मत्स्यकन्या म्हणजेच मर्मेडच्या गोष्टी सिनेमावाल्यांना अजिबातच नव्या नाहीत. १९८४ मध्ये आलेल्या टॉम हँक्सच्या ‘स्प्लॅश’नंतर जगभर मर्मेड या एकाच विषयावर अनेक चित्रपट निघाले, त्यावर टीव्ही मालिकाही झाल्या. यातून तयार झालेल्या घिस्यापिटय़ा कथानकांना धक्का देणारा आणि चीन तसंच अमेरिकेतलं बॉक्स ऑफिस हादरवणारा सिनेमा म्हणजे या वर्षी आलेला स्टीफन चाऊचा मर्मेड!
कोलंबसच्या अमेरिकी शोधाची जागतिक घटना इतिहासाच्या पानांतून सर्वानाच ज्ञात आहे. मात्र त्यानेच १४९३ साली मत्स्यकन्या पहिल्यांदा पाहिल्याची नोंद असल्याचा तितकासा गवगवा झाला नाही. मुळात अर्धमानव आणि अर्ध मत्स्य शरीर असलेल्या मत्स्यकन्येच्या अस्तित्वाचे पुरावे दरेक शतकांत सापडतात. त्यांच्या दंतकथाही पसरलेल्या पाहायला मिळतात. २००५ सालातील त्सुनामीनंतर दक्षिण भारतातही मत्स्यकन्येचा सांगाडा सापडल्याची सचित्र चर्चा मायाजालावर सापडू शकेल. मत्स्यकन्यांच्या अस्तित्वाच्या दाव्यांची अन् त्यांना खोडून काढलेल्या प्रतिदाव्यांची अगणित उदाहरणे असली, तरी परिकथा, टीव्ही आणि चित्रपट माध्यमांनी त्यांचा बक्कळ वापर केला. अनेक परिकथांचा जन्मदाता हान्स ख्रिश्चन अॅण्डरसन याच्या ‘लिटिल मर्मेड’पासून सुरू झालेला प्रवास मत्स्यकन्येच्या शेकडो हॉलीवूड सिनेमांमधून दिसला. संगणकीय वापराने अॅनिमेशन जसे समृद्ध झाले, तसे मत्स्यकन्यांच्या आवृत्त्याही देखण्या झाल्या.
मत्स्यकन्यांच्या चित्रपटांमध्ये अगदी अलीकडेपर्यंत सर्वाधिक गाजलेला आणि जगभर पोहोचलेला सिनेमा होता तो टॉम हँक्स या अभिनेत्याच्या अगदी सुरुवातीच्या काळातला ‘स्प्लॅश’ (१९८४) हा चित्रपट. या चित्रपटात मत्स्यकन्या आणि मानव यांच्यातील प्रेमकथा रंगविण्यात आली होती. यात मत्स्यकन्या ही इच्छाधारी नागिणीप्रमाणे (ही देखील दंतकथाच) आपले शरीर हवे तेव्हा मानवी आणि हवे तेव्हा मत्स्यकन्येमध्ये परावर्तित करणारी दाखविली होती. तिच्यातील काही वैशिष्टय़े मात्र व्हॅम्पायर आणि सिण्ड्रेलापटांनी प्रेरित होती. या मत्स्यकन्येला सूर्याच्या प्रखरतेचा त्रास होताना दाखविला आहे व तिला दररोज विशिष्ट वेळेत समुद्रात परतणे भाग असते. या प्रेमकथेला अनेक वाटा फोडत मानवाच्या कोत्या वृत्तीचे दर्शन घडविण्याचा पर्यावरणवादी विचार वगैरे ‘स्प्लॅश’ चित्रपटामध्ये मांडण्यात आला होता. या चित्रपटापासून प्रेरित होत नंतर मत्स्यकन्येवर आधारलेले अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिका झाल्या. मात्र मूळ चित्रपटाच्या लोकप्रियतेला बराचसा धक्का पोहोचायला तब्बल २०१६ उजाडावे लागले. ‘मर्मेड’ या हाँगकाँगच्या चित्रपटाने वर्षांच्या सुरुवातीला चीन आणि नंतर अमेरिकी तिकीटबारी हादरवली.
