मध्यंतर
आवडणाऱ्या क्षेत्रात करियर करायला संधी मिळाली नाही आणि न आवडणाऱ्या क्षेत्रात अडकून पडावं लागतंय म्हणून रुखरुखणारे बरेच जण असतात. पण आता काळ बदललाय. तुम्हाला हवं तर तुम्ही चाळिशीतही करियर बदलू शकता.
‘ऐ दिल मुझे बता दे..’
या गाण्याचे संगीतकार मदनमोहन आधी वडिलांच्या इच्छेखातर आर्मीत गेले होते. तिथे ते दोन-तीन वर्षांतच लेफ्टनंटही झाले. पण त्याच काळात त्यांना ‘दिल किस पे आ गया है’चं उत्तर मिळालं; त्यांचं संगीतावरचं खरं प्रेम जाणवलं. म्हणून ४५ साली त्यांनी आर्मीतली यशस्वी कारकीर्द सोडली आणि ते उपाशीपोटी गाण्यांना चाली लावत राहिले. चित्रपटसृष्टीत येऊन पोटभर चाली लावल्यावरच त्यांना ‘मिल गयी मंझिल मुझे’ हे पटलं.
जीवनाच्या रुळांचे मध्येच असे सांधे बदलणं; आपल्या स्वप्नाचा ध्यास घेऊन, सुखाचा जीव दु:खात घालून खऱ्या आनंदाचा शोध घेणं सोपं नसतं. तसा ध्यास घ्यायचं स्वातंत्र्य विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातच मिळालं! एकोणिसाव्या शतकापर्यंत भारतीय समाज चातुर्वण्र्याच्या चाकोरीत चालत होता. पिढीजात धंदा सोडून दुसरं काम करणं हे पाप होतं. भिक्षुकी ब्राह्मणपुत्रांनीच करावी आणि शेतकऱ्याच्या मुलाने नांगरच धरावा असा दंडक होता. रामायणात शम्बुक नावाच्या शूद्राची गोष्ट आहे : ‘शम्बुकाने ब्राह्मणासारखं तपाचरण केलं. त्याच्या त्या पापाचा परिणाम म्हणून एका ब्राह्मणाचा मुलगा मृत्यू पावला. त्या पापक्षालनासाठी रामाला शम्बुकाचा वध करावा लागला.’ जातीच्या मिराशीबाहेरचं काम पत्करताना त्या उदाहरणाचा प्रत्येकाला धाक वाटत असे.
विसाव्या शतकात औद्योगिक क्रांतीने समाजाचं स्वरूपच बदलून टाकलं. गावातून शहरात, शहरातून परदेशात लोकांचे लोंढे लोटले; चातुर्वण्र्याची चारखांबी व्यवस्था कोलमडली. नव्या शिक्षणाची दारं सगळ्यांना खुली झालेली होतीच. कुणीही काहीही करायला मोकळं झालं. लोकांना एकाच व्यवसायाच्या जन्मठेपेतून मुक्ती मिळाली.
त्या शतकाच्या शेवटी तर संगणक, टीव्ही, इंटरनेट, अ‍ॅनिमेशन, व्हिडीयो गेम्स, माहिती तंत्रज्ञान यांनी नवलाईच्या व्यवसायांची कित्येक दालनं उघडली. ब्युटिशियन, इंटीरियर डिझायनिंग, हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रांचीही भरभराट झाली. शिवणकाम, स्वयंपाक यांना ड्रेस-डिझायनिंग, केटरिंग या नावांनी ग्लॅमर प्राप्त झालं. क्रिकेट, फुटबॉलसारख्या खेळांना सोन्याचे दिवस आले. ओढगस्तीच्या काळासाठी कॉल-सेंटरसारखे हमखास पोट भरायचे मार्गही निर्माण झाले. नौकरी डॉट कॉमसारखी संकेतस्थळं दिमतीला असल्यामुळे आपल्यासाठीच बेतलेला व्यवसाय हुडकून काढणं सोपं झालं. सतत बदल, स्थित्यंतर हाच जगाचा स्थायीभाव झाला.
त्यामुळे त्या काळात अनेकांनी आपल्या मनाची साद ऐकून वहिवाट सोडली आणि नव्याच बिकट वाटेवर चालायची हिंमत दाखवली. इंजिनीयर झाल्यावर एमबीए करणं ही तर नवी वहिवाटच झाली. काही जणांनी शहर किंवा देश बदलताना मनाजोगता पेशा निवडायची संधी साधली. लग्नानंतर महिलांनी समाधानकारक, पण कमी वेळखाऊ कामं निवडली. क्रिकेट, नृत्य, सिनेमा यांच्यासारख्या, तरुणाईच्या क्षेत्रांत ज्यांना उमेदीच्या वयातच निवृत्ती पत्करावी लागली त्यांना आपल्या मर्जीनुसार ‘काही तरी नवेच’ करायला वाव मिळाला. संगणकबाप्पाच्या आंतरराष्ट्रीय योजकतेमुळे ‘जो जे वांच्छील तो ते लाहो’ अशी अवस्था झाली.
पण तरीही न आवडणाऱ्या नोकरीत झिजून आयुष्य फुकट घालवणारे लोक सध्याच्या जगात कमी नाहीत! ‘हे काम आवडत नाही. पण नवं काम झेपेल का? आणि समजा झेपलं तरी ते नक्की आवडेल का? खडखडत का असेना, नीट रस्त्यावरून चाललेलं गाडं मुद्दाम खड्डय़ात कशाला घालायचं?’ ही त्यांची नकारात्मक मानसिकता त्यांना रुळलेल्या चाकोरीतून बाहेर पडू देत नाही.
एक पाश्चात्त्य रूपककथा आहे :  ‘एका बेडकाला उकळत्या पाण्याच्या टोपात टाकलं तेव्हा तो तत्काळ उडी मारून टोपाबाहेर पडला. पण जेव्हा त्याला गार पाण्याच्या टोपात ठेवून ते पाणी हळूहळू तापवलं तेव्हा तो परिस्थितीशी जमवून घेत ती उष्णता सोसत राहिला. जेव्हा पाणी कडकडीत झालं तेव्हाच तो उडी मारायला तयार झाला. पण तोवर त्याची सारी ताकद सोसण्यात खर्ची पडली होती! त्याला उडी जमलीच नाही!’  याच ‘टोपमंडूकवृत्ती’ने अनेक लोक मनाविरुद्ध पत्करलेल्या व्यवसायाचं अवजड जोखड मानेवर तोलत आयुष्याचा गाडा रेटतात. शेवटी मान मोडते आणि आवडीच्या व्यवसायाचं विमान उडवायचं राहूनच जातं.

मनाविरुद्ध पत्करलेल्या व्यवसायाचं अवजड जोखड मानेवर तोलत आयुष्याचा गाडा रेटतात. शेवटी मान मोडते आणि आवडीच्या व्यवसायाचं विमान उडवायचं राहूनच जातं.

शिजवणं-खिलवणं हा नितीनचा लहानपणापासूनचा छंद होता. पण परीक्षेत उत्तम मार्क मिळवणाऱ्या मुलाने डॉक्टर-इंजिनीयरच व्हावं ही आईवडिलांची अपेक्षा होती. त्याने आचारी होणं आचारसंहितेत बसत नव्हतं. पठडीप्रमाणे इंजिनीयरिंगनंतर एमबीए करून नोकरीला लागेतो पंचविशी उलटली होती. मग फायनान्स-फर्ममधलं काम मिळालं होतं; सहकारी मनमिळाऊ होते; नंतर मॅनेजर म्हणून पगारही गलेलठ्ठ होता. तरीदेखील त्याला ते सगळं सुख खुपत होतं. त्याला सतत थकवा येई; गळून गेल्यासारखं वाटे. कामात मन लागत नसे. जगणं अर्थशून्य वाटे. न आवडणाऱ्या कामाशी झुंजताना त्याची सगळी ताकद खर्ची पडत होती. आणि ‘मरगळली मोलाची वर्षे; जॉबच का नच बदलावा’ हे मनात खदखदत होतं.
