मालिका स्त्रीप्रधान असणं नवीन नाही. यातली स्त्री आता पूर्वीसारखी सोशीक, गरीब, बिचारी नाही. पण, आजही काही मालिकांमधल्या स्रिया सुशिक्षित, सुजाण असल्या तरी मख्खपणे वावरताना दिसतात. त्या हुशार दिसत असल्या तरी त्यांच्या हुशारीचा फायदा मात्र घेताना दिसत नाहीत.
हिंदी सिनेमा हा हिरोंचा आणि मालिका हिरोइन्सची असं वर्गीकरण काही वर्षांपूर्वी झालं. हे वर्गीकरण हळूहळू मराठीकडे वळू लागलं. मराठी सिनेमांच्या बाबतीत तसं शंभर टक्के झालं नाही. कारण आजही मराठी सिनेमात विषयाला जास्त महत्त्व दिलं जातं. पण, मालिकांच्या बाबतीत हे तंतोतंत खरं ठरलंय. स्त्रीप्रधान मालिकांची संख्या वाढली. गरीब, बिचारी, सोशिक, सोज्ज्वळ महिला दाखवून प्रेक्षकांना फारच भावुक केलं. बरोब्बर संध्याकाळी सातच्या ठोक्याला अशा महिलांची एंट्री घरोघरी टीव्हीवर होते. मग काय, मालिकेतल्या नायिकांची दु:खं, संकटं जणू आपलीच समजून समस्त महिला प्रेक्षकवर्ग त्यांच्यात सामील होतो. पण, आता हे चित्र थोडं का होईना बदलताना दिसतंय. बदल कशात तर मालिकेतल्या महिलांची व्यक्तिरेखेच्या स्वरूपाबद्दल. मालिकेतली स्त्री व्यक्तिरेखा सुशिक्षित, आधुनिक विचारांची, सुजाण, हुशार अशी दाखवू लागले. पण, उपयोग काय त्याचा? असं म्हणण्याची वेळ आली आहे आता. असं का म्हणून विचारताय? मालिकेतल्या स्त्रिया, तरुणी बदललेल्या दाखवल्या खऱ्या पण, त्या दिसताहेत कुठे तशा? स्वानंदी, रुंजी, अर्पिता, कल्याणी, ऊर्मी, गौरी या नोकरी करणाऱ्या, भरपूर शिकलेल्या, सुसंस्कृत घरातल्या पण, राहतात मुळुमुळुच.
या विषयाची सुरुवात ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतल्या स्वानंदीपासून केली नाही तर नवलच! स्वानंदी.. एका क्लासेसमध्ये शिकवणारी तरुणी. म्हणजे शिक्षिकाच. तिला खोटं बोलायला आणि कोणी खोटं बोललेलं आवडत नाही. तसं ती तिच्या आचरणात आणतेही. पण, तिच्या सासूच्या खोटेपणाबद्दल सगळं माहीत असूनही ती एक अवाक्षर काढत नाही. मुकाटय़ाने सगळं सहन करते. असं का तर म्हणे ती जहागिरदारांची सून आहे. घर तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी आली आहे म्हणे. मान्य. पण, ललिताबाईंच्या कजागपणासमोर स्वानंदी गप्प कशी बसू शकते हे कोडंच आहे. मधल्या एका एपिसोडमध्ये स्वानंदी ललिताच्या मैत्रिणीकडे तिच्या घरी घरकाम करणाऱ्या लहान मुलीला शिकू द्या हे प्रेमळपणे समजवायला गेलेली असते. पण, ती ललिताचीच मैत्रीण शेवटी. तिच्यासारखा कांगावा करणारच. ती ललिताला येऊन सांगते की स्वानंदीमुळे तिच्या मुलीचं लग्न मोडलं. वास्तविक असं काहीही नसतं. पण, नेहमीप्रमाणे ममाज् बॉय नील यावर पटकन विश्वास ठेवतो आणि स्वानंदीला त्यांची माफी मागायला सांगतो. कधी नव्हे ती माफी मागायला नकार देते. मग तो तिला काही दिवस माहेरी जायला सांगतो आणि ती जातेही. कशाला जायचं? चूक होती का तिची तर नाही. बरं माहेरी का आली हे माहेरच्यांना खरं सांगितलंही नाही. मग अशा वेळी स्वानंदीचा खरेपणा, खंबीरपणे वागणं कुठे गेलं?
