एके काळी उन्हाळ्याची सुट्टी लागली की, मुलांना वेध लागत बालनाटय़ांचे. आजच्या मुलांना कार्टून- इंटरनेटच्या विश्वातून बाहेर काढून बालनाटय़ांपर्यंत नेणं आणि ते करताना बालनाटय़ांचा बाजार थोपवणं रोखणार कोण?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काही वर्षांपूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टय़ा लागल्या, की मामाच्या गावाला जायची जशी उत्सुकता असायची तशीच ती बालनाटय़ांचीही असायची. सुट्टय़ांमध्ये कोणती बालनाटय़ं पाहायची, याचेही प्लॅनिंग व्हायचे. तेव्हा ‘दुर्गा झाली गौरी’ असेल, ‘अलबत्या-गलबत्या’ असेल किंवा ‘सिंड्रेला आणि सात बुटके’ असेल, अशी एकामागून एक येणाऱ्या दर्जेदार बालनाटय़ांनी त्या वेळच्या मुलांचं जग व्यापून टाकलं होतं, पण काळ बदलला. त्या वेळी जास्त टीव्ही पाहिला जायचा नाही, मोबाइल तर नव्हतेच, इंटरनेटचा मागमूसही नव्हता. त्यामुळे मनोरंजनाची साधनं फार कमी होती; पण सध्याच्या घडीला उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांमुळे बालनाटय़ाकडे आजची पिढी फारशी वळताना दिसत नाही. दुसरीकडे बालनाटय़ाचा केलेला बाजार हेदेखील याचे कारण असू शकेल. गुणवत्तेला वाव न देता बालनाटय़ प्रशिक्षण शिबिराच्या नावाखाली पैसे उकळायचे, मुलांच्या पालकांवर तिकिटे विकायची सक्ती करायची. एकाच तिकिटामध्ये तीन-चार बालनाटय़ं दाखवायची, त्यामध्ये शिबिरातील मुलं कोंबून भरायची, असे घृणास्पद प्रकारही सुरू आहेत. म्हणूनच पूर्वीची आणि आत्ताची बालनाटय़ं, त्यांच्यामध्ये तसंच पालकांच्या दृष्टिकोनामध्ये झालेला बदल आणि या बालनाटय़ाच्या बाजारूपणावर चर्चा होणे आवश्यक आहे.
कला ही अमर, अभिजात असते, असं म्हटलं जातं. कलेला कसलंच बंधन नसतं, अगदी पैशांचंही नाही. एकीकडे देवाचं दर्शनही पैसे देऊन सुरू झालं असताना कला तरी पैशांच्या ससेमिऱ्यात अडकवून ठेवू नये, असे काही जणांना वाटते. बालनाटय़ म्हणजे लहान मुलांमध्ये नाटकाविषयी आवड निर्माण करायचं किंवा त्याची कुठे तरी सुरुवात होण्याचं एक माध्यम आहे, पण या सुरुवातीच्या काळातच जर हे सारं पैशांशिवाय होऊच शकत नाही, असं समजल्यावर लोकांनी जायचं कुठं? हादेखील प्रश्न आहे. असाच काहीसा प्रकार अभिनेता भूषण कडू याच्याबाबतही घडला. तो म्हणाला की, ‘‘लहानपणापासून मला नाटकांची आवड होती. बालनाटय़ापासूनच माझी सुरुवात झाली, पण सुरुवातीला एक अनुभव फार कटू आला. गिरगावात करेलवाडीमध्ये खेडेकर सायकलवाले आहेत, तिथे प्रभू सेमिनरी शाळा आहे. या शाळेत बालनाटय़ासाठी ऑडिशन्स सुरू होत्या, त्या मी दिल्या आणि माझी निवडही झाली. त्यानंतर ऑडिशन्स घेणाऱ्या व्यक्तींनी माझ्या हातामध्ये एक फॉर्म ठेवला आणि दीडशे रुपये शुल्क भरायला सांगितलं. त्याचबरोबर वेशभूषा आणि रंगभूषेचा खर्चही मीच करायचा होता. मी बाबांना हे दाखवलं. ते गिरणी कामगार होते. त्यांची इच्छा असूनही मला बालनाटय़ासाठी दीडशे रुपये त्यांना देता येत नव्हते. मी पुन्हा त्यांच्याकडे जाऊन अडचण सांगितली, पण त्यांनी काहीही ऐकून न घेता मला बालनाटय़ातून वगळले; पण त्यानंतरही मी आता इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. आता मी त्या शिबिराचे आयोजन करणाऱ्या व्यक्तीला शोधतो आहे.’
