विविध प्रयोगांमुळे टीव्ही माध्यम अधिकाधिक आकर्षक होत चाललंय. यात होणाऱ्या अनेक प्रयोगांपैकी एक म्हणजे महाएपिसोड. हिंदीतून आलेली मालिकांच्या महाएपिसोडची लाट मराठीत स्थिरावली आहे. महाएपिसोडचा ट्रेण्ड चॅनलच्या फायद्याचा ठरलाच आहे. शिवाय त्याला प्रेक्षकही पसंती दर्शवू लागले आहेत.

टीव्ही या माध्यमाचं स्वरूप दिवसेंदिवस बदलत चाललंय. चॅनल्स आणि कलाकारांची वाढती संख्या, सिनेमा आणि टीव्ही या माध्यमांतलं कमी होणारं अंतर, सिनेमातल्या कलाकारांची छोटय़ा पडद्यावर हजेरी, सिनेमासारखंच मालिकांमध्ये चित्रण अशा अनेक कारणांमुळे टीव्ही माध्यमाचं रूप पालटताना दिसतंय. चॅनल्सच्या वाढत्या संख्येमुळे त्यांच्यातील स्पर्धाही वाढतेय. स्पर्धेत एकमेकांना टक्कर देण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधले जाताहेत. कधी एखाद्या मोठय़ा कलाकाराला एका कार्यक्रमात आणायचं तर कधी सिनेमासारखा खर्च करून बिग बजेट मालिका बनवायची. स्पर्धा म्हटली की असे प्रयोग करणं स्वाभाविक आहे. पण, स्पर्धेत उतरताना चॅनल्समध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रयोग दिसून येतो तो म्हणजे एक तासाचा विशेष भाग, म्हणजेच महाएपिसोड. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी केल्या जाणाऱ्या अनेक प्रयोगांमध्ये महाएपिसोडचा आवाका मोठा आहे असं म्हणायला हरकत नाही. विशिष्ट निमित्ताने केल्या जाणाऱ्या मालिकांच्या महाएपिसोडला प्रेक्षकांची पसंती मिळू लागली आहे.

महत्त्वाचा प्रसंग येणार असेल, विशिष्ट वळण येणार असेल, मालिकेतलं गुपित उलगडणार असेल अशा घटना मालिकेत येणार असतील तर महाएपिसोड केला जातो. तर काही वेळा विशेष कारणाशिवाय महाएपिसोड करणं हा चॅनलच्या स्ट्रॅटेजीचा भाग असतो. प्रतिस्पर्धी चॅनलवर नवीन मालिका, रिअ‍ॅलिटी शो सुरू होत असताना दुसऱ्या चॅनलवर महाएपिसोडचा प्रयोग केला जातो. रेटिंग्स, प्रेक्षकसंख्या वाढवणं यासाठी केलेला तो प्रयत्न चॅनलसाठी अनेकदा फायदेशीर ठरतो. महाएपिसोड दाखवण्यासाठी बऱ्याचदा रविवारच निवडला जातो. खरं तर रविवार हा पुरस्कार सोहळे, वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर, जुने सिनेमे, सांस्कृतिक कार्यक्रम यांसाठी राखून ठेवलेला असतो. पण, आता हे स्वरूप बदलतंय. रविवार हा महाएपिसोडसाठी हक्काचा वार समजला जाऊ लागला. चॅनलच्या स्ट्रॅटेजीबद्दल स्टार प्रवाहचे कन्टेंट हेड जयेश पाटील सांगतात, ‘महाएपिसोड मालिकेला वेगळं वळण देण्यासाठी केला जातो. तर काही वेळा मालिकेच्या कथेत एखादा विशेष प्रसंग येत असेल तर महाएपिसोड केला जातो. स्ट्रॅटेजीही इथे महत्त्वाची ठरते. प्रतिस्पर्धी चॅनलवर नवीन कार्यक्रम सुरू होणार असेल तर त्या स्पर्धेत उतरण्यासाठी महाएपिसोड हे उत्तम साधन आहे. एका तासाच्या भागात मालिकेतला कन्टेंटही विस्तारित स्वरूपात असतो. त्या भागाची गोष्ट थोडी मोठी केली जाते. सुरुवातीला स्ट्रॅटेजी वापरून महाएपिसोड केला जायचा पण, आता हा ट्रेण्ड क्रिएटिव्ह मुद्दा झाला आहे.’

बरेच दिवस जर एखाद्या मालिकेचा महाएपिसोड दाखवला नाही तर प्रेक्षकांनाच चुकल्यासारखं होतं. सुरुवातीला सोमवार ते शुक्रवार असे मालिकांचे दिवस होते. नंतर मालिकांची वाढती लोकप्रियता, चॅनलची व्यावसायिक गणितं, स्पर्धा हे मुद्दे लक्षात घेत मालिकांचं प्रक्षेपण सोमवार ते शनिवार असं होऊ लागलं. प्रेक्षकांची आठवडय़ातील पाच दिवस मालिका बघण्याची सवय नंतर सहा दिवसांवर आली. सहा दिवस मालिकेतल्या कथेची चांगली लिंक लागलेली असते. रविवारी विश्रांती घेतल्यामुळे ही लिंक काहीशी तुटते. कालांतराने रविवारी दाखवल्या जाणाऱ्या महाएपिसोडमुळे प्रेक्षक पुन्हा मालिकेशी जोडला जातो, ही बाब चॅनलच्याही लक्षात आली. त्यामुळे चॅनलने ठरावीक काही दिवसांनी रविवारी महाएपिसोड करण्याचा ट्रेण्ड सुरू केला. इतर काही ट्रेण्ड्सप्रमाणे महाएपिसोडचा ट्रेण्डही हिंदीतून आला आहे. हिंदी मालिकांचा महाएपिसोड, महाएपिसोड संगम असे प्रकार सुरुवातीला खूप चालायचे. महाएपिसोड संगम म्हणजे दोन-तीन मालिकांचं एकत्रीकरण करून त्याला साजेशी एखादी पटकथा दाखवून महाएपिसोड करणे, पण आता हिंदीतले हे प्रकार तुलनेने कमी झालेले दिसून येतात. तिथे आता रिअ‍ॅलिटी शो, कथाबाहय़ कार्यक्रम यांचीही रेलचेल असते. त्यामुळे वीकेण्ड अर्थात शनिवार आणि रविवार त्या कार्यक्रमांच्या प्रक्षेपणासाठी राखून ठेवलेले असतात.

प्रेक्षकांना सोमवार ते शनिवार असे सहा दिवस मालिका बघायला मिळत असली तरी ते रोजचा साधारण २२-२४ मिनिटांचीच मालिका बघायला मिळते. साधारण २२ ते २४ मिनिटे मालिका आणि ६ ते ८ मिनिटे जाहिरात असं जाहिरात आणि मालिकेचा कन्टेंट यांच्या वेळेचं नियोजन केलं जातं. त्यामुळे खरं तर मालिका पूर्ण अर्धा तास अशी दाखवलीच जात नाही. म्हणून आवडत्या मालिकेचा महाएपिसोड म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच असते. मालिका आणि जाहिरात यांच्या वेळेच्या नियोजनानुसार महाएपिसोड म्हणजे एका तासाच्या विशेष भागात मालिका खऱ्या अर्थाने ४४ ते ४८ मिनिटे बघायला मिळते. यात काही वेळा कमी-जास्त होऊ शकतं; पण प्रेक्षकांना रोज बघायला मिळणाऱ्या मालिकेच्या कालावधीपेक्षा महाएपिसोडचा कालावधी जास्त असतो. त्यामुळे साहजिकच प्रेक्षकही महाएपिसोडला जास्त पसंती देतात. रविवारी मालिका बघितल्यानंतर लगेच सोमवारी तीच मालिका बघताना कनेक्टिव्हिटीही राहते. मालिकेशी तुटल्यासारखं वाटत नाही. मालिकांचा महाएपिसोड आता चॅनल्ससाठी महत्त्वाचा ठरू लागलाय हे यावरून दिसून येतं.

सुरुवातीला फक्त एखाद्या प्रयोगाचं साधन म्हणून त्याकडे बघितलं जायचं, पण आता या साधनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं जातंय.

मालिका म्हणजे डेली सोप. या मालिकांचं शूटिंग एका दिवसात १२ ते १६ तास इतकं सुरू असतं. त्यामुळे कलाकारांसह मालिकेचं संपूर्ण युनिट इतके तास काम करत असतं. कधीकधी काही कारणांमुळे हे शूटिंगचे तास वाढवलेही जातात. त्यामुळे आधीच महिनाभर इतका वेळ शूट केल्यानंतर पुन्हा महाएपिसोडसाठी शूटिंग करणं मालिकेच्या युनिटसाठी थोडं अवघड काम असतं. मग महाएपिसोड करताना मालिकेच्या युनिटचा कितपत विचार केला जातो, याबाबत चॅनल्स आपापली मते नोंदवतात. झी मराठीचे बिझनेस हेड नीलेश मयेकर सांगतात, ‘‘काही मालिकांचा महाएपिसोड करणं काही कारणास्तव शक्य नसतं. ज्या मालिकांचं शूटिंगचं ठिकाण दूर आहे, त्यांचं युनिटही मोठं आहे अशांचा महाएपिसोड करणं थोडं कठीण असतं. म्हणूनच ‘जय मल्हार’ आणि ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकांचे महाएपिसोड्स फार होत नाहीत. तसंच महाएपिसोड करण्यासाठी कलाकार आणि मालिकेचं युनिट यांना वेठीस धरणं योग्य नाही. त्यांना त्रास देऊन काम करून घेणं चुकीचं आहे.’’ तर महाएपिसोड्स सारखे केले तर त्याचा कलाकार आणि युनिटवर ताण येतो. त्यामुळे याबाबत विचार करून महाएपिसोडचा निर्णय घ्यावा लागतो, असं जयेश पाटील सांगतात. हाच मुद्दा कलर्स मराठीचे कन्टेंट हेड संजय उपाध्याय पुढे नेतात. ‘‘मराठी मालिकांचं शूटिंग हिंदी मालिकांप्रमाणे केलं जात नाही. हिंदीत महिन्याचे किमान २० दिवस काम केलं जातं, तर मराठी मालिकांसाठी महिन्यातून १५ ते २० दिवसांपेक्षा जास्त दिवस काम केलं जात नाही. मराठी मालिकांमध्ये मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवतीच पटकथा फिरत असतात असं नाही, तर मध्यवर्ती पात्रांसह इतरही पात्रांशी संबंधित पटकथा त्याच वेळी सुरू असते. त्यामुळे सगळ्या कलाकारांचं प्रत्येक दिवशी काम असतंच असं नाही. शिवाय महाएपिसोडबद्दलची सूचना काही दिवस आधी सांगितली जाते. त्यामुळे प्रत्येकाच्या कामाचं नियोजन केलं जात असल्यामुळे कलाकारांनाही पुरेसा आराम मिळतो,’’ असं उपाध्याय सांगतात.

मालिकेची पटकथा ठरलेली असली तरी त्यातले विशिष्ट प्लॉट म्हणजे उप-पटकथा ही ठरावीक दिवसांनी बदलत असते, बदलावी लागतेच. नाही तर मालिकेतल्या रटाळपणाला प्रेक्षक कंटाळतो. साधारणपणे सोमवारी एक नवीन मुद्दा पटकथेत प्रवेश करतो आणि उप-पटकथा सुरू होते. ही किमान एका आठवडय़ात संपते, पण काही वेळा त्यातला जीव मोठा असतो. अशा वेळी ती उप-पटकथा आणखी खेचली जाते. नवीन मुद्दा घेऊन सोमवारी सुरू झालेल्या मालिकेला शनिवारी ब्रेक लागतो. मालिकेच्या या उप-पटकथेत शनिवारी एखाद्या रंजक वळणावर मालिका येऊन थांबते आणि मग ‘अरे, आता मालिकेत पुढे काय होणार हे कळण्यासाठी सोमवापर्यंत थांबावं लागेल’ अशा प्रतिक्रिया उमटतात. इथे महाएपिसोड फायदेशीर ठरतो. महाएपिसोडमुळे प्रेक्षक मालिकेपासून तुटत नाहीत. पर्यायाने याचा फायदा मालिकेला आणि चॅनलला होतो.

चॅनलचं अर्थशास्त्र त्यावरील कार्यक्रम, मालिका यांच्या रेटिंग्सवरून चालतं. कोणती मालिका चालते, कोणती नाही यावरून त्या-त्या मालिकेचं भवितव्य ठरतं. त्यामुळे चॅनल्ससाठी प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक मालिका-कार्यक्रमाचं रेटिंग महत्त्वाचं ठरतं. महाएपिसोड साधारणत: रविवारी दाखवले जातात. याच दिवशी लोकप्रिय सिनेमांचं प्रक्षेपण, पुरस्कार सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम, वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर असे कार्यक्रमही असतात. या कार्यक्रमांची जागा महाएपिसोडने घेतली तर त्याला मिळणाऱ्या रेटिंगकडे चॅनलचं लक्ष असतं, पण महाएपिसोड्सना मिळणारा टीआरपी हा इतर कार्यक्रमांपेक्षा थोडा जास्त असल्याचं लक्षात आलं आहे. याबद्दल नीलेश सांगतात, ‘‘महाएपिसोड्सना मिळणारे रेटिंग्स पुष्कळदा जास्त असते. मालिकेतल्या व्यक्तिरेखेशी प्रेक्षकांची भावनिक गुंतवणूक झालेली असते. इतर पुरस्कार सोहळे किंवा तत्सम कार्यक्रमांमध्ये ही भावनिक गुंतवणूक नसते. ठरावीक मालिकेतल्या आवडत्या पात्राचं मालिकेत पुढे काय होतंय हे बघणं प्रेक्षकांसाठी जास्त उत्सुकतेचं असतं. चकचकीत इव्हेंट्सपेक्षा प्रेक्षक आता महाएपिसोड्सकडे वळतात.’’ भावनिक गुंतवणूक याच मुद्दय़ावर जयेश त्यांचं मत व्यक्त करतात, ‘‘मालिकेतल्या आवडत्या व्यक्तिरेखेचा प्रवास बघण्याला प्रेक्षक प्राधान्य देतात. म्हणूनच विशिष्ट मालिकेचा महाएपिसोड त्यातल्या व्यक्तिरेखेसाठी बघितला जातो. महाएपिसोडचा टीआरपी बऱ्याचदा त्यातल्या लोकप्रिय व्यक्तिरेखांसाठी असतो. त्यातल्या व्यक्तिरेखांशी प्रेक्षकांची भावनिक गुंतवणूक असते.’’ रेटिंगच्या मुद्दय़ाकडे संजय उपाध्याय वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. ते म्हणतात, ‘‘मालिकांचा प्रेक्षकवर्ग खूप आहे. महाएपिसोड्स बघण्याची प्रेक्षकांची नेहमी तयारी असते. प्रेक्षकांना त्यात प्रचंड रस असतो. त्यामुळे प्रेक्षक असतील तर महाएपिसोड करण्याचं उद्दिष्ट सफल होईल. महाएपिसोड म्हणजे लोकप्रिय मालिकांचं सेलिब्रेशन आहे. महाएपिसोडला प्रेक्षक असतो, प्रेक्षक असतो म्हणून टीआरपी मिळतो आणि म्हणूनच रेव्हेन्यू मिळतो.’’

