इतके दिवस आपलं बोट धरून चालणारं, आपल्यावर अवलंबून राहणारं आपलं कोकरू, तुमचा हात सोडून उघडय़ा जगात वावरायला बघतं, आपल्या नजरेनं जग पाहू लागतं, तेव्हा पालकांनी एखाद्या बंदरासारखं स्थिरचित्त असायला हवं.

बालवयीन मुलांच्या शिबिरातून वावरताना सर्वच पालक स्वत:तील प्रेमाच्या भावनेला शिस्त लावू लागले. अनेक बाबतीत त्यांनी स्वत:च्या वर्तनात, विचारसरणीत जाणीवपूर्वक बदल केले तर त्यांच्यातील इतर काही चांगले बदल त्यांच्या नकळतच त्यांच्यात रुजत गेले. त्यांची मुलं खरोखरच एका निवांत वातावरणात वाढू लागली.
ही मुलं किशोरवयात आल्यावर मात्र हे चित्र अधूनमधून विस्कटताना पालकांना दिसू लागलं. मुलांबद्दल पुन्हा एकदा पालक वारंवार काळजीत पडू लागले. मला वेळीअवेळी फोन करू लागले. माझ्यापुढे मुलांच्या बेपर्वा वर्तनाचा पाढा वाचू लागले. एका पालकसभेत आम्ही लहान असताना घरातली सगळी मुलं मिळून परवचा म्हणत असू, तसेच हे पालक मुलांच्या चुकीचे पाढे अगदी एकसुरात म्हणताहेत, असं मला वाटलं आणि मला एकदम हसूच फुटलं, पण मी ते आवरलं आणि पालकांना म्हटलं, ‘‘मुलं वयात येऊ लागताच आता तुम्हीपण अगदी पोरवयाचे झाल्यासारखे वागू लागला आहात. एखादं लहान मूल जसं परक्या माणसाला पाहून बावरतं, बिचकतं आणि आईला आणिकच बिलगतं, डोळे मिटून घेतं तसेच वागताहात तुम्ही आजकाल.’’
त्यांच्यापुढे एवढे गहन प्रश्न असतानाही मी त्याची दखल अशी शांतपणे तटस्थ राहून घेतलेली पाहिल्यावर ते आणिकच बिथरले. त्यांच्यापैकी एक बाबा चिडून म्हणाले, ‘‘आजी, आजही तुम्ही मुलाच्याच बाजूच्या? अहो, ती एवढी आत्ममग्न, बेपर्वा वागताहेत, हे चांगलं आहे का?’’
मी म्हटलं, ‘‘अरे, शांत हो, अजून मी काही बोलले तरी का?’’
तो बाबा म्हणाला, ‘‘बोलला नाहीत, तरी तुम्हाला त्याचंच खरे वाटतंय नं?’’ मी म्हटलं, ‘‘अरे, माझ्या दृष्टीने ती मुलंही पोरंच आणि तुम्हीपण पोरंच. दुसरं माणूस मनाविरुद्ध वागताच लगेच नाराज होणारी, त्याच्यावर हरघडी रुसणारी! मला तुम्ही सारी सारखीच. तुमची काळजी रास्त आहे आणि ती मला नीट समजली आहे. मुलं किशोरवयीन आहेत. त्यांच्यापुढचं जग अफाट दिसत असलं तरी त्यांना आज ते धूसर दिसत असतं. त्या अफाटपणात एकीकडे त्यांना अमर्याद स्वातंत्र्य जाणवत असतं. त्याचबरोबर त्या धूसरपणामुळं निर्णय घ्यायची वेळ येत तेव्हा ती कावरीबावरी होतात, पण आव मात्र शूरवीराचा आणतात. आपण मोठे झालो, एकटे कुठेही जाऊ शकतो; आपण आणि आपले दोस्त याबाबतीत समर्थ आहोत, अशी खात्री त्यांना वाटत असते. म्हणूनच आठवी, नववीची परीक्षा संपताच त्यांची दोस्तांसोबत खंडाळा- लोणावळ्याला शनिवार- रविवारी जायची तयारी सुरू होते. त्यांना तुम्ही परवानगी नाकारलीत, की ती आक्रस्ताळेपणा करू लागतात, तुमच्यावर नाराज होतात, तुम्हाला नावं ठेवतात. त्या क्षणीचं वास्तव काय असतं ते सांगता मला?’’
