आवडणाऱ्या क्षेत्रात करियर करायला संधी मिळाली नाही आणि न आवडणाऱ्या क्षेत्रात अडकून पडावं लागतंय म्हणून रुखरुखणारे बरेच जण असतात. पण आता काळ बदललाय. तुम्हाला हवं तर तुम्ही चाळिशीतही करियर बदलू शकता.
‘ऐ दिल मुझे बता दे..’
या गाण्याचे संगीतकार मदनमोहन आधी वडिलांच्या इच्छेखातर आर्मीत गेले होते. तिथे ते दोन-तीन वर्षांतच लेफ्टनंटही झाले. पण त्याच काळात त्यांना ‘दिल किस पे आ गया है’चं उत्तर मिळालं; त्यांचं संगीतावरचं खरं प्रेम जाणवलं. म्हणून ४५ साली त्यांनी आर्मीतली यशस्वी कारकीर्द सोडली आणि ते उपाशीपोटी गाण्यांना चाली लावत राहिले. चित्रपटसृष्टीत येऊन पोटभर चाली लावल्यावरच त्यांना ‘मिल गयी मंझिल मुझे’ हे पटलं.
जीवनाच्या रुळांचे मध्येच असे सांधे बदलणं; आपल्या स्वप्नाचा ध्यास घेऊन, सुखाचा जीव दु:खात घालून खऱ्या आनंदाचा शोध घेणं सोपं नसतं. तसा ध्यास घ्यायचं स्वातंत्र्य विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातच मिळालं! एकोणिसाव्या शतकापर्यंत भारतीय समाज चातुर्वण्र्याच्या चाकोरीत चालत होता. पिढीजात धंदा सोडून दुसरं काम करणं हे पाप होतं. भिक्षुकी ब्राह्मणपुत्रांनीच करावी आणि शेतकऱ्याच्या मुलाने नांगरच धरावा असा दंडक होता. रामायणात शम्बुक नावाच्या शूद्राची गोष्ट आहे : ‘शम्बुकाने ब्राह्मणासारखं तपाचरण केलं. त्याच्या त्या पापाचा परिणाम म्हणून एका ब्राह्मणाचा मुलगा मृत्यू पावला. त्या पापक्षालनासाठी रामाला शम्बुकाचा वध करावा लागला.’ जातीच्या मिराशीबाहेरचं काम पत्करताना त्या उदाहरणाचा प्रत्येकाला धाक वाटत असे.
विसाव्या शतकात औद्योगिक क्रांतीने समाजाचं स्वरूपच बदलून टाकलं. गावातून शहरात, शहरातून परदेशात लोकांचे लोंढे लोटले; चातुर्वण्र्याची चारखांबी व्यवस्था कोलमडली. नव्या शिक्षणाची दारं सगळ्यांना खुली झालेली होतीच. कुणीही काहीही करायला मोकळं झालं. लोकांना एकाच व्यवसायाच्या जन्मठेपेतून मुक्ती मिळाली.
त्या शतकाच्या शेवटी तर संगणक, टीव्ही, इंटरनेट, अॅनिमेशन, व्हिडीयो गेम्स, माहिती तंत्रज्ञान यांनी नवलाईच्या व्यवसायांची कित्येक दालनं उघडली. ब्युटिशियन, इंटीरियर डिझायनिंग, हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रांचीही भरभराट झाली. शिवणकाम, स्वयंपाक यांना ड्रेस-डिझायनिंग, केटरिंग या नावांनी ग्लॅमर प्राप्त झालं. क्रिकेट, फुटबॉलसारख्या खेळांना सोन्याचे दिवस आले. ओढगस्तीच्या काळासाठी कॉल-सेंटरसारखे हमखास पोट भरायचे मार्गही निर्माण झाले. नौकरी डॉट कॉमसारखी संकेतस्थळं दिमतीला असल्यामुळे आपल्यासाठीच बेतलेला व्यवसाय हुडकून काढणं सोपं झालं. सतत बदल, स्थित्यंतर हाच जगाचा स्थायीभाव झाला.
त्यामुळे त्या काळात अनेकांनी आपल्या मनाची साद ऐकून वहिवाट सोडली आणि नव्याच बिकट वाटेवर चालायची हिंमत दाखवली. इंजिनीयर झाल्यावर एमबीए करणं ही तर नवी वहिवाटच झाली. काही जणांनी शहर किंवा देश बदलताना मनाजोगता पेशा निवडायची संधी साधली. लग्नानंतर महिलांनी समाधानकारक, पण कमी वेळखाऊ कामं निवडली. क्रिकेट, नृत्य, सिनेमा यांच्यासारख्या, तरुणाईच्या क्षेत्रांत ज्यांना उमेदीच्या वयातच निवृत्ती पत्करावी लागली त्यांना आपल्या मर्जीनुसार ‘काही तरी नवेच’ करायला वाव मिळाला. संगणकबाप्पाच्या आंतरराष्ट्रीय योजकतेमुळे ‘जो जे वांच्छील तो ते लाहो’ अशी अवस्था झाली.
पण तरीही न आवडणाऱ्या नोकरीत झिजून आयुष्य फुकट घालवणारे लोक सध्याच्या जगात कमी नाहीत! ‘हे काम आवडत नाही. पण नवं काम झेपेल का? आणि समजा झेपलं तरी ते नक्की आवडेल का? खडखडत का असेना, नीट रस्त्यावरून चाललेलं गाडं मुद्दाम खड्डय़ात कशाला घालायचं?’ ही त्यांची नकारात्मक मानसिकता त्यांना रुळलेल्या चाकोरीतून बाहेर पडू देत नाही.
एक पाश्चात्त्य रूपककथा आहे : ‘एका बेडकाला उकळत्या पाण्याच्या टोपात टाकलं तेव्हा तो तत्काळ उडी मारून टोपाबाहेर पडला. पण जेव्हा त्याला गार पाण्याच्या टोपात ठेवून ते पाणी हळूहळू तापवलं तेव्हा तो परिस्थितीशी जमवून घेत ती उष्णता सोसत राहिला. जेव्हा पाणी कडकडीत झालं तेव्हाच तो उडी मारायला तयार झाला. पण तोवर त्याची सारी ताकद सोसण्यात खर्ची पडली होती! त्याला उडी जमलीच नाही!’ याच ‘टोपमंडूकवृत्ती’ने अनेक लोक मनाविरुद्ध पत्करलेल्या व्यवसायाचं अवजड जोखड मानेवर तोलत आयुष्याचा गाडा रेटतात. शेवटी मान मोडते आणि आवडीच्या व्यवसायाचं विमान उडवायचं राहूनच जातं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा