास त्यांची रोपे किंवा कंदही नर्सरींमधून किंवा बीज विक्रेत्यांकडे मिळतात. एक मात्र लक्षात ठेवावे, हिवाळ्यात कॅलाडियमच्या काही जाती सुप्तावस्थेत जातात. म्हणून कंद विकत घेतले तर त्यांना आपोआप कोंब फुटल्याशिवाय ते मातीत लावू नयेत. साधारण तीन ते चार महिन्यांची सुप्तावस्था संपली की नंतरच त्यांना कोंब फुटतात. सुप्तावस्था संपण्याआधीच कंद लावून त्यांना पाणी घालत राहिल्यास कंद कुजण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच तरारलेल्या रोपाची पाने आपोआप मरगळत गेली आणि नवी पाने फुटणे थांबले तर ते सुप्तावस्थेत जाण्याचे लक्षण समजावे. अशा स्थितीत त्यांचे पाणी हळू हळू कमी करत सर्व पाने सुकल्यानंतर पाणी देणे बंद करावे. तीन ते चार महिन्यांत कंदांची सुप्तावस्था संपली की कंदास परत फुटवा येतो. सुप्तावस्थेतील कंद मातीबाहेर काढून परत कोंब फुटेपर्यंत ते कोरडय़ा व शीतल जागी साठवून ठेवू शकतो. कंदांना सुप्तावस्था येते हे माहीत नसल्याने, काही जणांना असे वाटणे शक्य असते की आपले रोप मरून गेले आहे. कॅलाडियम बहुवर्षांयू असून एका कंदापासून अनेक कंद फुटत जातात. म्हणून कॅलाडियमची अभिवृद्धीही मुख्य कंदापासून नव्याने फुटलेल्या कंदांपासूनच करावी लागते.
कॅलाडियमला दमट वातावरण जास्त मानवते. कोरडय़ा हवामानात पानांच्या कडा सुकल्यासारख्या होत जाऊन या रोपाची रयाच निघून जाते. ही वनस्पती घरातील बागेमध्येही ठेवण्यास चांगली असली तरीही तिला वातानुकूलित गारवा जराही मानवत नाही; कारण वातानुकूलित खोलीतील हवा अत्यंत कोरडी असते. तसेच जास्त जोराचा वारा असलेल्या ठिकाणी कॅलाडियम ठेवल्यास मोठी पाने फडफडून फाटण्याची शक्यता असते. कॅलाडियमचे शास्त्रीय नाव आहे Caladium hortulanum. त्यांच्या हृदयाकृती पानांवर लाल डाग असल्याने, त्यांना ब्लीडिंग हार्ट्स असेही म्हणतात. कॅलाडियमची छोटय़ा पानांचीही एक जात आहे. तिचे शास्त्रीय नाव आहे Caladium humboldtii. या जातीची पाने हिरवी असून त्यांवर फक्त पांढरेच शिंतोडे असतात.
नंदन कलबाग