मालिकेचं शूट तासन्तास असलं तरी त्याचा शीण आता कलाकारांना येत नाही. याचं कारण आहे; त्यांनी शोधून काढलेले विविध मार्ग. शूटचा ताण हलका करण्यासाठी अधेमधे मिळणाऱ्या ब्रेकचा हे कलाकार मंडळी आवड, छंद जोपासण्यासाठी फायदा घेतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मालिकांचं शूटिंग म्हणजे पंधरा-सोळा तास काम. एकदा सकाळी कामाला सुरुवात केली की ब्रेक लागतो तो दुपारी जेवणासाठी. मग पुन्हा कलाकारांसह तांत्रिक विभागांमधल्या सगळ्यांना कामाला जुंपावं लागतं. पुन्हा संध्याकाळी एक ब्रेक मग पुन्हा शेवटच्या टप्प्यातलं काम सुरू. असं चक्र मालिकांच्या सेटवर बघायला मिळतं. पण, या व्यग्र वेळापत्रकातून कलाकारांचं स्वत:कडे दुर्लक्ष होणं साहजिक आहे. पण, काही कलाकार हुशारीने यातूनही ठरवून वेळ काढत स्वत:ला इतर गोष्टींमध्ये गुंतवताहेत. मालिकांच्या सेटवर थोडा जरी ब्रेक मिळाला की, ही मंडळी आपापल्या आवडीनिवडी, छंद जोपासण्याच्या कामाला लागतात. कोणी चित्र काढतं, कोणी वेगवेगळे पदार्थ तयार करतं, कोणी सिनेमे बघतं, कोणी खेळ खेळतं तर कोणी व्यायाम करतं. सततच्या शूटिंगमुळे कलाकारांच्या मनावर ताण असतो तो हलका करण्यासाठी ते स्वत:च काही ना काही प्रयत्न करताना दिसताहेत.
आता मालिका आठवडय़ातून सहा दिवस प्रक्षेपित होतात. त्यामुळे त्याचं शूटिंगही बऱ्याचदा दररोज असतं. तसंच एका दिवसात विशिष्ट एपिसोड शूट करून त्यांना पूर्ण करावे लागतात. त्यामुळे मालिकावाल्यांना ही डेडलाइन पाळावीच लागते. अशा वेळी कलाकार आणि तांत्रिक टीमच्या सगळ्यांनाच बराच वेळ काम करावं लागतं. पण, सलग काम करणं शक्य नसतं. अशा वेळी ठरावीक वेळेचा ब्रेक घेत शूट पूर्ण केलं जातं. मिळालेल्या ब्रेकमध्ये झोप काढून विश्रांती घेणं अनेक कलाकारांना नापसंत असते. मग अशा वेळी मिळालेल्या ब्रेकचा सदुपयोग करत कलाकार त्यांचे छंद, आवड जोपासण्यासाठी करतात. ‘नांदा सौख्य भरे’ ही नवी मालिका सध्या चांगला जम बसवतेय. यात कलाकारांची मोठी फौज आहे. त्यामुळे शूटिंगसाठी कलाकारांच्या तारखा, वेळा जमवून आणणं ही तारेवरची कसरत करत मालिकेचं शूट पार पडतंही. पण, कलाकारांची ही मोठी फौज मात्र आनंदाने सेटवर शूटिंग करत असते. बारा-तेरा तासांच्या कामाचा ताण त्यांना जाणवत नाही. याचं कारण म्हणजे सेटवर होत असलेल्या अनेक गोष्टी. मालिकेतल्या स्वानंदीची आई म्हणजे उमा गोखले या उत्तम गायिका आहेत. शूटदरम्यान मिळणाऱ्या ब्रेकमध्ये सेटवर गाण्यांची मैफल सुरू असते. त्या सांगतात, ‘कलावंताला प्रेक्षक हवेच असतात. त्यांच्याकडून मिळालेली दाद कोणत्याही कलावंताला सुखावून जाते. गायक स्वत:साठी गात असला तरी त्याला श्रोताही महत्त्वाचा असतो. आम्ही सेटवर मोकळ्या वेळेत गाणी गात असतो. मालिकेतली वच्छी आत्या म्हणजे वर्षां दांदळे संगीत शिक्षिका आहेत. त्यामुळे त्यांची दादही माझ्यासाठी महत्त्वाची ठरते. सगळे एकत्र बसलो की फर्माईश सुरू होतात. मग जुन्या-नव्या गाण्यांची मैफल मस्त रंगते. दोन सीन्समधला मोकळा वेळ निव्वळ गप्पा, गॉसिप्स करत बसण्यापेक्षा अशा गोष्टींनी सगळ्यांचाच ताण हलका होतो.’ या मालिकेतली आजी फारच लोकप्रिय झाली आहे. आजीची भूमिका साकारणाऱ्या रागिणी सामंत यांना रंगभूमीचा बराच अनुभव आहे. शिवाय त्या सुगरणही आहेत. त्यामुळे त्या मोकळ्या वेळेत विविध पदार्थ करत असतात, त्यांच्या नाटकांबाबतचे अनुभव सांगत असतात.