‘‘आजी, आम्ही दोघंही एकमेकांवर चिडलेले असतो.’’ मी म्हटलं, ‘‘चुकलं. उत्तर चुकलं. तुम्ही दोघंही परस्परांचं हे अनोळखी रूप पाहून बावरलेले, बिचकलेले असता. तुम्हाला समोर तुमचं एरवीचं तुमच्या कुशीत विसावणारं गोजिरवाणं लेकरू पाहायची सवय झालेली आहे. आजवर ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ असा फंडा असायचा! तेव्हा या मुलांना खूश ठेवणं सोपं होतं. आज ती स्वत:च्या नजरेनं जगाकडे पाहू लागली आहेत. जगाचा अर्थ लावण्यात ती मग्न आहेत. त्या जगात तुम्हीही आता आहात. त्याचं स्वत:चं जग मात्र आता पार वेगळं झालंय. तेव्हा हे त्याचं ‘स्व’तंत्रपण आहे, हे ओळखा. त्याचा आदरपूर्वक स्वीकार करा. त्यांना जग जसं दिसतंय, तसं पाहू द्या. त्यांना अंदाज घेऊ द्या. त्यांच्यावर रागावलात, तर ती तुमच्याशी बोलायची नाहीत. त्याचं गुपित ती लपवू लागतील, तुम्हाला दुरावतील.’’
‘‘म्हणजे मग आम्ही त्यांची अशी मनमानी खपवून घ्यायची का?’’
‘‘नाही. मुळीच नाही. इतकं प्रेमभरलं नातं असताना समोरची व्यक्ती मनमानी करेल का?’’ मी विचारलं. त्यावर रागानं उसळून एक आई म्हणाली, ‘‘माझा मुलगा आताच गाडी चालवायला मागतोय. द्यायची का गाडी? त्याच्या सुरक्षिततेची काळजी आम्हीच घ्यायची आहे नं?’’
मी म्हटलं, ‘‘तू अशी नाराजी दाखवणं मला मान्य आहे, पण मी तुझी बाजू घेत नाहीसं दिसताच तुझा स्वर जणू म्हणू लागलाय, ‘आजी, माझं मूल आहे. मला काळजी वाटते. तुम्हाला काय जातं सांगायला?’ मला तुमचीही काळजी असते आणि मुलांचीही काळजी असते.’’
‘‘सॉरी आजी, तसं नव्हतं म्हणायचं मला.’’
मी म्हटलं, ‘‘बघ, इथं तू एकटीच रागावली आहेस. मी शांत आहे. तरीही बावरून गेलेल्या अवस्थेत तुझा तोल सुटला नं? आता मी जर रागावले असते, तुझी चूक तुला रागं भरत दाखवली असती, तर तू काय केलं असतंस?’’
‘‘नाही आजी. मी चुकले. तुम्ही रागावलात तर ते मला सोसायचं नाही. मला रडूच येईल.’’ हे सांगताना तिचा सूर खरोखरच रडवेला झाला. मी म्हणाले, ‘‘बघा. मला दुखवायचं तुम्हाला सोसत नाही, पण तुमच्या स्वत:च्या अपेक्षा मी पुऱ्या करणार नाहीसं वाटताच तुम्ही नकळत मला दुखवलंत नं? त्यानं काय झालं? आपल्यातलं प्रेम, आदर संपला का? तुमचा नकार मुलांना असाच दुखावतो. त्या अपेक्षाभंगानं ती रुसतात. आपले दोस्त काय म्हणतील या कल्पनेनं ती गर्भगळीत होतात आणि मग त्यांचे दोषारोप सुरू होतात. त्यानं तुम्हीही चिडीला येता.’’
‘‘हो आजी.’’ दोघंतिघं एका सुरात म्हणाले.
सारी थोडी शांत झाल्यावर मी त्यांना समजावू लागले. मी त्यांना सांगितलं, ‘‘तुमची काळजी, चिंता अगदी न्याय्य, सकारण आहे, पण या भावना मुलांवरच्या ज्या प्रेमापोटी उद्भवताहेत, ते प्रेम त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं नं? किशोरवयात प्रेम, भीती, राग, करुणा, असूया अशा सर्व बऱ्यावाईट भावना सतत उसळून व्यक्त होत राहातात. हे वेडं वय असतं, पण त्या वयाआड तुम्ही प्रेमानं, आदरानं वाढवलेलं तुमचं शहाणं लेकरू शाबूत आहे, त्याला आपण सारे मिळून सुखरूप ठेवले पाहिजे नं? हीच जोखीम तुम्हाला काळजीत टाकते आहे. त्यांच्या रागाचा, आक्रस्ताळेपणाचा स्वीकार प्रेमानं करा. मला काही विचारू नकोस म्हणत त्यांना दूर लोटू नका. तुम्ही शांत राहा.’’
‘‘का म्हणून?’’
