दर वर्षी बाल दिन उत्साहने साजरा होतोच. पण या वर्षी १४ नोव्हेंबर १४ असं औचित्य साधून बालदिन वेगळ्या पद्धतीने साजरा करावा अशी कल्पना ‘कलांगण’च्या वर्षां भावे यांना सुचली आणि उभा राहिला एक आगळावेगळा प्रकल्प. त्याविषयी-
शाळेतल्या बाकांवर बसून मराठीच्या तासाला सर्वानी मिळून जोरजोरात कविता म्हणण्याचा आनंद काही वेगळाच होता. ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ असो किंवा ‘बलसागर भारत होवो’सारखं स्फूर्तिगीत असो, या मोठय़ा कविता त्यामुळे आवडत्या तर झाल्याच; पण अर्थ पुरता समजण्याआधीच त्या तोंडपाठही झाल्या. मोठय़ा आवाजात सर्वानी मिळून कविता म्हणणं, हा एक अनुभव घेण्याचाच भाग होता. स्वस्थपणे, शांतपणे स्वत:शीच कविता वाचणं, स्वत:ची अनुभूती त्यामध्ये शोधण्याचं वय आणि काळ यापेक्षा वेगळा होता. मात्र आता हा बाकावरचा अनुभव तरी किती जणांना मिळतो? त्यासाठी त्यांना वेळ तरी मिळतो का? त्यामुळे एकसंधत्वाची, एकसंघाची भावना निर्माण होणं, ही तर आणखी लांबचीच गोष्ट झाली!
प्रथम हा प्रश्न मनात आला आणि त्यावर विचार करावासा वाटला तो ‘कलांगण’ंच्या वर्षां भावे यांना!
‘कलांगण’ ही मुंबईतली लहानग्यांसाठीची संस्था त्यांनी सुरू केली ती ‘गाण्यामधून व्यक्तिमत्त्व विकास’ हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवूनच. १५ वर्षांत ‘कलांगण’तर्फे अनेक उपक्रम राबवले. १४ नोव्हेंबर हा बाल दिन तर त्यांच्यातर्फे नानाविध स्वरूपात साजरा होतोच. पण १४ नोव्हेंबर १४ या दिवशी आपल्याला काही विशेष करता आले तर करावे, हा विचार साधारण दीडएक वर्षांपूर्वी वर्षांताईंच्या मनात आला. या दिवसाचं वेगळेपण लक्षात घेऊन १४ भाषांमधील काही गाणी आपण मुलांकडून बसवून घ्यावीत असा विचार झाला. ती कशा प्रकारे सादर होतील, आणखी काय करता येईल, याबद्दल साहजिकच विचारविनिमय, चर्चा सुरू झाल्या आणि बघता बघता कल्पना मूर्त स्वरूपात येऊ लागली.
एक ते दीड वर्षांचा काळ हाताशी होता. प्रयोग जरा मोठय़ा स्वरूपात व्हावा. राष्ट्रीय पातळीवर सादरीकरण करता यावं, त्याला चांगली प्रसिद्धी मिळावी आणि अधिकाधिक मुलांना सामावून घेता यावं, या दृष्टीने आखणी सुरू झाली. १४ भारतीय भाषांमधली गाणी हे राष्ट्रीय एकात्मतेचं एक सुंदर उदाहरण ठरणार होतं. कुठल्याही पक्षाचा शिक्का न मारता ‘मिले सूर मेरा तुम्हारा’सारखं ते दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांवरून छोटय़ा छोटय़ा भागांमधून सादर करायचं ठरवलं तर तेही उचित ठरेल, यातही खरे तर काहीच वाद किंवा दुमत नसावं.
परंतु ते काही हा उपक्रम करण्यामागचं उद्दिष्ट नाही. तर विविध राज्यांमधल्या किंवा अनेकविध भाषिक मुलांना त्या निमित्ताने एकत्र आणून सर्वानी मिळून शिस्तीने करण्याच्या एखाद्या भव्यदिव्य अनुभवाचा एक भाग होता येईल, याचे साक्षीदार ठरवता येतील.. असा छोटय़ांसाठीचा हा एक उपक्रम! सोहळ्याच्या स्वरूपात म्हणजे एक इव्हेंट म्हणूनही तो सादर करता यईल असा विचार प्रथमपासूनच सुरू होता.
प्रथम सुरुवात केली ती हा विचार अनेकांशी बोलून विविध भाषांतील कवी-लेखकांकडून आपल्याला हवी तशी – म्हणजे विशिष्ट कारणासाठी – लहान मुलांसाठी गाणी लिहून घेण्यापासून!
पण वाटलं तितकं हे काम सोपं नव्हतं. वर्षांताई म्हणाल्या, ‘‘विषय मांडताच वेगवेगळे सल्ले मिळायला सुरुवात झाली. इतक्या भाषांमधली गाणी कुठून आणणार – मुलांना ती कशी कळणार? ते शब्द मुलांना आपले वाटतील का? मुलं कशाला असली गाणी म्हणतील? त्यांचा अर्थ तरी कोणाला कळणार? शिवाय बदतमीज
दिल मानेना, कोंबडी पळाली, मोरया मोरया अशा अनेक ठॅण ठॅण ऱ्हिदमच्या गाण्यांमुळे मुलांनी या गाण्यांकडे वळावं तरी का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. थोडक्यात असे काही करण्याच्या भानगडीत पडू नका!
‘‘पण एक शिक्षिका म्हणून मुलांबद्दलचा मला असलेला अनुभवच दांडगा आत्मविश्वास देऊन गेला आहे. मी स्वत:च प्रत्येक गाणं त्या त्या मुलाला किंवा मुलीला शिकवणार हे माझ्या मनाशी पक्कं होतं. असं गाणं शिकत असताना मुलांना त्याविषयी आत्मीयता वाटू लागते, आणि गाणं त्यांना ‘आलं’ आहे हे मला त्यांच्या डोळ्यांतच दिसतं याविषयी मला पूर्ण खात्री होती. हे गाणं आपल्याला का आवडावं हे आपणच मुलांना सांगायचं असतं, ते आपल्याला सांगता यायला हवं. प्रेरणा मिळण्यासाठी ते बीज कुठेतरी पडावं लागतं.’’
वेगवेगळ्या भाषांमधली गाणी लिहून घेणं चालू असतानाच प्रथम एक िंहदी गाणं वैभव जोशी यांनी लिहिलं आणि ते इतकं भावलं की सूत्ररूपासारखं हे एकच गाणं इतर १३ भाषांमध्ये अनुवादित करून ते रेकॉर्ड करायचं (ध्वनिमुद्रित) असं ठरलं.
आओ हम सब हाथ मिलाएॅँ
दिल से दिल तक राह बनाएॅँ
अंधियारा छटने को है,
देखो ना पौव फटने को है।
एक नये सूरज के पीछे –
ऑँखे मींचे,
क्यूं ना जाना जाए।
चलो ना, हम सब हाथ मिलाए!
असं ते हिंदी गाणं..
त्याचे सुंदर अनुवाद झाले, त्या त्या भाषेचा लहेजा, आवाजांच्या जातीची गरज, त्या त्या भाषेतली वैशिष्टय़पूर्ण वाद्यं असं सगळं घेत त्याचं ध्वनिमुद्रण होत गेलं – प्रत्येक गाणं एक अडीच-तीन मिनिटांचं स्वतंत्र गीत झालं.
‘‘हा सगळाच अनुभव अचंबित करणारा होता. हिंदी, मराठी, गुजराती, राजस्थानी, पंजाबी, संस्कृत या भाषांना तुलनेनी अडचण वाटली नाही. तशा या महाराष्ट्राला जवळच्या भाषा! असीम फाऊंडेशन, ज्ञानप्रबोधिनी, आनंद ओक, संस्कृती बापट अशा अनेकांनी मदत केली. धनश्री लेलेंनी संस्कृत गाणं सुंदर लिहिलं. त्या धीरगंभीर भाषेला शोभेल अशी जणू बंदिशच तयार झाली. तशाच शास्त्रीय पद्धतीने ते गाणं झालं. मग एक मोठीच तानही त्यामध्ये आली. ती तान झेपेल अशी गाणारी मुलगी शोधावी लागली. अशी त्या त्या गाण्याची विशिष्ट गरज निर्माण होत गेली. आणि ती पुरी करण्यासाठी आम्ही धडपडत राहिलो. माझ्याबरोबरीने संगीत संयोजक कमलेश भडकमकरही होता.
‘‘बघता बघता मुलं या गाण्याशी खेळू लागली.. शब्दांशी. स्वरांशी. सूर्य हा शब्द प्रत्येक गाण्यात होता. मग यातला सूर्य कुठला हे शोधणं सुरू झालं. तसं कुठल्या भाषेत सूर्याला काय म्हणतात, हाथ मिलाए. यासाठी काय म्हटलंय.. असे खेळ सुरू झाले. गाणं लिहून आलं की त्याचा नेमका अर्थ काय आहे, हे समजून घेणं हा माझ्यासाठीच एक पहिला उद्योग झाला.. आणि मग सगळ्या प्रकल्पालाच रंग चढू लागला. ‘चांदण गाभा’ हा एक शब्द जरी लक्षात राहिला तरी ते त्या पंजाबी गाण्याचं यशच! असे शब्द मुलांच्या कोशात जागा पकडून बसू लागले.
‘‘गाणारी मुलं निवडण्यासाठी मी किमान महाराष्ट्र पिंजून काढला. याशिवाय कोलकाता, बेळगाव, बंगलोर, बडोदा, भरूच अशा अनेक ठिकाणी – म्हणजे गावोगावी जाऊन मीच स्वत: हजार-बाराशे मुलांच्या परीक्षा घेतल्या – त्यातून दीडशे मुलं निवडली. गाणी गाण्यासाठी अमेरिका, इंग्लंड, दुबई धरून चार देश, पाच राज्यं, चौदा शहरं यामधील मुलांच्यात अंध, अनाथ, मतिमंद-गतिमंद, वंचित तसेच आदिवासी अपंग, आजारी, मुलं आणि मुलींचा यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात समावेश आहे, हे सांगायला मला आनंद वाटतो.’’
वर्षांताईंनी संकल्पना, संयोजन आणि संगीत दिग्दर्शन एवढा सगळा खटाटोप केला हे त्यांनी सांगितलं म्हणूनच कळलं. नाही तर सारेगम, संगीतरत्नसारख्या स्पर्धात्मक कार्यक्रमांसाठी एखाद्या वाहिनीनं काम करावं तेवढं मोठं- इतका आवाका असलेलं हे काम होतं, नक्कीच!
तरीही अनेक भाषांची अडचणही होतीच. काश्मिरी भाषेशी दूरान्वयानेही कधी संबंध आला नव्हता. ते गाणं देवनागरीमध्ये लिहून घेतल्यानंतरही धड वाचता येईना!
अविनाश बिनीवाले या भाषातज्ज्ञांनी अनेक भाषकांशी ओळख करून दिली. हिंदी-इंग्रजी उत्तम जाणणारे आणि एखादी परकी भाषा येणारेही त्यात होते. मल्याळी, तेलुगू माहीत असणारे लोक मुंबईत कमी नाहीत, पण गाणी करून घेणं किंवा अर्थ समजून घेणं यासाठी खूप शोधाशोध करावीच लागली, जे मुळात इतकं अवघड वाटलंच नव्हतं.
गाणी गाण्यासाठी अमेरिका, इंग्लंड, दुबई धरून चार देश, पाच राज्यं, चौदा शहरं यामधील मुलांच्यात अंध, अनाथ, मतिमंद-गतिमंद, वंचित तसेच आदिवासी अपंग, आजारी, मुलं आणि मुलींचा यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात समावेश आहे.
