मथितार्थ
सालाबादप्रमाणे यंदाही भारताचा स्वातंत्र्य दिन शाळाशाळांमधून, विविध सरकारी कार्यालये आणि तसेच काही राजकीय पक्षांच्या कार्यालयांमधून साजरा झाला.. सर्वच दूरचित्रवाणी वाहिन्यांनी देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाल्याच्या बातम्या दिल्या, वर्तमानपत्रांमधून त्या आशयाच्या बातम्या प्रसिद्धही झाल्या. त्यामुळे धूमधडाक्यात स्वातंत्र्य दिन साजरा झाल्याचे वातावरण देशभरात निर्माण झाल्याच्या भ्रमात आपण सारे आहोत, पण या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी खरोखरच आपण काय करीत होतो, असा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारला तर त्याचे खरे उत्तर आपल्याला मिळेल. विविध बैठय़ा वस्त्यांमध्ये, झोपडपट्टय़ांमध्ये मिठाई-चॉकलेटपासून ते मोफत वस्तूंच्या वाटपाची आमिषे असतात. त्यामुळे लहान मुलांचा गोतावळा जमा होतो आणि मग त्या ‘भावी पिढी’समोर स्वातंत्र्य दिन साजरा होतो. मोठय़ा मंडळींची संख्या तशी कमीच असते. एरवी सोसायटय़ांमध्ये तर अनेकांनी सुट्टी म्हणून ताणून दिलेली असते. तर अनेक जण स्वातंत्र्य दिनाच्या आजूबाजूस येणाऱ्या सुट्टय़ा पाहून त्यानुसार शहराबाहेर पडण्याचे ‘स्वातंत्र्य’ पसंत करतात. यंदा तर एका प्रसिद्ध पर्यटन कंपनीने ‘स्वातंत्र्य दिन स्पेशल’ असे म्हणत स्वातंत्र्य दिनाची सुट्टी मजेत घालवा, अशी ऑफरच ग्राहकांना दिली. या ऑफरचा संबंध हा देशप्रेमाशी नव्हता तर केवळ त्या स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीशी होता, म्हणून तर ‘तुमचे स्वातंत्र्य मिळवा, सुट्टी मजेत घालवा’ असेच घोषवाक्य त्यांनी वापरले होते. असे जाहीर आवाहन करताना त्या कंपनीला जराही लाज वाटली नाही, कारण जनतेलाही त्याची लाज राहिलेली नाही, याची त्यांना खात्रीच आहे.
आपली मानसिकताच सध्या विचित्र झाली आहे. आपले देशाशी आणि देशबांधवांशी असलेले नाते शाळेच्या पुस्तकात प्रतिज्ञेपासून सुरू होते आणि शाळा सुटली की तिथेच संपते. १० वर्षे घोकलेली ती प्रतिज्ञा नंतर अनेकांना पुसटशीही आठवत नाही. १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीची चाहूल लागते ती, त्याच्या आठवडाभर आधी नाक्यानाक्यावर दिसणाऱ्या तिरंग्यांच्या प्रतिकृतींमधून. मग नजर साहजिक जाते ती कॅलेंडरच्या दिशेने आजूबाजूला येणाऱ्या सुट्टय़ांवर.. स्वातंत्र्यानंतरची पहिली चार-पाच वर्षे सोडली तर गेली साठेक वर्षे हे असे अव्याहत सुरू आहे आणि आता तर आपल्यापैकी कुणालाच त्याची लाजही वाटेनाशी झाली आहे.
असे म्हणतात की, जो देश एकसुरात त्यांचे राष्ट्रगीत गाऊ शकतो, तोच आपत्तीच्या कालखंडात एकत्र उभा राहू शकतो. आपल्याकडे राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर खणखणीत आवाजात म्हणणे तर सोडाच, लोकांचे इतर चाळेच अधिक सुरू असतात. सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य केल्यानंतर दिसणारे चित्र म्हणजे राष्ट्रगीत सुरू असताना लोकांच्या गप्पा, मोबाइलवर मेसेज टाइप करणे सुरूच असते. राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर जागच्या जागी उभे राहणे राहिले बाजूला, लोक आपल्या जागा शोधत बसतात. हा निर्लज्जपणाच ठरावा. आता आपल्याला त्याचेही काही वाटेनासे झाले आहे. बरे, देशप्रेम ही काही केवळ स्वातंत्र्य दिनाला आठवण्याची गोष्ट नाही, पण एरवी आपण त्याला जवळपास हरताळच फासलेला असतो.