सुधाताई करमरकर, रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, मीना नाईक या व्यक्तींबरोबरच आविष्कार या नाटय़संस्थेनेही बालनाटय़ाला चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. मतकरी यांच्या ‘अलबत्या-गलबत्या’ या बालनाटय़ातील दिलीप प्रभावळकर यांची बालनाटय़ातील चेटकीण काही वर्षांपूर्वी चांगलीच गाजली होती. बालनाटय़ाला प्रयोगशाळा मानणारे दिलीप प्रभावळकर त्याबद्दल म्हणतात, ‘‘सध्या मी बालनाटय़ पाहात नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही; पण त्या वेळी मी प्रौढ असलो तरी रत्नाकर मतकरी यांच्या बालनाटय़ांमध्ये काम करायचो. सध्याच्या घडीला रंजन करून घ्यायच्या कल्पना बदलल्या आहेत. आम्ही बालनाटय़ करत असतानाच्या प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या गरजा आणि आताच्या मनोरंजनाच्या गरजा यामध्ये मोठा फरक आहे. आत्ताच्या मुलांना कुठल्या प्रकारची नाटकं दाखवायला हवीत, याचा विचार व्हायला हवा. त्या वेळी टीव्ही बाल्यावस्थेत होता. इंटरनेट नव्हतंच. पण त्या वेळी मतकरींनी प्रत्येक बालनाटय़ांच्या विषयांमध्ये वैविध्य आणलं होतं. ‘अलबत्या-गलबत्या’ बालनाटकांमध्ये मी चेटकीण करायचो. काल्पनिक विषयावर सामाजिक संदर्भ दिलेला असायचा, कधी विज्ञानाची महती सांगणारी बालनाटय़ं असायची. मुलांच्या बुद्धीला वाव देणारी बालनाटय़ं असायची. मी प्रायोगिक, हौशी, व्यावसायिक नाटकं केली; पण बालनाटय़ करताना प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं हे माझ्यासारख्या नटाला खूप मोठं प्रशिक्षण होतं. संवाद साधण्याचा अनुभव मला इथे मिळाला. अभिनयाच्या दृष्टीने ती एक प्रयोगशाळा होती. बालनाटय़ं करण्यामागे उद्बोधन आणि मनोरंजन व्हावे, हा मुख्य हेतू होता. त्या वेळी वेगवेगळे विषय हाताळले गेले, मी सहा बालनाटय़ं केली, पण प्रत्येक भूमिका वेगळी होती. सध्या मी बालनाटय़ं पाहात नसलो तरी एकंदरीत व्यापारीकरणाचा फटकाही या क्षेत्राला बसला असावा, असं वाटतं. त्याचबरोबर आता सारं ‘टू मिनिट न्यूडल्स’सारखं पटकन लागतं. मुलांना लवकरात लवकर शिक्षण द्या, मोठं करा; पण पटकन केलेली करमणूक ही तितक्याच लवकर विसरलीही जाते. सध्या क्रिएटिव्हिटीपेक्षा मार्केटिंगला अधिक महत्त्व आहे, असं एकंदरीत दिसतं आहे. आता बालनाटय़ करणाऱ्यांपुढे मोठं आव्हान असं आहे की, मुलांना गुंतण्यासाठी आता बरीच साधनं उपलब्ध आहेत; पण काही कालातीत नाटकं असतात. काही दिवसांपूर्वी आलेलं ‘लायन किंग’सारखं नाटकं मोठय़ांनाही गुंतून ठेवतात. त्यामुळे अशी काही नाटकं केली, तर आजची मुलंही त्यामध्ये गुंततील.’
