वर्षभरापूर्वी ‘ई टीव्ही मराठी’ या चॅनलचं  ‘कलर्स मराठी’ असं रिब्रॅण्डिंग झालं आणि वर्षभरात ते मराठी चॅनल्समध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोचलं आहे. या वेगवान प्रवासाबद्दल चॅनलप्रमुख अनुज पोद्दार यांच्याशी गप्पा-

गेल्या वर्षभरात कलर्स मराठी या वाहिनीने स्वत:चं रूप पालटून टाकलंय. कलर्स मराठी म्हणजे पूर्वीचं ई टीव्ही मराठी. विविध प्रयोग करत हे चॅनल आता दुसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचलं आहे.

ई टीव्ही मराठीचं कलर्स मराठी हे रिब्रॅण्डिंग गेल्या वर्षी मार्च महिन्यात झालं. त्याआधी साधारण २०१३ च्या अखेरीस वायकॉम एटीन या ग्रुपने ई टीव्ही नेटवर्कची ई टीव्ही मराठी, ई टीव्ही गुजराती, ई टीव्ही कन्नड, ई टीव्ही बांगला, ई टीव्ही ओरिया ही चॅनल्स विकत घेतली होती. वायकॉम एटीनमध्ये समाविष्ट झाल्यापासूनच खरं तर ई टीव्ही मराठीमध्ये बदल जाणवू लागले होते. ग्रामीण बाजाच्या मालिकांचं प्रमाण हळूहळू कमी होत होतं. पूर्वीच्या विशिष्ट धाटणीच्या मालिकाही कालांतराने कमी होत गेल्या. आणखी बदल दिसू लागले ते वर्षभरापूर्वी कलर्स मराठी या नावाने चॅनलचा चेहरा बदलला तेव्हापासून. कलर्स मराठीचे प्रमुख अनुज पोद्दार या संपूर्ण प्रवासावर एक नजर टाकतात. ‘कलर्स मराठी लाँच झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी ‘लगान’ या सिनेमातला ‘चले चलो’ हा मंत्र डोक्यात ठेवला होता. आमच्यासमोर एक प्रस्थापित चॅनल होतं. आव्हानं खूप होती. पण, आता असं वाटतं की नवीन होतो ते एकाअर्थी चांगलं होतं. नवीन असलो की काहीतरी वेगळं करून पाहण्याची इच्छा असते, विविध प्रयोगांसाठी उत्सुकता असते. प्रचंड मेहनत घेतली जाते. तेव्हा पुढे जाण्याची घाई नव्हती तर चांगलं काम करून दमदार सुरुवात करायची होती. त्यामुळे शांतपणे विचारपूर्वक काम करता आलं. कमी कालावधीत बऱ्याच गोष्टी साध्य केल्या. सध्या सुरू असलेल्या मराठी एन्टरटेनमेंट चॅनल्स क्षेत्रात कलर्स मराठीचा शेअर गेल्या वर्षी १५ टक्के होता. तो वर्षभरात ३६ टक्के झाला आहे, ही सुखकर बाब आहे’, ते सांगतात.

‘कोण होईल मराठी करोडपती’ हा शो २०१३ मध्ये ई टीव्ही मराठीवर सुरु झाला. या शोमुळे ई टीव्ही मराठीचं वजन काहीसं वाढलं. हिंदीतल्या ‘कौन बनेगा करोडपती’ची ही मराठी आवृत्ती असली तरी मराठी प्रेक्षकांसाठी ती पर्वणीच होती. मराठी प्रेक्षक बुद्धिमान, प्रामाणिक असतात म्हणून हा शो त्यांच्यासाठी मराठीमध्ये आणल्याचं पोद्दार आवर्जून सांगतात. त्यांनंतर ‘झुंज मराठमोळी’सारखा वेगळा कार्यक्रमही या चॅनलने प्रक्षेपित केला. काही कार्यक्रमांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसला तरी चॅनलने प्रयोग करणं सोडून दिलं नाही.

कलर्स हे हिंदी चॅनल लाँच होत असताना कलर्स मराठीचे हेड अनुज पोद्दार तिथे स्ट्रॅटेजी टीममध्ये काम करत होते. कलर्स मराठी सुरू करण्याच्या वेळी अनुज यांना त्यांच्या तिथल्या अनुभवाचा उपयोग झाला. ही कलर्स मराठीची उजवी बाजू ठरली. अनुज सांगतात, ‘कलर्स मराठी सुरू होताना लोकांच्या मनात नानाविध प्रश्न, शंका होत्या. आम्ही ई टीव्ही मराठीच्या प्रेक्षकांशी बोललो. सर्वेक्षणं, संशोधन, अभ्यास केला. एकीकडे प्रस्थापित मराठी चॅनल्स तर दुसरीकडे हिंदी चॅनल्स होती. या सगळ्यात स्वत:चं स्थान प्रस्थापित करायचं हे मोठं आव्हान होतं. त्यावेळी आम्ही दोन नियम कटाक्षाने पाळले. एक, चांगलं काम करायचं, पुरेसा वेळ घेऊन उत्तम कन्टेन्ट तयार करायचा; दोन, कोणाचंही अनुकरण न करता बदल आणायचा.’

कलर्स हिंदी आणि कलर्स मराठी ही दोन्ही चॅनल्स सुरू होताना अनेक ठिकाणी साम्य दिसून आलं असलं तरी एक मोठा फरक होता. कलर्स हिंदी पूर्णपणे नवीन चॅनल होतं. तर कलर्स मराठी या चॅनलच्या मागे आधीचा ई टीव्ही मराठी आणि नंतर वायकॉम एटीन हे बॅनर होतं. ही एकाअर्थी जमेची बाजू होती पण, त्याचवेळी ती मर्यादाही होतीच. एखाद्या लोकप्रिय अभिनेत्याचा मुलगा सिने इंडस्ट्रीत पदार्पण करतो तेव्हा तो काय करू शकेल याबाबत उत्सुकता असते. पण, या सगळ्याचं दडपण मात्र त्याला असतं. तसंच चॅनलचं आहे. असं असलं तरी कलर्स मराठीने त्यातून योग्य मार्ग काढला. ‘ई टीव्ही मराठीबद्दल प्रेक्षकांचा झालेला चुकीचा समज, ग्रह याचं बॅगेज कलर्स मराठीवर सुरुवातीला होतं. ई टीव्ही मराठीबद्दलच्या प्रेक्षकांच्या मानसिकतेचाही विचार कलर्स मराठीला करावा लागला होता. पण, हे बॅगेज घेऊन कलर्स मराठीची टीम सातत्याने चांगलं काम करत राहीली’, अनुज सांगतात.

एखादं चॅनल यशस्वीरित्या सुरु ठेवण्यासाठी त्यात जाहिराती महत्त्वाची भूमिका बजावतात. जाहिरातींचे दर, दर्जेदार कार्यक्रमाच्या वेळी प्रसारित होण्याची खात्री, चॅनलशी दीर्घकाळ संबंध, स्पर्धा अशा अनेक बाबी चॅनल आणि जाहिरातदार एकमेकांशी व्यवहार करताना लक्षात घेतात. कलर्स मराठीचं रिब्रॅण्डिग होताना जाहिरातदार मिळवताना चॅनलने एक धोरण आखलं होतं. पोद्दार सांगतात, ‘आमचं चॅनल प्रेक्षकांप्रमाणेच जाहिरातदारांशीही संबंध जोडण्याचा प्रयत्न करतं. जाहिरातदाराकडे जाण्याआधी आम्ही आमच्या मालिका, कार्यक्रम दर्जेदार, देखणे कसे होतील याकडे लक्ष देतो. आमची कलाकृती शंभर टक्के चोख असेल तर आम्ही ताठ मानेने जाहिरातदारांशी बोलू शकतो. तसंच आमच्या अटी-नियमांनुसार हा व्यवहार होऊ शकतो. अर्थात या आर्थिक व्यवहारात थोडं कमी-जास्त होत असतं. संबंध टिकवण्यासाठी ते करावं लागतं.’

चॅनलने केलेल्या एका सर्वेक्षणाबाबत अनुज सांगतात, ‘आम्ही केलेल्या सर्वेक्षणात असं आढळलं की प्रेक्षक टीव्हीवर एकुणात जे काही बघायला मिळत होतं, त्यावर खूश होते, पण त्याचवेळी ई टीव्ही मराठीवर जे दाखवलं जायचं त्याबद्दल मात्र ते नाराज होते. हे चॅनलसाठी मोठं आव्हान होतं.’ या आव्हानावर शोधलेला उपाय ते सांगतात, ‘पुरेसा वेळ घेऊन बदल करू या असं आम्ही ठरवलं. आपल्या चॅनलमध्ये होत असलेल्या बदलाची प्रेक्षक नक्की दखल घेतील आणि एकदा दखल घेतली की माऊथ पब्लिसिटी करतील. आमच्या चॅनलकडे वळायला त्यांच्याकडे एक ठोस कारण मिळेल. या सगळ्यासाठी काहीतरी नवीन, ओरिजिनल करावं लागेल याची आम्हाला कल्पना होती.  आम्हाला आमची स्वत:ची ओळख निर्माण करायची होती. यात आज आम्ही यशस्वी झालो आहोत.’

प्रेक्षकांसाठी मराठी मनोरंजनविश्वात बदल घडवून आणण्याचा विचारही पोद्दार मांडतात. कलर्स मराठी चॅनलवरून दाखवल्या जातील त्या मालिका सगळ्या अर्थाने उत्तम दर्जाच्या असायला हव्यात असा त्यांचा आग्रह होता. म्हणूनच त्यांनी प्रॉडक्शन व्हॅल्यू वाढवणं, तांत्रिकदृष्टय़ा प्रगत होणं, संशोधन करणं अशा अनेक गोष्टींचा गांभीर्याने विचार केला. ‘तरुण प्रेक्षकांना चॅनलकडे वळवणं, नवीन प्रेक्षक जोडणं, मध्यमवयीन आणि वयस्कर प्रेक्षकांना धरून ठेवणं या तिन्ही गोष्टींकडे एकाच वेळी लक्ष देणं गरजेचं होतं. पुन्हा इथेही हे सगळं करण्यासाठी योग्य कारणाची आवश्यकता आहेच. मराठी संस्कृती, कला, कथानक, ठिकाणं, वातावरण, संवेदनशीलता, महत्त्वाकांक्षा या सगळ्याशी मी जोडला गेलोय. या सगळ्याची मला जाण आहे. म्हणूनच त्याचा विचार आमच्या कार्यक्रमांमधून होत असतो’, ते सांगतात.

कलर्स मराठी चॅनलच्या मालिकांमध्ये आशयाच्या बाबतीत बदल झालेला प्रकर्षांने दिसून येतोय. पण त्याच वेळी चॅनलच्या लुकमध्येही बराच बदल आढळून येतोय. तो म्हणजे भव्य सेट्स, चकचकीतपणा आणि भव्य सादरीकरण. ‘तू माझा सांगाती’, ‘गणपती बाप्पा मोरया’ या दोन्ही कार्यक्रमांचे सेट मोठे आहेत. ‘..मोरया’ मालिकेत अ‍ॅनिमेशन तंत्रज्ञान वापरलंय. चॅनलने आर्थिक गुंतवणूक बरीच केली आहे हे स्पष्ट दिसतंय. याबाबत पुढे अनुज सांगतात, ‘आर्थिक गुंतवणूक बरीच आहे असं चित्र दिसत असलं तरी त्यामागे मेहनतही तितकीच आहे. आमचं चॅनल सगळ्यात जास्त खर्च करणारं चॅनल आहे असं अजिबात नाही. पण एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती नीटच व्हायला हवी. समोरचा १०० रुपये खर्च करतोय म्हणून आम्ही २०० खर्च करतोय असं नाही. कोणत्या दर्जाची कलाकृती तुम्ही प्रेक्षकांना दाखवताय हे महत्त्वाचं आहे. तुम्ही प्रेक्षकांचा विचार केलात तर ते तुमच्याकडे आदराने बघतात. त्यांना कार्यक्रम आवडतात आणि ते चॅनल बघायला लागतात.’ सध्या पौराणिक, ऐतिहासिक मालिका, रिअ‍ॅलिटी शोजमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते. पण, नेहमीच्या मालिकांमध्ये वेगळ्या कॅमेऱ्याचा वापर हे फार कमी बघायला मिळतं. सध्या सुरू असलेल्या ‘किती सांगायचंय मला’ या नव्या मालिकेत सी थ्री हण्ड्रेड हा कॅमेरा मालिकेच्या संपूर्ण शुटिंगसाठी वापरला जातोय. या कॅमेरामुळे आऊटडोअर शुटच्या वेळी विशेष फायदा होतोय. या कॅमेऱ्यामुळे सेटबाहेरची रंगसंगती उठावदार दिसते. तसंच मुव्हिंग सीनमध्येही या कॅमेऱ्यामुळे विशेष फरक दिसून येतोय. तंत्रज्ञानातला बदल इथे दिसून येतो.