पण पस्तिशीत अननुभवी नवशिक्या म्हणून केटरिंगच्या करियरचा डोंगर पायथ्यापासून चढायला कष्ट पडणार होते. ‘सोडून दिली तीच वाट पुन्हा पुन्हा दिसत’ राहणार होती. इथल्या अनुभवाच्या जोरावर सहज मिळू शकली असती ती सीईओ वगैरे उच्चपदं मनात रुंजी घालणार होती. ती विसरणं आणि मॅनेजरपणाच्या मुकुटाचा माज डोक्यातून साफ धुऊन काढणं अत्यावश्यक होतं. ध्यासापोटी तेवढं जमलंही असतं. पण सुखवस्तूपणात रुळलेल्या कुटुंबाचा जमाखर्च, मुलांची अपेक्षित शाळा-कॉलेजं सांभाळून स्वत:चं नवं शिक्षण घेणं, तुटपुंज्या पगारात भागवणं कठीण जाणार होतं.
शेवटी त्याने बायकोला विश्वासात घेतलं. तिच्या, ‘मी आहे’ या आश्वासनावर विसंबून त्याने निर्धास्तपणे नोकरीचा राजीनामा दिला; केटरिंगचे कोर्सेस केले आणि सरळ एका मोठय़ा हॉटेलात नवशिक्या म्हणून लागला. आवडत्या कामात झोकून दिल्यावर नितीनचा प्रत्येक क्षण नवं शिकण्यात सत्कारणी लागला; त्यामुळे बढत्याही लवकर मिळाल्या. आता त्याचं स्वत:चं रेस्टॉरंट जोरात चाललं आहे. कुटुंबासहित तो त्याचं रसभरीत आयुष्य चवीने जगतो आहे.
काही जण एका करियरमध्ये मजा येत असतानाही अधिक आवडणाऱ्या दुसऱ्या क्षेत्राकडे खेचले जातात. प्रज्ञाने मोठय़ा आनंदाने जेनेटिक्समध्ये पीएच.डी. केलं. परदेशीच्या एका तालेवार युनिव्हर्सिटीत तिला संशोधनाची संधी मिळाली. तिथल्या व्हिसाची वाट बघत असताना तिने कार्यबाहुल्यामुळे गांजलेल्या एका सीएच्या हाताखाली गंमत म्हणून काम केलं आणि तिला त्या कामाची झिंग चढली! जेनेटिक्स, संशोधन सारं विसरून तिने सीएचा पाठपुरावा केला. क्षेत्र पूर्ण वेगळं असूनही त्यात प्रज्ञाला जन्मांतरीच्या प्रीतिखुणा पटल्या! हल्ली तो सीए तिच्या हाताखाली काम करतो.  
सगळ्याच कहाण्या अशा सुखान्त नसतात. अकाऊंटंट प्रशांतने व्यवसाय सोडून, तीन र्वष पूर्णवेळ खर्ची घालून, तन-मन-धन ओतून सर्वागसुंदर मराठी सिनेमा काढला. पण व्यावसायिक अज्ञानामुळे तो बॉक्स ऑफिसवर आपटला. मोठं नुकसान झालं. शर्थीच्या प्रयत्नांनंतर प्रशांत पुन्हा अकाऊंटंट म्हणून यशस्वी झाला. त्या अपयशातून त्याला अनेक धडे मिळाले. त्याच्यासारख्या चुका इतर कुणी करू नयेत, म्हणून तो आता लोकांना वेळीच सावध करतो.
असं दुसऱ्याच्या अनुभवावरून शिकता येतंच, पण व्यवसाय बदलण्यापूर्वी खास मानसशास्त्रीय सल्लाही घेता येतो. खरं तर आपला ओढा कुठल्या व्यवसायाकडे आहे; कुठलं काम आपल्याला झपाटून टाकेल हे ठरवणाऱ्या शास्त्रोक्त प्रश्नावली म्हणजे अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट्सही असतात. आपल्याकडे मॅनेजमेंटची एन्ट्रन्स परीक्षाही तशीच असते. तिच्यात निवडला जात नाही तो बुद्धीने कमी नसतो. फक्त त्याला त्या व्यवसायाची खरी आवड नसते! मुंबई-पुण्यात अशा चाचण्या करणाऱ्या काही संस्था आहेत. इंटरनेटवरही त्या चाचण्या देता येतात. त्यांच्यातल्या एकीचं नाव ‘सो कॅन यू’ किंवा ‘सोकानू’ आहे.. आयुष्याचं तारू नव्या दिशेला वळवताना मदत करणारं सुकाणूच ते! अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट्स वयाच्या चौदाव्या वर्षांपासून करून घेता येतात. त्या त्याच वेळी केल्या तर सुरुवातीपासूनच नेमकी वाट निवडता येते. मग चुकीच्या वाटेवर चालून कष्ट आणि वेळ वाया जात नाहीत. पण चूक झालेली असलीच तर ती निस्तरताना तरी योग्य मार्गदर्शनाचा फायदा घ्यावा.