काळ बदलला तसा बालनाटय़ांच्या दर्जाची अधोगती व्हायला सुरुवात झाली. आताची मुलं अ‍ॅनिमेटेड बाल चित्रपट आवडीने बघतात, पण बालनाटय़ाकडे सहसा वळताना दिसत नाहीत. यामध्ये त्यांच्या पालकांचीही चूक आहे. कारण त्यांनी लहानपणी बालनाटय़ं पाहिल्यावर आपल्या मुलांना त्याकडे नेलं नाही. याबाबत ‘दुर्गा झाली गौरी’, या प्रसिद्ध बालनाटय़ामध्ये ‘दुर्गा’ ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी सांगितलं की, ‘‘आमच्या वेळी फार चांगली बालनाटय़ं यायची, त्यामध्ये वैविध्यही होतं. आता या पिढीला मात्र काहीच मिळत नाही, असं वाटतं. मुलांची आवड बदललेली आहे आणि त्याचा विचार करायला पाहिजे. त्यांना चॅनेल्सपासून दूर आणलं पाहिजे, त्यासाठी नामांकित नाटक कंपन्यांनीही पुढे येण्याची गरज आहे. ‘लायन किंग’, ‘दुर्गा झाली गौरी’, ‘वृक्षवल्ली आम्हा..’ अशी काही बालनाटय़ं होती जी बरीच वर्षे चालू शकतील, पण त्यामध्ये किती वेळ आपण रमणार किंवा ग्रीप्स थिएटरसारखी एक उत्तम संकल्पना आहे, पण त्याचे प्रयोग सर्व ठिकाणी व्हायला हवेत. जशी संगीत नाटकं लयाला चालली आहेत तशीच अवस्था बालनाटय़ांची आहे. मुलं कॉम्प्युटर आणि अन्य गॅझेट्समध्ये अडकलेली आहेत, त्यामधून त्यांना बाहेर काढायला हवं. आज मी माझ्या मुलीला मल्टिप्लेक्समध्ये जाऊन अ‍ॅनिमेटेड चित्रपट दाखवू शकते, पण तेच पैसे आपण बालनाटय़ासाठी खर्च करत नाही. बालनाटय़ाचा अनुभव या मुलांनी घ्यायला हवा, त्यासाठी दर्जेदार नाटकं यायला हवीत, त्यांच्या विश्वात जाऊन करायला हवं. आम्ही त्या वेळी या बालनाटय़ाचा आनंद लुटला होता; पण सध्या पालकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांना सर्व गोष्टींमध्ये नंबर वन व्हायला हवं. त्यासाठी शिबिरांमध्ये प्रवेश मिळवा, प्रमाणपत्र घ्या आणि त्यानंतर मालिका किंवा चित्रपटांमध्ये कामं मिळतात, असं पालकांना वाटतं. या कलेचा मुलांना मोकळेपणाने आनंद घेता यायला हवा. मुलांना वर्षभर शिबिरं करता येणार नाहीत, पण माझ्या मते शाळेमध्ये जसे शारीरिक शिक्षणाचे तास असतात, तसेच नाटकाचेही व्हायला हवेत. तरच आपल्याला त्यांच्यामधले लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, नेपथ्यकार, संगीतकार मिळू शकतील किंवा चांगले प्रेक्षक तर नक्कीच मिळतील. या विषयाची परीक्षा नाही ठेवायची, त्यांना मोकळेपणाने करायला हवं. आपल्याला जो शाळेचा अभिमान वाटतो तो या मुलांनाही वाटायला हवा. यामधून मुलं ताजीतवानी होण्यास मदत होईल. यामध्ये एक पालक आणि कलाकार म्हणून आमचीही चूक आहे. कारण आम्ही त्यांच्यामध्ये जायला हवं, अनुभव वाटायला हवेत. आम्हाला आविष्कार नावाचं हक्काचं ठिकाण होतं, तसं आता दिसत नाही. बालप्रेक्षक आपल्या रंगभूमीकडे वळायला हवेत.’
