जमाना माध्यम क्रांतीचा नव्हे, माध्यम स्फोटाचा आहे. लेखक व्यक्त होण्यासाठी माध्यम निवडताना अभ्यास करताना दिसतो, पण माध्यमांतर करताना हा अभ्यास दिसत नाही. सतीश तांबे यांच्या ‘चुळबुळ’ या कथेवर आधारित नाटकाच्या निमित्ताने माध्यमांतराबद्दल..
जमाना व्हच्र्युअल प्रॉडक्ट्सचा आहे. वेष्टन बदलून आतील एकच माल वेगवेगळ्या सेगमेण्टमध्ये, भिन्न ग्राहकाला विकणे हा फण्डा झालाय. मुले-मुली-स्त्री-पुरुषांसाठी एकच टॉप, लेगिंग्ज इतकेच काय, कॉस्मेटिक प्रॉडक्टस्सुद्धा वेष्टने बदलून खपताहेत. प्रॉडक्टचे मार्केट पेन्रिटेशन नफ्यात पुरेपूर वसूल करून घेणे हा त्याचा उद्देश. एक गाणे हे व्हच्र्युअल प्रॉडक्ट ही म्युझिक चॅनल, व्हिडीओ क्लिप, ऑडिओ सीडी, चित्रपट नंतर डीव्हीडी पुढे एमपी थ्री ते कॉलर टय़ुन, पुढे रिमिक्स आणि नंतर वाद्यवृंदांतून असे विविध प्रकारे विकले जाते. जमाना माध्यम क्रांती नव्हे, तर माध्यम स्फोटाचा आहे. या साऱ्यात आपले साहित्य आणि लेखक कुठे आहेत? ते काय करताहेत?
आज लेखकाला व्यक्त होण्यासाठी अनेक माध्यमे उपलब्ध झालेली आहेत. चतुर किस्से ते मितभाषी ट्विटस असे हरप्रकारे लेखक लिहिताहेत आणि वाचलेही जाताहेत. एका वाक्याच्या ट्विटपासून थेट चारशे पानी कादंबरीपर्यंत अनेक प्रकारे आज व्यक्त होता येते. प्रिंट आणि डिजिटल अशी दोन माध्यमे उपलब्ध आहेत. यात किस्से, लघु-दीर्घ कथा, कादंबरी, नाटय़छटा, एकांकिका, नाटक आणि लघुपट, टेलिफिल्म ते फीचर फिल्म असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अशावेळी एका लेखकाने एक विषय दोन-चार वर्षे मुरवून एकाच रूपात लिहिण्याचा हट्ट धरणे बरोबर आहे का? हे माध्यमांतर करण्यासाठी नवा लेखक सक्षमही आहे. तो अभ्यासपूर्वक आपले लिखाण- माध्यम निवडताना दिसतो. मात्र माध्यमांतरावर फारसा विचार करताना दिसत नाही. झटपट व्यक्त होणे, यात आपली कल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची तळमळ दिसत नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कलाकृतीच्या माध्यमांतराची गरज आज कधी नव्हे इतकी वाढलेली आहे.
कोणत्याही माध्यमातून होणाऱ्या अभिव्यक्तीच्या मुळाशी एक घटक कायम असतो, तो म्हणजे कल्पना. ही कल्पना सर्वाना सुचते ती विरण्यापूर्वी पकडण्यासाठी लेखकाने सावध असणे गरजेचे. एकच कल्पना कवी, लेखक, पटकथाकार, नाटककार यांना त्यांच्या स्वत:च्या माध्यमात दिसू शकते. पण ती इतरही अनेक माध्यमांतून प्रवास करेल अशी शक्यता ते पडताळूनच पाहत नाही. त्यासाठी लेखकाने एकाहून अधिक माध्यमांतील गुण-दोष समजून घेत त्या माध्यमांत कुशलता आणायला हवी. असा लेखक एकच विषय अनेक माध्यमांतून रचनेत आवश्यक ते बदल करत, परिणाम साधत, स्वतंत्र कृती म्हणून उभा करू शकेल. ज्या वाचक/ प्रेक्षकाची ज्या माध्यमाशी जवळीक आहे, त्यातून त्याला ती अनुभवता येईल. कलाकृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल.
