चौदाव्या शतकात कोलंबसकडून अमेरिकेचा शोध लागल्यावर युरोपातील वेगवेगळ्या देशांतून झुंडीच्या झुंडी तेथे वेगवेगळ्या भागांत म्हणजे फ्लोरिडा, फिलाडेल्फीया, न्यूयॉर्क, डेलावर येथे वसाहती करून राहू लागल्या. अशा तेरा वसाहती होत्या. पुढे या वसाहती व ब्रिटन यांच्यात लढाई होऊन अमेरिकेचा जन्म झाला. अवाढव्य अमेरिकेत लेक सुपीरिअर, मिशिगन, ओंटारिओ, ताहो, लिनीअर असे मोठमोठे लेक्स आहेत. अठराव्या शतकात अमेरिका व ब्रिटन यांच्यामधे कुबेक कराराद्वारे लेक्सच्या दक्षिणेकडील भाग अमेरिकेत व उत्तरेकडील भाग ब्रिटिशांकडे राहिला तोच कॅनडा देश. व्हिक्टोरिआ राणी हिच्या आधिपत्याखाली असलेला हा भाग साहजिकच कॉमन वेल्थ कंट्रीज्मध्ये सहभागी झाला. पुढे १९व्या शतकात कॅनडा हे स्वतंत्र राष्ट्र घोषित केले गेले.
कॅनडा हे जरी नॉर्थ अमेरिका आहे असे म्हटले तरीही त्याचा विस्तारच खुद्द अमेरिकेपेक्षा मोठा आहे. जगात सर्वात मोठय़ा, प्रचंड विस्ताराच्या देशात रशियाखालोखाल त्याचा क्रम आहे. ओंटारिओ, मॅनिटोबा, कुबेक, आलबर्टा, न्यू-फाऊंडलंड, ब्रिटिश कोलंबिया, सॅस्केचवान, प्रिन्स एडवर्ड, नोव्हास्कोशिआ असे १० विभाग, ६ टाइम झोन्स व नॉर्थवेस्ट, युकान, नुनवत् प्रादेशिक सत्ता असलेला हा देश प्रचंड मोठा आहे. ओंटारिओ, कुबेक माँट्रिअल, सॅस्केचवान, न्यू ब्रन्सविक, मॅनिटोबा अशा आणि ज्या भागांत फ्रेंच-प्राधान्य होते, तेथे अजूनही फ्रेंच भाषेवरच जोर आहे. युरोपिअन लोकांच्या प्रवेशाअगोदर हजारो वर्षांपूर्वीपासून तेथे राहत असलेली सानिच जमात, जी इंडियन म्हटली जात असे, ही पुढे फर्स्ट नॅशनल्स म्हणूनच ओळखली गेली.
कॅनडाचा व्हँकुव्हर आयलंडचा परिसर देशाच्या पश्चिमेला, अमेरिकेच्या ओरेगन व वॉशिंग्टन स्टेटच्या बरोबरीने पॅसिफिक महासागराच्या पश्चिम किनाऱ्यावरचं बेट आहे. युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका हे इंग्लिश, फ्रेंच, स्पॅनिश, पोर्तुगीज अशा वेगवेगळ्या देशांतील लोकांनी येऊन स्थापन केलेला देश. सुस हवामान असलेल्या आयलंडवर हळूहळू युरोपिअन नागरिकांची वस्ती होऊ लागली. १९व्या शतकाच्या मध्यावर व्हिक्टोरिआ राणीने या परिसरात प्रामुख्याने इंग्रज वसाहत करण्याचे ठरविले. सानिच लोकांच्या जागांवर बळजबरीने केलेल्या नॉर्थ अमेरिकेतील या भागाला ब्रिटिश कोलंबिआ असे म्हटले गेले; परंतु पॅसिफिकचा पश्चिम किनारा व ऑलिम्पिक माऊंटन रेंजेसमुळे सदा उबदार हवामान, हिरवळ, फळंफुलं भरपूर असलेल्या या भागात ब्रिटिशांनी आपले पार्लमेंट हाऊस बांधले व शहराला राणी व्हिक्टोरिआचे नाव दिले. हे शहर ब्रिटिश कोलंबिआची राजधानी आहे.
