पावसाळा सुरू झाला की हमखास लहानपणीच्या रम्य आठवणी जाग्या होतात. विशेषत: श्रावण तर खास करून आठवतोच. आम्ही अंजनगाव सुर्जी येथे राहायचो. तेव्हा तेथे ना सिमेंट काँक्रीटचे जंगल होते, ना आजच्यासारखी वाहतुकीची गजबज. शांत सुरेख टुमदार गाव. त्यातून आम्ही राहायचो, तो वाडा गावाच्या बाहेर म्हणावा अशाच ठिकाणी. त्यामुळे आजूबाजूला भरपूर मोकळी जागा असायची हुंदडायला. वाडय़ात साताठ बिऱ्हाडं राहायची. त्यामुळे खेळायला सवंगडय़ांची कमतरता कधीच भासत नसे. पहिल्या पावसात भिजायचा मनसोक्त आनंद उपभोगला तो फक्त लहानपणीच. त्यासाठी कधी आईबाबांनी सर्दी होईल किंवा आजारी पडशील म्हणून रागावल्याचे स्मरत नाही. उलट पहिल्या पावसात भिजल्याने अंगातील उष्णता निघून जाते, घामोळ्यांचा त्रास नाहीसा होतो म्हणायचे. त्यामुळे आम्ही त्या पहिल्या पावसात अगदी मनसोक्त भिजायचो. आजची छोटी पिढी मात्र या आनंदाला नक्कीच मुकलीय. श्रावण सुरू झाला की तर फारच मजा यायची. घरात आईची व्रतवैकल्ये, पूजा-अर्चा असायची. त्यासाठी तिला पहाटे उठून फुले, दुर्वा, पत्री आणून देणे, त्याचे सुरेखसे हार करून देणे हे माझे आवडते काम असायचे आणि फुले तरी किती नाना प्रकारची असायची. जाई, जुई, चमेली, चाफा, सदाफुली, मोगरा, गुलाब. सगळी फुलझाडे कशी फुलांनी बहरलेली असायची. आमच्या अंगणात एक वेल गुलाबाचे मोठे झाड होते. ते तर श्रावणात टपोऱ्या फुलांनी अगदी लदबदलेले असायचे. आठवण आली की अजूनही तो मंद मंद सुगंध दरवळल्याचा भास होतो. त्याच्या बाजूचा गोकर्णीचा वेल आणि त्याची ती गर्द निळी-जांभळी फुलेही तशीच आठवतात. शिवाय आजूबाजूला आपोआप उगवलेली गुलछडीची रोपेही असायचीच. त्याला चिडीसुद्धा म्हणायचे. ही फुले तर नाना रंगात असत. मोतिया, अबोली, लाल, गुलाबी, जांभळी. त्याला सुगंध असा नसायचा, पण इतकी सुरेख दिसायची. मला नेहमी प्रश्न पडायचा या फुलांमध्ये इतके सुंदर सुंदर रंग देव कसे काय भरत असेल बरे? नंतर बऱ्याच वर्षांनी कुठे तरी एकदा व. पु. काळेंचं फार छान वाक्य वाचनात आलं. ‘‘फुलाला चित्रकलेचा डिप्लोमा असावा लागत नाही. ज्या मातीत ते रुजतं तेथेच ते रंग दडलेले असतात.’’ काय कल्पना आहे ना!