एका तासाच्या महाएपिसोडमध्ये जे नेमकं दाखवायचं आहे ते महाएपिसोडमध्ये अखेरच्या दहा-बारा मिनिटांत दाखवलं जायचं. त्यामुळे महाएपिसोडच्या सुरुवातीपासून काही तरी घडेल या आशेने बसणाऱ्या प्रेक्षकांचा भ्रमनिरास व्हायचा. महाएपिसोडच्या प्रोमोबद्दलही हीच नाराजी व्यक्त व्हायची. त्याचा प्रोमो अतिरंजक आणि अतिनाटय़ाने तयार केला जायचा. पण प्रत्यक्ष त्या एपिसोडमध्ये प्रोमोप्रमाणे गोष्टी नसायच्या. त्यामुळे प्रेक्षक विशिष्ट मालिकांबाबत नाराज व्हायचा. पण आता हे चित्र बदललंय. जे प्रोमोमध्ये दाखवलं जातं तेच मालिकेच्या महाएपिसोडमध्येही दाखवलं जातं. तसंच त्यातलं नाटय़ एपिसोडच्या सुरुवातीपासून मांडलं जातं. महाएपिसोडमध्ये झालेला हा बदल स्वागतार्ह आहे.

महाएपिसोडचा हक्काचा वार रविवार आहे. यापूर्वी झालेले बहुतांशी महाएपिसोड रविवारीच झाले आहेत. काही मात्र आठवडय़ाच्या मधल्या एखाद्या वारी झाले आहेत. पण रविवारशिवाय इतर दिवशी महाएपिसोड करणं हे चॅनलसाठी थोडं अवघड असतं. याचं कारण नीलेश मयेकर देतात, ‘रविवारशिवाय इतर दिवशी महाएपिसोड करायचा असेल तर दुसऱ्या एखाद्या मालिकेचा भाग दाखवता येत नाही. त्यामुळे एका मालिकेच्या महाएपिसोडसाठी दुसऱ्या मालिकेबाबत तडजोड करावी लागते. मग अशा वेळी विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो.’ असंच मत संजय यांचंही आहे. ते सांगतात, ‘इतर दिवशी विशिष्ट मालिकेचा महाएपिसोड केला तर इतर मालिकांच्या प्रेक्षकांवर अन्याय केल्यासारखं आहे. तरी लग्न किंवा एखादी मोठी घटना मालिकेत दाखवायची असेल तर त्याबाबत विचार केला जातो.’

महाएपिसोडच्या बाबतीत आणखी एक मुद्दा गेल्या काही महिन्यांमध्ये अधोरेखित होताना दिसला. काही चॅनल्सनी तीन मालिकांचे सलग तीन महाएपिसोड दुपार आणि रात्री असे दोन्ही वेळा दाखवले. त्यामुळे प्रेक्षकांना महाएपिसोड बघण्यासाठी दुपार आणि रात्र असे दोन पर्याय मिळाले होते. तसेच इतर हिंदी-मराठी चॅनल्सवर रात्री असलेल्या ग्लॅमरस, चकचकीत कार्यक्रमांचाही प्रेक्षकवर्ग मोठा आहे. त्यामुळे दुपारी महाएपिसोड आणि रात्री ग्लॅमरस कार्यक्रम असं नियोजन प्रेक्षकांनी केलं होतं.

टीव्ही माध्यमात होणाऱ्या बदलांपैकी महाएपिसोड हा एक महत्त्वाचा बदल आहे. सुरुवातीला याचं स्वरूप वेगळं होतं. आता त्यातही थोडा बदल होताना दिसतोय. सादरीकरण, मांडणी यामुळे मालिकेचा महाएपिसोड आकर्षक होतोय. महाएपिसोड दाखवणं हे सुरुवातीला चॅनलच्या स्ट्रॅटेजीचा भाग होता. पण आता महाएपिसोड प्रेक्षकांना पसंत पडू लागल्यामुळे आणि त्यातून रेटिंग मिळत असल्यामुळे महाएपिसोड करणं आता स्ट्रॅटेजिकसह क्रिएटिव्ह मुद्दाही झाला आहे. येत्या काळात महाएपिसोडचं स्वरूप आणखी बदलेल असं मतं चॅनल्सकडून व्यक्त केलं जातंय. त्यामुळे आता महाएपिसोडमध्ये येत्या काळात कोणकोणते बदल होतील याबाबत उत्सुकता असेल.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com
@chaijoshi11

Story img Loader