व्हिक्टोरिआ येथे पायी किंवा सायकलने फिरण्यात जास्त मजा आहे. कॅनडाच्या कोणत्याही शहरापेक्षा येथे सायकलनेने फिरण्याचे मार्ग जास्त आहेत. पण आपल्यासारख्या पर्यटकांना फिरायचे असल्यास ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ हा बसचा पर्याय अतिशय सोयीचा आहे. या बसची फेरी तासाभराची असते व तिकीट दिवसभर चालू शकते. त्यामुळे पहिल्या फेरीत सर्व जागा पाहून कुठे परत यायचे हे आपण ठरवू शकतो. पुढील फेरीत इच्छित ठिकाणी उतरून फिरल्यावर परत बसमध्ये चढू शकतो. व्हिक्टोरिआ राणीच्या कारकीर्दीत बांधलेली पार्लमेंट हाऊस इमारत पाहण्यासारखी आहे. खास इंग्लिश शैलीची प्रशस्त बांधणी, घुमटाकार मनोरे असलेली ही इमारत समुद्रकिनारीच आहे. लॉनच्या हिरवळीवर व्हिक्टोरिआ राणीचा सोनेरी मुकुट घातलेला पुतळा हातात दंडुका घेऊन राखण करीत असल्यासारखाच वाटतो. शेजारी तेवढेच जुने पण चांगले १०० फूट उंचीचे ख्रिसमस ट्री आहे. नाताळात हे झाड सजवण्यासाठी महिन्याभराचा अवधी लागतो.
ज्याप्रमाणे बान्फ, कॅनेडिअन रॉकीज येथे जुन्या जमान्यातले बान्फ स्प्रिंग हॉटेल आहे तसेच इथेही फेरीअर माँट एम्प्रेस हॉटेल आहे. ट्रान्स पॅसिफिक हायवे बांधणीच्यावेळी व्हिक्टोरिआ हे शेवटचे बंदर होते. तेथे बोटीतून येणाऱ्या पर्यटकांसाठी थोडी विश्रांती, राहण्याची सोय व्हावी म्हणून हॉटेल बांधले गेले. जसे बान्फ स्प्रिंग हॉटेलमधून रॉकीजचे नयनरम्य दृश्य दिसते, तसेच या हॉटेलमध्ये सर्वच ठिकाणाहून समुद्रकिनारा, तेथील रस्त्यावरील वर्दळ दिसते. त्याच्या भरीला आतील उंची सजावट, जुन्या चित्रांच्या तसबिरी आतल्या इंटिरीअरला उठाव देतात.
कॅनेडिअन रेल्वे बांधकामाच्या वेळेस चीनमधून थोडे कामगार आणले होते, ते आता तेथे स्थायिक होऊन त्यांची चायना टाऊन म्हणून बरीच मोठी वसाहत झाली आहे. कॅनडाच्या वेगवेगळ्या भागांत चायना टाऊनस् आहेतच. त्या वेळी त्यांचा व्यापार तीनच फूट रुंद अशा फॅन टॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या बोळात चालत असे व अजूनही चालतो. आता जरी मोठय़ा प्रमाणात चायनीज मार्केटस् असली तरीही फॅनटॅन अॅली ही कुतूहल म्हणून आवर्जून पाहिली जाते. चायनीज लोकसंख्या मोठय़ा प्रमाणावर असल्याने त्यांच्यासाठी चर्च, मुलांना संस्कृती समजण्यासाठी शाळा, शिवाय चायनीज टी गार्डन आहे. येथे संध्याकाळी सांस्कृतिक व चहापान असा कार्यक्रम असतो.
केडरॉक कॅसल हा भव्य ३९ खोल्यांचा प्रासाद वल्र्ड हेरिटेज मानांकित आहे. कोळसा खाणीचे मालक डंमीर यांनी १८८० बांधलेल्या प्रासादासाठी ५,००,००० डॉलर्स एवढी रक्कम खर्चली होती. येथील स्टेन्ड ग्लास खास बेल्जियम येथून आणल्या होत्या तर सॅन फ्रान्सिस्को येथून आणलेल्या ओक लाकडाचा पायऱ्या व इतर लाकडी कामासाठी वापर केलेला आहे. त्या सर्व ३९ खोल्या आपण तासाभरात पाहू शकत नाही, पण खास खोल्या पाहू शकतो. २०व्या शतकाच्या सुरुवातीला कॅप्टन कुक येथे आला होता, चुकीच्या अंदाजाने टाकलेला नांगर उथळ किनाऱ्यात अडकला त्याला तिथून पुढे जाता येईना. त्या भागाला कुक आयलंड असे म्हटले जाते. नैसर्गिकदृष्टय़ा परिपूर्ण असलेल्या या जागेवर सुंदर वास्तू, नॅशनल पार्कस्, चर्चेस्, म्युझियम्स बरेच पाहण्यासारखे आहे.
‘हॉप ऑन हॉप ऑफ’ची दिवसभराची रपेट करून संध्याकाळी फिशरमनस् वार्फ येथून रम्य असा सूर्यास्त पाहत शीण नक्कीच जातो. जसा अंधार पडत जातो, तसा हा परिसर लुकलुकत्या दिव्यांनी चमकणारे व्हिक्टोरिअन पार्लमेंट हाऊस व फेरीअर माँट हॉटेल पाहण्यासाठी भरपूर मंडळी असतातच. शिवाय खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी लहानमोठे ढाबे, करामती करणारे विदूषक किनारा रम्य करण्यात हातभार लावतातच, पण येथील जगप्रसिद्ध बुचार्ट गार्डनला भेट दिल्याशिवाय व्हिक्टोरिआ ट्रिप पूर्ण म्हटली जाणार नाही.
बुचार्ट गार्डन्सला जाताना तिथपासून दहा मिनिटांच्या अंतरावर छान बटरफ्लाय गार्डन आहे. या थंड प्रदेशात ग्लास हाऊसमध्ये ऊष्ण कटिबंधीय वातावरण निर्माण करून रंगीबेरंगी फुलपाखरं, लहानमोठे पक्षी ठेवलेले आहेत. गेल्या गेल्या आपले स्वागत होते ते कॅरेबिअन देशातल्या फ्लेमिंगोजनी. त्यांच्या बरोबर कोई मासे, कासव स्वच्छंद फिरत असतात. अगदी बोटाच्या पेराएवढी गोल्डन हेलीकॉन, ग्रीनॅमास पीकॉक, स्कारलेट मरमॉनपासून ते पसाभर रुंदीची जायंट आऊल, जायंट अॅटलास मॉस, नुसती घिरटय़ा मारत असतात. कधी आपल्या डोक्यावर तर कधी कॅमेरावर, तर कधी खांद्यावर येऊन बसतात. पण इतकी चपळ की, हात जवळ गेला तर उडालीच समजा. रेन फॉरेस्टमध्ये अॅमेझॉन पोपट, इक्लेक्टस्, झेब्रा फिंच, तिथली फळंफुलं लहानमोठे धबधबे, क्षणभर आपण तिथेच आहोत असं वाटतं.
