lp31छोटय़ा दोस्तांनो, बालदिनाच्या निमित्ताने ‘लोकप्रभा’ देत आहे, तुमच्यासाठी धम्माल कथा आणि कवितांचा विशेष विभाग-

संगीता म्हणजे एकदम हौशी मुलगी. तिला सगळ्यात फार रस असायचा. विशेषत: खेळण्यात, अवांतर वाचण्यात आणि अभ्यासातसुद्धा. तशी ती ऑलराऊंडर होती. त्यामुळे शाळेत शिक्षकांची लाडकी आणि घरी आईबाबांची. पण गेल्या काही महिन्यांपासून सारंच बिनसलंय. त्यासाठी कारणीभूत ठरलेत ते टीव्हीवरचे रिअ‍ॅलिटी शोज.
बरेचदा रात्रीच्या जेवणाच्या वेळी आई टीव्हीवरचे हे रिअ‍ॅलिटी शोज लावायची. भोजनाचा आस्वाद घेत सर्व जण या कार्यक्रमाचाही आनंद घेत. प्रारंभी संगीताला या कार्यक्रमांमध्ये विशेष रस वाटला नाही. पण नियमितपणे हेच कार्यक्रम बघण्यात येऊ लागल्यानं तिला या कार्यक्रमांमध्ये मजा येऊ लागली. ती हे कार्यक्रम एन्जॉय करू लागली.
रिअ‍ॅलिटी शोज कोणते असतात याचा शोध तिने घेतला. त्यासाठी सुट्टय़ांच्या दिवशी ती तासन्तास टीव्हीपाशी बसून चॅनेल सìफग करत असे. त्यातून तिला कळलं की रिअ‍ॅलिटी शो हे नृत्य, गायन, अभिनय, विनोद, साहस अशा प्रकारातले असतात. तिने मग कोणत्या दिवशी कोणता शो कोणत्या चॅनेलवर सुरू होतो, याचं वेळापत्रक केलं नि तिच्या खोलीत लावलं. सुरुवातीला आईबाबांना आणि आजूबाजूच्या काका-काकूंना तिचं भारीच कौतुक वाटलं.
या कौतुकाचा संगीताला मनस्वी आनंदही झाला त्यामुळे प्रत्येक चॅनेलवरचा रिअ‍ॅलिटी शो ती बघू लागली. एकमेकांच्या वेळेत जर हे शो असतील तर रात्रीचे पुनर्प्रक्षेपित भाग ती बघू लागली. तेही शक्य झालं नाही तर रविवारी हे शो जेव्हा पुन्हा दुसऱ्यांदा प्रक्षेपित होत तेव्हा तर न चुकता बघू लागली.
दररोज हे शो कधी सुरू होतात याची ती वाटच बघत असे. शाळेतून आली की सारं लक्ष या शो सुरू होण्याकडे. त्यामुळे यात तिचा खूप वेळ जाऊ लागला. डोळ्यांची पापणीही न हलवता ती हे कार्यक्रम बघायची. प्रारंभी कौतुक करणाऱ्या आईबाबांना तिचं हे या शोजला असं चिकटून बसणं आवडेनासं झालं. सारखं सारखं तेच ते बघितल्यानं डोळ्यावर परिणाम होतील, अभ्यासावर परिणाम होईल, पाठ दुखेल असं आईनं समजावून सांगितलं. बाबाही अधूनमधून रागवायचे. पण ती या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायची. फार तर एखाद-दुसरा कार्यक्रम टाळायची. पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या.
शेवटी व्हायचं तेच झालं. तिचं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं. याचा परिणाम अभ्यासावर झालाच. शाळेत होणाऱ्या विविध स्पर्धा, चाचण्या यात ती मागे पडू लागली. असं याआधी कधी झालं नव्हतं. शिक्षकांनाही चिंता वाटू लागली. वर्गशिक्षिकेने संगीताच्या बाबांची भेट घेऊन त्यांची चिंता कळवली. आता बाबांनाही काळजी वाटू लागली. बाबांनी तिला बरंच समजावलं, पण तेवढय़ापुरतच. संगीताचं रिअ‍ॅलिटी शो बघण्याची तिची हौस काही फिटली नाही.
यावर उपाय काय करावा हे काही बाबांना सुचेना. अशा वेळी ते संगीताला घेऊन बांद्रय़ाच्या समुद्रकिनारी असलेल्या बँडस्टँडला जायचे.
हे संगीताचं मुंबईतलं सर्वात आवडतं ठिकाण. कारण तिथे आहे शाहरुख खानचा मन्नत बंगला. शाहरुख तिचा आवडता हिरो. एक ना एक दिवस शाहरुख या बंगल्यात दिसेल असं तिला वाटायचं. त्यामुळे बँडस्टँडला जाण्याची गळ ती नेहमीच बाबांना घालायची. बँडस्टँडला जाण्याचं बाबांनी सांगताच तिने बाबांना मस्त पप्पी दिली.
x x x
बँडस्टँडला आल्यावर शाहरुखच्या बंगल्याकडे कौतुकाने बघत संगीता बाबांना म्हणाली,
‘‘बाबा बाबा, शाहरुख किती ग्रेट आहे नाही का?’’
‘‘आहेच की, पण तो ग्रेट का आहे याचा विचार केलास का कधी़.’’
‘‘हे बघा बाबा, तो टीव्ही बघत नाही म्हणून ग्रेट ब्रिट आहे असं काही प्रवचन देऊ नका हं.’’ संगीता म्हणाली. त्यावर आईबाबा दोघेही हसले.
‘‘मी अजून कुठे काय म्हणालोय. तूच निष्कर्ष काढलास.’’ बाबा म्हणाले. रिअ‍ॅलिटी शोजचे दुष्परिणाम संगीताला समजावून सांगणं कठीण असल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं.
‘‘बरं तर, मग तुमच्या मते शाहरुख खान ग्रेट का आहे?’’
‘‘सांगू का, पण तुला ते पटणार नाही. कदाचित धक्काही बसेल.’’ बाबांनी लांबलचक प्रस्तावना केली. संगीतानं lp32जांभई दिली.
बाबांकडे कंटाळलेल्या चेहऱ्यानं बघत संगीता म्हणाली,
‘‘बाबा बोअर करू नका ना. डायरेक्ट सांगा की.’’
‘‘बरं बाई, सांगतो. तुझा आवडता शाहरुख ग्रेट झाला याचं महत्त्वाचं कारण म्हणजे टीव्हीवरील रिअ‍ॅलिटी शो.’’ बाबांचं हे वाक्य कानावर पडताच संगीताच्या चेहऱ्यावरचा कंटाळा पळाला. बाबा आपली खेचताहेत असं तिला वाटलं. त्यामुळे ती त्यांना हलकेच चिमटा घेत म्हणाली,
‘‘बाबा, तुम्ही माझी खेचताहात, अहो तुम्हाला हे शोज आवडत नाहीत. परवा किती रागावलात तुम्ही मला.’’
‘‘अगं मी रिअ‍ॅलिटी शो आवडत नाही असं कुठं म्हणालो, त्यासाठी तुला रागावलो पण नाही.’’
‘‘खरं की काय? पण मला खरंच वाटत नाही हो. कारण मी रिअ‍ॅलिटी शो बघते तेव्हा तुम्ही आणि आई किती कुरकुर करता.’’
‘‘तेच तर मला सांगायचंय बाळे.’’ बाबा तिला म्हणाले आणि मन्नत जवळ असलेल्या एका सिमेंटच्या आसनाकडे घेऊन गेले. त्यांनी बुट्टय़ेवाल्याला हाक मारली. तीन गरमागरम बुट्टे घेतले. त्यांचा आस्वाद घेत पुन्हा ते मूळ विषयावर आले.
‘‘बाबा, तुम्ही मघा म्हणालात की मला तेच सांगायचंय म्हणून. काय ते सांगाना.’’
‘‘अगं, माझ्यासारखी आणि तुझ्या आईसारखी शाहरुखची आईसुद्धा कटकट करायची, त्याच्या टीव्हीवरील रिअ‍ॅलिटी शो बघण्यावरून.
‘‘हो का, मग पुढे काय झालं?’’
‘‘काय होणार? शाहरुख चिडला.’’
‘‘खरंच?’’
‘‘शाहरुखची शप्पथ!’’
‘‘बरं बरं, पुढे काय झालं?’’
‘‘शाहरुखने चिडून प्रतिज्ञा केली की यापुढे मी रिअ‍ॅलिटी शोच बघणार नाही.’’
‘‘बाबा तुम्हाला काय सांगायचंय ते कळलंय मला.’’ संगीता लटक्या रागाने म्हणाली. शाहरुखच्या आडून उपदेशाचे डोस बाबा आपल्याला पाजताहेत हे तिच्या लक्षात आलं होतं.
‘‘अगं पुढचं तर ऐकून घे ना.’’
‘‘सांगा,’’ समुद्राच्या लाटांकडे बघत संगीता नाखुशीने म्हणाली.
‘‘शाहरुख त्याच्या मम्मीला म्हणाला, मम्मी तू सारखी रागावतेस ना या रिअ‍ॅलिटी शो बघण्यावरून मला, बघ एके दिवशी मी या शोमध्ये कामच करून दाखवीन.’’ बाबांना जे त्याक्षणी सुचलं ते बोलून गेलं.
रिअ‍ॅलिटी शो न बघणं, पण त्यात काम करणं ही आयडिया झक्कासच असल्याचं संगीताच्या चटदिशी लक्षात आलं. आवडत्या शाहरुखलाच हे असं धम्माल सुचू शकतं असं वाटून ती आनंदली. तिने बाबांकडे कौतुकानं बघितलं. तिचा राग गेल्याचं बाबांच्या लक्षात आलं. त्यांनी तीन आइस्क्रीम घेतले. संगीता जाम खूश झाली. त्या आनंदातच ती म्हणाली,
‘‘पुढे काय झालं बाबा..’’
‘‘पुढे तेच झालं. शाहरुखने बोलल्याप्रमाणे करून दाखवलं. रिअ‍ॅलिटी शो बघणं थांबवल्यानं त्याचा वेळ वाचला. या वाचलेल्या वेळेचा उपयोग तो अभिनयाच्या सरावासाठी करू लागला. त्यातून त्याचं अभिनय कौशल्य वाढलं. त्याला एका टीव्ही मालिकेत काम मिळालं. पुढे सिनेमात काम मिळालं. तो मोठा हिरो झाला. माय डियर संगीताचा तो आवडता हिरोसुद्धा बनला. आता तर प्रत्येक रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसतो.’’
‘‘खरंच की बाबा.’’
‘‘खरंय ना. तेच तर मला सांगायचंय. हे शोज बघू नकोस असं कुठे मी किंवा मम्मी म्हणतोय. पण किती वेळ त्यात घालवायचा हे तर तू ठरवू शकतेस ना. आतापर्यंत खूप शोज बघितलेस. आता न बघता या शोचाच भाग होण्यासाठी प्रयत्न कर की. तुला बॉलीवूड नृत्य आवडतात. त्याचा सराव कर, रिअ‍ॅलिटी शोच्या वेळेत नि भाग घे एखाद्या नृत्य शोमध्ये. वाटल्यास तुला मी टेरेन्स लुईची शिकवणी लावून देतो.’’ बाबा एका दमात बोलून गेले.
बाबांच्या बोलण्यात पॉइंट असल्याचं चाणाक्ष संगीतानं ओळखलं. शो बघण्याऐवजी शोमध्ये सहभागी होण्याची आयडिया ग्रेट आणि स्मार्ट होती, अगदी तिच्या आवडत्या शाहरुखसारखीच.
संगीता, आता शाळेतून आल्यावर दररोज दोन तास नृत्याचा सराव करतेय.
रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेणारच याचा तिने निर्धार केलाय.

Story img Loader