‘‘आईबाबा आहात म्हणून? अरे, आईबाबा होणं सोपं नसतंच कधी? आपल्या बाळाला छोटासा काटा रुतला, तरी त्याचा नायटा होईल की काय या भीतीनं व्याकूळतो जीव आपला. खरं नं? या किशोरवयीन मुलांचे आईबाबा होताना तुमच्यातील संयमाची जशी कसोटी लागत राहाणार आहे नं, तशीच तुमच्यातील संवाद कायम आणि प्रेमपूर्ण राखण्याचीही कसोटी लागणार आहे. आज अवतीभवती अंध, अपंग मुलांचे पालक किती तरी आहेत. किशोरवयात आपलं बोट सतत सोडू पाहून खुल्या जगात एकटय़ानं वावरू पाहणाऱ्या त्यांच्या किशोरवयीन मुलांनाही ते कसे सांभाळताहेत ते जरा पाहा. त्यांना तर बऱ्याच अंशी एकतर्फी प्रेम करावं लागतंय. अवतीभवती खरोखरच अपमार्गाला लागलेली, बहकलेली, अगदी वाया गेलेलीही किशोरवयीन कोवळी मुलं पाहात आहात नं तुम्ही? आता या तुलनेत आपली ही मुलं कशी दिसताहेत ते पाहा बरं जरा एकदा स्वच्छ नजरेनं?
आजघडीला तुम्ही कसं वागणं हितकारक आहे सांगू? तुम्ही एखाद्या बंदरासारखं स्थिरचित्त असायला हवं. समोरचा उसळलेला दर्या बघून बंदराला आपल्या मुलांची काळजी वाटणं साहजिकच असतं, पण तरीही नाव दर्याकडे झेपावणारच नं? आपली ही लेकरं उद्याच्या पहाटेकडे नजर लावून आशेनं, उत्साहानं आपापलं कर्तृत्व सिद्ध करू पाहाणार आहेत आता. कधी ती हरणार, तर कधी ती जिंकणार. पुढे पुढे नवनवीन परीक्षांना ती सामोरी जाणार. त्या वेळी त्या परीक्षा, परीक्षक कार्यक्षम असोत वा नसोत, मुलांना परीक्षा द्याव्याच लागणार आहेत. आजच्या बेपर्वा, उद्याचं भान नसलेल्या शिक्षण पद्धतीत ही लेकरं अक्षरश: होरपळून जाताहेत. त्यांच्या मनाच्या चिंध्याचिंध्या करणाऱ्या संवेदनशून्य शिक्षकांशी त्यांना हरघडी जुळवून घ्यावं लागतंय, हे वास्तव तुम्ही कधी विसरू नका. आज त्यांना अनुभवाला न येणारं वत्सल गुरुत्व त्यांच्या शिक्षकांपाशी अभावानंच आहे, हे मान्य करा. शिक्षकांतर्फे खोटी रदबदली करू नका. आजच्या स्पर्धात्मक वातावरणाचा बागुलबुवा दाखवून त्यांना विचलित करू नका. मुख्य म्हणजे शालेय किंवा महाविद्यालयीन यश ही अगदी फसवी मोजपट्टी आहे, हे नीट ध्यानात घ्या तुम्ही.’’
‘‘इथं एक महत्त्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे. स्वत:चं व्यक्तिमत्त्व साकारायच्या प्रयत्नात किशोरवयीन मुलं असतात. आता ती पूर्वीसारखी तुमच्यासमवेत कलाकौशल्य करण्यात रमणार नाहीत. तुमचे भाबडे आदर्श ती स्वीकारणार नाहीत. या वयात त्यांना हवं तसं नटू द्या. कधी ती केस विस्कटण्यात तासन् तास घालवतील, तर कधी ओंगळबोंगळ कपडे घालून ती मिरवतील. या बदलांना तुम्ही मन:पूर्वक स्वीकारा. त्यांची भाषा, हावभाव सारं, सारं तुम्हाला खटकेल, पण त्यावर अकारण शेरेबाजी करू नका.’’
मला मध्येच थांबवत एक बाबा म्हणाला, ‘‘अशानं ती बिघडली, तर काय करायचं मग?’’
‘‘नाही, घाबरू नका. त्यांचं हे असं वागणं हा एक वेगळ्या अंगानं घेतलेला आत्मशोध असतो. एकीकडे नट-नटय़ांच्या पेहेरावाची, बोलण्याचालण्याची नक्कल करता करता एकीकडे ही मुलं स्वत:लाच त्यातून जोखत असतात.