नुकतेच व्यावसायिक मंचावर आलेल्या, ‘चुळबुळ’ या सतीश तांबे यांच्या कथेवर आधारित नाटकाने माध्यमांतराचा विचार पुन्हा मनात आला. या नाटकाच्या मुळात जाण्यासाठी आपल्याला त्यांच्या ‘राज्य राणीचं होतं’ या कथासंग्रहातील ‘कोरसमधील बोबडा पोपट’ या कथेकडे जावे लागेल. तिथे गेल्यावर समजेल की आपण मुळाशी नाही तर खोडाशी पोहोचलो आहोत. ‘कोरसमधील बोबडा पोपट’ ही कथा तांबे यांच्याच ‘नवसाचा खांब’ या एकांकिकेवर आधारित आहे. पुढे तिच्या फांदीकडे पाहिले तर आपल्याला ‘चुळबुळ’ नावाचा दीर्घाक दिसेल, जो कथेवरून बेतला आहे. नंतर पुढे ‘चुळबुळ’ हे नाटक. म्हणजे एकांकिका ते कथा असा उलटा प्रवास करून ती मध्ये दीर्घाकाचे स्टेशन घेत नाटक बनली. माध्यमांतराचा हा प्रवास बलस्थाने, अडचणी, रूपांतरे आणि विस्तार या दृष्टीने अभ्यासावा अशी इच्छा होणे साहजिक आहे. त्याचाच हा प्रयत्न.
कल्पनेची कथेकडे जाणारी वाट पात्रे, स्थाने आणि तपशिलांना कालानुRमे जोडत पुढे जाते. कथेत तपशील येतात दोन प्रकारे. निवेदनपर किंवा आत्मनिवेदनपर. कशीही असली तरी कथा घडते निवेदकाच्या नजरेतून. तपशील आणि वर्णनासाठी ते आवश्यक आहे. कथा ही भूतकाळात घडून गेलेली असली तरीही निवेदन वाचताना ती त्या भूतकाळाचे वर्तमान बनून वाचकासमोर उभी राहते. कथेतील वास्तव हे आभासी, काल्पनिक, अतिवास्तव यांचे मिश्रण होऊन बनते. तिला निवेदकाचा दृष्टिकोन मिळतो. त्यानुसार ती गंभीर, वस्तुनिष्ठ, तटस्थ, विनोदी, भावघन, करुण इत्यादी रूपे धारण करते. या रूपांत पात्रे-घटना आणि तिचा परिणाम अशा क्रमाने कथा पुढे सरकते. कथेची एकसूत्री, एकरेषीय, एकसंध अशी इतर वैशिष्टय़े आहेत, जी एकांकिकेशीदेखील जोडता येतात. एकांकिका ही माध्यमांतराच्या दृष्टीने कथेच्या अधिक जवळची.
कथेची एकांकिका होताना तिच्या कल्पना विस्तारावर स्थल, काल आणि पात्र मर्यादा येतात. या एकांकिकेच्या वास्तविक मर्यादा आहेत. तिची कल्पना विस्तारताना, सूचक नेपथ्याच्या साहाय्याने स्थळ आणि पात्रांचा लवचीक आणि कल्पक वापर करत संवादी प्रसंग रचत एकांकिका पुढे जाते. तपशिलांचा वापर एकांकिका सूचकतेच्या साहाय्याने पूर्ण करते किंवा तो अनावश्यक असल्यास टाळते. कथेच्या दृश्यात्मकतेलाही एकांकिकेत मर्यादा येतात. नेपथ्य आणि प्रकाशयोजनेच्या साहाय्याने ही मर्यादा कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. इथे एक लक्षात घेऊ की एकांकिकेतील कंस म्हणजे कथेतील तपशील नव्हेत तर त्या रंग-सूचना असतात. आता याच कथेचा दीर्घाक करताना व्यक्ती आणि प्रसंगचित्रणाला आणि भावदर्शनाला अधिक वाव मिळतो. त्याच कथेचे पूर्ण नाटक करताना मात्र त्याची स्थल मर्यादा बांधीव नेपथ्यामुळे आणखी कमी होते, मात्र पात्र-प्रसंग जास्ती तपशीलवार उभे राहतात. नाटक हे संवादी माध्यम असल्याने साहजिकच अभिव्यक्तीचे मुख्य साधन संवाद हेच राहते. कथेवरून दृश्यमालिका, लघुचित्रपट किंवा चित्रपट बनताना मात्र तिचे पटकथेत रूपांतर होणे जरुरी आहे. पटकथा म्हणजे प्रेक्षकांना चित्रपट कसा दिसेल याचे अंदाजे दृश्यलेखन. पटकथा हे अंदाजे दृश्यलेखन असते हे भान या माध्यमात असणे जरुरी आहे. चित्रपटाचा दृश्यमानतेचा आवाका मोठा असल्याने दृश्यसंख्या अर्थातच वाढते. शब्द माध्यमांतून दृक-श्राव्य माध्यमातील हे रूपांतर संवादी न राहता दृश्यभाषेची मदत घेत अभिव्यक्त होते. माध्यमांतरातील हा फरक साधारण आणि ढोबळपणे मांडला असला तरीही लक्षात येते की माध्यमांतरासाठी कथेला एकांकिका, दीर्घाक, लघुपट, टेलिफिल्म ही जास्ती जवळची माध्यमे तर कादंबरीला नाटक-चित्रपट.