‘कुंग फू हसल’ आणि ‘शाओलिन सॉकर’ हे विनोदी चित्रपट जगभर गाजविणाऱ्या स्टीफन चाऊने या वर्षी आणलेला ‘मर्मेड’ चीनमधील बॉक्स ऑफिसवर विक्रमी गल्ला करणारा, म्हणून त्याची नोंद आहेच. पण हान्स ख्रिश्चन अॅण्डरसनची परिकथा आणि त्यानंतर आलेल्या हजारो मत्स्यकन्यांच्या अवतारांना पुरून उरणारी गोष्ट हे त्याचे वैशिष्टय़ आहे. याशिवाय चाऊच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणे येथे तिकडम विनोदाचा पुरेपूर वापर आहे.
‘मर्मेड’मध्ये पर्यावरणवादी दृष्टिकोन आहेच. पण चाओने मर्मेडचे मानवाला समांतर विश्व तयार केले आहे. या विश्वात एका निर्जन समुद्रतटावर मर्मेडची प्रचंड मोठी वस्ती मानवासारखीच राहत असते. कुण्या एका काळातील मानवी संपर्कातून ही वस्ती तिथे विसावलेली असते. तिच्या अस्तित्वावर घाला घालण्याचा मानवी प्रयत्न उधळून लावण्यासाठी ती लढण्यासाठी सज्ज होते. हा लढण्याचा नवा प्रकार तयार करण्यात आला आहे.
चित्रपटाला सुरुवात होते ल्यू शुआन नावाचा गडगंज तरुण उद्योगपती एका मोठय़ा लिलाव प्रक्रियेत समुद्री पट्टा चढय़ा बोलीने विकत घेतो, त्याने. या समुद्री पट्टय़ाला विकसित करून आणि त्यात कृत्रिमरीत्या जमिनीची भर घालून विकास करण्याचा त्याचा मनसुबा असतो. अनेक उद्योजकांच्या डोळ्यांना झोंबवणारी बोली लावून त्याने हा समुद्री पट्टा घेतला असल्याने, सुरुवातीला त्याची संभावना होते. मात्र तरीही उद्योगनफा आणि आपल्या तारुण्यनशेत मश्गूल असलेल्या शुआनकडून या समुद्रातील जलचरांना संपविणारी यंत्रणा कार्यान्वित होते. या यंत्रणेमुळे एक संपूर्ण मत्स्यकन्या आणि ऑक्टोपसची मानवासारखी जगणारी परिसंस्था बिथरते. ल्यू शुआनला ठार मारण्यासाठी या वस्तीत मानवासारखाच कटकारस्थानाचा कट घडतो. शान नावाच्या सर्वाधिक सुंदर मत्स्यकन्येला मानवी आचार-व्यवहारांची दीक्षा दिली जाऊन शुआनला मारण्यासाठी खरोखरीच्या मानवी वस्तीत पाठविले जाते. ल्यू शुआनजवळ असलेल्या पैशांवर भाळणाऱ्या हुजऱ्यांना टाळत शान त्याच्या संपर्कात येते. पैशाबद्दल कोणतेही स्वारस्य न दाखविणाऱ्या या मुलीच्या तो प्रेमात पडतो. शानचे शुआनला ठार मारण्याचे सुरुवातीचे प्रयत्न प्रचंड विनोद करीत फसतात. नंतर नकळतपणे त्याच्या प्रेमात पडलेली शान त्याला मारण्यापासून परावृत्त होते. मात्र वस्तीमधील ऑक्टोपस आणि सारे तिला वाळीत टाकतात. पुढे शुआनला ती मत्स्यकन्या असल्याचा पत्ता लागतो. मर्मेडची वस्ती असल्याचे तो पोलिसांना सांगतो. तेथे त्याची पुरती खिल्ली उडविली जाते. मात्र त्याच्याच उद्योगात कार्यरत असलेला संशोधक आणि सहभागी उद्योजिका मर्मेडच्या जनुकांचा वापर करून नव्या नफ्याच्या विचारात त्या संपूर्ण समुद्री पट्टय़ावर कब्जा करतात. संघर्ष शिगेला पोहोचतो. यात शुआन आणि शान यांची प्रेमकथा निर्णायक वळणावर येऊन ठेपते.