१८५०मध्ये ओंटारिओ स्थित स्कॉटिश जोडपे रॉबर्ट व जेनी बुचार्टस् हे व्हँकुव्हर आयलंडच्या पश्चिम किनारी, व्हिक्टोरिआ नजदीक ब्रेंटवूड बे या ठिकाणी आले. ओंटारिओ येथे त्यांची सिमेंटची फॅक्टरी होती. पण सिमेंट तयार करायला चुनखडीची जरुरी असते व वरील जागी चुनखडी भरपूर असल्याने त्यांनी येथे चुन्याची खाण सुरू केली. त्या जागी उंचवटय़ावर आपले घर बांधून स्वत:ची छोटीशी बाग केली. काही वर्षांनी त्यांचे जपानी मित्र, येशिदा, जे बागकामात निष्णात होते, त्यांनी तेथील जागा पाहून जेनीला टी-गार्डन करण्यास सुचवले. जात्याच बागबगीच्यांची आवड असणाऱ्या जेनीने त्यावर काम सुरू केले. त्यानंतर जेनीचा मित्रपरिवार बाग पाहायला येत असे, पण तिची अट होती की, टी गार्डन पाहायला यायचे तर तर चहा घेऊनच गेले पाहिजे.
खाणीतील चुन्याचे उत्पन्न कमी झाल्यावर त्या ठिकाणी दलदलीच्या जागेत संकन गार्डन साकार झाले. त्या गार्डनची सुरेख आखणी कॅनडा व अमेरिका येथील हॉर्टिकल्चरिस्ट यांच्याकडून झाली. त्या ठिकाणी रॉस फाऊंटन, डान्सिंग फाऊंटन आले. पूर्वीच्या खाणीचा खांब व त्यासाठी लागणारी अवजारे एका बाजूला ठेवलेली आहेत. पर्यटकांचा ओघ पाहून किचन गार्डनचे रोझ गार्डन, तर टेनिस कोर्टचे इटालिअन गार्डन, जरा खाली जापनीज गार्डन आले. जेनीबाईंना फुलझाडांची आवड, तर रॉबर्टसाहेबांना पक्षी व प्राणी संग्रह करायची आवड. जगाच्या पाठीवर फिरून काही प्राण्यांचा संग्रह केला. घरात पोपट, चिमण्यांचे वास्तव्य, तर स्टारपाँडमध्ये बदकं मस्त विहार करत असतात. आता लहानग्यांच्या करमणुकीसाठी एक कोपरा आहे. गार्डनचा विस्तार प्रचंड असल्याने वयस्क नागरिकांसाठी लहानशी बग्गी आहे.
इथला सर्व कारभार बुचार्ट कुटुंबच पाहत आहे. आताच्या घटकेला त्यांची पणती रॉबीन ली क्लर्क ही व्यवस्था पाहते. बुचार्ट गार्डनमध्ये वर्षभराच्या कार्यक्रमांचे आयोजन असते. जून ते सप्टेंबर हा फुलांचा मोसम, संध्याकाळ दिव्यांच्या रोषणाईने झगमते. लेबर डेच्या दिवशी रात्री आतषबाजी जोरात चालते. थंडीत त्या वेळची फुलं, नाताळचे कार्यक्रम असा भरगच्च कार्यक्रम असतो. प्रत्येक मोसमात वेगवेगळे सौंदर्य व त्या वेळेची मजा करायची तर आपल्या भेटीत बुचार्ट गार्डनची ट्रिप झालीच पाहिजे.
गौरी बोरकर – response.lokprabha@expressindia.com
गार्डन सिटी व्हिक्टोरिआ
चौदाव्या शतकात कोलंबसकडून अमेरिकेचा शोध लागल्यावर युरोपातील वेगवेगळ्या देशांतून झुंडीच्या झुंडी तेथे वेगवेगळ्या भागांत म्हणजे फ्लोरिडा, फिलाडेल्फीया, न्यूयॉर्क, डेलावर येथे वसाहती करून राहू लागल्या.
आणखी वाचा
First published on: 19-06-2015 at 01:04 IST
मराठीतील सर्व पर्यटन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Canada garden city victoria