आणखी एक गोष्ट ही मुलं नकळत करत राहतात. आईबाबांच्या मनाविरुद्ध वागून ती कधी कधी आपल्या त्यांच्यावरच्या प्रेमाची खात्री करून घेत असतात. यातून उद्भवणाऱ्या संघर्षांत तुम्ही शांत राहून संवाद तुटू न देणं खूप महत्त्वाचं असतं. वरवर बेफिकीर वाटणारी ही मुलं मनोमन आपलाच आधार सतत शोधत असतात. बाह्य़ जीवनातले ताण असह्य़ झाल्यानं तो राग सतत आईवर काढत राहाणारी मुलंही उपचारांसाठी जेव्हा मानसोपचारतज्ज्ञांकडे जातात तेव्हा, तुला इतका राग येतो तर चार दिवस आईला बाहेरगावी जाऊ दे का, असं त्यांनी विचारताच ही मुलं ठाम नकार देतात. त्यांना एखाद्या तान्ह्य़ा बाळाइतकीच आपल्या प्रेमाची आता गरज असते.’’
‘‘आजी, खूप बरं वाटलं हो हे ऐकून. कधी कधी आम्हीपण नाहक दुराग्रह करत राहातो, पण ते तेव्हा ध्यानातच येत नाही, पण जेव्हा ते ध्यानात येतं, तेव्हा आपलं लेकरू आपल्याला दुरावेल की काय ही भीती वाटत राहाते.’’ यावर मी त्या सर्वाना पुन्हा समजावलं. मी सांगितलं, ‘‘जवळच्या सर्व नातेसंबंधात भांडणं, वादावादी होतच असते. ती अटळ असते. म्हणून ती पोषक ठरते असं मात्र नाही. या वयाच्या मुलांना स्वत:ची सारी सुखंदु:खं नेहमी पराकोटीचीच आहेत असं वाटत असतं. ती रागावतात जशी पटकन, तशीच ती खुलतातही पटकन. आपल्यातील सच्चेपणा, कळकळ त्यांना उमगायला तो रागाचा, विसंवादाचा भर थोडा ओसरावा लागतो. एक मात्र पथ्य तुम्ही सर्वानी पाळलं पाहिजे. मतभेद नोंदवताना मुलांची निर्भर्त्सना, अवहेलना आपल्याकडून कधीही केली जाता कामा नये. रागाच्या भरात त्यांच्या पूर्वीच्या चुका पुन:पुन्हा उगाळणं, त्यांना लांबलचक उपदेशाचे डोस पाजणं आणि त्यांच्यातील कमतरता दाखवताना त्यांची इतरांशी तुलना करणं अशा गोष्टी मुलांना खूप दुखावतात. अशा वेळी आपल्या मनातलं मोलाचं असलेलं त्यांचं स्थान डळमळतं आहे की काय या भीतीनं ती घायाळ होतात. आपल्यापासून दूर जाऊन ती इतरत्र प्रेम शोधू लागतात.
हे किशोरवय हा एक छोटासा पण प्रचंड घडामोडींचा टप्पा असतो मुलांच्या वाढीतला. या टप्प्यावर ती स्वत:च्या शरीरातील नाना बदलांशी जुळवून घेत असतात. स्वत:च्या रूपाबाबत, पेहेरावाबाबत ती मनातून साशंक आणि गोंधळलेली असतात. एरवी रूपगर्विता म्हणून शाळा-कॉलेजात मिरवणारी मुलगीही स्वत:च्या कुरळ्या केसाचं किंवा अपऱ्या नाकाचं दु:ख करत असते. ती गोंधळलेली आहेत यावर विश्वास ठेवा. तुम्ही मात्र गोंधळून जाऊ नका.
त्यांना उमलू द्या. तुमच्या भीतीचं, काळज्याचं, सावट त्यांच्या उमलत्या वयात घातक ठरेल. ते त्यांच्यावर पडू देऊ नका. तुमच्या नाना अपेक्षांचं ओझं त्यांना आज पेलवणार नाही. त्यांना प्रेम द्या. स्वत:कडून अपेक्षा करायची, स्वत:ला शिस्त लावायची सवय आपण इथं त्यांना लावली आहे. ती सवय आता पाहा ही मुलं किती तऱ्हांनी तुम्हाला साकारून दाखवतील ती! ते उमलणं पाहून मग तुम्ही आनंदित व्हाल. मुलांची पाठ थोपटाल तेव्हा स्वत:ची पाठही अधूनमधून थोपटायची संधी तुम्हाला मिळेलच. ती मात्र थोपटायचं विसरू नका. शिवाय मी आहेच मुलांचे आणि तुमचेही लाड पुरवायला.’’

Story img Loader