आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दर्जा काय आहे हे पाहण्यासाठी भारतीय खेळाडूंसाठी ग्लासगो येथील यंदाची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ही सोनेरी संधी मानली जात आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेच्या उंचीपर्यंत भारतीय खेळाडू सहसा पोहोचू शकत नाहीत. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दर्जा काय आहे हे पाहण्यासाठी भारतीय खेळाडूंसाठी दक्षिण आशियाई स्पर्धा, आशियाई स्पर्धा व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आदी स्पर्धा महत्त्वाच्या असतात. ग्लासगो येथील यंदाची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ही भारतीय खेळाडूंसाठी आपले कौशल्य दाखविण्यासाठी सोनेरी संधी मानली जात आहे. विशेषत: आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा व २०१६ मध्ये रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धासाठी ही स्पर्धा रंगीत तालीम असणार आहे.
जगातील अनेक देशांमध्ये ब्रिटिशांची सत्ता होती. या देशांमधील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी, तसेच ब्रिटिशांच्या संस्कृतीचा अधिकाधिक लोकांपर्यंत प्रसार व्हावा यासाठी ब्रिटिश एम्पायर क्रीडा स्पर्धा आयोजित केली जावी, अशी संकल्पना प्रथम १८९१ मध्ये जॉन अ‍ॅश्ले कूपर यांनी मांडली. हीच संकल्पना आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धाचे जनक बॅरन डी कुबर्टीन यांच्यासाठीही ऑलिम्पिक चळवळ पुन्हा सुरू करण्यासाठी प्रेरणादायक ठरली. १९११ मध्ये लंडन येथील क्रिस्टल पॅलेस येथे फेस्टिव्हल ऑफ एम्पायर आयोजित करण्यात आला. पाचवे किंग जॉर्ज हे सिंहासनावर विराजमान झाल्याच्या गौरवार्थ हा उत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये बॉक्सिंग, कुस्ती, जलतरण, अ‍ॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, दक्षिण आफ्रिका व इंग्लंड या देशांमधील खेळाडूंनी त्यामध्ये सहभाग घेतला.
या उत्सवाच्या यशस्वी संयोजनामुळे ब्रिटिश एम्पायर क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याच्या संकल्पनेस अधिकच जोर धरला गेला. कॅनडात १९२८ मध्ये ही स्पर्धा आयोजित केली जावी, अशी विनंती करण्यात आली. मात्र ही स्पर्धा सुरू होण्यासाठी १९३० पर्यंत वाट पाहावी लागली. त्यामध्ये अकरा देशांनी भाग घेतला. दुसऱ्या महायुद्धापर्यंत दर चार वर्षांनी या स्पर्धाचे आयोजन केले गेले. १९४२ व १९४६ मध्ये दुसऱ्या महायुद्धामुळे या स्पर्धामध्ये खंड पडला. १९५० मध्ये पुन्हा ही स्पर्धा सुरू झाली. १९५४ मध्ये या स्पर्धाचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असे नामकरण करण्यात आले. राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या स्थापनेमुळे राष्ट्रकुलातील देशांमधील क्रीडा व सांस्कृतिक देवाणघेवाण अधिकच वाढली गेली. १९५८ मध्ये झालेल्या स्पर्धेत तीस देशांमधील एक हजारहून अधिक खेळाडूंनी भाग घेतला. या स्पर्धेस मिळालेल्या या प्रतिसादामुळे संयोजकांचा उत्साह अधिकच वाढला. १९७८ मध्ये एडमंटन येथे झालेल्या स्पर्धेत पंधराशे खेळाडूंनी भाग घेतला होता. न्यूझीलंडने वर्णद्वेषी आफ्रिकेबरोबर क्रीडा संबंध ठेवल्याच्या निषेधार्थ नायजेरियाने १९७८ च्या स्पर्धेवर बहिष्कारही घातला होता. १९८६ ची स्पर्धा संयोजनापेक्षाही अनेक देशांच्या बहिष्कारामुळे गाजली. १९८५ मध्ये इंग्लंडने आफ्रिकेबरोबर विविध क्रीडा स्पर्धाद्वारे संबंध सुरू केले होते. हे नाते तोडावे, अशी मागणी अनेक देशांनी इंग्लंडच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्याकडे केली. मात्र त्यांनी ही मागणी धुडकावून लावली. त्यामुळे १९८६ च्या राष्ट्रकुल स्पर्धेवर ३२ आफ्रिकन व कॅरेबियन देशांनी बहिष्कार घातला. १९९८ मध्ये कुआलालंपूर (मलेशिया) येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी क्रीडा प्रकारांची संख्या दहावरून पंधरा करण्यात आली. सांघिक क्रीडा प्रकारांचाही त्यामध्ये समावेश करण्यात आला. त्या स्पर्धेत सत्तर देशांमधील तीन हजार ५०० पेक्षाही अधिक खेळाडूंनी भाग घेतला. मेलबर्न येथे २००६ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन केले गेले. तेथे चार हजारांपेक्षा अधिक खेळाडूंनी भाग घेत या स्पर्धेवरील आपले प्रेम व्यक्त केले.