बरं, ज्यांनी ते धाडस देशाच्या वतीने दाखवावे अशी अपेक्षा आहे, ती मंडळी तर चक्क शेपूटच घालताना दिसतात. जानेवारी महिन्यापासून भारत-पाक सीमेवर धुसफूस सुरू आहे. पहिल्या घटनेत पाकिस्तानी सैनिकांनी दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद करून त्यांचे शिर घेऊन पलायन केले त्यानंतर एकदा चकमकीचा प्रसंग आला. अगदी अलीकडे तर तिसऱ्या घटनेमध्ये पाच भारतीय जवान शहीद झाले. भारताच्या हद्दीत घुसखोरी करून पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय जवानांवर हल्ला चढवला. खरे तर २००३ सालच्या नोव्हेंबर महिन्यापासून भारत-पाक सीमेवर शस्त्रसंधी लागू आहे. असे असतानाही गेल्या अनेक वर्षांत पाकिस्तानने कधी छुपा तर कधी उघड हल्ला केला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याचा निषेध केल्यानंतर हल्ला केल्याचेच नाकारले आहे. आताही पाच जवान ज्या हल्ल्यात शहीद झाले, तो हल्ला पाकिस्तानी सैनिकांनी केलेला नाही, असा कांगावा पाकिस्तानने केला आहे. अर्थात ते साहजिकच आहे. पण संरक्षणमंत्र्यांनीही त्या संदर्भात गुळमुळीत बोटचेप्या पद्धतीने जणू काही आपण केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी सैनिक ठार झाले असावेत व त्याचे शल्य मनात असावे अशा प्रकारे संसदेमध्ये निवेदन केले. हल्ला करणारे पाकिस्तानी सैनिक असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली होती. पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी हे एकत्र हातात हात घालून कार्यरत आहेत. एवढे की, ‘एकाला झाकावे आणि दुसऱ्याला काढावे,’ याची संरक्षणमंत्र्यांना कल्पना नाही काय? पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी यांची जी अभद्र युती गेली कैक वर्षे आहे, त्याबद्दल भारतीय संरक्षणमंत्र्यांनी सावध भूमिका घेण्याचे कारणच काय? अखेरीस त्यावर देशभरात कल्लोळ झाल्यानंतर त्यांनी विधान मागे घेत त्यात दुरुस्ती केली. भारत-पाक संबंधांमधील वास्तवाची जाणच संरक्षणमंत्र्यांना नव्हती, असे त्यांची देहबोली सांगत होती. आधीच त्यांनी संरक्षणाशी संबंधित अनेक करार नानाविध कारणांनी अडवून ठेवले आहेत. आपल्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप होता कामा नये, असे त्यांना वाटते. तसे त्यांनी जाहीररीत्या बोलूनही दाखवले आहे. पण म्हणून भ्रष्टाचाराच्या भीतीने कोणतेही करार न करता त्याचा वाईट परिणाम भारताच्या संरक्षणसिद्धतेवर होऊ द्यायचा, याचे समर्थन करता येत नाही. एवढे कमी म्हणून की काय उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांनीही पाकधार्जिणी अशीच विधाने केली. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला, अशीच ही अवस्था!
एका बाजूला संरक्षणमंत्र्यांची ही अशी अवस्था असताना दुसरीकडे देशात काय सुरू आहे? तर सर्वाना वेध लागले आहेत ते २०१४मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांचे. पंतप्रधान होणाऱ्या स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अनेकांनी आता त्यासाठीच्या मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांना मालेगाव मशिदीच्या बॉम्बस्फोटामध्ये नाहक अटक झालेल्या मुस्लीम युवकांचा उमाळा आला आहे. कुणालाही नाहक अटक होणे किंवा त्रास दिला जाणे ही वाईटच गोष्ट आहे. त्याचा संबंध धर्माशी असता कामा नये. तो संबंध धर्माशी जोडला जाणेही तेवढेच वाईट आहे. पण हे सांगताना पवारांनी दोन पावले पुढे जात असेही विधान केले की, आपल्या कुटुंबातील मुला-मुलींवर एवढा अत्याचार झाल्याचा राग मुस्लीम तरुणांच्या डोक्यात शिरला तर त्याला दोष देता येणार नाही! शरद पवार हे राजकारणातील मुरब्बी नेते आहेत त्यामुळे जीभ अजाणतेपणी सैल सुटली असे त्यांच्याबाबतीत म्हणता येणार नाही. त्यांची प्रत्येक कृती विचारपूर्वक असते. त्यामुळे हे विधानही निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केलेले विचारपूर्वक विधानच होते, हे तर आता सामान्य जनतेलाही कळते आहे. पण एका बाजूला काश्मीरमधली सीमा आणि दुसरीकडे ईशान्य भारताची सीमा खदखदत असताना केला गेलेला हा युक्तिवाद देशविघातक आहे. देशात एवढे बॉम्बस्फोट झाल्याने हिंदूच्याही डोक्यात राग गेला आणि म्हणून मालेगावचा बॉम्बस्फोट झाला, असा युक्तिवाद कडव्या हिंदुत्ववादी संघटनांनी केला तर त्याला पवारांचे उत्तर काय असणार? असा युक्तिवाद काही संघटना खासगीत करतातही तेही निषिद्धच आहे. पवार यांनी हे विधान प्राप्त परिस्थितीत करणे हे जाणत्या राजाचे लक्षण निश्चितच नाही. दुसरीकडे नरेंद्र मोदी यांचा वारू वेगात सुटलेला आहे. मार्गात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर ते वार करीत सुटले आहेत. धोरणलकवा झालेले पंतप्रधान तर गर्भगळीत अवस्थेतच आहेत. मग आता या अवस्थेत त्या सीमेवर लढणाऱ्या जवानांचे मनोबल उंचावायचे तरी कोणी? युद्ध हे पाकिस्तान आणि भारत दोघांनाही परवडणारे नाही. किंबहुना त्याची जाणीव असल्यानेच पाकिस्तानने छुप्या युद्धाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांच्या उद्दिष्टांची नेमकी जाण त्यांना आहे, पण त्यांच्या कारवायांना सामोरे जाण्यासाठीचा आपला मार्ग अद्याप आपल्याला सापडलेला नाही. पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्यानंतर घेतलेली गुळमुळीत भूमिका ही पाकिस्तानच्याच पथ्यावर पडते आहे. आपण हतप्रभ असल्याचा संदेश संपूर्ण देशभरात जातो आहे आणि या अवस्थेत प्रत्येकाला दिसते आहे ते केवळ राजकारण आणि वर्षभरात येऊ घातलेल्या निवडणुका. स्वत:च्याच स्वातंत्र्याच्या प्रेमात बुडालेले नागरिक आणि सत्तास्थानाकडे डोळा लावून बसलेले राजकारणी यांच्यामुळे निर्माण झालेली ‘देशप्रेमाची ऐशी की तैशी’ अशी ही अवस्था शत्रुराष्ट्राला कुरघोडीची संधी देते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा