देशानं आधी सायनाला आणि आता सिंधूला डोक्यावर घेतलेलं आहे. पण या सगळ्या गदारोळात ज्याच्या खांद्यावर भारतीय बॅडिमटनच्या यशाची मुहूर्तमेढ रोवली गेली तो गोपीचंद आता शांतपणे पुढची तयारी करतो आहे. त्याला लिहावंसं वाटलं, कारण या यशामागची तपश्चर्या त्याची आहे. त्याच्यातल्या खेळाडूला, माणसाला आणि कोचला हे पत्र!
प्रिय गोपीचंद,
क्रिकेट सोडून खेळ माहीत नसणाऱ्या आमच्या जमातीत पहिल्यांदा तुझं नाव ऐकलं तेव्हा म्हटलं ‘असेल कोणीतरी. एखादी टूर्नामेण्ट मारेल आणि जाईल बापडा.’ पण तुझं नाव सारखंच दिसायला लागलं पेपरात आणि तुझ्याबद्दलचं कुतूहल वाढायला लागलं. कधी सचिनच्या कव्हर ड्राइव्ह शेजारी तुझा स्मॅश मारतानाचा फोटो यायचा तेव्हा वाटायचं ‘बरा दिसतोय, टिकेल एखाद-दोन वर्ष’. मग कळलं तू ऑलरेडी पाच वर्ष नॅशनल चॅम्पियनशीप मारलीस. आपोआप तोंड बंद झालं. आणि तुझ्या नव्या पराक्रमांची वाट पहायला लागलो.
स्टार स्पोर्टस हे चॅनल चन वाटायच्या काळात कधी तरी टीव्हीवर तुझी मॅच पाहिली. तुडतुडया, बारीक, टिपीकल साउथ इंडीयन चेहरा असणारा तू नजाकतीनं खेळत होतास. जगातल्या अत्यंत वेगवान खेळात कमालीचा ठेहराव असलेला तुझा गेम बघून आश्चर्य वाटत राहिलं आणि नकळत तुला फॉलो करायला सुरुवात केली. तुझ्यामुळे बॅडिमटनमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आणि साधं सोसायटीच्या गेटवर बॅडिमटन खेळताना स्मॅश मारला की तुझ्यासारखा शर्टबिर्ट मागे घ्यायला सुरुवात झाली.
एक पॉझ घेऊन सव्र्हिस करणं, क्रॉस ड्रॉप्स टाकणं, लाँग रॅलीज खेळणं हे सगळं करून बघायला सुरुवात केली आणि आपल्याला शायिनग मारण्याव्यतिरिक्त काहीही येत नाही हे एका महिन्यातच कळलं. नाटकाचं वेड लागलं, रॅकेट धुळीत गेल्या; पण खरं सांगतो तुझ्याबद्दलचं अप्रूप एक टक्काही कमी झालं नाही. त्यात तू ऑल इंग्लंड जिंकलंस आणि प्रचंड आनंद झाला. कारण तुझं यश ही घटना नाही तर तपश्चर्या होती हे नंतर कळालं. त्या क्लबवर तू उंचावलेल्या चॅम्पियनशीपनं हजारो भारतीय मुलांसाठी कोर्टची दारं खुली झाली. तुझ्या स्मॅशनं फक्त चेन हाँगला नाही तर अख्ख्या देशाला अदबीनं वाकायला लावलं आणि तुझ्या चेहऱ्यावरचं समाधान माझे डोळे पाणावून गेलं.
मग ती बातमी आली जिने मला हादरवून टाकलं. एका जगप्रसिद्ध शीतपेय कंपनीची जाहिरात करायला, ‘ते लहान मुलांसाठी योग्य नाही’ म्हणून तू नकार दिलास. आणि मी मनातल्या मनात तुला वेडं ठरवलं. मला हा अतिरेक वाटला, पण मग तुझी मुलाखत वाचली आणि शांतपणे विचार केला. मग जाणवलं की स्वत:च्या किमती अव्वाच्या सव्वा वाढवणाऱ्यांच्या गर्दीत मूल्य आणि सदसद्विवेकबुद्धी असलेला तू एकमेव आहेस. तू पसे नाकारलेस, पण किंमत वाढवलीस. माझ्यासाठी तू सगळयात मोठा ‘स्पोर्टसब्रॅण्ड’ झालास त्या दिवशी.
