‘बोलते ती टुच्ची आणि करते ती वच्छी’ असं ठसक्यात बोलणारी ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतील वच्छी आत्या ही भूमिका घराघरांत पोहोचतेय. ही भूमिका साकारणाऱ्या वर्षां दांदळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होताहेत. अभिनय क्षेत्रातला त्यांचा प्रवास, क्षेत्रात उशिरा झालेलं पदार्पण, नोकरी सांभाळून अभिनय करणं या सगळ्यांवर त्यांच्याशी बातचीत.
’ अभिनय क्षेत्रात तुमचं पदार्पण थोडं उशिरा झालं याचं नेमकं कारण काय? एकूणच पदार्पण आणि प्रवासाविषयी सांगा.
– अभिनेत्री व्हायचं असं कधीच ठरवलं नव्हतं. १९९१ साली मी बीएमसीमध्ये संगीत शिक्षिका म्हणून नोकरीला लागले. तिथे मुलांची नाटकं, गाणी बसवायचे. नोकरीत रुजू झाल्यानंतर साधारण नऊ वर्षांनी एका परीक्षकांनी मला ‘ही मुलं उत्तम अभिनय करतात. म्हणजे तुम्हीही करीत असाल ना’ असं विचारलं. मी असा कधी विचार केला नाही, असं माझं त्यावरचं उत्तर होतं. पण, मग मनात म्हटलं की एखाद्या स्पर्धेत भाग घ्यायला हरकत नाही. म्हणून बीएमसीमध्ये एका स्पर्धेत सहभागी झाले होते. मनोहर सुर्वे दिग्दर्शित एका नाटकात मी काम केलं. त्यासाठी मला बक्षीसही मिळालं. हा माझ्यासाठी एकदम वेगळा आणि चांगला अनुभव होता. तसा लहानपणापासून फिल्मीपणा अंगात होताच. आपणही हिरोइन व्हावं असंही नेहमी वाटायचं. आरशासमोर उभं राहून गाणी वगैरे म्हणणं हे मीही केलंय. पण, तो माझ्या मनाच्या आतला कप्पा होता. मला अभिनय करता येतो हे कळण्यासाठी १९९९ हे वर्ष उजाडावं लागलं. नोकरीच्या ठिकाणी माझ्या अभिनयाबद्दल अनेकांना समजलं. म्हणून दरवर्षी विविध स्पर्धाना मला अनेक जण त्यांच्या नाटकात घ्यायला लागले. त्यापैकीच विजय निकम यांनी मला त्यांच्या एका नाटकात काम करण्याची संधी दिली. त्यांच्यासोबत दहा-बारा वर्षे विविध नाटकं करत राहिले. व्यक्तिरेखेतील गंमत शोधणे, तिच्यातल्या खाचा-खोचा बघणं, चालणं-बोलणं-वय याचं निरीक्षण करणं, लकबी बघणं या सगळ्याचा विचार करणं महत्त्वाचं असतं, हे मी विजय निकम यांच्याकडून शिकले. अभिनयात अनुभव मिळत गेला. कालांतराने व्यावसायिक नाटकं करू लागले. ‘नटसम्राट’, ‘तो मी नव्हेच’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘डॉन, भय्या हातपाय पसरी’ अशी व्यावसायिक नाटकं केली. सतीश पुळेकर, प्रभाकर पणशीकर अशा अनेक दिग्गजांसोबत काम करायची संधी मिळाली. २००६ मध्ये ‘चिमणी पाखरं’ही पहिली मालिका केली. मग मालिकांचा ओघही सुरूच राहिला. ‘कृपासिंधू’, ‘शुभंकरोति’, ‘मालवणी डेज’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘सुहासिनी’, ‘देवयानी’, ‘भैरोबा’, ‘एकाच या जन्मी जणू’, ‘१७६० सासूबाई’ अशा मराठी तर ‘मायकेसे बंधी डोर’, ‘मुक्तिबंधन’, ‘आर के लक्ष्मण की दुनिया’, ‘क्राइम पट्रोल’, ‘आहट’, ‘हाँटेड नाइट्स’ अशा हिंदी मालिका केल्या. स्पर्धापासून सुरू झालेला प्रवास अतिशय सुखाचा आहे.
’ तुम्ही संगीताचं प्रशिक्षण घेतलं आहे. असं असूनही अभिनय क्षेत्रात यावंसं का वाटलं?
– हो, मी संगीताचं प्रशिक्षण घेतलं आहे. पण, एका क्षणी माझ्या असं लक्षात आलं की मला गायनात तितकी मजा येत नाहीये. त्यामुळे संगीत ऐकून त्याचा आनंद घेऊ या, असं मी ठरवलं. संगीत या कलेबद्दल नितांत आदर आणि प्रेम आहे. पण, अभिनयाकडे मी अधिक झुकले. अभिनय मला कळतो की नाही हे माहीत नव्हतं पण, अभिनय मी स्वत: खूप एन्जॉय करते हे मात्र मला जाणवलं.
’ तुम्ही साकारलेल्या इतर भूमिकांपेक्षा वच्छी आत्या ही भूमिका अधिक लोकप्रिय झाली. ही भूमिका इतकी गाजेल असं वाटलं होतं का?
– भूमिका इतकी लोकप्रिय होईल असं मला सुरुवातीला वाटलं नव्हतं. वच्छी आत्या ही भूमिका तीन महिन्यांसाठीच असेल, नायक-नायिकेचं लग्न झालं की त्या भूमिकेचं काम थोडं कमी होईल; असं मला सांगितलं होतं. दरम्यान, दुसऱ्या एका वाहिनीवरची एक मालिका मी स्वीकारली होती. ‘नांदा..’च्या तीन महिन्यांच्या माझ्या कामानंतर मी दुसरी मालिका करू शकेन, असं मला वाटलं होतं. त्यामुळे मी दुसरी मालिका स्वीकारली होती. पण, त्या दुसऱ्या वाहिनीवरील मालिकेचं लोकेशन वेगळीकडे हलवण्यात आलं. ते खूप लांब होतं. काही वैयक्तिक कारणास्तव इतक्या लांब मी शूटला जाऊ शकत नसल्यामुळे त्यांना माझा नकार कळवला. याच वेळी मला ‘नांदा..’टीमकडून सांगितलं की, वच्छी आत्या ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. झी मराठीच्या टीममधील जाणकार, अनुभवी लोकांनी सांगितलं की, तुमच्या अभिनय करिअरमधली ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका ठरेल. हे शब्द मला प्रोत्साहन देऊन गेले. मालिकेचं शुट सुरू झालं. पहिल्या दोनेक सीन्सनंतरच मला या भूमिकेचं महत्त्व कळलं होतं.
’ रेल्वेमधून प्रवास करताना महिला प्रवासी तुमच्या वच्छी आत्या या भूमिकेसंदर्भात कशा प्रकारे व्यक्त होतात?
– ‘नांदा..’ ही मालिका सुरू झाल्यापासून मी मालाडमध्ये राहतेय. पण, अजूनही काही कामानिमित्त मी डोंबिवलीला जात असते. हा प्रवास करताना वच्छी आत्याचं लोकांना प्रचंड वेड आहे, याची जाणीव होते. या भूमिकेच्या आधी बायका अमुक एका मालिकेतली विशिष्ट भूमिका करणारी मीच आहे ना, याची खात्री करून घ्यायच्या. पण, आता थेट वच्छी आत्या अशी हाकच मारतात. कारण त्यांना ती त्यांच्यातलीच एक वाटते. एकदा एका बाईने नारळाच्या वडय़ा दिल्या होत्या तर एकदा एकीने सोनचाफ्याची फुलं दिली होती. हे सगळं हक्काने सुरू असतं. मीही माझ्याकडे पुरेसा वेळ असला तर त्यांच्याशी गप्पा मारते. कारण त्यांच्यामुळेच भूमिकेला आणि पर्यायाने मला प्रेम मिळतंय. त्यामुळे त्यांच्याशी तितक्याच आपुलकीने बोलणं हे मला माझं कर्तव्य वाटतं.
० नोकरी सांभाळून या क्षेत्रात काम करणं किती अवघड आहे?
