लंडनच्या ‘शेक्सपिअर्स ग्लोब थिएटर’मध्ये २००७ साली मध्यरात्री होणाऱ्या ‘ऑथेल्लो’ या नाटकाच्या प्रयोगाला मी आणि माझा नवरा, अतुल कुलकर्णी गेलो होतो. तेव्हा मी त्याला म्हणाले, मला इथे परफॉर्म करायचंय.. कारण ही नटाची स्पेस आहे. इथे माइक नाहीत, साधी प्रकाशयोजना आहे – म्हणजे काही इफेक्ट्स नाहीत. तिन्ही बाजूंना प्रेक्षक आहेत. थ्रस्ट थिएटर (शिवाय हाफ ओपन)- म्हणजे जिथे प्रेक्षकांशी संवाद साधणं सहज शक्य आहे, अशा जागेत कुणाही अभिनेत्याला आपली कला सादर करायला मिळणं म्हणजे पर्वणीच आणि २८ एप्रिल २०१२ साली, मी तिथे शेक्सपिअरच्या ‘ट्वेल्थ नाइट’वर आधारित असलेलं ‘पिया बहरुपिया’ सादर करत होते. याला स्वप्न म्हणावं की जादू, नशीब म्हणावं का प्राक्तन, हे मला आजही सांगता येणार नाही. जणू मी ते शब्द उच्चारले आणि शेक्सपिअरच्या नाटकातले सगळे- राजे-राण्या, विदूषक, चेटकिणी, पऱ्या, भुतं कामाला लागली आणि ‘पिया बहरुपिया’चा खेळ तिथे त्यांनी जमवला. ते ‘ग्लोब’मध्ये होणारं पहिलं िहदी नाटक होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ट्वेल्थ नाइट’ची गोष्ट अगदी साधी आहे. इलेरियाच्या जवळच्या समुद्रात एक बोट बुडते आणि वायोलाची आणि तिच्या जुळ्या भावाची (सेबास्टियन) ताटातूट होते. वायोला, इलेरियात एका सरदाराच्या दरबारी, मुलाचा वेश धारण करून (सिझारिओ नावाने) कामावर रुजू होते. हा सरदार ज्या राणीच्या प्रेमात असतो, ती त्याला भीक घालत नसते. म्हणून हा सरदार या मुलाला तिच्याकडे आपला निरोप घेऊन पाठवतो, तर ती राणी या मुलाच्या, जो खरं तर एक मुलगी आहे, प्रेमात पडते आणि हे सगळं घडत असताना त्या मुलाचा वेश धारण केलेल्या मुलीला आपण सरदाराच्या प्रेमात पडलो आहोत हे जाणवतं. पुढे हा गोंधळ निस्तरताना काय काय होतं, हे नाटकात दाखवलंय.

‘ग्लोब’ हे अर्ध खुलं (हाफ ओपन) थिएटर आहे. इथे जे प्रेक्षक सगळ्यात स्वस्त तिकीट घेतात ते उभे राहून नाटक बघतात. या प्रेक्षकांच्या डोक्यावर छप्पर नसतं. तर जे प्रेक्षक महागडं तिकीट काढतात ते बसून, डोक्यावर छप्पर असलेल्या ठिकाणी, स्टेजच्या भोवती तिन्ही बाजूंना असतात आणि गंमत म्हणजे, जेव्हा नट प्रेक्षकाच्या जवळ जातो तेव्हा तोही छप्पर नसलेल्या भागात येतो. थंडी, पाऊस, ऊन, वारा या सगळ्यांचा नटांवर, प्रेक्षकांवर आणि नाटकावर परिणाम होतो. त्यामुळे नाटक करताना अर्थातच मजाही येतेच. ज्या दिवशी आम्ही प्रयोग केला त्या दिवशी खूप थंडी होती. आमचा एक प्रयोग दुपारचा होता. माझा, मध्यंतराअगोदर एक प्रवेश आहे. त्यात मी, वायोला जी मुलाच्या वेशात आहे (सिझारिओ) स्टेजच्या छप्पर नसलेल्या भागात येते आणि तिचं प्रेम तिच्या प्रियकरापर्यंत पोचवू शकत नाही हे दु:ख एका गाण्यातून व्यक्त करते. हे गाणं सुरू झालं आणि रिपरिप पाऊस पडू लागला. मला कळेच ना.. वाटलं, हा जो नैसर्गिक इफेक्ट आहे त्यापुढे सगळं थिटं आहे. आपण कितीही लाइट्स किंवा साऊंड इफेक्ट वापरले असते तरी हे साध्य करू शकलो नसतो आणि यात प्रेक्षकही सामील झाले. गाणं गाताना मी, प्रेक्षक आणि जणू आकाशही रडत होतं. शेक्सपिअरच्या नाटकात दिवस-रात्र, पाऊस-वारा, हिवाळा-उन्हाळा ही पात्रंच असतात. त्याच्या पात्रांवर या सगळ्यांचा परिणाम होतो. अगदी तसंच माझ्याबाबतीत घडत होतं..

इथे नाटक करताना प्रेक्षक आणि कलाकार यांचा एक वेगळाच बंध तयार होतो. ते खूप जवळ असतात. आपल्याला त्यांचे हावभाव दिसतात, जाणवतात. प्रेक्षकांनी शेक्सपिअर वाचलेला असतो, त्याची अनेक नाटकं वेगवेगळ्या रूपांत पाहिलेली असतात. अनेकांना तर नाटकं पाठ असतात. हा प्रेक्षक, विशेष करून, पिटातला, अत्यंत खुला आहे. मला जाणवलं हे माझ्याबरोबर तर आहेतच, पण मला ऊर्जाही देताहेत. त्यांच्यामुळे मला अनेक गोष्टी सापडत होत्या. तो खऱ्या अर्थाने सहृदय प्रेक्षक होता.

शेक्सपिअरचं नाटक, शेक्सपिअरच्या ‘ग्लोब’मध्ये करायला मिळणं हे स्वप्नच असावं कदाचित.. किंवा जादू.. नशीब की प्राक्तन.. ते जे काही होतं.. हा खेळ खेळताना खूप मजा आली आणि हा ‘पिया बहरुपिया’चा खेळ असाच बेभान होऊन जागोजागी खेळला गेला.

माया मरी न मन मरा,

मर मर गये सरीर

आसा, तिस्ना ना मरी,

काह गये दास कबीर

तर पुढच्या आठवडय़ात पुढच्या ठिकाणच्या अनुभवाबद्दल.
गीतांजली कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com