ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्याला १५ सुवर्ण, ३० रौप्य आणि १९ कांस्यपदकांसह एकूण ६४ पदके मिळाली. सहभागी देशांमध्ये पदकांच्या कमाईत आपण पाचव्या क्रमांकावर गेलो. मागच्या राष्ट्कुल स्पर्धाच्या तुलनेत ही घसरलेली पदकसंख्या काय सांगते?
भारतीय राजकारणात बदलाचे वारे घोंघावले; पण क्रीडा क्षेत्रात हे बदलाचे वारे कधी घोंघावणार, हे कुणीही सांगू शकत नाही. पूर्वीची भारतीय क्रीडा क्षेत्रातील उदासीनता आजही कायम आहे, हे राष्ट्रकुल स्पर्धेतून दिसून आले. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी अपुरा सराव, केंद्र सरकारकडून सरावासाठी मिळालेला अपुरा निधी आणि गेल्या वेळेच्या तुलनेत पदकांची घटलेली संख्या, यावरून आपण खेळांच्या बाबतीत किती गंभीर आहोत, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. भारताने ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत १५ सुवर्ण, ३० रौप्य आणि १९ कांस्यपदकांसह एकूण ६४ पदके पटकावत सहभागी देशांमध्ये पाचवे स्थान पटकावले. पण चार वर्षांपूर्वी मायदेशात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने १०१ पदकांसह दुसऱ्या स्थानावर मजल मारली होती. त्यामुळे या वेळी २१६ जणांचा चमू पाठवूनही फक्त कुस्ती, वेटलिफ्टिंग आणि नेमबाजी या क्रीडा प्रकारांतच भारताला चमक दाखवता आली.
ऑलिम्पिकमध्ये चीन, रशिया आणि अमेरिकेसारख्या देशांचे वर्चस्व असते; पण राष्ट्रकुल किंवा आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंना पदक मिळवण्याची सुवर्णसंधी असते. राष्ट्रकुल स्पर्धा ही आशियाई आणि आगामी ऑलिम्पिकसाठी तयारी करण्याची, आत्मविश्वास वाढवण्याची तसेच पदकांची लयलूट करण्याची नामी संधी. या वेळी राष्ट्रकुल स्पर्धेकडे भारताने फारसे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळेच भारताची पदकांची संख्या घटली, असे दिसून येते. तिरंदाजी आणि टेनिस या हमखास पदक मिळवून देणाऱ्या तसेच कुस्तीतील ग्रीको-रोमन या क्रीडा प्रकारांचा ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश नव्हता. त्यातच भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवाल हिने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे भारताच्या पदकतालिकेवर त्याचा स्पष्ट परिणाम दिसून येत होता. कुस्ती आणि नेमबाजी या प्रकारांतही भारताला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. वेटलिफ्टिंगमध्ये भारताने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली.
भारतासाठी हमखास पदक मिळवून देणारा क्रीडा प्रकार म्हणजे नेमबाजी. भारताला ऑलिम्पिकमध्ये एकमेव सुवर्णपदक मिळवून दिले ते नेमबाजी या खेळानेच. आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय नेमबाजांकडून नेहमीच पदकांची अपेक्षा बाळगली जाते. राष्ट्रकुल स्पर्धेत या वेळीही नेमबाजांनी निराशा केली नाही. पुरुषांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात जितू राय याने भारताला नेमबाजीत सुवर्णपदक मिळवून दिले. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या जितूचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले. श्रेयसी सिंग आणि राही सरनोबत यांनीही भारताच्या खात्यात सुवर्णपदकांची भर घातली. मुंबईची नेमबाज अयोनिका पॉल हिला १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिचे हे दुसरे आंतरराष्ट्रीय पदक ठरले. ऑलिम्पिकमध्ये एकमेव सुवर्णपदक मिळवणाऱ्या अभिनव बिंद्राने सुवर्णपदकासह राष्ट्रकुल स्पर्धेतील आपल्या कामगिरीचा शेवट केला. मलायका गोयल हिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक मिळवत भारताची नेमबाजीतील युवा पिढीही सक्षम असल्याचे दाखवून दिले. गेल्या वेळी सुवर्णपदकांची लयलूट करून स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या गगन नारंगला मात्र सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. नारंगने या वेळी निराशा केली असली तरी रौप्यपदकासह तो मायदेशी परतला.