आजूबाजूला कोणाचा आदर्श मानायचा या संभ्रमावस्थेत असताना तू आणि राहुल द्रविड या दोघांच्या ‘सेल्फलेस’, ‘रिस्पॉन्सिबल’ आणि ‘डेडीकेटेड’ असण्याकडे ओढला गेलो.
कालांतरानं तुझ्याबद्दलचा फॉलोअप कमी झाला. पण आपुलकी वाटत राहिली. तुझी खेळाडू म्हणून कारकीर्द संपली. ऑलिम्पिक पदकानं तुला हुलकावणी दिली. विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर असताना कित्येक खेळाडू धडपड करतात, पण त्याच क्षणी तू ‘ऑलिम्पिक मेडल मिळवायचं’ तुझं स्वप्न पुढच्या पिढीत पेरायचं ठरवलंस.
ज्या क्षणी लोकांना ‘आता बॅडिमटनमध्ये आपलं कोणी नाही’ असं वाटत होतं त्याच क्षणी तू स्वत:ची अॅकेडमी सुरू करायचं ठरवलंस. तीन-तीन दिवस लोकांच्या दारात जाऊनही स्पॉन्सरशिप मिळेना तेव्हा तू घर गहाण टाकलंस आणि ही अॅकेडमी सुरू केलीस हे फार कमी जणांना माहितेय. बारा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या त्या अॅकेडमीतली सगळ्यात लहान मुलगी आठ वर्षांची पी. व्ही. सिंधू होती हे नुकतचं कळलं आणि मी मनोभावे तुझ्या तपश्चय्रेला साष्टांग नमस्कार केला.
सायनानं तुझं स्वप्न सत्यात आणलं आणि सिंधूनं त्याला रुपेरी वर्ख चढवला. निर्विवाद यश. निभ्रेळ गुणवत्ता. जगातल्या मोठयात मोठया खेळाडूंसमोर प्रत्येक गुण जिंकून जोशात ओरडायला फक्त रॅकेटमध्ये नाही तर अंगातही मजबूत गट्स असावे लागतात हेही तूच शिकवलंस. सचिनने वर्ल्डकपमध्ये शोएबला फोडताना झालेला आनंद आणि सिंधूने सेमी फायनलला जपानी प्लेयरला उद्ध्वस्त करताना झालेला आनंद मला सारखाच वाटतो. तो विजय फार महत्त्वाचा होता, छोटय़ा छोटय़ा गोष्टीवर सेटल होणाऱ्या देशात, ब्राँझवर सेटल न होण्याचा निर्णय घेण्याचं आणि त्यासाठी लढण्याचं धाडस त्या मुलीनं दाखवलं, ते ऐतिहासिक होतं.
ती फायनल हरली पण लढवय्यासारखी. मॅच झाल्यावर समोरच्या प्लेयरची रॅकेट पडल्यावर उचलून देणं यासारखा ‘मॅच पॉइण्ट’ सिंधूनं घेतला आणि तुझ्यातल्या जाहिरात नाकारणाऱ्या माणसाची सावली मला व्यापून गेलेली दिसली त्या एकवीस वर्षांच्या मुलीवर.
खेळांच्या बाबतीत प्रोसेसवर विश्वास नसलेल्या आततायी माणसांच्या देशात तुझ्यासारख्या सावल्यांची प्रत्येक मदानाला नितांत गरज आहे. स्पोर्टस हे कल्चर व्हायला पाहिजे असं म्हणणारा, लहान मुलांना शाळेपासून हेरणारा, त्यांना ओरबाडणाऱ्या वातावरणापासून लांब ठेवणारा, अपेक्षा सोडून आनंदाकडे नेणारा, आत्मविश्वास आणि मूल्य या दोन्ही गोष्टी उदंड हातानं देणारा आणि खेळाडू आणि माणूस म्हणून सशक्त बनवणारा एक गोपीचंद प्रत्येक खेळाला हवाय. प्रश्न फक्त इतकाच आहे की पसे, ग्लॅमर आणि इन्स्टन्ट यश यांच्या या बाजारात तुझ्यासारखी आणखी माणसं आणायची तरी कुठून?
– तुझा आजन्म फॅन,
response.lokprabha@expressindia.com