मालिकेतल्या खुळ्या पात्राकडे सहसा दुर्लक्ष होत असतं. पण याला अपवाद ठरलाय तो ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतला पांडू. विस्कटलेले केस, वाढलेली दाढी, वेंधळा असा पांडू साकारलाय प्रल्हाद कुडतरकर याने.
वेगळ्या विषयाची एखादी मालिका सुरू होते. सास-बहू ड्रामेबाजी मालिकांच्या भाऊगर्दीत ती मालिका चर्चेचा विषयही ठरते. त्यावर टीका होते. त्याचे समर्थक तयार होतात. ती कशी चांगली, वाईट या चर्चानी व्हॉट्स अॅप ग्रुपही रंगतात. असं बरंच काही झालं झी मराठीच्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचं. ही मालिका सुरू झाली तेव्हा अनेक वाद निर्माण झाले. अंधश्रद्धा दाखवतात, भूतबाधाचे संदर्भ आहेत, भाषा चुकीची आहे वगैरे वगैरे. पण हळूहळू मालिकेने जोर घेतला आणि लोकांना ती आवडूही लागली. मालिकेला नियमित प्रेक्षक मिळाल्यानंतर तोच प्रेक्षक हळूहळू त्यातल्या व्यक्तिरेखांमध्ये गुंतू लागला. मग नीलिमा, माधव, दत्ता, अभिराम, सुश्ला, आर्चिस अशा अनेकांच्या प्रेक्षक जवळ जाऊ शकला. पण या सगळ्या व्यक्तिरेखांमध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय ठरलाय तो पांडू. खुळ्याची भूमिका साकारलेला पांडू म्हणजे प्रल्हाद कुडतरकर या तरुणाने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
‘रात्रीस खेळ चाले’मधला पांडू इतका लोकप्रिय झालाय की, तो प्रत्येक प्रसंगामध्ये असावा असं प्रेक्षकांना वाटू लागलंय. मालिकेत तो वेडा दाखवलाय. पण मालिकेचे महत्त्वाचे धागेदोरे तो उलगडत असतो. खरं तर मालिकेत अनेक व्यक्तिरेखा महत्त्वाच्या दिसून येताहेत, पण पांडू ही व्यक्तिरेखा इतरांपेक्षा वेगळी दिसून येतेय. पांडू सांगेल तेवढंच काम करणारा असला तरी भाव खाऊन जातोय.
वाढलेली दाढी, विस्कटलेले केस, मळलेले कपडे अशा अवतारात पांडू असला तरी तो प्रेक्षकांना स्क्रीनवर बघायला आवडतो. त्याचं हसणं तर अधिक लोकप्रिय झालंय. हसता हसता विशिष्ट एखादा संवाद म्हणण्याची ढब लक्ष वेधून घेणारी आहे. पांडूच्या यशाबद्दल आणि ती व्यक्तिरेखा प्रल्हादच साकारणार हे ठरल्याचा किस्सा तो सांगतो, ‘का रे दुरावानंतर ‘रात्रीस खेळ..’सारखी रहस्यमय मालिका लिहिणं खरं तर हा मोठा बदल होता माझ्यासाठी. पण माझ्यावर चॅनलने विश्वास ठेवला. लेखक म्हणून मी मालिकेतल्या व्यक्तिरेखा कशा रंगवेन, कोणाची काय स्वभाववैशिष्टय़े असतील वगैरे विचार करायचो. त्याच वेळी झी मराठीचे नीलेश मयेकर यांनी पांडू या व्यक्तिरेखेसाठी माझं कास्टिंग केलं. मालिकेचे निर्माते संतोष भोसले आणि पटकथा लेखक संतोष आयचित या दोघांनाही ते पटलं. अशा प्रकारे पांडू ही व्यक्तिरेखा मी साकारू लागलो. मी कोकणातलाच असल्यामुळे प्रत्येक गावात पांडूसारखी एक तरी व्यक्ती असतेच, हे माहीत होतं. शिवाय कोकणातल्या गोष्टी लहानपणापासून ऐकत आलोय. त्यामुळे मालिकेचं लेखन आणि पांडू साकारताना खूप मदत झाली.’
प्रल्हाद लेखन करताना ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तिरेखेचा अभ्यास करतो त्याचप्रमाणे तो पांडू ही व्यक्तिरेखा साकारतानाही संपूर्ण विचार करतो. कोकणातला असल्यामुळे पांडूसारख्या व्यक्ती त्याने गावागावांत बघितल्या आहेत. पांडू ही व्यक्तिरेखा रंगवण्याबाबत तो सांगतो, ‘मी माझ्या गावात पांडूसारख्या व्यक्ती अनुभवल्या आहेत. त्यांना वाईट वाटलं, कोणी ओरडलं तरी ते त्यांच्या नेहमीच्या स्टाइलनेच वागतात, बोलतात. त्यांची एक विशिष्ट लकब असते. ते ती कधीच सोडत नाही. तसंच पांडूचं आहे. त्याला कोणी कितीही बोललं तरी तो हसत हसत बोलण्याच्या लकबीतच बोलत असतो.’ ‘ह ह ह. सुष्मा इला. त्या बघा सुष्मा इला.’ हे पांडूचं बोलणं फार वैशिष्टय़पूर्ण नसलं तरी प्रेक्षकांना ते आवडू लागलं आहे. प्रल्हादच्या अभिनयातल्या साधे-सहजपणामुळे तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
प्रल्हादने याआधी अनेक एकांकिका, नाटकांसाठी लेखन आणि अभिनय केला आहे. मुंबईच्या महर्षी दयानंद कॉलेजमधून मराठी साहित्यात त्याने पदवी घेतली. नंतर तो मनोरंजन क्षेत्राकडे वळला. त्याने दिग्दर्शित केलेली ‘हिस्ट्री ऑफ लिजंड्स’ ही एकांकिका त्या वर्षी खूप गाजली. त्या एकांकिकेपासून प्रल्हादचा प्रवास खऱ्याअर्थाने सुरू झाला. त्यानंतर वेगवेगळ्या कॉलेजमधून तो एकांकिकांचं दिग्दर्शन करू लागला. त्याच्या मते ज्या कॉलेजमध्ये एकांकिका, अभिनय याविषयी योग्य मार्गदर्शन करणारे लोक नाहीत त्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना याविषयीची माहिती द्यायला हवी. त्यासाठी तो विविध कॉलेजसाठी एकांकिका बसवू लागला. ‘आय सी यू’, ‘कारशेड’, ‘मेड फॉर इच अदर’, ‘ट्रथ अॅण्ड डेअर’ अशा अनेक एकांकिकांचं त्याने दिग्दर्शन केलं असून ‘नॉट फॉर सेल’, ‘गेट सेट गो’, ‘पहिल्या बापाचा पहिला मुलगा’, ‘तमाशा ऑफ ह्य़ुमॅनिटी’, ‘पळसाला पानं तीन’ अशा एकांकिकांमध्ये अभिनयही केला आहे.
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या आधी त्याने अनेक मालिकांचं लेखन केलं आहे. ‘भाग्यलक्ष्मी’, ‘आभास हा’, ‘का रे दुरावा’, ‘लक्ष्य’, ‘आंबट गोड’, ‘माधुरी मिडल क्लास’, ‘मनी सागर’ अशा मालिकांसाठी त्याने लेखन केलं आहे. काही मालिकांसाठी पटकथा तर काहींसाठी संवाद लेखनाचं काम त्याने यशस्वीरीत्या पूर्ण केलं आहे. मालिकांची नावं बघितली तर लक्षात येईल की प्रल्हादने वेगवेगळ्या विषयांच्या मालिकांचं लेखन केलं आहे. या अनुभवाविषयी तो सांगतो, ‘सुदैवाने मला विविध विषयांच्या मालिकांचं लेखन करायला मिळालं. लेखकालाही वेगवेगळ्या बाजाचं लेखन करण्याची संधी हवीच असते. मला मिळालेल्या या संधीत विशेष वाटा आहे झी मराठीचा. चॅनलने माझ्यावर विश्वास दाखवला. वैविध्यपूर्ण मालिकांच्या लेखनामुळे विशिष्ट बाजाच्या मालिका लिहितो असा शिक्का बसला नाही. अशा पद्धतीच्या लेखनासाठी मला एकांकिकांचा खूप फायदा झाला. कॉलेजमध्ये असताना वेगवेगळ्या धाटणीच्या एकांकिका लिहिल्या. दुसरी एकांकिका पहिलीपासून कशी वेगळी असेल असा विचार नेहमी असायचा. त्याचा इथे फायदा झाला.’ आताही मोकळ्या वेळेत एकांकिका, नाटकं बघण्याचा प्रल्हादचा अभ्यास सुरू असतो. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमासाठी त्याने साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.
एकांकिका, व्यावसायिक-प्रायोगिक नाटक, मालिका अशा माध्यमातून प्रल्हादने लेखन केलं आहे. या तिन्ही माध्यमांच्या लेखन अनुभवाबाबत तो चांगले मुद्दे मांडतो. ‘एकांकिका लिहिताना स्पर्धेचा विचार असतो. पहिल्या एकांकिकेपेक्षा दुसरी किती दमदार होईल याचा विचार केला जातो. स्पर्धेच्या दृष्टिकोनातून एकांकिका सादर केली जाते. तर नाटकाचं लेखन करताना त्यात मनोरंजन किती आहे हे बघितलं जातं. प्रेक्षकांना काय आवडेल, काय नाही याचा विचार इथे होतो. त्यातही प्रायोगिक आणि व्यावसायिक यांची गणितं वेगळी असतात. मालिका रोज असतात. त्यामुळे त्यात तोचतोचपणा टाळण्याचा प्रयत्न असतो. शिवाय त्यातही काहीतरी हॅपनिंग दाखवलं पाहिजे, असा हेतू असतो. त्यामुळे लेखनाच्या माध्यमांनुसार त्यामागचा अभ्यास, पद्धत, विचार बदलत जातात’, तिन्ही माध्यमांचं महत्त्व प्रल्हाद अतिशय मुद्देसूद सांगतो.
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यावर अनेक टीका झाली. अंधश्रद्धा, चुकीची भाषा, कलाकारांचा अभिनय वगैरे मुद्दे मांडत अनेकांनी मालिकेचा विरोध केला होता. पण आता मालिका प्रेक्षकांना आवडू लागलीय. याबाबत प्रल्हाद सांगतो, ‘मालिकेच्या सुरुवातीला काहींनी टीका केली, हे खरंय. पण माझ्या मते कोणत्याही कलाकृतीला प्रस्थापित होण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. या मालिकेतले अनेक कलाकार बीड, औरंगाबाद, पुणे अशा भागांतून आले आहेत. मालिकेसाठी ते मालवणी भाषा शिकले आहेत. पण आता मालिकेला चांगला प्रतिसाद मिळतोय. कोकणात आकेरी गावात मालिकेचं शूट होत असतं. त्या ठिकाणी सेटवर कलाकारांना भेटायला गर्दी होत असते.’
विविध माध्यमांत काम केलेल्या प्रल्हादला मात्र रंगभूमीचं जास्त आकर्षण आहे. त्याच्या प्रवासाची सुरुवात रंगभूमीपासून झालेली असल्यामुळे तसं असणं साहजिकच आहे. ‘रात्रीस.’ ही मालिका संपल्यानंतर नाटक करण्याकडे कल असल्याचं तो सांगतो. विशेष म्हणजे त्यातही तो प्रायोगिक नाटकालाच प्राधान्य देतो. प्रायोगिक नाटकांमध्ये विविध प्रयोग करून बघता येतात. तिथे व्यावसायिक गणितं आड येत नाहीत. दडपण न घेता प्रयोग करण्याची मोकळीक प्रायोगिक रंगमंचावर मिळते, असं त्याचं म्हणणं आहे. प्रल्हादने पूर्वी ‘वीर दौडले सातच’ या व्यावसायिक आणि ‘एका बाकी एकाकी’ या प्रायोगिक नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय ‘सेल्फी’ या शॉर्टफिल्ममध्येही त्याने अभिनय केला आहे. या शॉर्टफिल्मला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. काळ्या रंगाचा न्यूनगंड असलेल्या मुलाची कथा यात दाखवली आहे. यातला न्यूनंगड असलेला मुलगा प्रल्हादने उत्तम वठवला आहे.
कोकणातलं कथानक, छायाचित्रण, अभिनय, तेथील लोकेशन्स, नाईकांचा वाडा. नाईकांच्या वाडय़ात सतत काही ना काहीतरी अतक्र्य गोष्टी घडत असतात. त्याबद्दल पांडूला सगळं माहितीये, असं त्याचं नेहमीचं दाखवणं हे या व्यक्तिरेखेचं वैशिष्टय़ आहे. आता एखाद्या प्रसंगात काहीतरी अतक्र्य घडण्याची घटना दाखवली की, ‘आता पांडू येईल आणि त्याला सगळं माहितीये असं म्हणेल’ असं घरोघरी म्हटलं जातं. पांडूच्या निमित्ताने मनोरंजन क्षेत्रात आणखी एक दमदार अभिनेता आल्याचं प्रल्हाद हे उत्तम उदाहरण आहे. लेखन-अभिनय-दिग्दर्शन अशा तिन्ही कला त्याच्याकडे असल्यामुळे येत्या काळात एखादी सशक्त कलाकृती त्याच्या नावे झाली तर नवल वाटायला नको!
चैताली जोशी
twitter – @chaijoshi11
response.lokprabha@expressindia.com