असाच एक आणखी मनात घर केलेला रंग म्हणजे आमच्या वाडय़ातल्या एका मोठय़ा टाकीवरच्या हिरवळीचा गर्द पोपटी-हिरवा रंग. पावसाळ्यात त्या टाकीवर कुठे कुठे ती हिरवळ उगवायची. तो रंग तर इतका प्रसन्न वाटायचा. आणि त्या मऊ मऊ हिरवळीचा तो मखमली स्पर्श तर विचारूच नका. मी कितीदा तरी त्यावर बोटे फिरवून तो आनंद लुटला आहे. दुसरा असाच मखमली रंग म्हणजे पावसाळ्यात सापडणारा अगदी लालचुटुक रंगाचा शेंगदाण्याच्या आकाराचा किडा. आम्ही त्याला मखमलीचा किडा म्हणायचो. त्याला पकडायचं. नंतर आगपेटीला हवा जाण्यासाठी लहान लहान छिद्र करायचे, हिरवे हिरवे गवत टाकून छान गादी करून त्यात तो ठेवायचा. हे किडे मात्र क्वचितच दिसायचे. त्यामुळे सापडले की आम्ही खूश व्हायचो. एक ना अनेक प्रकार. मुसळधार पाऊस पडून गेला की अंगणात खळखळ पाणी वाहायचे. त्यात नदी नदी म्हणून मनसोक्त खेळायचे, कागदाच्या नावा सोडायच्या. खूप मजा यायची. मग खेळून खेळून थकल्यावर घरात येऊन हात-पाय धुवायचे. बऱ्याच वेळ पाण्यात, वाळू वर खेळून तळपाय कसे छान गुलाबी गुलाबी स्वच्छ स्वच्छ होऊन जायचे. मला ते गुलाबी गुलाबी तळपाय बघायला खूप आवडायचे. पोटभर खेळून झाल्यावर आता बाकी पोटात कावळे कोकलायला लागून भुकेची जाणीव व्हायची. स्वयंपाकघरातून येणारा ताज्या अन्नाचा सुवास भूक आणखीनच चाळवायचा. स्वयंपाकघरात आई चुलीसमोर हा एवढा कणकेचा पिंडल घेऊन बसली असायची. आपापली ताटे घेऊन आम्ही भावंडं गोल करून तिच्या बाजूला बसायचो. ती अन्नपूर्णा गरमागरम खरपूस भाजलेल्या घडीच्या पोळ्या, भरपूर लोणकढी तुपाने माखून वाढत जायची अन् आम्ही पटापट फस्त करत जायचो. वजनबिजन वाढायची चिंता कधी चुकूनही वाटायची नाही. ते साधेच वरण-भात-भाजीचे जेवण काय स्वादिष्ट लागायचे. आज कुठल्याही महागडय़ा हॉटेलात, कितीही पैसे मोजले तरी तसे जेवण नक्कीच मिळणार नाही, या विचाराने मन कुठे तरी खंतावतेच. सुटीच्या दिवशी दुपारी किंवा एरवी संध्याकाळी खेळायलाही भरपूर वेगवेगळे खेळ असायचे. लगोरी, आबाधुबी, लंगडी, लपाछपी, विटीदांडू, टिक्कर तर कधी कधी सागरगोटे. पण त्या सगळ्या बिनपैशांच्या खेळात जो जिवंतपणा असायचा, जी उत्स्फूर्तता असायची ती बाकी आजच्या महागडय़ा व्हिडीओ गेम्स किंवा मोबाइल गेम्समध्ये नक्कीच नाही. लहानपणची आणखी एक आठवण म्हणजे कधी कधी आम्हाला चमचमणारे काजवे सापडायचे. त्यातला एखादा आम्ही पकडून काचेच्या बाटलीत ठेवायचो आणि त्याची ती लुकलुक किती तरी वेळ कुतूहलाने न्याहाळीत बसायचो. तो आनंद काही वेगळाच होता अन् ते निरागस विश्वही खासच. निसर्गाच्या सान्निध्यात, मुक्त वातावरणात घालवलेले ते बालपण खरोखरच खूप रम्य होते. आता वाटतं पुन्हा एकदा लहान होऊन ते क्षण परत एकदा अनुभवावे.
वाचक लेखक : बालपणीचा काळ सुखाचा
पावसाळा सुरू झाला की हमखास लहानपणीच्या रम्य आठवणी जाग्या होतात. विशेषत: श्रावण तर खास करून आठवतोच. आम्ही अंजनगाव सुर्जी येथे राहायचो.
आणखी वाचा
First published on: 26-09-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व ब्लॉगर्स कॉर्नर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Childhood days