२०१२ लंडन ऑलिम्पिकनंतर भारताने पुन्हा एकदा कुस्तीत चांगली कामगिरी करून या क्रीडा प्रकारात ‘अच्छे दिन’ आल्याचे दाखवून दिले. अमित कुमारने ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावल्यानंतर योगेश्वर दत्त आणि सुशील कुमार या अनुभवी कुस्तीपटूंनी पहिल्या क्रमांकावर मजल मारली. बजरंग कुमार, सत्यवर्त कडियान आणि राजीव तोमर यांनी रौप्यपदकाला गवसणी घातली. पवन कुमार याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महिलांमध्ये विनेश फोगट आणि बबिता कुमारी यांनी सुवर्णपदकावर मोहोर उमटवत ‘हम किसी से कम नहीं’ हे दाखवून दिले. ललिता, साक्षी मलिक आणि गीतिका जखार यांनी रौप्यपदक, तर नवज्योत कौर हिने कांस्यपदक पटकावले.
वेटलिफ्टिंगमध्ये भारताने सुरेख कामगिरी करत सर्वाची मने जिंकली. के. संजिता, मीराबाई चानू यांनी ४८ किलो वजनी गटात अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावले. गेल्या वेळी रौप्यपदकावर समाधान मानलेल्या सुखेन डे याने या वेळी अखेर सुवर्णपदकाला गवसणी घातली. सतीश शिवलिंगम याने पदार्पणाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत थेट सुवर्णपदकाची कमाई करत नवा इतिहास घडवला. पूनम यादव आणि संतोषी मत्सा यांनी कांस्यपदकावर नाव कोरले. ज्युदोमध्ये नवज्योत चाना आणि सुशीला लिकमाबाम यांनी रौप्य, तर कल्पना थौडाम हिने कांस्यपदक मिळवले.
भारतीय हॉकी संघाची घसरण सुरू असताना राष्ट्रकुल स्पर्धेत मात्र भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. गेल्या वेळेप्रमाणे या वेळीही भारताला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. ऑलिम्पिक आणि सुवर्णपदक विजेत्या ऑस्ट्रेलियाचा पाडाव करणे या वेळीही भारताला जमले नाही. बॉक्सर्सनी या वेळी मात्र सपेशल निराशा केली. तब्बल चार बॉक्सर्सनी अंतिम फेरीत धडक मारली होती. पण या चार जणांपैकी एकालाही सुवर्णपदकावर मोहोर उमटवता आली नाही. विजेंदर सिंगसह मनोज कुमार, देवेंद्र सिंग आणि एल. सरिता देवी यांना रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. पिंकी राणी हिने कांस्यपदक प्राप्त केले.
सायना नेहवालच्या अनुपस्थितीत भारताने बॅडमिंटनमध्येही सुरेख कामगिरी केली. पारुपल्ली कश्यपने भारताला १९८२नंतर प्रथमच पुरुषांमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. पी. व्ही. सिंधूला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला तरी तिने कांस्यपदकावर मोहोर उमटवली. ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांना महिला दुहेरीचे जेतेपद राखण्यात अपयश आले. अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागल्यामुळे त्यांना रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. दीपिका पल्लिकल आणि जोश्ना चिनप्पा यांनी स्क्वॉशमध्ये मिळवलेले सुवर्णपदक ही भारताच्या दृष्टीने सर्वात आशादायी बाब ठरली. राष्ट्रकुल स्पर्धेत या वेळी पहिल्यांदाच स्क्वॉश या क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला होता. दीपिका-जोश्ना जोडीने महिलांच्या दुहेरीत पहिलेवहिले सुवर्णपदक मिळवत नवा अध्याय रचला. गेल्या वेळी भारताने ३८ सुवर्णपदकांसह एकूण १०१ पदके मिळवत ऑस्ट्रेलियापाठोपाठ दुसरे स्थान पटकावले होते; पण या वेळी इंग्लंडने १९८६नंतर प्रथमच पहिल्या क्रमांकावर मजल मारण्याची किमया साधली. भारताला मात्र पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियाने दुसरे, कॅनडाने तिसरे तर यजमान स्कॉटलंडने चौथे स्थान प्राप्त केले.
२०१० राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने चांगली कामगिरी केल्यामुळे भारताची २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कामगिरी सुधारली होती. सहा ऑलिम्पिक पदके, ही भारताची लंडन ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली होता. राष्ट्रकुल स्पर्धेत या वेळी भारताची पदकांची संख्या रोडावली आहे. त्याचा परिणाम २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे. लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर असणारा भारत देश क्रीडा क्षेत्रात कधी चमकणार, हा सर्वानाच पडलेला प्रश्न आहे. २०१६ रिओ ऑलिम्पिक आणि २०२० ऑलिम्पिकसाठी प्रदीर्घकालीन योजना राबवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सरकारकडून खेळाडूंना भरघोस निधी, सरावासाठी आधुनिक सोयीसुविधा आणि अन्य सर्व काही गोष्टी पुरवण्याची गरज आहे. अन्यथा ‘ये रे माझ्या मागल्या’ ही परिस्थिती यापुढेही कायम राहील.