कलर्स मराठीवर सध्या ‘मेजवानी’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ असे दोन कार्यक्रम पूर्वीचे आहेत. सर्वेक्षणात या दोन्ही कार्यक्रमांची लोकप्रियता खूप असल्याचं दिसून आलं. म्हणून थोडे बदल करून ते आजही सुरू आहेत. आधीचा प्रेक्षक चॅनलशी जोडलेला असायला हवा हेही त्यामागचं एक कारण असल्याचं पोद्दार सांगतात. ‘चॅनलचा संपूर्ण एकत्रित डेटा बघण्यापेक्षा वयोगटानुसार बघण्याकडे माझा कल असतो. यामुळे विशिष्ट वयोगटानुसार त्या त्या विभागातील चढ-उतार कळतो. प्रेक्षकांचा एकही विभाग मागे राहता कामा नये याकडे माझं लक्ष असतं. असं केल्यामुळे तरुणांसाठी कन्टेम्पररी, महत्त्वाकांक्षी, आधुनिक असा चॅनलचा एक रंग दिसला. तत्त्व, संस्कृती, ओळख याला धक्का लावू न देता हा बदल झाला. सध्याचे कार्यक्रम प्रेक्षकांना आवडताहेत, पूर्वीचे प्रेक्षक पुन्हा चॅनलशी जोडले गेले हे पाहून समाधान वाटतं.’ ते स्पष्ट करतात.

एकाच बाजाचे कार्यक्रम असणारे काही चॅनल्स असतात. पण पोद्दार यांच्या मते कार्यक्रमांमध्ये वैविध्य असायला हवं. इथे ते जेवणासंदर्भातलं एक उदाहरण देतात. ‘कोणतंही जीईसी म्हणजे जनरल एंटरटेंमेंट चॅनल जेवणाच्या थाळीसारखं असायला हवं. त्यात गोड, तिखट, आंबट असं सगळंच असायला हवं. सगळ्यांना आवडेल असं कॉम्बिनेशन असणं महत्त्वाचं असतं. प्रेक्षकांचा प्रतिसाद त्यांच्याशी बोलून, त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून समजतो. सर्वेक्षण करताना ते आकडय़ांमधून सांगितलं जातं. पण त्यातून सगळंच कळतं असं नाही. त्यासाठी ‘बिटवीन द लाइन्स’ वाचावं, कळावं लागतं,’ असंही अनुज पुढे सुचवतात. ते म्हणतात, ‘प्रेक्षक काय म्हणतात, काय बघतात, त्यांना काय आवडतं या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रेक्षकांना आनंदी, सुखी, समाधानी व्यक्तिरेखा बघायला आवडतात असा ते दावा करतात. पण रेटिंग्ज बघितले तर लक्षात येईल की, सास-बहू ड्रामा, ट्विस्ट, रहस्य याला रेटिंग्ज जास्त मिळतात. असं अनेकदा होत असल्यामुळे त्यांची आवडनिवड सांगताना वेगळी आणि रेटिंगमधून वेगळी दिसत असेल तर त्याचा चॅनलने अधिक विचार करायला हवा. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि रेटिंग्समधून आलेला निष्कर्ष यात गल्लत करता कामा नये. त्यामुळे रेटिंग्ज मुखवटय़ाशिवाय आणि रिसर्च मुखवटय़ासह असं धोरण असावं. त्यातलं सत्य शोधणं मात्र तुमचं काम आहे. रेटिंग्ज सगळंच सांगू शकत नाही. तो आकडा फक्त आकडाच असतो. पण प्रेक्षकांना का आवडतंय, का आवडत नाहीये हे सगळं त्यांच्याशीच बोलूनच कळेल.’

ई टीव्ही मराठीची ग्रामीण भागातील प्रेक्षकांचं चॅनल अशी ओळख होती. त्यामुळे चॅनलचं रिब्रॅण्डिंग होताना ग्रामीण प्रेक्षकांशी संबंधित नुकसान झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनुज याबाबत स्पष्टीकरण देतात, ‘सुरुवातीला रिब्रॅण्डिंग होताना थोडा परिणाम झाला. जुना कंन्टेन्ट काढून टाकणं आमच्यासाठी सोपं होतं. तसं आम्ही केलंही. पण जुना कंन्टेन्ट  काढून असा नवीन कंन्टेन्ट तयार केला, जो मुंबई-पुण्यासारख्या शहरी प्रेक्षकांना आवडेल. पण त्या वेळी ग्रामीण प्रेक्षकांवर अन्याय केल्यासारखं वाटू लागलं. जुन्या प्रेक्षकांना सोबत घेऊन नवीन प्रेक्षकांशी कसं जोडलं जाणार  याचा विचार होताच. म्हणूनच ‘सरस्वती’, ‘तुकाराम’, ‘पालखी’, ‘दर्शन’ हे कार्यक्रम ग्रामीण भागाकडे झुकणारे आहेत. पण त्याच्या सादरीकरणामुळे ते शहरी प्रेक्षकांनाही आकर्षित करतात. तर ‘अस्सं सासर सुरेख बाई’ ही मालिका शहरी असली तरी त्यातील मानवी भावनांमुळे ग्रामीण प्रेक्षक जोडला जातो.’

अनुज पोद्दार यांनी आजवर वेगवेगळ्या क्षेत्रांत काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या कामाच्या अनुभवाचा उपयोग त्यांना चॅनलच्या स्ट्रॅटेजीसाठी होतो. प्रत्येक क्षेत्रातले खाचखळगे त्यांनी अगदी जवळून बघितले आहेत. त्या-त्या क्षेत्रातल्या अडचणी, फायदे-तोटे वेगवेगळ्या स्वरुपाचे असले तरी त्यातून मार्ग काढता येतो तो विशिष्ट स्ट्रॅटेजीने. टेक्स्टाइल बिझिनेस, सीए, फायनान्स इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट बँकर, मॅट्रीमॉनिअल साइट असा मोठा प्रवास त्यांनी केला असल्यामुळे कोणत्या परिस्थितीत कसं, कोणत्या पद्धतीने आणि कोणासाठी काम करायचं या सगळ्याचं ज्ञान त्यांना अवगत आहे. विविध क्षेत्रात काम केल्यानंतर मीडियामध्ये त्यांनी स्ट्रॅटेजी टीममध्ये काम करुन नाव कमवलं. एम टीव्हीच्या स्ट्रॅटेजी टीममध्ये ते सुरुवातीला काम करायचे. तिथला तरुण प्रेक्षकवर्ग लक्षात घेऊन त्यांनी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी आजमावल्या. त्यानंतर कलर्स हिंदी चॅनलचा सेटअपसुद्धा त्यांनी केला. तिथेही ते स्ट्रॅटेजी टीममध्ये होते. दोन्हीकडे स्ट्रॅटेजी टीममध्ये काम केल्यामुळे कलर्स मराठी सुरु करताना फायदा झाला. पोद्दार यांची स्ट्रॅटेजीने काम  करण्याची पद्धत चॅनलला फायदेशीर ठरते. चॅनल्स सुरु करण्यासह त्यांनी कलर्सचा अमेरिका, इंग्लंडमध्ये सेटअप केला आहे. तिथे सेटअप करणं आणि इथे करणं यात खूप फरक असल्याचं ते सांगतात. इंडोनेशियामधल्या निकोलोडिअन चॅनलच्या सेटअपविषयी ते एक अनुभव सांगतात, ‘इंडोनेशिया हा मुस्लीम देश आहे. निकोलोडिअन चॅनलचा तिथे सेटअप करताना थोडी अडचण झाली. तिथली मानसिकता थोडी वेगळी आहे. पण सेटअप करताना विशिष्ट फॉम्र्युला नसतो हे यातून शिकलो. त्या-त्या देशातील लोकांची संवेदनशीलता, मानसिकता लक्षात घेतली पाहिजे. तिथल्या लोकांना काय आवडेल याचा अभ्यास करायला हवा. त्या वेळी एक उपाय सुचला. इंडोनेशियात दिवसातून सहा वेळा नमाज करायचा असतो. त्यासाठी ब्रेक असतो. निकोलोडिअन चॅनेल सहा ब्रेकमध्ये ब्रेक घेईल आणि लहान मुलांना नमाजाची वेळ झाली असं सुचवेल, असं ठरलं. असं केल्यानं चॅनलबद्दलचा त्यांचा आदर वाढतोय असं दिसून आलं. प्रेक्षकांशी असं जोडून घेता येतं.’