मनकवडय़ा रंजनाला माणसांच्या समस्या जाणणं; त्यांची भांडणं निस्तरून सलोखा निर्माण करणं; मनुष्यबळाचा अंदाज घेऊन त्यांच्याकडून जास्तीत जास्त काम काढून घेणं उत्तम जमत असे. तिचं मन तिच्या बँकेच्या नोटांत आणि डेटात अजिबात रमत नव्हतं. तिने इंटरनेटवरून अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट्स घेतल्या. तिला ह्य़ुमन रिलेशन्सचा जॉब उत्तम जमेल असं निदान झालं. पण रंजनाने घाई केली नाही. तिने त्या कामाबद्दल बरीच माहिती गोळा केली; त्या व्यवसायातल्या ऊनसावल्यांबद्दल जाणकारांबरोबर चर्चा केली. मनाला खात्री पटल्यावर मग बँकेतून दोन महिने रजा घेऊन तिने वानगीदाखल एचआरचं काम करूनही पाहिलं आणि तिला ते आवडलं. त्यानंतर तिने संध्याकाळचे कोर्सेस करून त्या कामाचं रीतसर शिक्षण घेतलं आणि इतकी चौफेर पूर्वतयारी केल्यावरच व्यवसाय बदलला.
तसे सांधे बदलताना घरच्यांच्या ठाम पाठिंब्याची गरज असते. नितीनच्या बायकोला बँकेत नोकरी होतीच. शिवाय तिने शिकवण्याही केल्या. नितीन नव्या व्यवसायाचा डोंगर चढत असताना त्याला आधार द्यायला तिचे पाय जमिनीवर भक्कम रोवलेले होते. त्यांची मुलंही समजूतदारपणे वागली. नात्यांना वेगळी रुची आली. प्रशांत त्याच्या फिल्मी साहसातून सावरून पुन्हा स्वत:च्या पायांवर उभा होईतो त्याची धीराची बायको, मायाळू आईवडील आणि समर्थ सासूसासरे यांनी त्याला सतत खंबीर साथ दिली. त्यामुळेच त्या अकाऊंटंटला आयुष्याचा हिशेब नीट जमला. रंजनाच्या तपश्चर्येच्या काळात तिच्या जाऊबाईंनी घरचं सगळं सांभाळलं. नव्या क्षितिजांच्या शोधात जाणाऱ्या हर्षां भोगले, केजरीवाल यांच्यासारख्यांच्या जीवननौकांसाठी एक हक्काचा, सुरक्षित किनारा जपायचं काम त्यांच्या बायका करताहेत.
पुढच्या दहाच वर्षांत थ्रीडी प्रिंटिंग, मायक्रो-फार्मिग, तऱ्हेतऱ्हेचं जेनेटिक-छूमंतर वगैरे अद्भुत व्यवसायांची रेलचेल झालेली असेल. ‘वासांसि जीर्णानि’ थाटात, वयापरत्वे बदलत्या व्यक्तिमत्त्वांसाठीही व्यवसाय बदलले जातील. शिवाय एक सामाजिक सांधाही बदलेल. कर्तबगार बायकोच्या कर्तृत्वाला दाही दिशा मोकळ्या व्हाव्या आणि आपल्यालाही आवडणारं घरकाम-स्वयंपाक-बालसंगोपन करायला मिळावं या दुहेरी हेतूने नवरे हौसेने हाऊस-हजबण्ड बनतील. एकविसाव्या शतकातल्या समाजाच्या क्षमता त्या नव्या करियर-चेंजमुळे सर्वार्थाने बहरतील.

Story img Loader