नवी दिल्ली येथे २०१० मध्ये आयोजित करण्यात आलेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सर्वार्थाने गाजली. यामध्ये २१ क्रीडा प्रकारांचा समावेश होता. ७१ देशांमधील सहा हजारांपेक्षा जास्त खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला. ही स्पर्धा संयोजनात झालेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे अधिकच गाजली गेली. स्पर्धेनिमित्त तयार करण्यात आलेल्या क्रीडा सुविधा तसेच दिल्ली शहराचे आधुनिकीकरण यासाठी साठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाले. ही स्पर्धा खूपच भव्यदिव्य स्वरूपात झाली असली तरी ही स्पर्धा खूपच महागडी होती, अशीही टीका मोठय़ा प्रमाणात झाली. एक मात्र नक्की की भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी ही स्पर्धा चैतन्यमय व प्रेरणादायक ठरली.
आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक पाच वेळा या स्पर्धाचे आयोजन केले आहे. कॅनडाने चार वेळा तर स्कॉटलंड व न्यूझीलंडने तीन वेळा या स्पर्धेचे आयोजन केले आहे. इंग्लंडने दोन वेळा ही स्पर्धा घेतली. मलेशिया, भारत, जमेका, वेल्स यांनी प्रत्येकी एकदा संयोजनपद भूषविले. ऑकलंड (१९५० व १९९०) व एडिनबरो (१९७० व १९८६ ) या शहरांनी प्रत्येकी दोन वेळा ही स्पर्धा आयोजित केली. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत झालेल्या स्पर्धामध्ये वर्चस्व गाजविले आहे. त्यांनी ८०३ सुवर्ण, ६७३ रौप्य व ६०४ कांस्य अशी एकूण दोन हजार ८० पदकांची कमाई केली आहे. इंग्लंडने त्याखालोखाल पदके मिळविली आहेत. त्यांनी ६१२ सुवर्ण, ६१४ रौप्य व ६१२ कांस्यपदके जिंकली आहेत. कॅनडाचा तिसरा क्रमांक आहे. त्यांना ४३६ सुवर्ण, ४५९ रौप्य व ४९३ कांस्य अशी एकूण १३८८ पदके मिळाली आहेत. भारताने चौथे स्थान घेताना १४१ सुवर्ण, १२३ रौप्य व १०८ कांस्य अशी एकूण ३७२ पदके मिळविली आहेत. त्यापैकी १०१ पदकांची कमाई त्यांनी घरच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत केली होती. आतापर्यंत भारताने मिळविलेल्या ३७२ पदकांमध्ये कुस्तीगिरांचा मोठा वाटा आहे. भारतीय मल्लांनी आतापर्यंत ३६ सुवर्ण, २८ रौप्य व २० कांस्य अशी एकूण ८४ पदके जिंकली आहेत. अ‍ॅथलेटिक्स व जलतरण हे दोन्ही क्रीडाप्रकार पदके मिळविण्यासाठी हुकमी क्रीडाप्रकार मानले जात असले तरी भारतीय खेळाडूंना त्यामध्ये अपेक्षेइतकी नेत्रदीपक कामगिरी करता आलेली नाही. जलतरणात ऑस्ट्रेलिया, कॅनडा व इंग्लंडच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजविले आहे. जमैका तसेच आफ्रिकेच्या खेळाडूंनी अ‍ॅथलेटिक्समध्ये पदकांची लयलूट केली आहे. भारताने आतापर्यंत अ‍ॅथलेटिक्समध्ये केवळ तीन सुवर्ण, आठ रौप्य व ११ कांस्य अशी एकूण २२ पदकांची कमाई केली आहे. भारतास पहिले सुवर्णपदक मिल्खा सिंग यांना १९५८ मध्ये कार्डिफ (वेल्स) येथे झालेल्या स्पर्धेत ४४० यार्ड्समध्ये सुवर्णपदक मिळाले होते. पुरुष गटात अ‍ॅथलेटिक्समध्ये भारतास मिळालेले हे एकमेव सुवर्णपदक आहे. भारतास त्यानंतर सुवर्णपदकासाठी ५२ वर्षे वाट पाहावी लागली. नवी दिल्ली येथे कृष्णा पुनिया हिने महिलांच्या थाळीफेकीत सोनेरी कामगिरी केली. याच स्पर्धेत भारतीय महिलांनी ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीतही सोनेरी यश संपादन केले.
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व कॅनडा यांच्या तुलनेत भारतीय खेळाडू खूपच मागे आहेत. ही स्पर्धा वर्चस्व गाजविण्यासाठी हुकमी संधी असते. कारण अनेक अव्वल दर्जाचे खेळाडू विविध कारणांस्तव या स्पर्धेकडे पाठ फिरवितात. विशेषत: अ‍ॅथलेटिक्स व जलतरण या क्रीडा प्रकारांत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, कॅनडा, जमैका आदी देश अव्वल दर्जाच्या खेळाडूंऐवजी युवा खेळाडूंना किंवा दुसऱ्या फळीतील खेळाडूंना पाठवितात. आपल्याकडे मात्र विरोधाभास दिसून येतो. आपण बुजुर्ग खेळाडूंवरच भिस्त ठेवतो. तरीही भारताची कामगिरी विशिष्ट मर्यादेपर्यंतच राहिली आहे. आशियाई क्रीडा व ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धासाठी भक्कम पायाभरणी करण्याच्या दृष्टीने यंदाची स्पर्धा भारतासाठी उत्तम संधी आहे. त्याचा फायदा ते घेतील, अशी आशा आहे.

Story img Loader