जलरंग आणि महाराष्ट्रीय कलावंत यांचे एक वेगळेच नाते असावे, बहुधा. त्यातही बंगाल आणि महाराष्ट्र आणि गेल्या काही वर्षांमध्ये केरळमधील कलावंतदेखील त्यात समाविष्ट झालेले दिसतात. गेल्या शंभरेक वर्षांपासून तर महाराष्ट्रीय कलावंतांचे जलरंगांशी जोडलेले हे नाते आपल्याला स्पष्टपणे जाणवते. जलरंगांचे जादूगार म्हणून गौरविले गेलेले विख्यात चित्रकार प्रल्हाद अनंत धोंडदेखील याच महाराष्ट्रातील. त्यामुळे आपल्या कलाकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात प्रत्येक कलावंताला या जलरंगांची भुरळ पडतेच, पण प्रत्येकाची त्या जलरंगांवर तेवढी पकड नसते. प्रवाहीपणा हा पाण्याचा गुणधर्म, त्यामुळेच खूप छान वातावरणनिर्मिती जलरंगांमध्ये आकारास येते. त्यातही पावसाळी वातावरण म्हणजे जलरंगांसाठीचा उत्सवच. पण तो प्रत्येकाला जमतोच असेही नाही, काही तरुण चित्रकारांचे काम पाहिल्यावर त्यांच्या कामात सातत्य असेल तर ते भविष्यात कोणत्या दिशेने जाणार, याची चुणूक पाहायला मिळते, अशा नव्या दमाच्या चित्रकारांमध्ये अमोल पवार यांचा समावेश होतो. त्यांच्या नव्या चित्रकृतींचे प्रदर्शन येत्या ४ ते १० ऑगस्ट या कालावधीत जहांगीर कलादालनात पाहायला मिळणार आहे.
त्यांची काही चित्रे पाहताना धोंड सरांच्या चित्रांची आठवणही येते. अर्थात तो पल्ला गाठणे तसे दूर आहे. मात्र हा कलावंत जलरंगांवर प्रभुत्व गाजवण्याची क्षमता राखतो, हे मात्र त्यांच्या चित्रांवरून नक्कीच लक्षात येते. सोनहिरव्या संध्याकाळचा परिणाम एका चित्रात त्यांनी नेमका पकडला आहे. मुंबईतील फ्लोरा फाऊंटनचे चित्र त्यांना चित्रचौकटही नेमकी कळते आहे, याची साक्ष देणारे आहे. आवर्जून वाट वाकडी करून हे प्रदर्शन पाहायला हरकत नाही.
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा