नाताळ आपल्याला माहीत असतो तो ख्रिश्चन बांधवांचा मोठा सण म्हणून. अमेरिकेसारख्या देशात नाताळ कसा साजरा होतो याची एक झलक-
ख्रिसमस (याच्या स्पेलिंगमध्ये असलेल्या ‘टी’चा उच्चार बोलताना करत नाहीत) हा सण अमेरिकेत दुसऱ्या क्रमांकाचा मानला जातो. कारण पहिल्या क्रमांकावर असलेल्या थँक्सगिव्हिंगसारखा सगळे लोक हा सण साजरा करीत नाहीत. या सणाला धर्माची किनार आहे. जगातल्या बलाढय़ अशा या लोकशाहीत ७२ टक्के लोक ख्रिस्ती आहेत. त्यांनीच तर अमेरिका घडवली आहे. ख्रिश्चन धर्मात जरी पुष्कळ शाखा आणि उपशाखा असल्या, तरी त्यांचा सर्वाचा असा विश्वास आहे की येशू हा देवाचा मुलगा होता, तो २५ डिसेंबरला जन्माला आला. (काही मूठभर त्याचा जन्म मार्च महिन्यातला आहे असे म्हणणारेही आहेत), लोकांनी केलेल्या पापांचं क्षालन करण्यासाठी तो सुळावर चढला, त्याचा पुनर्जन्म झाला आणि तो शेवटी स्वर्गात गेला. २५ डिसेंबरला येशूचा जन्म साजरा करण्याचा सण म्हणजे ख्रिसमस. अमेरिकेतल्या ख्रिसमसचं रूप बदलून एखाद्या मौजमजा करायच्या सणासारखं झालेलं असलं, तरीही ख्रिश्चन नसलेल्या इतर धर्माचे लोक (सहिष्णू हिंदू सोडून) ही पाश्र्वभूमी विसरू शकत नसावेत. सण साजरा न करता ही मंडळी इतर सामान्य दिवसांप्रमाणेच एक असं समजून हा दिवस घालवतात.
अमेरिकेतल्या आधुनिक ख्रिसमसचं आताचं रूप मागच्या साधारण दीडेकशे वर्षांतलंच आहे. १७व्या शतकामध्ये ‘मे फ्लोअर’ बोटीने अमेरिकेला आलेले आणि त्यांच्या मागून आलेले इंग्रज (या सर्वाना पायोनिअर म्हणतात) इंग्लंडच्या लोकांहून फार वेगळे नव्हते. ख्रिसमसचा सण हा गंभीरपणे प्रार्थना करून (फार तर चर्चमध्ये जाऊन) आपापल्या कामाला लागण्याचा- अशा मताचे. पण हे फक्त ख्रिसमस साजरा करण्यापुरते; एरव्ही या लोकांना ब्रिटिशांचे वर्चस्व (दादागिरी) पसंत नव्हते. त्यांना आपला वेगळा, स्वतंत्र देश हवा होता. १७७५ ते १७८३ या काळात अमेरिकन रिव्होल्यूशन झाली. अमेरिकेने आपले स्वातंत्र्य मिळवून लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला. अमेरिकेच्या लोकशाही तंत्राची, स्वायत्ततेची आणि सुबत्तेची खबर आजूबाजूच्या देशांना (विशेषकरून युरोपमधल्या) लागायला वेळ नाही लागला. ‘हिरव्या कुरणां’च्या शोधात मग युरोपमधून लोकांचे लोंढे अमेरिकेत स्थायिक व्हायला आले. येताना आपल्या चाली-रीती, रिवाज, विश्वास, श्रद्धा सगळं घेऊनच आले. अमेरिकेचे मेल्टिंग पॉट झाले.
आधुनिक अमेरिकेच्या संस्कृतीमध्ये या मेल्टिंग पॉटची झलक आहे. इथल्या ख्रिसमसचं रूप लक्षात यायला ही पाश्र्वभूमी समजून घेणे जरुरीचे आहे.
अमेरिकेत ख्रिसमसला सदाहरित झाडाची घरात स्थापना करण्याची जी पद्धत आहे, ती मुळात जर्मनीची. एक गमतीचा किस्सा सांगतात याच्याबद्दल. स्वतंत्र अमेरिकेला ब्रिटिश राजे, राण्यांचे आकर्षण अगदी आजही आहे. ख्रिसमस साजरा करायला सुरुवात झाली, तरी सुरुवातीला झाडं ठेवायची पद्धत नव्हती. १८४६ मध्ये इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियाचे (ही राणी सगळ्यांची लाडकी) तिच्या लाडक्या नवऱ्याबरोबर- प्रिन्स अल्बर्टबरोबर (हा जर्मनीचा होता आणि ख्रिसमसच्या झाडाची पद्धत जर्मनीचीच) आणि मुलांबरोबर राजवाडय़ात ख्रिसमसच्या झाडाजवळ उभे असलेले एक चित्र सगळीकडे प्रसिद्ध झाले. पुढच्याच वर्षी अमेरिकेत ख्रिसमसच्या झाडाचे आगमन झाले. झाडाशिवाय आता ख्रिसमसची कल्पनाच करता येत नाही.
प्रत्येक वर्षी ३४ ते ३६ दशलक्ष मोठी (६ ते ७ फुटी) झाडे अमेरिकेत सर्वदूर पाठविली जातात. झाडांचे उत्पादन सगळ्या राज्यांमध्ये होते. ‘स्कॉच पाइन’, ‘डग्लस फर’, ‘व्हाइट पाइन’, ‘फ्रेझर फर’ अशा काही प्रसिद्ध जातींना चांगली मागणी असते. एक झाड काढलं की त्याच्या बदल्यात तीन नवीन रोपं लावली जातात. आठ- दहा वर्षांमध्ये झाडं चांगली मोठी होतात. एक जानेवारीनंतर लोक आपल्या घरासमोर रस्त्याच्या कडेला झाडे ठेवून देतात. वेगळ्या स्पेशल ट्रक्समधून सर्व झाडे एका ठिकाणी गोळा करून, कापून त्यांचा सालपा करून तो फुलझाडांच्या दुकानातून विकला जातो किंवा कधी कधी नगरपालिकेमधून नागरिकांना फुकट वाटला जातो. बागेमध्ये हा सालपा (मल्च) मोठय़ा झाडांच्या बुंध्यांजवळ किंवा जिथे तण वाढून द्यायचे नाहीत, अशा जागांवर वापरला जातो. व्हाइट हाऊसमधलं झाड, रॉक फेलर सेटरमधलं झाड आणि बिल्टमोर हाउस या अमेरिकेतल्या सर्वात मोठय़ा घरामधली झाडे ही सगळ्या अमेरिकेत त्यांच्या उंचीमुळे आणि त्यांच्यावर चमचमणाऱ्या लक्षावधी छोटय़ा दिव्यांमुळे आपले रेकॉर्ड टिकवून आहेत. ही झाडे शंभर फुटांहून जास्त उंच असतात. त्यांच्यावर जवळजवळ २५ ते ३० हजार छोटे दिवे लखलखत असतात. थॉमस अल्वा एडिसनचा एडवर्ड जॉन्स नावाचा मदतनीस होता. त्याने १८८२ मध्ये ख्रिसमसच्या झाडाकरता छोटय़ा विजेच्या दिव्यांच्या माळांची कल्पना काढली. १८९० पर्यंत या माळांची निर्मिती घरा-घराकरिता झाली. आजही या माळा सगळीकडे वापरात असतात.
पुढे येणाऱ्या वर्षांच्या आर्थिक व्यवहाराचे आडाखे देशातले अर्थतज्ज्ञ या दिवसाच्या खरेदी-विक्रीच्या आकडय़ांवरून बांधतात. सर्व तऱ्हेचे सेल बाजारात लागलेले असतात. वेगवेगळ्या आठवडय़ात दुकाने स्पेशल सेल लावतात.