आसामी भाषा कळणंही फार कठीण झालं. त्या त्या गाण्याच्या- भाषेच्या- रचनेच्या गरजेनुसार जशी वाद्यं वापरली गेली, तसेच काही आवाजही शोधावे लागले. आसामी गाण्यासाठी अत्यंत कोवळे आवाज हवेत म्हणून अगदी सात ते दहा वर्षांच्या पंधरा मुली मुद्दाम निवडाव्या लागल्या. एकूणच सगळा प्रवास फारसा सुखाचा म्हणता आला नाही तरी भरपूर आनंद देणारा मात्र होता.
भाषातज्ज्ञ म्हणजे ‘सर्व भाषा जाणणारा’ नव्हे. ट्रेनमध्ये एखादी सुरेख अस्खलित पंजाबी बोलणारी बाई भेटली तरी तिला पंजाबी लोकगीत म्हणजे काय, हे माहीत नाही.. असे काही शोधही वर्षांताईंना या प्रवासात लागले.
गाणी करत असताना आणखी एक पथ्य पाळलं गेलं. त्या-त्या भाषेतल्या लोकांना ते-ते गाणं आपलं वाटायला हवं, तसंच ते गाणं आजचंही वाटायला हवं. तरीही ऱ्हिदममध्ये शब्द मात्र हरवले जाता कामा नयेत.
जेव्हा अशा प्रकारची गाणी मागवायला वर्षांताईंनी सुरुवात केली, त्याच वेळी लगेच दुसऱ्या आघाडीवरही लढायला सुरुवात करावी लागली; ती म्हणजे आर्थिक आघाडी! तिथेही त्यांनी जोरदार आघाडी उघडली. काही संस्था, कंपन्या, कॉपरेरेट्स आणि व्यक्ती पुढे आल्या. आजवर १४० मुलांनी ही गाणी गायलीत. आता हळू हळू सर्व भाषांमधली वेगळ्या अर्थ-आशयाची गाणी येतील, त्याचंही ध्वनिमुद्रण होईल, पण ही गाणी १४०० मुलांनी १४ नोव्हेंबर २०१४ रोजी गेटवे ऑफ इंडिया किंवा अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी गावीत आणि तो एक सोहळाच (इव्हेंट) साजरा व्हावा, अशी कल्पना होती.
आता स्वप्नांनी नवा आकार घेतला आहे.
५ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी केलेलं भाषण ऐकून लहान मुलांवर संस्कार करण्यासंबंधीचे त्यांचे विचार सगळ्या जगालाच समजले. मुलांमध्ये काम करणाऱ्या अनेक व्यक्तींना, संस्थांना, त्यांच्याशी नाळ जुळल्यासारखं वाटलं. हा नवाच साक्षात्कार होता. त्यामुळेच नवीन आशा वर्षांताईंच्या मनात पालवली, ती म्हणजे थेट राष्ट्रपती भवनातच हा कार्यक्रम करण्याची. तिथल्या गरजांनुसार त्याचं स्वरूप थोडं बदलावं लागेल. तो भला मोठा इव्हेंट होणार नाही, याची जाणीव त्यांना नक्कीच आहे. परंतु हा प्रयत्न दूरवर पोचून मुलांना त्यातून जो लाभ व्हावा अशी अपेक्षा आहे, ती पूर्ण होण्यास यामुळे मोठाच हातभार लागेल.
पुढच्या वर्षभरात ही आणि आणखी १४ नवी गाणी किमान १४०० मुलांकडून गाऊन घेतली जातील. ठिकठिकाणी त्याचे कार्यक्रमही होतील.
क्वचित एखाद-दुसऱ्या कार्यालयातून ‘हम होंगे कामयाब’ किंवा ‘हमको मन की शक्ती देना’ यांसारखी एखादी प्रार्थना किंवा समूहगीत काम सुरू करण्यापूर्वी ठरावीक वेळी म्हणावं अशी सुरुवात होत असताना, त्यानिमित्ताने यातला आनंद आणि स्वत:लाच वाटणारी गरज ओळखून एरव्हीपेक्षा आणखी चार डोकी त्या वेळेआधी हजर राहण्याची धडपड करत असताना समूहगानासाठी एवढा मोठा खटाटोप करावा असं वर्षांताईंना वाटणं खूपच स्तुत्य आहे..