दर शुक्रवारी नवनवीन सिनेमे प्रदर्शित होत असतात. मालिकेत काम करणाऱ्यांना प्रत्येक वेळी ते सिनेमे थिएटरमध्ये जाऊन बघायला मिळतातच असं नाही. पण सिनेक्षेत्रात असल्यामुळे विविध कलाकृती बघणंही महत्त्वाचं ठरतं. यावर तोडगा काढलाय तो ‘पुढचं पाऊल’ या मालिकेच्या टीमने. या मालिकेच्या सेटवर जवळपास चारशे ते पाचशे डीव्हीडीजची लायब्ररी आहे. फक्त कलाकारच नव्हे तर मालिकेची सगळ्या विभागांची तांत्रिक टीमही हे सिनेमे बघण्यात सामील असते. याबाबत जुई गडकरी सांगते, ‘सेटवर जवळपास सहा-सात डीव्हीडी प्लेअर आणि लॅपटॉप आहेत. मालिकेतल्या प्रत्येकाला सिनेमांचं वेड आहे. त्यामुळे आम्ही आमच्याकडच्या संग्रहातल्या डीव्हीडी सेटवर आणल्या आहेत. शिवाय इथे अनेकांची डीव्हीडीजची ऑनलाइन शॉपिंगही सतत सुरू असते. रोज किमान एक तरी डीव्हीडीचं पार्सल सेटवर येतच असतं. हॉलीवूडच्या सीरिज, हिंदी, मराठी, इंग्लिश, तमिळ, तेलुगू, बंगाली, गुजराती नवे-जुने सिनेमे असं अखंड सुरू असतं. रोज ठरवून विशिष्ट सिनेमे बघितले जातात. रीतसर त्याचं नियोजन केलं जातं. अमुक दिवशी कोणी कोणता पदार्थ घरून आणायचा वगैरे ठरवलं जातं. मेक-अप रूममध्ये बसून थिएटरचा फिल येण्यासाठी हा खटाटोप केला जातो. पण यामुळेच कामाचा शीण अजिबात जाणवत नाही.’ याशिवाय जुईला चित्रकलेची प्रचंड आवड आहे. त्यामुळे ती स्वत: मोकळ्या वेळेत तिची चित्र काढण्याची आवड जोपासते. तसेच बॅडमिंटन, ल्युडो, चेस असेही काही खेळ सेटवर खेळले जात असल्याचं ती सांगते. पाच जण एकत्र बसून एखादा सिनेमा बघत असतील आणि त्यातल्या एकाचा सीन असेल तर त्याच्यासाठी तो सिनेमा तिथेच थांबवला जातो किंवा तो कलाकार त्याचा सीन करून परत आल्यावर सिनेमा पुन्हा तिथपासून लावला जातो. कामाचा ताण, चिंता कमी करण्याचा हा उत्तम उपाय असल्याचं जुई सांगते. डीव्हीडी प्लेअर, डीव्हीडी, खेळांचं साहित्य हे सगळं सेटवर मेक-अप रूमच्या पेटय़ांमध्ये सुरक्षित असतं.