चॅनलमध्ये लहानसहान गोष्टींचे निर्णयही सांभाळून, समजून, विचारपूर्वक घ्यावे लागतात. डेली सोप दाखवणं म्हणजे रोजचे छोटेमोठे बदल अपेक्षित आहेत. एका वेळी शेकडो माणसं एकाच गोष्टीसाठी कार्यरत असतात. शिवाय मालिकांच्या कंन्टेन्टबाबतही जागरूक असावं लागतं. ‘कोणतंही काम करताना बऱ्या-वाईट गोष्टींचा विचार करावाच लागतो. अनेकदा वेगाने निर्णय घ्यावे लागतात. तीन आठवडय़ांनी सुरू होणाऱ्या एखाद्या कार्यक्रमातील एका गोष्टीत बदल करायचा असेल; तर ते काही वेळा सहज शक्य नसतं. अशी परिस्थिती अनेकदा उद्भवते. अशा वेळी चुका होतात, पण त्यातून बरंच काही शिकता येतं. आम्हाला कोणताही शॉर्टकट वापरायचा नव्हता. पुरेसा वेळ घेऊन बदल करूयात असं आम्ही आधीच ठरवलं होतं. जुने सगळे कार्यक्रम लगेच बंद करायचे नाहीत हा निर्णय आधीच झाला होता. पण तीन ते सहा महिन्यांमध्ये बंद होतील असं नियोजन करूया असंही त्याच वेळी ठरवलं होतं. त्यानंतर नवीन कार्यक्रमांची फळी तयार होईल. प्रेक्षक काही वेळा व्यक्त होतात. तेव्हा काही गोष्टी बदलणार आहेत, तुम्हालाही नवीन अनुभव येईल याची खात्री चॅनलने द्यायला हवी. जुन्याच गोष्टी दाखवून, काहीही बदल न करता आम्ही जर असं म्हणत असू तर त्याला काहीच अर्थ नाही. शिवाय रिसर्चमध्ये प्रेक्षक ‘हे हवं, ते नको’ असं सांगू शकत नाहीत. जे दिसतं त्यावर व्यक्त होऊ शकतात. गोष्टी करून बघितल्याशिवाय प्रेक्षकांचा कल कुठे आहे ते कळत नाही,’ अशी माहिती पोद्दार देतात.

खासगी चॅनलची संख्या वाढली आहे. प्रादेशिक चॅनल्सची स्पर्धासुद्धा थेट आता हिंदूी चॅनल्सशी होऊ लागली आहे. याबाबत ते सांगतात, ‘स्पर्धात्मक क्षेत्रात राहताना आजूबाजूचे चॅनल्स काय करताहेत याचा विचार होणं गरजेचं आहे. तसंच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काळानुरूप बदलही आवश्यक आहे, पण कलर्स मराठी चॅनलचा फंडा थोडा वेगळा आहे. चॅनलचा विचार प्रेक्षकांपासून सुरू होऊन त्यांच्यापाशीच थांबतो. ‘आम्ही स्पर्धेत राहण्यासाठी काम करत नाही. प्रेक्षकांना समाधानी, खूश ठेवण्यासाठी आम्ही काम करतो. इतर चॅनल्स काय करताहेत याची माहिती असण्यासाठी त्याचं निरीक्षण करणं गरजेचं आहेत, पण त्याला प्रतिसाद देणं-न देणं आमच्या हातात आहे. अमुक एका कार्यक्रमाला स्पर्धा देण्यासाठी आपण तमुक करूया, असं आम्हाला करायचं नव्हतं’, या सगळ्यातून चॅनलची विचारसरणी प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून तयार झाली आहे, असं लक्षात येतं.

ऑनलाइन कंन्टेन्ट हा सध्या चर्चेचा विषय आहे. विविध विषयांच्या नवनवीन वेबसाइट्स ज्याप्रमाणे सध्या सुरु होताहेत त्याचप्रमाणे ऑनलाइन चॅनल्सची संख्याही वाढतेय. चॅनल्ससाठी खरंतर ही स्पर्धा आहे. पण, या नव्या तंत्रज्ञानाकडे स्पर्धक म्हणून बघत नसल्याचं पोद्दार सांगतात. ते म्हणतात, ‘ऑनलाइन कटेंटकडे आम्ही सकारात्मकरित्या बघतो. हा बदल स्वागतार्ह आहे. या माध्यमातून नवीन टॅलेंट पुढे येत असेल तर त्याला स्पर्धक म्हणून आम्ही बघत नाही. हा बदल माध्यम क्षेत्रासाठी चांगलाच आहे, असं आम्ही मानतो. तंत्रज्ञानात होणाऱ्या गोष्टींना कोणी थांबवू शकत नाही आणि थांबवताही कामा नये.’ ऑनलाइन कटेंटसह डिसप्र्शनचीसुद्धा चर्चा सगळीकडे आहे. एखाद्या व्यवस्थेत प्रस्थापित नियमांनुसार गोष्टी घडत असताना काही बदलांमुळे त्या विस्कळीत होणं म्हणजे डिसप्र्शन होय. प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या पातळीवर डिसप्र्शनला सामोरं जावं लागतंय. टीव्ही माध्यम क्षेत्रातही डिसप्र्शन्स असू शकतात. विविध चॅनल्सचे अ‍ॅप आता सुरु झाले आहेत. विविध साइट्स नव्याने सुरु होताहेत. हे चॅनलसाठी डिसप्र्शन आहे का; याविषयी पोद्दार सांगतात, ‘डिसप्र्शन आता सगळीकडेच आहे. टीव्ही माध्यमातही आहे. पण, त्याकडे आम्ही सकारात्मकदृष्टय़ा बघतो. अ‍ॅप्स आणि विविध साइट्समुळे गोष्टी अधिक चांगल्या होताहेत. ज्या प्रेक्षकांना रात्री एखादी मालिका बघता आली नाही त्यांना त्यांच्या सोयीने अ‍ॅपवर बघता येते. चॅनल्सच्या अ‍ॅप्सकडे डिसप्र्शन म्हणून नाही तर नवीन संधी म्हणून त्याकडे बघतो. ’