चित्रपटात एकाच वेळी विनोद आणि गांभीर्याचे मिश्रण पाहायला मिळते. स्टीफन चाऊ याचा विनोद हा पाचकळ प्रवृत्तीचा नाही. येथे मर्मेड आणि तिच्या विषयीच्या समज-गैरसमजांनी भरलेले कुतूहल सिनेमाशी संबंध नसलेल्या कथानक घटकांतून दाखविण्यात येते. शुआनचे श्रीमंतीपण, त्याचे मौजेत आणि पैशांच्या माजेत हरविलेले तारुण्य, बावळटांहून बावळट सहउद्योजक आणि मत्स्यकन्येच्या जगतातील मानवसदृश विचार करणारे जलप्राणी तिरकस विनोदाद्वारे पर्यावरणावर, मानवाच्या प्रगतीमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या नुकसानीची दखल घेताना दिसतात.
इथली मत्स्यकन्या शान ही आत्तापर्यंत चित्रपटात वापरण्यात आलेल्या संकरित मर्मेडसारखी इच्छाधारी नाही. तिच्या शरीराची ठेवण बदलून, तिच्या पेहरावात विशिष्ट बदल करून तिला वस्तीमध्ये पूर्ण मानवत्वाची वेषभूषा करण्यात आलेली आहे. यात ती मानवी वस्तीमध्ये दाखल होऊन त्यांच्यासारखे उत्तम वावरू शकते. त्यासाठी तिची स्केटबोर्डवर हुकूमत दाखविली आहे. ही मानवजगतात वावरणारी स्पेशल इफेक्ट्स नसलेली मर्मेड विचित्ररीत्या चालते आणि वागतेही.
स्टीफन चाऊने तयार केलेले मर्मेडचे जग हे खासम खास म्हणावे लागेल. इथे एक राणी मत्स्यवृद्ध आहे. तिचा मानवावर संपूर्णपणे आकस नाही. पण मानवी प्रगतीने झालेल्या त्यांच्या अध:पतनाची गाथा ती पाण्याचा वापर करून गोष्टी रूपात मांडते. हा अॅनिमेशनद्वारे दाखविलेला प्रकार अद्भुत आहे. जाँ पिअर जुनेट किंवा टिम बर्टन या दृश्यश्रीमंत दिग्दर्शकांच्या चित्रपटांत असते, तसे इथे मानवसमांतर देखणे विश्व उभारण्यात आलेले आहे. ज्यांनी स्टीफन चाऊचे ‘कुंग फू हसल’ आणि ‘शाओलिन सॉकर’ चित्रपट पाहिले असतील, त्यांना अवघड परिस्थितीतून सरकत नेणाऱ्या सुखांतिकांची चाऊची शैली परिचित असेल. इथे हान्स ख्रिश्चन अॅण्डरसन यांच्या परिकथेचा शेवट जगजाहीर असला, तरी तो चाऊने साजेसा बदलेला आहे.
हाँगकाँग आणि चिनी सिनेमामध्ये गेल्या दशकभरामध्ये सूडपटांचा सुळसुळाट झालेला आहे. मारधाड एके मारधाड असलेला जॉनी टोच्या सिनेमांमध्ये अल्पबजेटी दृश्यसौंदर्य वारेमाप असते. मात्र कलाकारांची त्याची फौज १९९९ सालापासून आजतागायत कायम आहे. स्टीफन चाऊच्या या सिनेमामध्ये स्पेशल इफेक्ट्सनी तयार करण्यात आलेले भव्यदिव्य सौंदर्य आहेच. वर ही चिनी मर्मेड कचकडय़ाची नसल्याचे भरपूर दाखले आहेत.
पंकज भोसले – response.lokprabha@expressindia.com