भारतीय पुनरुज्जीवनवादी कला चळवळीला १९२०च्या सुमारास सुरुवात झाली. त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे गुणवंत हणमंत नगरकर. वॉश टेक्निक पद्धतीने त्यांनी केलेले चित्रण विशेष गाजले. पारदर्शक जलरंगांचे एकावर एक थर चढवत हे चित्रण केले जाते. छाया-प्रकाशाचा वापर टाळून मानवाकृतींचे केलेले लयदार रेखाटन ही त्यांची शैली होती. ‘रामाला वनवासात जाण्याचा दिलेला आदेश’ हे या प्रस्तुतच्या चित्राचे शीर्षक असून त्यातही ही शैली व्यवस्थित पाहाता येते. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातर्फे येत्या १० जूनपासून सुरू होणाऱ्या प्रवाह या प्रदर्शनामध्ये हे चित्र प्रत्यक्ष पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
आणखी वाचा