सध्याच्या घडीला बरीच बालनाटय़ं शिबिरं होत असतात; पण मुलांचा, त्यांच्या मानसिकतेचा विचार करून गौरी केंद्रे या बालनाटय़ं शिबिरं घेतात. त्यांनी याविषयी सांगितलं की, ‘‘पूर्वी सुट्टीमध्ये मामाच्या गावाला गेल्यावर गोष्टींचा खजिना मिळायचा, त्यामध्ये सारे रमून जायचे, तो काळ तसाच होता, पण आता कॉम्प्युटरवर सारं काही पाहायला मिळतं. आता एकत्र कुटुंबपद्धती राहिलेली नाही. त्यामुळे मुलांचं संगोपन चांगलं होतंच असं नाही, कारण मुलांचा पालक आता कॉम्प्युटर झाला आहे, सर्व प्रश्नांची उत्तरं तो देतो. त्यामुळे जुन्या जमान्यातील बालनाटय़ं आता त्यांना दाखवून चालणार नाही. ती नाटकं त्या काळात महान होतीच, पण बदल स्वीकारायला हवा आणि तो बदल स्वीकारून तसे प्रयत्न व्हायला हवेत. त्यांचं जग आता वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर बौद्धिक भूकही. त्यामुळे त्याला अनुसरूनच आताची बालनाटय़ं व्हायला हवीत. मुळात मराठी बाल मासिकं बंद झाली, त्यांची देवाण-घेवाण व्हायची, यामधली गंमत आता नाही. मुलांचं वाचन वाढायला हवं. शिबिरांबाबत बोलायचं झालं तर तुम्हाला बालनाटय़ं शिबिरात काय शिकवायचंय, याचा अभ्यासक्रम तयार असायला हवा. आता शंभर लोक शिबीर घेतात. दोन मालिकांमध्ये काम केलेले लोकही शिबीर घेतात, पण अभिनय करणं आणि शिकवणं यात मोठा फरक आहे. आधी आपण शिकायला हवं आणि त्यानंतर मुलांना शिकवायला हवं. पालकही ग्लॅमरमुळे आंधळेपणे जातात, पण त्याने काय सिद्ध केलंय, हे पालकांनी शोधायला हवं. पालकांनी विचारायला हवं की, शिबिरात नेमकं काय शिकवणार आहात? शंभर मुलं जमवून, त्यांचे थातूरमातूर खेळ घेऊन शिबीर होत नाही. तुम्हाला प्रत्येक दिवशी शिकवण्यासारखं मटेरियल असायला हवं. एक महिन्याचं शिबीर असेल तर निदान तुमच्याकडे शिकवायला सहा महिन्यांचं मटेरियल असायला हवं. त्याचबरोबर मुलांची मानसिकता बघून त्या पद्धतीने शिकवायला हवं. त्यासाठी प्रशिक्षकाकडे अनुभव हवा. प्रशिक्षकाला प्रत्येक मुलाची कुवत, आवड माहिती असायला हवी. या शिबिरांमुळे लगेचच आपला मुलगा अभिनेता झाला, आता साऱ्यांची घरापुढे गर्दी होईल, असं पालकांना वाटत असेल तर तसं नसतं. अभिनय म्हणजे काय, शरीराचा वावर कसा असायला हवा, आवाज कसा असायला हवा, एखाद्या भूमिकेचा अभ्यास कसा कराल, भूमिकेसाठी मानसिकता कशी असावी, या साऱ्या गोष्टी मुलांना शिकवायला हव्यात. एका तिकिटामध्ये जी काही तीन-चार नाटकं असतात, ती मी पाहिली नाहीत. एका वेळी सर्व मुलं दाखवायची, हा अट्टहास असू शकेल. त्यामुळे कुणाला झाड करा, कुणाला पान, कुणाला फूल. पण या गोष्टींना दर्जा नसावा. त्यांनी जर दर्जा कायम राखला तर नक्कीच मुलं पुन्हा बालनाटय़ाकडे वळतील. मुलांना फक्त व्यग्र ठेवायचं म्हणून पालकांनी त्यांना शिबिरामध्ये आणू नये, पालकांनी डोळस होणं गरजेचं आहे. आजच्या काळात बालनाटय़ं लिहिली जात नाहीत, ही एक मोठी गोम आहे.’’
सुधाताई करमरकरांच्या बालनाटय़ शिबिरांमधून कारकीर्द घडवणारा आणि व्यावसायिक रंगभूमीवर व्यग्र असूनही बालनाटय़ांसाठी वेळ काढणारा भूषण कडू म्हणाला की, ‘‘शिबिरं घेणं, पैसे उकळणं, पालकांना वेठीस धरणं, आपला मुलगा रंगमंचावर दिसावा या पालकांच्या भावनेचा फायदा घेणं, हे कुठे तरी थांबायला पाहिजे असं मला वाटतं. मुलांवर कोणतीही गोष्ट लादू नये. त्यांना त्यांचं ठरवू दे. सध्याच्या घडीला बालनाटय़ाच्या काही शिबिरांमध्ये प्रचंड प्रमाणात शुल्क आकारलं जातं. मुलांच्या वेशभूषेचा खर्चही पालकांनाच करावा लागतो. त्याचबरोबर सर्वात वाईट गोष्ट म्हणजे पालकांनाच तिकिटं विकावी लागतात. काही जणांमध्ये लहानपणापासूनच गुणवत्ता असते. मग त्यांनी असे