– नोकरी सांभाळत या क्षेत्रात काम करणं म्हणजे तारेवरची कसरत! मला रोज वेगवेगळ्या शाळेत जावं लागतं. शाळांच्या संगीत, नाटकांच्या स्पर्धेसाठी मुलांना तयार करावं लागतं. शाळेच्या सांस्कृतिक विभागाचं सगळं काम सांभाळावं लागतं. वर्षांला सहा-सात गाणी शिकवणे, राग शिकवणे हा सगळा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. मुलांची नाटुकली बसवावी लागतात. अशी शाळेची जबाबदारी असते. तर दुसरीकडे मालिकेत चोख काम करून भूमिकाही गाजवायची असते. रोज सकाळी सात वाजता मी शाळेत जाते. तिथून शूटिंगसाठी सेटवर जाते. महिन्यातले साधारण १५ दिवस शूटसाठी द्यावे लागतात. सुदैवाने दोन्हीच्या वेळा जमून आल्या आहेत. त्यामुळे दोन्हीकडच्या जबाबदाऱ्या मला हसतहसत पार पाडता येतात. शिवाय दोन्ही ठिकाणच्या सहकाऱ्यांचा पाठिंबा, प्रोत्साहनही आहेच.
० तुम्ही डोंबिवलीत राहता, मढमध्ये शूट आणि मुंबईत नोकरी. हे सगळं कसं जमवता?
– आता मालाडमध्ये राहायला आल्यापासून जरा सोयीचं झालंय. पण, २००७ ते २०१३ या सात वर्षांच्या काळात मी खूप कसरत केली आहे. डोंबिवलीला राहायचे, कुल्र्याला शाळेत नोकरी करायचे आणि मढमध्ये शूटिंगला जायचे. डोंबिवली-कुर्ला-मढ असा सात वर्षांचा संघर्ष केलाय. कधी कधी उशिरा पॅक अप झाल्यानंतर मी सेटवरच राहायचे. दुसऱ्या दिवशी तिथून शाळेत जायचे. मग पुन्हा शूट. असं चक्र सुरूच असायचं. काही वेळा असं केल्यामुळे तीन-चार दिवस मी घरीही जाऊ शकत नव्हते. कधी कधी शेवटची ट्रेन चुकायची. मग दादर स्टेशनवर भाजीवाल्या मावशींसोबत गप्पा मारत रात्रभर बसायचे. अशा प्रसंगांमुळे आजही डोळे पाणावतात. पाच-सहा ऑडिशन घेऊन झाल्यानंतर ‘तुझं काम होत नाहीये’, ‘तुझा चेहरा सूट होत नाहीये’ असं सांगितलं जायचं. असेही अनेक प्रसंग अनुभवले आहेत.
’ इतकी धावपळ व्हायची, अजूनही होते तर नोकरी कधी सोडाविशी वाटत नाही का?
– काही आर्थिक कारणांमुळे मी आता नोकरी सोडू शकत नाही. पण, येत्या दोन-तीन वर्षांमध्ये नोकरी सोडून पूर्ण वेळ अभिनय क्षेत्रात काम करायचा माझा नक्कीच विचार आहे.
’ वर्षां दांदळे आणि वच्छी आत्या यात काय साम्य आणि फरक आहे?
– आयुष्यात आपण माणूस म्हणून सगळ्या व्यक्तिरेखा कोणत्या ना कोणत्या प्रसंगातून जगतच असतो. वच्छीचे काही गुण माझ्यात आहेत. तिच्याप्रमाणे मलाही माणसं जोडायला आवडतं. वच्छीच्या वाटेत कोणी आडवं आलं की ती ते लक्षात ठेवून समोरच्याला दाखवून देते. तसंच माझंही आहे. अर्थात मी अगदी वच्छीसारखी वागत नाही. कारण ती मालिका आहे. त्यात दाखवलेल्या सगळ्याच गोष्टी प्रत्यक्षात घडतातच असं नाही. पण, माझ्या मनात या गोष्टी राहतात. शेवटी मीही माणूस आहे. पण, माझ्यात काही प्रमाणात वच्छी आहे हे खरं. किंबहुना ती सगळ्यांमध्येच आहे म्हणून तर ती सगळ्यांना आवडते.