कलर्स मराठी हे चॅनल अमेरिका, मध्यपूर्व देश अशा आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आहे. इथे चांगला प्रतिसाद आहे. कॅनडामध्येही सुरू करण्याबाबत चर्चा सुरू होती. फिजी, मालदिव्समध्येही मराठी प्रेक्षकसंख्या कमी असल्याने तिथे चॅनल दिसत नाही. परदेशात चॅनल दिसण्यासाठी काही तांत्रिक बाबी पूर्ण कराव्या लागतात. त्यासाठी बरीच आर्थिक गुंतवणूक करावी लागते. ती परवडत नाही. मराठी प्रेक्षकसंख्या कमी असलेल्या देशांमध्ये ऑनलाइन मीडियाची मदत होते.

ई टीव्ही मराठीचं कलर्स मराठी होताना झालेल्या बदलांचे साक्षीदार प्रेक्षक स्वत: आहेत. चॅनलमध्ये झालेल्या बदलांमुळे आधीचा प्रेक्षकवर्ग टिकून नवा प्रेक्षकवर्ग तयार झालाय यात शंका नाही. हे चॅनल आता एका प्रस्थापित चॅनलची मक्तेदारी मोडून काढण्याच्या वाटेवर आहे. या चॅनलला नंबर वन होण्याची महत्त्वाकांक्षा नाही, पण प्रेक्षकांचं चॅनल म्हणून ओळख मिळाल्याचा आनंद घ्यायला त्यांना नक्की आवडेल!

कमिटमेंट हवी
जेवढे जास्त कलाकार या क्षेत्रात येतील तेवढं चॅनल्ससाठीही चांगलंच आहे. अनेक हुशार कलाकारांनाही ब्रेक मिळेल. अनेकांच्या करिअरची सुरुवात होईल. नवे चेहरे येताहेत. ही अतिशय चांगली बाब आहे. आमच्या चॅनलमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही कलाकाराला इतर चॅनल्ससोबत काम करण्यापासून अडवत नाही. पण तुम्ही आमच्या चॅनलसोबत काम करत असाल तर त्यात १०० टक्के द्या, असं जरूर सांगितलं जातं. शुटिंग आणि प्रमोशनच्या तारखा पाळाव्यात; एवढी अपेक्षा असते. याशिवाय कलाकारांचे इतर प्रोजेक्ट्स असतील तर त्यांची आम्ही अडवणूक करत नाही.