पैसे का भरावेत आणि ज्यांच्याकडे ही गुणवत्ता नाही तर त्यांच्या पालकांनी असे पैसे का भरावेत? त्यामुळे काही गल्ला जमवणाऱ्या लोकांचा फायदा होतो. कारकीर्द पटकन घडत नसते. माझी अशी विनंती आहे की, अशा लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका. ग्लॅरमच्या मागे धावल्याने तुम्ही निष्फळ ठराल. तुम्ही काम केल्यावर मानधनाची अपेक्षा करणं गैर नक्कीच नाही. सुधाताई करमरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही समूह नावाची संस्था स्थापन केली आहे, जी बालनाटय़ं करणारी अशीच एकच संस्था असावी जी प्रत्येक कलाकाराला मानधन देते, त्याच्या प्रवासापासून साऱ्या व्यवस्था जातीने पाहते. जसं व्यावसायिक नाटकाच्या वेळी असतं अगदी तसंच आम्ही बालनाटय़ाच्या वेळीही करतो. एकाच तिकिटांमध्ये तीन किंवा चार बालनाटय़ं दाखवणं हा फसवेगिरीचा धंदा आहे, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. एक चांगली कथा घेऊन बालनाटय़ं बनवायला हवीत, ज्याला चांगलं नेपथ्य, संगीत, वेशभूषा, रंगभूषा असेल. कारण आज जर आपण चांगली बालनाटय़ं बनवली तर आपल्याला उद्याच्या नाटकांसाठी प्रेक्षक मिळू शकतील. यातून बालरंगभूमी टिकेलच, एकंदरीत नाटक टिकेल. या मुलांना चांगल्या गोष्टी ऐकवायला हव्यात. या साऱ्या इंटरनेटच्या जगाबाहेर दुसरं जग आहे, हे त्यांना दाखवायला हवं. बालनाटय़ हा एक विचार आहे, एक बी आहे, जी चांगली रुजली तर चांगली फळं नक्कीच मिळू शकतील. पुन्हा एकदा बालनाटय़ासाठी चळवळ उभी राहण्याची गरज आहे.’’

आपल्याकडे बालनाटय़ाला एक परंपरा होती. ती मोडीत निघणार का, अशी भीती आता वाटायला लागली आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये दर्जेदार बालनाटय़ांचा दुष्काळ जाणवत आहे. सध्या मुलं इंटरनेट आणि कार्टून चॅनेल्सवरच व्यग्र असल्याचं दिसतं. त्यांना यामधून बाहेर काढणारं बालनाटय़ यायला हवं. ते फक्त त्यांच्यासाठीच असायला हवं. मुळात गेल्या काही वर्षांमध्ये काही जणांनी बालनाटय़ शिबिराच्या नावाखाली जो काही ‘धंदा’ सुरू केला आहे, त्यामुळे लोकांचा या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यासाठी नावलौकिक मिळवलेल्या नाटय़ कंपन्यांनी पुढे यायला हवं. कारण आज बालनाटय़ं पाहणारी मुलं हेच उद्याचे प्रेक्षक असणार आहेत. पालकांनीही डोळसपणे याकडे पाहायला हवं. आपण आपल्या पाल्याला कुठल्या बालनाटय़ शिबिरात पाठवावं, हे ठरवायला हवं. त्याचबरोबर तिथे का पाठवत आहोत, हा हेतू स्वच्छ असायला हवा. एकंदरीत बालनाटय़ाच्या ढासळत्या डोलाऱ्याला आपणच जबाबदार आहोत. आपणच बदल घडवला तरच बालनाटय़ाला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल, नाही तर बालनाटय़ाचा हा बाजार असाच चालू राहील.

माझ्या मते नाटकाचेही तास व्हायला हवेत. तरच आपल्याला त्यांच्यातून लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, नेपथ्यकार, संगीतकार मिळू शकतील किंवा चांगले प्रेक्षक तर नक्कीच मिळतील.

बालनाटय़ करताना प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं हे माझ्यासारख्या नटाला खूप मोठं प्रशिक्षण होतं. संवाद साधण्याचा अनुभव मला इथे मिळाला. अभिनयाच्या दृष्टीने ती एक प्रयोगशाळा होती.

शंभर मुलं जमवून, त्यांचे थातूरमातूर खेळ घेऊन शिबीर होत नाही. एक महिन्याचं शिबीर असेल तर निदान तुमच्याकडे शिकवायला सहा महिन्यांचं मटेरियल असायला हवं.

सध्या बालनाटय़ाच्या काही शिबिरांमध्ये प्रचंड शुल्क आकारलं जातं. मुलांच्या वेशभूषेचा खर्चही पालकांनाच करावा लागतो. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे पालकांनाच तिकिटं विकावी लागतात.
प्रसाद लाड