कथेचे माध्यमांतर करताना येणारा मुख्य प्रश्न, त्यातील निवेदनाचे काय करायचे? कथेतील तीन चतुर्थाश किंवा त्याहून अधिक भाग निवेदनात्मक असतो. हा मुख्य प्रश्न नीट सोडवणे- न सुटणे, हे नाटय़ उत्तम साधणे किंवा बिघडवणे याला कारण होते. हा विचार करता एकांकिकेसाठी कथा एकपेडी, म्हणजे जास्ती उपकथानके नसलेली असते या उलट चित्रपट, कादंबरी किंवा नाटकासाठी असलेल्या कथा बहुपेडी असतात. आपण ‘चुळबुळ’ या नाटकाचे जे एकांकिका- कथा- दीर्घाक-नाटक हे उदाहरण तपासणार आहोत, त्यात ही गोष्ट स्पष्ट होत जाईल.
माध्यमांतर करण्यासाठी नवा लेखक सक्षम आहे. तो अभ्यासपूर्वक आपले लिखाण- माध्यम निवडतो. मात्र माध्यमांतरावर फारसा विचार करत नाही. व्यक्त होण्यात आपली कल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्याची तळमळ दिसत नाही.
‘चुळबुळ’ या नाटकाचा मूळ स्रोत असलेली ‘नवसाचा खांब’ ही एकांकिका दोनच पात्रांत घडते. मंचाच्या मध्यभागी एक खांब आहे, तो कसले प्रतीक आहे हे लेखक सांगत नाही. एकांकिकेतील पुरुष आणि स्त्री यांचे नाते नाही, पण ओळख आहे. पत्नीचा मृत्यू आणि मुलीचे लग्न झाल्यावर, लैंगिक जीवन संपलेल्या काळात अचानक पन्नाशीच्या त्याची स्वप्नांत, रात्री-बेरात्री लैंगिक भावना जागी होत जाते. आपली जुनी मैत्रीण त्याच्या स्वप्नात येत राहते आणि तो स्वप्नदोषाने अस्वस्थ होतो. मनातील साचलेली मळमळ बोलायला त्याच्यासोबत कुणीही नाही. त्यामुळे तो तिच्याशीच बोलू लागतो. या निवेदनात तो आपल्या संपूर्ण लैंगिक गंडांचा प्रवास ससा, कुत्रा, साप, बेडूक अशा रूपकांतून मांडतो. यापुढे कोणताही उपयोग नसलेले पौरुषत्वदेखील तो गमवायला तयार नाही. उपयोग नसो पण ते आहे हेच समाधान. लैंगिक समस्येसाठी डॉक्टरकडे जायची प्रथा नसल्याने तो घरगुती उपाय करतो. यातूनच कामदेवाची पोथी त्याच्या हाती लागते. त्यातील सल्ला, जुने प्रेम आठवा आणि शांतता मिळाली की कामदेवाला चंदनाचा खांब वाहा, तो वाचतो आणि तोच हा मध्यातील खांब. अशा रीतीने रूपकाची एकात्मता साधते. लैंगिक भावनेची ही प्रतीके स्त्रीला कळत नाहीतच, वर पुरुषाचे सदैव कामवासनेचा विचार करणेच तिला कोडय़ात पाडते. एक साधी सरळ भावना- तिला एव्हढे फाटे? हे रूपकी नाटय़ शेवटी पोपटाचे रूपक घेत संपते. नवसाचा खांब हे मध्यवर्ती प्रतीक त्यामुळे सहज लक्षात येते. मनातील लैंगिक मळमळ पुरुषाने एखाद्या स्त्री, मैत्रिणीकडे व्यक्त करणे अशक्य अशा सांस्कृतिक वातावरणात एकांकिका स्वप्नात घडते असा घाट स्वीकारणे सक्तीचे होते.
अशी एकांकिका जेव्हा ‘कोरसमधील बोबडा पोपट’ ही कथा होऊन येते तेव्हा लेखकाला रंगमंच बंधन नसल्याने जास्तीचे तपशील, स्थळे, काळ आणि पात्रे जोडणे शक्य होते. हे कसे घडते ते पाहू. सुरुवातीलाच एकांकिकेच्या संवादी माध्यमाबाहेर, तपशिलांतून लेखक वामनचे मध्यमवयीन विधुर आणि एकटे असणे, त्याची लैंगिक समस्या कुठून आणि कशी उभी राहत गेली, हे तपशीलवार सांगतो. इथे खांबाचे रूपक बदलून ते वडाचे झाड बनते आणि त्याच्या पारंब्यांवर त्याची जुनी मैत्रीण सावित्री परी बनून विहरू लागते. ही दृश्यचैन एकांकिकेत अर्थात परवडली नसती. कथेत नवे वळण येते सावित्री या वामनच्या मैत्रिणीकडून. कदाचित वामनची पत्नी व्हायची, त्याऐवजी ती आज विख्यात तारका आहे. तिने लग्न केलेले नाही, असा कथेत वास्तवाचा तपशील भरला जातो. वामनचा सावित्री शोध त्याला, तिच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या दिखाऊ फिल्मी पार्टीत घेऊन येतो. इथे कथा पुरुषाच्या लैंगिकतेतील अहंगंडाला नमवून संपते. तपशील, वास्तव या सोबत पार्टीतील अनेक फिल्मी, नाटकी पात्रे आणि शेवटाला सर्व पौरुषत्वावर ठाम विधान केल्याने कथा मोठा पल्ला गाठते. आता या कथेत दीर्घाकाच्या शक्यता निर्माण होतात. तसा तो नंतर बनलाही. त्याला कथेच्या तपशिलांचा फायदा झालाच, वर पार्टीच्या हमखास विनोदी प्रसंगामुळे नाटक खेळते राहून अचानक सावित्रीने सर्वांच्या पौरुषत्वाला दिलेल्या आव्हानाचा उत्कर्षबिंदू बनत आवश्यक नाटय़परिणाम साधला. तासाभराच्या मर्यादेत कथेतील नको असलेले तपशील गाळता आले आणि दीर्घाक नाटय़ परिणामात उणा न पडता उभा राहिला.
‘चुळबुळ’ हे नाटक करताना लेखकाने दीर्घाक आणि कथा, दोन्हींचा आधार घेतला. कथेतील वगळलेले निवेदन तपशील नाटकात आले. मात्र यातील काही आधी वगळले होते ते परिणामांत उणे होते म्हणूनच. म्हणजेच संपूर्ण नाटक करताना हे तपशिलांचे निवेदन नाटकाला ‘चर्चानाटय़’ असा नवा फॉर्म देऊन गेले. आता या कथेत वामन, त्याचा मित्र, मानसोपचारतज्ज्ञ आणि सावित्री अशी चार मुख्य पात्रे आली. वामनच्या लैंगिक समस्येचे वैयक्तिक, उपरोधिक, मनोविश्लेषक दृष्टिकोनातून विश्लेषण झाले. हे नाटक लैंगिकतेला रूपकात्मक रीतीनेच भीडते. त्यात अश्लीलता अजिबात नाही. वामनची समस्या त्याच्या मित्राला न समजणे आणि मानसोपचारतज्ज्ञाला भलतीच वाटणे यात विसंगती आहे. त्यातून होणारा गोंधळ वामनला सावित्रीपर्यंत पोहोचवतो. तिला तिच्या ध्यानीमनी नसताना एकांकिकेत काम करायला लावून खरे तर वामननेच तिचा अभिनय प्रवास सुरू केला असतो. तेव्हा ती कदाचित वामनची पत्नी व्हायची, त्याऐवजी आज विख्यात तारका आहे. तिने लग्न केलेले नाही, ही एकच हळहळ वामनला वाटते आहे. तिच्याबाबत या क्षेत्रात चालतात तशी अनेक गॉसिप्स त्याने ऐकलेली आहेत. येथून कथा या क्षेत्रातील एकूणच लैंगिक मोकळीक, स्पर्श सोवळेपणा नसणे आणि स्त्रीचा गैरफायदा घेण्याकडे जाते. भारतीय लैंगिक सोवळेपणाच्या दांभिकतेला डिवचत, सावित्रीच्या घरी तिने नाटय़क्षेत्रातील मित्रांना दिलेल्या पार्टीकडे येते. या क्षेत्रातील कॉम्प्लेक्स असलेली मंडळी आपण बिनधास्त आहोत हे दाखविण्यासाठी जे दिखाऊ प्रयत्न करतात ते विनोदी आणि केविलवाणे दिसणारे या क्षेत्रातील वास्तव. या पार्टीत लाळघोटय़ा पुरुषांना सावित्री, अचानक एक गिफ्ट मागून, नाटकाचा चरम बिंदू गाठत जेरीस आणते. विषय लैंगिक समस्येचा असला तरीही नाटकात कुठेही अश्लीलता नाही. फक्त लैंगिक समस्येचा ऊहापोह आहे. हे नाटक नव्या फॉर्मशी प्रामाणिक आहे. चर्चानाटय़ या वेगळ्या फॉर्ममध्ये ते आपला परिणाम साधते.
थोडक्यात- द्विपात्री एकांकिका, बहुआयामी कथा, मर्यादित आशय निवडलेला दीर्घाक आणि संपूर्ण विषयाचे आकलन देणारे नाटक असा हा प्रवास माध्यमांतरची बलस्थाने आणि मर्यादा समजून घेण्यासारखा आहे.