सिनेमे बघण्याचं वेड ‘जुळून येती रेशीमगाठी’मधल्या अर्चूला म्हणजे शर्मिष्ठा राऊत हिला आणि ‘अस्सं सासर सुरेख बाई’मधल्या नायकाला म्हणजे संतोष जुवेकरलाही आहे. शर्मिष्ठा तिच्या या आवडीबद्दल सांगते, ‘मी मोकळ्या वेळेत माझ्या मेक-अप रूममध्ये बसून सिनेमे बघते. जे सिनेमे खूप गाजले, चांगले होते, पण कामामुळे मला बघता आले नव्हते असे सिनेमे मी बघते. यात जुन्या सिनेमांचाही समावेश आहे. कारण जुन्या अनेक सिनेमांमधून खूप काही शिकायला मिळतं. याबरोबरच मी मालिकेतल्या घरासमोर असलेल्या अंगणावर चालते. तेवढाच व्यायाम होतो. खूपदा मित्रमैत्रिणींशी गप्पा होत नाहीत. तर या मोकळ्या वेळेचा फायदा मी त्यांना फोन करून त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी करून घेते.’ शर्मिष्ठाला वेगवेगळे पदार्थ बनवण्याचीही आवड आहे. त्यामुळे फावल्या वेळेत ती स्वयंपाकघराचा ताबा घेऊन कधीकधी प्रयोगशील पदार्थ करत असते. याच सेटवर विजयाची भूमिका साकारणारी मधुगंधा कुलकर्णी ही लेखिका आहे. ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ या मालिकेची पटकथा, संवाद ती लिहिते. त्यामुळे ब्रेकमध्ये ती लेखनाचं काम करते. तर ‘जुळून येती रेशीमगाठी’या मालिकेच्या सेटवर सर्व विभागांमधली पुरुष मंडळी व्हॉलीबॉल खेळत असतात. कलाकारांना मालिकेच्या व्यग्र वेळापत्रकामुळे अनेकदा नवे आलेले सिनेमे बघता येत नाहीत. किंवा बरेचसे सिनेमे बघायचे राहून गेलेले असतात. अशा वेळी हे कलाकार शुटिंगमध्ये मिळणाऱ्या ब्रेकचा चांगला उपयोग करुन घेतात. संतोष जुवेकर हा त्यापैकीच एक. तो त्याच्या ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या नव्या मालिकेच्या सेटवर ब्रेकमध्ये नवे-जुने सिनेमे बघतो.
आजच्या इंटरनेटच्या जमान्यात सोशली अपडेट राहणं खूपच महत्त्वाचं झालं आहे. कलाकारही हे ओळखून आहेत. म्हणूनच फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, डबस्मॅश इथे कलाकार अपडेट असतात. या कलाकारांपैकीच एक म्हणजे ‘दुर्वा’मधली मालविका म्हणजे शाल्मली टोळ्ये. तिला फोटो आणि डबस्मॅशचं भलतं वेड आहे. त्यामुळे रिकाम्या वेळेत तिचं फोटो काढणं आणि डबस्मॅशवर डबिंग करणं चालू असतं. वरवर हा टाइमपास वाटत असला तरी कलाकारांसाठी डबस्मॅश हे अ‍ॅप गमतीसोबतच अभ्यासाचंही आहे.
पुस्तकं वाचनाचा छंद अनेकांना असतो. ‘नांदा सौख्यभरे’च्या सगळ्याच कलाकारांचा हा छंद त्यांच्या गप्पांचा विषय ठरतो. पुस्तकाबाबत माहिती, लेखकाची माहिती, पुस्तकाचा विषय या सगळ्याबाबत तिथे चर्चा होते. साहित्याबाबत अशीच चर्चा ‘अरे वेडय़ा मना’ या सेटवरही होत असते. मालिकेत स्वप्निलची भूमिका साकारणारा अभिजीत आमकर त्याच्या मोकळ्या वेळाबाबत सांगतो, ‘शूटच्या ब्रेकमध्ये मी आणि मालिकेतले आण्णा म्हणजे अविनाश नारकर कवितावाचन करतो. आम्हा दोघांनाही गुलजारजींच्या कविता खूप आवडतात. आम्ही त्या पुन्हा-पुन्हा वाचून त्याचे अर्थ शोधतो. माझ्या भावाची भूमिका साकारणारा आशीष गाडे चांगला संगीत दिग्दर्शक आहे. आम्ही वाचत असलेल्या कवितांना तो चाल देतो. हे सगळं करताना वेगळीच धमाल येते. याचे दोन-तीन व्हिडीओज आम्ही यू टय़ुबवरही टाकलेत. खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हे व्हिडीओज बघून लोक त्यांच्या गाण्याची फर्माईश करतात.’ मिळणाऱ्या ब्रेकमध्ये अशा प्रकारे क्रिएटिव्ह कामही होऊ लागलंय. ‘अरे वेडय़ा मना’ मालिकेच्या सेटवर गाण्यांची मैफल रंगत असते. त्यामुळे सेटवरच वातावरण अगदी खेळीमेळीच होत असल्याचं तो सांगतो.
मालिकांमध्ये बालकलाकार असण्याचं प्रमाण अलीकडे वाढलंय. अशा वेळी सेटवर मोकळ्या वेळेत त्यांचा अभ्यास घेण्याचे प्रकार सुरू असतात. ‘तू माझा सांगाती’च्या सेटवर मात्र बालकलाकार असूनही फक्त अभ्यास एके अभ्यास असं होत नाही. अभ्यासासोबतच अनेक खेळ तिथे खेळले जातात. लहानांसोबत मोठेही त्या खेळांची मजा घेतात. बालकलाकारांसोबत खेळताना एक प्रकारचा व्यायाम होत असल्याचं या मालिकेतल्या कलाकारांचं म्हणणं आहे. पकडापकडी, लपंडाव, बॅडमिंटन असे अनेक खेळ इथे खेळले जातात. हे खेळ खेळताना सेटवर कल्ला चालू असतो. त्यामुळे बरेच तास सुरु असलेल्या शुटिंगचा ताण फारसा जाणवत नाही. ‘कमला’ या सेटवर क्रिकेटची धूम असते. रोज ठरावीक ब्रेकमध्ये रूममधून बॅट आणि बॉल बाहेर येतो आणि सगळी टीम पीचवर उतरते. यात महिला कलाकारांचाही समावेश असतो. त्यांना हरणं-जिंकणं महत्त्वाचं वाटत नाही. पण या खेळामुळे रिफ्रेश व्हायला मदत होते. शिवाय शरीराला चालना मिळते, असं या मालिकेच्या टीमचं म्हणणं आहे.
एकुणात, मालिकांचं वेळापत्रक कितीही व्यग्र असलं तरी त्यातूनही स्वत:ची आवड, छंद यांना कसा वेळ द्यायचा हे कलाकार चांगलंच जाणून आहेत. तासन्तासच्या शूटचा ताण कमी करण्यासाठी कलाकार आपापल्या आवडीनिवडीचा, छंदांचा चांगला उपयोग करून घेताना दिसताहेत. मालिका ही समूहाने करण्याची कलाकृती. त्यामुळे इथे मिळणारा मोकळा वेळही समूहाने विविध खेळ किंवा उपक्रम करण्यात घालवला जातो. काम खूप असलं तरी त्याचा ताण जाणवू द्यायचा नसेल तर काहीना काही उपक्रम करणं कालाकारांना महत्त्वाचं वाटतं. ‘मालिकेचं शूट फार हेक्टिक असतं’ असं सर्वत्र म्हटलं जातं. पण ते हेक्टिक वाटू, जाणवू नये म्हणून कलाकार अशा प्रकारे सेटवर वावरत असतात.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com 