पुरस्कार सोहळ्यांचा फायदाच
गेल्या वर्षभरात अनेक पुरस्कार सोहळ्यांचं प्रक्षेपण कलर्स मराठीवर बघायला मिळालं आहे. गेल्या वर्षीचा मिक्ता पुरस्कार, संस्कृती कलादर्पण, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, इम्फा असे अनेक पुरस्कार सोहळे या चॅनलवर बघायला मिळाले आहेत. वर्षभरातला हा ठळक सकारात्मक बदल दिसून येत आहे. हा बदल चॅनलसह इंडस्ट्रीलाही फायद्याचा ठरला आहे. ‘आपण स्वत: व्यवस्थित, टापटीप राहावं असं आम्ही सगळ्यांनी ठरवलंय. मराठी लोक अतिशय साधे असतात. शोबाजी नसते. वैयक्तिक आयुष्यात असं असणं चांगलंच आहे. पण एखादी व्यक्ती शोबिझिनेसमध्ये असेल तर पुरस्कार सोहळ्यातही त्या व्यक्तीने उत्तमच दिसायला हवं. मराठी पुरस्कार सोहळ्यांमध्येही आता रेड कार्पेट असतं. या सगळ्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय. हा आमचा नियम अजिबात नाही. पण इंडस्ट्रीत बदल आणण्यासाठी आम्ही एक पाऊल उचललं आहे’, पोद्दार सांगतात. ‘गर्जा महाराष्ट्र’, ‘मानाचा मुजरा’, ‘सिंगर लाइव्ह कॉन्सर्ट’ असे सांस्कृतिक कार्यक्रमही कलर्स मराठीवर दाखवले जातात. शिवाय मालिकांचे महाएपिसोडही असतातच. कलर्स मराठीची ही ‘संडे प्रॉपर्टी’ वाढत जातेय यात शंका नाही. याबाबत अनुज सांगतात, ‘आठवडय़ातून सहा दिवस मालिका बघितल्यामुळे रविवारी थोडी वेगळी मेजवानी दिली तर काय हरकत आहे. संडे प्रॉपर्टी इज टीप ऑफ आईस बर्ग असं मी नेहमी म्हणतो. तो दिसतो देखणा. त्याकडे बघून लोक आकर्षित होतात. त्याच्या जवळ आलात की त्याचा पाया दिसतो. तो भक्कम आहे. तो पाया म्हणजे चॅनल्सच्या मालिका आहेत. मालिका लोकप्रिय झाल्यापासून महाएपिसोड्सना चांगला प्रतिसाद मिळतोय. इव्हेंट्सपेक्षा महाएपिसोड्सचं रेटिंग्स जास्त असतं. जर एखाद्या रविवारी एखादा इव्हेंट, सिनेमा नसला तरी हरकत नसते. चॅनलचं तिथे नुकसान होत नाही.’

चांगलं कारण मिळालं तरच…
‘कलर्स चॅनलवरील किंवा अन्य हिंदी कार्यक्रमांची मराठी आवृत्ती काढायला हरकत नाही. पण हिंदीत विशिष्ट कार्यक्रम लोकप्रिय आहे म्हणून मराठीत करू या हे एवढंस कारण मला पुरेसं वाटत नाही. ‘कोण होईल मराठी करोडपती’ हा कार्यक्रम करण्यामागे विशिष्ट कारण होतं. मराठी प्रेक्षक बुद्धिमान आणि प्रामाणिकपणा असतात. त्यामुळे बुद्धिमत्ता आणि पैसा यांची सांगड घालून दिली तरच ते त्यांना अपील होईल. म्हणून ‘कोण होईल..’ हा कार्यक्रम सुरु केला. कार्यक्रमातील बहुतांश प्रश्न मराठी संस्कृती, साहित्य, मनोरंजन, कला इत्यादींशी संबंधित होते. यामुळे प्रेक्षक कार्यक्रमाशी जोडले गेले. ‘खतरों के खिलाडी’ मराठीमध्ये करण्याचं मला विशेष कारण सापडलं नाही. तसंच तसा कार्यक्रम करण्यासाठी तितक्याच बजेटचीही आवश्यकता असते. ते शक्य होणं थोडं कठीण. कमी बजेटमध्ये तसाच शो करून आम्हाला प्रेक्षकांची फसवणूक करायची नाही. म्हणून त्याऐवजी ‘झुंज मराठमोळी’ हा कार्यक्रम आम्ही केला. हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. तर आता ‘झलक दिखला जा’ऐवजी ‘ढोलकीच्या तालावर’ हा कार्यक्रम सुरू करून त्याला थोडा ग्लॅमरस टच दिला आहे. ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम मराठीमध्ये लोकप्रिय होणार नाही. हिंदीप्रमाणे मराठीत तो चालणार नाही, असा माझा अंदाज आहे.’

तरुण पिढीही आकर्षित होतेय…
पूर्वी पुरस्कार सोहळ्यांमध्ये कलाकार साधेसुधे यायचे. ‘कलाकार म्हणून तुमचं वेगळेपण पेहरावामध्ये दिसलं पाहिजे’ असं सुचवलं. हा बदल तरुणाईला आकर्षित करणारा आहे. तसंच तरुण प्रेक्षकवर्ग खेचण्यासाठी ‘ढोलकीच्या तालावर’ हा कार्यक्रम थोडा आधुनिक बाजाचा केला. इम्फा इव्हेंट, मागच्या वर्षीचा मिक्ता आणि इतरही काही पुरस्कारांचा लुक तरुणाईला आवडेल असा देखणा केला. ‘तू माझा सांगाती’ ग्रामीण पाश्र्वभूमीवर असली तरी त्या मालिकेचा लुक तरुणांना आकर्षित करणारा आहे.’
चैताली जोशी
response.lokprabha@expressindia.com
@chaijoshi11

 

 

 

Story img Loader