स्टॅन्ली गोन्सालविस – response.lokprabha@expressindia.com
‘दिएस नातालीस’ (जन्मदिवस) या मूळ लॅटीन शब्दाचा मराठमोळा अपभ्रंश- नाताळ. ख्रिसमस हा इंग्रजी शब्द मूळ ग्रीक शब्द ख्रिस्तोस मास (मसीहा-अभिषिक्त केलेला) या शब्दावरून आला. प्रभू येशूचा जन्म कोणत्या दिवशी झाला याची अधिकृत नोंद नाही. पूर्वी रोमन साम्राज्यात २५ डिसेंबरला सूर्यदेवतेचा सण साजरा केला जात असे. ज्युलियन कॅलेंडरनुसार या दिवसाच्या आगेमागे शरद ऋतू संपून शिशिर ऋतू सुरू होतो व सूर्य नव्या जोमाने प्रकाशू लागतो. ख्रिस्त – जगाला नवा प्रकाश दाखविणारा म्हणून इसवी सनाच्या चौथ्या शतकापासून पोप पहिले ज्युलियस (३३७-३५२) यांच्या निर्देशानुसार त्याच दिवशी ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करण्यात येऊ लागला. मात्र कॉप्टिक, सर्बियन, रशियन व ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये नाताळ ६ जानेवारीला साजरा केला जातो.

प्रभू येशूचा जन्मदिवस एक उत्सव म्हणून साजरा करण्याची प्रथा इटलीच्या असिसी गावातील संतपुरुष फ्रान्सिस असिसीने १२२३ साली सुरू केली. येशूचा जन्म गोठय़ात झाला म्हणून गोठा, त्यात गाई-म्हशी, गव्हाणीत पहुडलेला बाळ येशू व त्याच्याजवळ त्याचे आई-बाबा असा देखावा त्याने तयार केला. हा देखावा थोर चित्रकार-शिल्पकार लिओनार्दो दा व्हिन्चीने चित्ररूपात साकारला. त्याचे अनुकरण करून रेनेसाँन्स म्हणजेच कलेच्या पुनरुज्जीवनाच्या काळात इतर अनेक चित्रकारांनी आपल्या प्रतिभाशाली कुंचल्यातून तो वेगवेगळया प्रकारे रंगविला. त्यामुळे आता गोठय़ातील गवतावर पहुडलेले येशू बाळ, त्याचे मातापिता व शेजारी गोमाता, मेंढरे, मेंढपाळ असे ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडविणारे देखावे  उभारणे हा नाताळचा अविभाज्य भाग झाला आहे.

marathi granted status of classical langueage
अभिजात भाषेचा दर्जा केवळ राजकीय सोयीपुरता?
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
loksatta satire article on uproar in haryana bjp legislative party meeting in chandigarh
उलटा चष्मा : खर्ची आणि पर्ची
Potato bread Recipe
‘पोटॅटो ब्रेड रोल’ची जबरदस्त सोपी मराठी रेसिपी, एकदा खाल तर खातच राहाल
cow to be rajyamata gomata declared by maharashtra government
Rajmata-Gaumata: प्राचीन भारतीय संस्कृती आणि मिथकं गायींबद्दल काय सांगतात?
lokmanas
लोकमानस: एकांगी कल्पनाविलास
loksatta chaturang Happiness Thomas Hobbes philosophy advertisers
जिंकावे नि जगावे : आनंदाचे डोही
Pregnancy Tourism and The Aryans Of Ladakh Latest Marathi News
Pregnancy tourism in Ladakh: प्रेग्नन्सी टुरिझम म्हणजे नक्की काय? या संकल्पनेचा संबंध इतिहासातील आर्यांच्या टोळीशी कसा जोडला गेला?

मात्र मध्यंतरी सांताक्लॉज या सणामध्ये घुसखोरी केली व आता तोच या सणाचा अविभाज्य भाग झाला आहे! मध्ययुगात युरोपात जन्मलेला, मायरा प्रांताचा बिशप व पुढे संतपद प्राप्त झालेला निकोलस ही दानशूर व सज्जन असामी होती. कालांतराने त्याच्या या कर्णावतारामागे इतक्या कथा-दंतकथा जोडण्यात आल्या की, संत निकोलसचे लघुरूप सांताक्लॉज ही एक अजरामर व्यक्तिरेखा नव्याने जन्माला आली.

सांताक्लॉजची कीर्ती हळूहळू सर्वदूर पसरू लागली. डच वसाहतवाद्यांमुळे तो अमेरिकेत पोहोचला. पुढे जर्मनांनी रेनडियर प्राण्यांनी ओढायची गाडी (स्लेज) व त्यावर बसून आकाशातून संचार करणारा सांताक्लॉज अशी त्यात भर घातली. याच कल्पनेचा आधार घेऊन क्लेमेन्ट मूर ह्या कवीने (१८२२) ‘संत निकोलसतर्फे सप्रेम भेट’ या कवितेत अंगावर पायघोळ झगा, हातापायात पांढरे मोजे, हातात काठी, डोक्यावर लाल टोपी असे खेळकर, मिश्किल म्हाताऱ्या सांताक्लॉजचे शब्दचित्र रेखाटले. याच कवितेवर आधारित सर थॉमस नास्ट या अमेरिकन चित्रकाराने सांताक्लॉज रंगवला. पुढे त्या चित्रात घंटांचा समावेश करण्यात आला आणि ‘जिंगलबेल’ हे लोकप्रिय नाताळगीत (कॅरल) जन्माला आले.

सांताक्लॉजच्या वाढत्या लोकप्रियतेचा पुरेपूर लाभ घेतला, तो कोका-कोला कंपनीने. या व्यवसायचतुर कंपनीने सांताक्लॉजचे काल्पनिक चित्र तयार केले आपल्या कोलाच्या बाटलीवर चिकटवले. तेव्हापासून या नाताळबाबाचा पुनर्जन्म झाला. सांताक्लॉज घराघरात पोहोचला व लोकमानसावर अधिराज्य गाजवू लागला. एक खुशालचेंडू, हसरा-खेळकर, ढेरपोटया म्हातारा रेनडियरांच्या गाडीवर स्वार होऊन आपल्या पाठीवरील गाठोडय़ातून मुलाबाळांना खाऊ-खेळणी वाटत फिरतोय, ही धम्माल संकल्पना सर्वच जातीधर्माच्या, वयाच्या व भूगोलाच्याही िभती ओलांडून जगभरातील जनमनावर राज्य करीत आहे.

त्यात जागतिकीकरणाच्या या काळात बडय़ा कंपन्या व धूर्त व्यापारीवर्गाने नाताळामधील धार्मिकता वजा करून त्याला पूर्ण व्यावसायिक स्वरूप दिले आहे. ख्रिसमस हा  त्यांच्या उत्पादनविक्रीचा महत्त्वाचा इव्हेन्ट झाला आहे. त्यांच्यासाठी ही पर्वणीच आहे. बाजारपेठेचे हे गणित धर्माचे लेबल लावल्यास कधीच फायदेशीर ठरणार नाही, हे जाणून घाऊक व किरकोळ उद्योजक ख्रिसमसचे मार्केटिंग करतात. त्यासाठी सांताक्लॉजहा त्यांचा ब्रॅण्ड. म्हणून आयताच मिळाला.

ख्रिसमसच्या खरेदीसाठी मॉल्स व दुकाने सजवली जातात, तेव्हा त्या सजावटीत प्रामुख्याने नजरेत भरणारा असतो तो सांताक्लॉज! नाताळच्या काळात कोणतीच जाहिरात त्याच्या चित्राशिवाय पूर्ण होत नाही. ख्रिस्ताचा जन्मोत्सव असूनही सांताक्लॉजच केंद्रस्थानी राहू लागला आहे. बाळ येशूकडे गंभीरपणे हात जोडून प्रार्थना करावी लागते’; पण नाताळचा उत्सवी मूड वृिद्धगत करतो तो सांताक्लॉज.

नाताळ म्हणजे केवळ मौजमजा, खाणेपिणे, भरपूर खरेदी असे चित्र तयार केले जात आहे आणि त्याचे ठळक प्रतीक म्हणून सांताक्लॉजचा वापर केला जात आहे. हा मोठाच विरोधाभास आहे व तोच आता प्रस्थापित झाला आहे. खरे तर ख्रिसमस आणि सांताक्लॉजचा अर्थाअर्थी काहीएक संबंध नाही. आपण ‘मेरी ख्रिसमस’ म्हणतो तेव्हा ते नवजात येशूबाळाला केलेले अभिवादन असते, याचा अलीकडे विसर पडू लागला आहे.

नाताळची शुभेच्छापत्रे, ई-मेल किंवा मोबाइलवर येणाऱ्या शुभसंदेशांत एक वाक्य हमखास असते- मे सांताक्लॉज ग्रॅन्ट ऑल युअर विशेस! मानवी इच्छापूर्ती केवळ देवच करू शकतो हे सांगण्याऐवजी आता सांताक्लॉजकडे तशी प्रार्थना केली जात आहे! आता तर नवश्रीमंत पालक आपल्या लाडक्या छकुल्यांना सांताक्लॉजकडून तुला काय हवंय, असं विचारतात तेव्हा नव्या पिढीतील ही हुशार बालके आधुनिक मोबाइल, आयपॅड वगैरे गॅजेट्सची मागणी करतात! पालक सुद्धा आपल्या एकुलत्या एका मुला/मुलीची अशी कोणतीही इच्छा सांताक्लॉजच्या नावाने पूर्ण करून कृतकृत्य होतात! साहजिकच लहान मुलं ख्रिसमसच्या वेळेस सांताबाबाचीच अधिक आतुरतेने वाट पाहत असतात.

बालवयात सांताक्लॉज एखाद्या परिकथेसारखा मुलांच्या भावविश्वात येतो.  निरागस मुलांना सांता हा फारच मजेशीर प्रकार वाटतो.  मुलं अगदी मनापासून ‘सांता शो’ एन्जॉय करतात. लहान वयात मुलांना सांताची गोष्ट रंगवून सांगणे, त्याचे नाचगाणे, खाऊवाटप हे एक खेळ म्हणून ठीक आहे, पण त्या पलीकडे या दंतकथेला नाताळ सणाचा भाग समजणे चुकीचे आहे. विशेष म्हणजे काही चर्चमध्येही गोठय़ाच्या देखाव्यात सांताक्लॉजचा समावेश केला जातो. त्यामुळे भाविक येशूबाळाबरोबर त्यालाही वंदन करतात!

एक खरे आहे की, सांताक्लॉज, ख्रिसमस ट्री, केक अशा प्रतीकांमुळे ख्रिसमस आता सर्व धर्मीयांच्या घरांत पोहोचला आहे. आपल्या देशात अशा एकमेकांच्या धर्मप्रतीकांचा स्वीकार झाला तर धार्मिक सलोखा व सुसंवादाच्या दृष्टीने ते दमदार पाऊल ठरेल. मात्र नाताळच्या उत्सवी स्वरूपाबरोबरच त्याची आध्यात्मिक बाजूही तितक्याच ठळकपणे पुढे यायला हवी.

नाताळ हा ख्रिस्ताची नव्याने ओळख करुन घेण्याचा काळ असतो.  मुळात ख्रिस्त एक बंडखोर होता. सामान्य सुताराच्या घरात जन्माला येऊनही तो जुलमी रोमन राजवटीच्या विरोधात उभा राहिला. धर्माला आपल्या दावणीला बांधलेल्या पुरोहित वर्गाला त्याने जाब विचारला. कर्मकांड नाकारली. वाळीत टाकलेल्या महारोग्यांच्या अंगावरून मायेचा हात फिरविण्याचे धैर्य त्याच्या अंगात होते. तो शरीरविक्रय करणाऱ्या महिलेच्या घरी गेला. तिचा पाहुणचार स्वीकारला. त्याच्या या कृतीवर नाक मुरडणाऱ्या अभिजनांचे ढोंग त्याने उघडे पाडले. स्वैराचारी ठरवून एका स्त्रीवर दगडफेक करू पाहणाऱ्या जमावाला आव्हान देणारा तो धैर्यवान होता. त्याचा अनुयायी होऊ पाहणाऱ्या श्रीमंताला त्याने ठणकावून सांगितले की, तुझे असेल नसेल ते विकून टाक व मगच माझ्या मागे ये!

त्याने कायम दीनदलित व शोषितांची बाजू घेतली. विश्वासघात करणाऱ्या आपल्या शिष्यालाही क्षमा करण्याइतके त्याचे हृदय विशाल होते. प्रस्थापित सत्ताधारी, धर्मगुरू, शास्त्री-पंडित यांनी त्याच्या विरोधात कटकारस्थान रचले. पण येशूने कधीही हातात शस्त्र घेतले नाही. उपवास, आत्मक्लेश, अिहसा, शांती व भयमुक्तीचा त्याने सतत पुकारा केला व अखेपर्यंत क्षमा व प्रेमाची शिकवण देत राहिला.

नाताळ म्हणजे या सर्वाची आठवण. त्या आठवणींत स्वत:चा धांडोळा घ्यायला हवा. नाताळच्या आनंदात कालवारीची ती काटेरी वाट नजरेसमोर यायला हवी. कारण मानवी आयुष्य म्हणजे दु:ख, वेदना, अपयश, भीती व तणावांचा न संपणारा प्रवास असतो. छळ, कत्तली, रक्तपात, आगडोंब याने आपला सभोवताल काळवंडलेला आहे. िहसाचाराला अंत नाही. चिरंतन आहे ते दु:ख; सुख तर क्षणभंगुर असतं. जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या खांद्यावर दिलेला हा क्रूस आहे. तेच माणसाचे प्राक्तन असते,

हा भार काही काळ तरी हलका व्हावा म्हणून येतो नाताळ. बाळाच्या त्या निरागस हास्यातून आपल्याला मिळते नवजीवनाची ऊर्जा. त्यासाठीच साजरा केला जातो बाळाच्या जन्माचा आनंद. हा असतो सृजनाचा उत्सव म्हणूनच गव्हाणीत पहुडलेल्या त्या इवल्याशा बाळाहून मोठे कोणीच नसावे!

(छायाचित्र सौजन्य : विकिपीडिया)