’ मालिकेत दाखवलेल्या सगळ्याच गोष्टी प्रत्यक्षात घडतातच असं नाही, असं म्हणालात. मग मालिकेतल्या व्यक्तिरेखांसारख्या व्यक्ती खऱ्या आयुष्यात असतात असं तुम्हाला वाटतं का?
– ललिता, स्वानंदी अशा व्यक्तिरेखा खऱ्या आयुष्यात काही प्रमाणात असू शकतात. ललितासारख्या काही बायका मी प्रत्यक्ष आयुष्यात बघितल्या आहेत. खोटं वागून जगणाऱ्या बायका असतात. फरक इतकाच आहे की, ती मालिका असल्यामुळे ललिता समोरच्या व्यक्तीचा जमेल तितका अपमान करते. प्रत्यक्षात अशा बायका थेट वागत नाहीत. स्वानंदीसारखं नेहमी खरं बोलणारा असाही एक माणूस मी अनुभवला आहे. अगदी शंभर टक्के खरं बोलत नसतीलही पण, स्वानंदी या व्यक्तिरेखेच्या जवळ जाणारी ती व्यक्ती आहे. त्यामुळे मालिकेतल्या व्यक्तिरेखांसारख्या व्यक्ती खऱ्या आयुष्यात असू शकतात पण, त्यांची व्यक्त होण्याची पद्धत काहीशी वेगळी असू शकते. कारण शेवटी मालिका आणि खरं आयुष्य यात फरक असतो.
’ वच्छी आत्या या भूमिकेने तुम्हाला काय दिलं?
-वच्छी आत्या या भूमिकेने मला जबाबदारीची जाणीव दिली आहे. प्रतिमा कुलकर्णी, सीमा देव, सतीश पुळेकर अशा मोठय़ा मंडळींनी या भूमिकेचं कौतुक केलंय. मालिकेचं काम वेगाने होत असतं. कधी कधी कमी वेळात जास्त संवादांवर काम करायचं असतं. त्या वेळी काम वाढल्यामुळे त्यात उन्नीस-बीस होऊ शकतं. पण, आपण शंभर टक्केच द्यायला हवे याची सतत जाणीव होत असते. पण एक मात्र नक्की सांगते, या भूमिकेच्या यशामुळे यापुढचा प्रवास आर्थिकदृष्टय़ा आणि करिअर-दृष्टय़ाही अधिक सुखकर होईल.
’ तुम्ही आता कौतुकाबद्दल बोललात. प्रत्येक कलाकाराला ही कौतुकाची थाप हवी असते. तुम्हाला ही थाप मिळायला थोडा वेळ लागला असं नाही का वाटत?
– हो, वेळ लागला हे खरंय. मी आजवर सहभागी झालेल्या स्पर्धामध्ये बक्षीस मिळवलंय. मालिकांमधली कामं चोख केलीत. प्रेक्षकांना माझी ती सगळी कामं आवडलीही आहेत. आता वच्छी या भूमिकेचं भरभरून कौतुक होतंय. मला जे हवं होतं, ते आता मिळतंय. कौतुकाची थाप उशिरा मिळाली पण भरभरून मिळाली!
’ मालिकेतून एखादा कलाकार लोकप्रिय झाल्यावर त्याला इतर अनेक ऑफर्स मिळू लागतात. तुम्हालाही हा अनुभव आला असेल. मग तुमचे पुढचे प्रोजेक्ट्स काय?
– वच्छी आत्या ही भूमिका साकारण्याच्या आधीही आणि नंतरही अनेक भूमिकांसाठी मला विचारलं गेलं. तीन नाटकं आणि एक मालिकेबाबत विचारणा झाली. पण एकाच वेळी मला सगळं करता येणं शक्य नाही. शिवाय आता एक मालिका आणि नोकरी यांच्या वेळापत्रकाची घडी चांगली बसली आहे. त्यामुळे सध्या तरी एकच मालिका करायची असं ठरवलंय. ही मालिका संपल्यानंतर मात्र इतर ऑफर्सचा मी विचार करेन.
चैताली जोशी –