अर्थात ही टीका कोणत्याही कलाकारावर नक्कीच नाही. सगळेच कलाकार त्यांना सांगितलेलं, दिलेलं काम चोख करत आहेत. पण, मग यात दोष कोणाचा? लेखक, दिग्दर्शक, निर्माता, चॅनल की अशा मालिका बघणाऱ्या प्रेक्षकांचा? काहीच कळेना. हे चक्र आहे. एकाने सुरू केलं की ते पुन्हा त्याच्यापर्यंत येऊन पोहोचणारच. अशीच दुसरी एक मालिका म्हणजे ‘किती सांगायचंय मला’. या मालिकेची कथा खरंतर चांगली आहे. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवणारा ओम आणि जिल्हाधिकारी अर्पिता यांची प्रेमकहाणी. याला जोड घर, संसार, रूढी, परंपरा, विचार अशा सगळ्याची. जिल्हाधिकारी असलेली अर्पिता लग्न झाल्यानंतर घर सांभाळू शकेल का अशी ओमच्या आजीला शंका. इथूनच मालिका पुढे सरकते. मालिकेचा प्लॉट चांगलाय. त्याची मांडणी तूर्तास तरी फार आकर्षक वाटत नाही. पण, मालिकेचा जम बसवायला आणखी थोडा वेळ जाईल कदाचित. तो देऊया आपण. मुद्दा हा आहे की, जिल्हाधिकारी तरुणी इतकी अविचारी कशी असू शकते हा. म्हणजे खरंतर ती अविचारी नाही. पण, जिल्हाधिकारी तरुणीकडून अपेक्षा केली जाणार नाही असं काहीसं ती वागते. मालिकेतला एक प्रसंग; ओम आणि अर्पिता काही कामानिमित्त एका कॉफी शॉपमध्ये भेटतात. एक निनावी व्यक्ती या भेटीचा फोटो काढते. दुसऱ्या दिवशी हा फोटो पेपरमध्ये छापून येतो आणि एकच बवाल होतो. जिल्हाधिकारी अर्पिता कोणासोबत होती, कुठे होती, का होती वगैरे प्रश्न उपस्थित केले जातात. पण फोटोत दिसणारा मुलगा ओम आहे, कामासाठी भेटलेलो वगैरे माहिती तिला तिच्या घरच्यांना सांगता येत नाही. जे खरं आहे ते फाडफाड बोलून टाकायला कशाला हवीय हिंमत? पण, हे आमच्या मालिकेतल्या समस्त तरुणीवर्गाला कळेल तर ना. आता ओम आणि अर्पिताच्या लग्नाला आजीचा होकार आलाय म्हणे. तरी आजी हळूच बारीकसारीक काहीतरी सुनवत असतात. पण, त्यांना स्पष्टपणे काय ते एकदाच सांगावं हे जिल्हाधिकारी बाईला कळायला नको का? अर्थात तिने असं केलं तर मालिका तिथेच संपेल की हो, त्यामुळे हा कथाखेच प्रपंच सुरू आहे वाटतं!
चॅनल्सची धारणा, स्वरूप, मांडणी बदलत चालली असली तरी मालिका स्त्रीप्रधान असायला हव्यात, हे चॅनलवाल्यांचं उद्दिष्ट आजही तसंच कायम आहे. पुसट बदल होतोय यात. पण, पुसटच. काही वर्षांपूर्वीच्या स्त्रीप्रधान मालिकेत नायिकेने अन्याय सोसणं, मानसिक छळाला बळी जाणं, संकटं झेलून आयुष्य जगणं वगैरे गोष्टी असायच्या. आताची नायिका शिकली-सवरलेली दाखवतात. बऱ्यापैकी मालिकांमध्ये शहरी भागातील कथानकंआहेत. त्यामुळे मालिकेचा लुक बदलतो. बदललेलं चित्र असूनही नायिका स्पष्ट बोलताना मात्र दिसत नाहीत. आज मालिकांमध्ये वेगवेगळे विषय बघायला मिळतात. ते मनोरंजकही असतात. पण, नायिका सुशिक्षित, सुजाण, हुशार दाखवूनही मूर्खपणा करताना दिसतात. आता हे का दाखवतात, याचं उत्तर व्यावसायिक गणितांमागे दडलेलं असू शकतं. पण, तार्किकदृष्टय़ा ते खटकणारं आहे. तसं न दाखवताही मालिका मनोरंजक दाखवता येईलच ना. पण, तसं होताना दिसत नाही.
सध्या लोकप्रिय असलेल्या ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतल्या मुख्य जोडीचं कौतुक होतंय. मालिकेची कथासुद्धा योग्य वेगात सुरू आहे. सगळं आलबेलं आहे. पण, कधीकधी खटकतं ते गौरीचं वागणं. तिची वहिनी एक कजाग बाई. घरात एका कामाला हात लावत नाही आणि उंटावरून शेळ्या हाकत असते. तिच्या ऑर्डर्स तिची सासू, आजेसासू आणि नणंद म्हणजे गौरी मुकाटय़ाने ऐकतातही. असं असतं का? सुनबाई उठल्या की त्यांना हातात चहा, नाश्ता, डबा दिला जातो. सासू, आजेसासू सहन करतात. त्यांचं वय, शिकवण, स्वभाव वगैरे लक्षात घेता एकवेळ ते समजूनही घेऊ. पण, गौरी? ती तर शिकलेली, नोकरी करणारी आजची तरुणी. ती तिच्या वहिनीची मिजास निमूटपणे ऐकून घेते. तिने चहा आणायला सांगितला की गेल्या मॅडम सेवेसाठी, तिने इस्त्रीचे कपडे आणायला सांगितले की गौरी चालली दुकानात, गौरीच्या दादाने तिला काही काम सांगितले की गौरी ‘मी करते ना’ असं म्हणून मोकळी. गौरी कुठे जाते, तिच्या मित्रमैत्रिणींमध्ये काय घडतंय या नसत्या चौकशा मात्र तिला असतात. अनेकदा ती गौरीला याबद्दल थेट विचारत असते. गौरी मात्र वरवरची उत्तरं देते. पण, तिने ‘मला असे प्रश्न विचारलेले आवडत नाहीत, त्यामुळे माझ्यामध्ये पडू नकोस’ असं किंवा तत्सम काही सांगायला काहीच हरकत नाही. पण, नाही. गौरी ताईंना सौजन्यतेचा पुरस्कार मिळायला हवा!
‘पुढचं पाऊल’ या मालिकेतल्या कल्याणी या व्यक्तिरेखेबद्दल काय आणि किती बोलणार खरंतर! ही व्यक्तिरेखा पहिल्या भागापासूनच शांत, गरीब, भोळी, भित्री अशी दाखवली आहे. अशा मुली असतातही पण, घरात कणखर सासूच्या हाताखाली वावरलेल्या कल्याणीला आता तरी शहाणपण यायला हवं; तर नाही. जरासा बदल झालाय. पण, हवा तितका नाही. ‘रुंजी’ ही मालिका सुरू झाली तेव्हा रुंजी ही मुख्य व्यक्तिरेखा खूप भावली होती. आजची तरुणी एकदम बरोब्बर सादर केली होती. बेधडक, बिनधास्त, धाडसी अशी रुंजी लोकप्रियही झाली. पण, तिचं लग्न झाल्यानंतर ती तिच्या चुलतसासू म्हणजे मोठय़ा आईच्या जाळ्यात अडकत गेली. अडकायची, पुन्हा बाहेर पडायची. पुन्हा तेच. पण, रुंजीसारख्या मुलीने मोठय़ा आईचं पितळ एकदाच उघड का करू नये हा नेहमी सतावणारा प्रश्न आहे.
धार्मिक आणि आधुनिक विचारसरणींची जुगलबंदी बघायला मिळते ती ‘पसंत आहे मुलगी’ या मालिकेत. या मालिकेचा विषय खूप वेगळ्याप्रकारे हाताळला जातोय. या मालिकेवरही खूप टीका झाली. पण, मालिका आता हळूहळू वेगळं वळण घेतेय. कदाचित येत्या काही दिवसात, महिन्यात मालिकेचं आणखी वेगळं रूप बघायला मिळेल. मालिकेची मुख्य स्त्री व्यक्तिरेखा ऊर्मी. मानसशास्त्राची विद्यार्थिनी. त्यामुळे ती समोरच्याच्या वागण्यावर शांतपणे, समजून-उमजून व्यक्त होते. आधुनिक विचारसरणी, राहणीमान असलेल्या घरातून धार्मिक विचारसरणी असलेल्या घरात ती सून म्हणून येते. पण, तिथे तिला अनेक गोष्टी झेलाव्या लागतात. वासू म्हणजे ऊर्मीचा नवरा, त्याच्याशी आधी लग्न ठरलेल्या नंदिनीची कारस्थानं घरात सुरूच आहेत. तिच्या प्रत्येक कारस्थानात ती ऊर्मीला मुद्दामहून ओढते. हे ऊर्मीलाही माहिती आहे. पण, तिचा मानसशास्त्राचा अभ्यास मधे येतो. नंदिनीला जवळचं असं कोणीच नाही, तिला एकटीला सोडलं तर तिच्यावर होणारे परिणाम वगैरे विचार तिच्या मनात येतात आणि म्हणून नंदिनीने मुद्दाम आखलेल्या कटात ऊर्मीच दोषी असल्याचं ती निमूटपणे मान्य करते. नंदिनी कशी चुकीची असं एकदाही ऊर्मीने सगळ्यांसमोर स्पष्ट सांगितलं नाही. इतकी सहनशील मुलगी आज बघायला मिळेल का, हा मोठा प्रश्नच आहे.
या सगळ्यात कोणत्याही कलाकाराच्या कामाबद्दल किंतु नाही. कलाकाराला दिलेलं काम तो नक्कीच पूर्ण करतो. इथे मुद्दा आहे तो तर्कशास्त्राचा. खरंतर मनोरंजन क्षेत्रात तर्कशास्त्र काही वेळा थोडं बाजूलाच ठेवावं असं म्हटलं जातं. पण, लहानसहान गोष्टींमध्येही अतार्किक गोष्टी दिसू लागल्या तर मात्र प्रेक्षकांना ते खटकू लागतं. मालिकांचे विषय चांगले, प्रबोधन करणारे, योग्य संदेश देणारे असले तरी अशा अतार्किक गोष्टींमुळे त्यांच्यावर टीकेचे शिंतोडे उडवले जातात. खटकणाऱ्या गोष्टींमागे चॅनल्सची व्यावसायिक गणितं, मालिकांचं लांबणं, कथानक खेचणं वगैरे गोष्टी असू शकतात. आता या गोष्टी ना प्रेक्षकांच्या हातात ना कलाकारांच्या. त्यामुळे कलाकारांनी त्या करायच्या आणि प्रेक्षकांनी त्या बघायच्या. प्रेक्षकांना किमान टीव्ही बंद करण्याचा पर्याय तरी आहे. तेवढं तर प्रेक्षक नक्कीच करू शकतात..!
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com
@chaijoshi11