थँक्सगिव्हिंग संपता संपता रस्त्यांच्या कडांनी मोकळ्या जगांवर जागोजागी तंबू ठोकून ख्रिसमसच्या झाडांची रास लावलेली असते. बरीचशी आत उभी करून ठेवलेली असतात. शनिवारी किंवा रविवारी मग सगळ्या कुटुंबाची ट्रिप झाड आणायला निघते. झाड फार आधी आणलं, तर ते ऐन ख्रिसमसला मरगळून जाता कामा नाही आणि आणायला फार उशीर केला, तर चांगली झाडं संपून जायची. सगळा विचार करूनच मग आपल्या बजेटमधलं झाड आणायचं. बहुतेक वेळा गाडीची ट्रंक (डिकी) अर्धी उघडी ठेवून. घरी आणल्यावर टेपने जखडलेल्या झाडाच्या फांद्या मोकळ्या करून त्याला एका मोठय़ा पसरट पाणी असलेल्या भांडय़ात उभं करायचं (अमेरिकेत घरांमध्ये मुख्य हॉलच्या खिडक्या रस्त्यावर उघडतात. ख्रिसमसचे झाड अशा एखाद्या खिडकीजवळच उभं केलं जातं. एखाद्या रस्त्यावरून फिरायला गेल्यावर आजूबाजूच्या घरांच्या खिडक्यांमधून सजवलेली झाडे बघण्यासारखी असतात). उभ्या केलेल्या झाडाच्या बुंध्याला मग लाल किंवा दुसऱ्या कुठल्याही रंगाचा घागरा (स्कर्ट) घालायचा, झाडाला रोज पाणी घालायचं आणि झाड सजवायला सुरुवात करायची.
घरातलं झाड सजतं तसं सगळं घर आणि अंगणही सजतं. दिव्यांच्या माळा, लाल-सोनेरी रंगांचे रिबिनींचे मोठे मोठे बो, आकाशकंदील (ताऱ्यांच्या आकारातले), छोटय़ा घंटा, प्रवेशदारावर प्लॅस्टिकच्या पाना-फुलांची हिरव्या आणि लाल रंगातली रीथ (प्रत्येक सणाच्या ठरलेल्या रंगांप्रमाणे रीथ बदलतात). थर्माकोलचा सँटा, त्याची रेनडिअरची गाडी, बेबी जीझसच्या जन्माचा सीन, मोठे कँडी केन्स अशा तऱ्हेची डेकोरेशन्स खूप लोक आपल्या घराच्या पुढच्या अंगणात करतात. अमेरिकेत ख्रिसमसच्या दिवसांमध्ये टवटवीत पाना-फुलांनी बहरलेली झाडं अभावानेच दिसतात. आजूबाजूच्या देशांमधून आता मात्र अमेरिकेत ख्रिसमसच्या वेळेला मिसलटो, हॉली, अमारेलिस, पॉइन्सेशिआ अशी रंगीत फुलझाडे येऊ लागली आहेत. (तशी ती अमेरिकेतही वाढवतात आता). ही रंगीबेरंगी (लाल, हिरवी) पाने फुले दाराजवळ किंवा घरात सणाच्या वेळेला वातावरणनिर्मिती करतात. घर-अंगणाप्रमाणे रस्ते, सगळ्या इमारती, अगदी इस्पितळे, बँका, पोस्ट ऑफिसं- झाडून सगळ्या-ख्रिसमसला नटून बसतात. रस्त्यांवरचे विजेचे खांबही लाल, हिरव्या रंगांनी सुशोभित केलेले असतात.
सरकारी शाळांमधे ख्रिसमस- सरकारी शाळा ख्रिसमसला साधारणपणे १७ दिवस बंद असतात. शाळांमध्ये निधर्मी वातावरण जपलं जातं. ख्रिसमसचं झाड, सगळ्यांनी मिळून म्हटलेली ख्रिसमसची गाणी (ही चर्चमध्ये म्हटल्या जाणाऱ्या धार्मिक गाण्यांहून अगदीच वेगळी असतात. यात धार्मिकता नसते, सूर मात्र सगळ्यांना आवडणारे आणि म्हणता येणारे असतात). सगळ्यांनी मिळून मजा करायचा, भेटवस्तू मिळवायचा, सुट्टीचा आनंद लुटायचा सण असं ख्रिसमसचं रूप सरकारी शाळांमध्ये दाखविलं जातं. मुलांवर अर्थात घरांमध्ये वेगळे संस्कार होत असतातच.
सण म्हणून ख्रिसमसचं स्वागत बहुतेक सगळे लहान, मोठे खूप आनंदाने करतात. बहुतेक सगळे म्हणायचे कारण असे की, काही थोडे ख्रिस्ती लोक चर्चमध्ये २५ तारखेला (२४ आणि २५ डिसेंबरच्या मधल्या रात्री १२ वाजता) प्रार्थना करतात. चर्चने आयोजित केलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावतात आणि ख्रिसमस हा मुख्यत्वेकरून धार्मिक सणासारखा साजरा करतात- नुसताच मौजमजा करायच्या सणासारखा नाही. इतरांना उपद्रव न करता तुमचं व्यक्तिस्वातंत्र्य जपायला अमेरिका कोणालाच नाही म्हणत नाही.
झाड सजलं की त्याच्या खाली मग भेटवस्तू मांडायला सुरुवात होते. झाडाच्या निमुळत्या शेंडय़ावर घरातले सर्वात छोटे मूल एक चमचमणारा तारा बसवतं. छोटय़ा-मोठय़ांनी केलेल्या, कधी कधी पिढय़ान्पिढय़ा सांभाळून ठेवलेल्या दागिन्यांनी मग झाड रोज सजत राहतं. कलाबुतीच्या, मण्यांच्या, पॉपकॉर्नच्या माळा, छोटय़ा शोभिवंत वस्तू, कॅण्डी केन या मुलांच्या साखरेच्या गोळ्या, छोटय़ा छोटय़ा घंटा, रंगीत पेपरच्या छोटय़ा रीथ्स (दर्शनी दरवाजावर लावतात, तशाच-मोसमाला शोभेल अशी पुष्परचना असलेल्या पण आकाराने लहान), एक ना अनेक! येता-जाता घरातली बरीच मंडळी तिरपे कटाक्ष टाकून झाडाच्या खालच्या पार्सलांचा अंदाज घेत असतात. याला अपवाद लहान मुलांचा. त्यांच्या भेटी सँटा आणणार असतो ना!
ख्रिसमसला सांगितलेल्या भेटी घेऊन येणाऱ्या सँटाची परंपरा नेदरलँड, स्वीडन, स्वित्झर्लंड अशा वेगवेगळ्या देशांमधल्या लोकांनी आणली. येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर त्याला भेटी घेऊन काही लोक आले हा भेटींमागचा संदर्भ असावा.
काही गृहिणी पुढच्या वर्षीचं काही शॉपिंग- ख्रिसमसच्या झाडासाठी किंवा बाहेरच्या सजावटीसाठी- आताच करण्याची घाई करतात, कारण या वस्तू ख्रिसमस झाला की लगेच दुकानात कमी किमतीत विकायला ठेवलेल्या असतात. घरी आणून या सर्व वस्तू नीट पॅक करून पुढच्या वर्षीकरता ठेवून देतात.
अमेरिकेचं मुलांवरचं प्रेम, भौतिकवादाचे धोरण, खूप मिळवा, खूप खर्च करा, (काही लोकांच्या मते चंगळवाद) यात सँटा अगदी फिट बसला. युरोपमधून आलेल्या सँटावर अमेरिकेने आपले संस्कार केले. अमेरिकेत सँटा लाल डगला घालून, खांद्यावर भेटवस्तूंची थैली (सॅक) घेऊन ‘हो, हो, हो’ करीत येतो. तो ढेरपोटय़ा, हसरा, पांढरी दाढीवाला, म्हातारा आहे. उत्तर ध्रुवावर त्याची खेळणी बनवण्याची फॅक्टरी आहे. छोटे बुटके त्या कारखान्यात खेळणी बनवत असतात. त्याची बर्फावरून यायची गाडी रेनडिअर्स ओढतात आणि रूडॉल्फ नावाचा लाल नाकवाला रेनडिअर त्याचा फारच लाडका आहे (कारण बाकी सारे रेनडिअर्स त्याच्या लाल नाकाची चेष्टा करतात, त्याला खेळायला घेत नाहीत). सँटा आपल्या बुटक्यांना प्रत्येक मूल नॉटी आहे की नाइस हे नक्की विचारतो. सगळ्या मोठय़ा मॉल्समध्ये मोक्याची जागा बघून सँटाला बसवलेले असते. तरुण आई-वडील आपल्या छोटय़ा मुलांना त्याच्या मांडीवर बसवून फोटो काढण्याच्या धडपडीत असतात (मुलं मात्र भोकांड पसरून आपली भीती व्यक्त करीत असतात).
साताठ वर्षांंपर्यंतची मुले भाबडेपणाने सँटाला बऱ्याच आधी पत्रं लिहितात. त्यांचे शिक्षक किंवा पालक मग ही पत्रे ‘पोस्टाने’ सँटाला पाठवतात. मुले ख्रिसमसच्या रात्रीची वाट बघत बसतात. कोणी नाठाळानी जर या मुलांना ‘सँटा काही खरा नाहीं,’ असे सांगायचा प्रयत्न केला, तर मुलांचा युक्तिवाद असा की ‘मग मी रात्री झाडाजवळ सँटाकरिता ठेवलेले दूध आणि बिस्किटे कुठे गेलीं?’ कोणीही या छोटय़ांना व्यवहारी जगात आणायची घाई करीत नाहीत, उलट कौतुकाने त्यांचा हा समज जपतात.
ख्रिसमसच्या दिवशी म्हणजे २४ आणि २५ डिसेंबरच्या मधल्या रात्रीपर्यंत झाडाखाली भेटवस्तूंचा आणि भेटकार्डांचा ढीग होतो. भेटकार्डांची सुरुवात सर्वस्वी अमेरिकेची आहे. १८८५ साली लुईस प्रँग याने प्रथम या कार्डांची अमेरिकेला ओळख करून दिली. वेगवेगळ्या प्रसंगी अनुरूप कार्डं देण्याची पद्धत अमेरिकेत आजही आहे.
ब्लॅक फ्रायडे- म्हणजे थँक्सगिव्हिंगच्या नंतरचा दिवस- हा अमेरिकेतला वर्षभरातला सगळ्यात मोठा दिवस. पुढे येणाऱ्या वर्षांच्या आर्थिक व्यवहाराचे आडाखे देशातले अर्थतज्ज्ञ या दिवसाच्या खरेदी-विक्रीच्या आकडय़ांवरून बांधतात. सर्व तऱ्हेचे सेल बाजारात लागलेले असतात. वेगवेगळ्या आठवडय़ात दुकाने स्पेशल सेल लावतात. काही जुन्या, प्रसिद्ध दुकानांचे सेल दर वर्षी ठरलेल्या वेळीच लागतात आणि लोक त्यांची प्रतीक्षा करत असतात. खरेदी करायच्या आधी तुमच्या आमच्यासारखे लोक नीट अभ्यास करून खरेदीचे नियोजन करतात. आपल्याला हवी ती वस्तू कुठल्या दुकानाच्या कुठल्या शाखेत आहे, ते दुकान घरापासून किंवा कामाच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे, दुकानाच्या उघडण्याच्या आणि बंद असण्याच्या वेळा, आपल्याला हवी असलेली शेड, शेप तेथे आहे किंवा नाही, वगैरे. नेटवरून शॉपिंग करायचं ठरवलं तरी लोक वस्तू आधी दुकानांमध्ये जाऊन बघून येणे पसंत करतात.
ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशीचं शॉपिंग आणखीनच वेगळं. झाडून सगळी दुकानं २६ तारखेला भल्या पहाटे उघडतात. खूप लोकांची गर्दी होते. ख्रिसमसच्या भेटी २५ लाच उघडलेल्या असतात आणि त्या परत करायच्या किंवा बदलून घ्यायच्या असल्या की गिऱ्हाइकं घाई करतात. काही गृहिणी पुढच्या वर्षीचं काही शॉपिंग- ख्रिसमसच्या झाडासाठी किंवा बाहेरच्या सजावटीसाठी- आताच करण्याची घाई करतात, कारण या वस्तू ख्रिसमस झाला की लगेच दुकानात कमी किमतीत विकायला ठेवलेल्या असतात. घरी आणून या सर्व वस्तू नीट पॅक करून पुढच्या वर्षी करता ठेवून देतात.
ख्रिसमसची मेजवानी साधारणपणे थँक्सगिव्हिंग्जच्या मेजवानीसारखीच असते. एगनॉग, प्लम पुडिंग, हनि बेक्ड हॅम, फ्रूट केक हे विशेष पदार्थ. वेगवेगळ्या तऱ्हेचे केक आणि कुकीज करणे सबंध सीझनभर चालूच असते. जिंजरब्रेडचा बंगलाही कधी कधी पालक हौसेने करतात. काही धार्मिक लोक २४ तारखेच्या रात्री १२ वाजता चर्चमध्ये प्रार्थना करायला जातात.
२५ तारखेला घरातली सर्व मंडळी झाडाभोवती जमा होतात. क्वचित सगळे जण डोक्यावर लाल पांढऱ्या, गोंडेवाल्या टोप्या घालतात. मग सगळ्या भेटवस्तू ‘ओह’, ‘वॉव’ करत उघडल्या जातात. सँटाने आणलेल्या भेटी मोठय़ांनी गुपचूप झाडाखाली आणून ठेवलेल्या असतातच. एकमेकांना मिठय़ा मारत सगळ्या भेटवस्तूंचे कौतुक केले जाते.
२५ तारीखही उलटून जाते. अजूनही सगळ्यांचा मूड सुट्टीचा असतो. लोकांच्या खर्च करायच्या मानसिकतेचा लाभ घ्यायला सरकारी, निमसरकारी, खासगी, सगळीच बिझनेस हाउसेस बाह्य सरसावून तयार असतात. विजेच्या दिव्यांचा वापर करून वेगवेगळी, सर्वांना माहीत असलेली कार्टूनमधली व्यंगचित्रे, डिस्नेनी लोकप्रिय केलेली परिकथांमधली पात्रे, विविध, मनोहारी फुलांच्या रचना या सगळ्यांनी व्यापलेल्या मैलोन्मैल लांबीचे पट्टे नागरिकांना आकर्षित करतात. रात्रीचे आउटिंग (अर्थातच पैसे खर्च करून) खूप लोक आवडीने करतात. मोठय़ा जत्रा, सर्कशी, नवीन नवीन सामानांनी भरलेली मॉलमधली दुकाने, छोटय़ा-मोठय़ा बागा, झू, जिथे जाल, तिथे ख्रिसमसच्या निमित्ताने काही नवीन आकर्षणे लोकांना बोलावतच असतात. पैशांची भरपूर देवाण-घेवाण होते. हळूहळू मंद गतीने कचेऱ्या सुरू होतात. दुकाने लगेचच उघडतात (कधी एकदा या हॉलिडे सीझनला दुकान उघडतो असे कितीतरी दुकानदारांना झालेले असते. उपाहारगृहे, हॉटेले सगळ्यांचेच सुगीचे दिवस असतात. जानेवारी महिना मात्र सगळ्याच हॉटेलांना, उपाहारगृहांना मंदीचा असतो).
मूड अजून सुट्टीचा असतो. कारण नवीन वर्ष समोर उभे असते, त्याचे स्वागत करायचे असते. हा उत्सव मात्र सगळेच सारख्या उत्साहाने करतात. शाळा, कॉलेजे, कामाची ठिकाणे सगळीकडेच मग ख्रिसमसला कोण भेटले, कुठे गेलो, खरेदी केली, काय भेटी मिळाल्या- दिल्या, कुठला केक, हॅम छान होते, कुठली चॉकलेटे पुरवून खाल्ली अशा गप्पा बरेच दिवस चालतात.