पस्तीसेक र्वष झाली असतील त्या घटनेला. तीस मित्र-मैत्रिणींचा ग्रुप घेऊन वनट्री हिलमार्गे माथेरानला गेलो होतो. रात्री तीनच्या दरम्यान गाडी कर्जतला पोहोचली. ताबडतोब आम्ही चालायला सुरुवात केली. थांबत विश्रांती घेत अकरा तासांनंतर दुपारी दोन वाजता माथेरान स्टेशनपाशी आलो. सोबतचे डबे उघडून सगळ्यांनी उदराग्नी शांत केला. वर भरपूर पाणी ढोसलं आणि तास-दीड तासाने परतीच्या प्रवासाची तयारी सुरू झाली. काढलेले शूज पायात घालून मंडळी लेस बांधत असतानाच मी सूचना द्यायला लागलो. आता ‘अमन लॉज’ स्टेशनपर्यंत रेल्वे रुळाला समांतर चालत राहायचं, रेल्वे मार्गाची साथ अजिबात सोडायची नाही. पुढे दस्तुरीवरून मातीच्या रस्त्यानं चालत नेरळ गाठायचं. ‘थांबू नका, दमू नका साडेसहाची गाडी मिळाली तर आपण साडेआठ-नऊपर्यंत घरी पोहोचू.’ सगळ्यांनी सूचना ऐकली असेल असं समजून मी ऑर्डर सोडली, ‘चला निघा आता’. पाठीवर सॅक मारून निघालेल्यांबरोबर मीही चालायला लागलो. ‘उताराचा रस्ता आहे, वाट सरळ आहे, चुकण्याची शक्यता अजिबात नाही’ असा विचार करून मी माझा वेग वाढविला. तशी सगळीच मंडळी थट्टा-मस्करी करीत फर्लाग-दीड फर्लागाच्या टप्प्यात चालत होती. दोन-अडीच तासांत आम्ही नेरळ स्टेशनवर पोहोचलोसुद्धा! खाली आलेल्यांची मोजणी केली तर चार डोकी कमी असल्याचं लक्षात आलं. पुन्हा मोजणी केली, पण तीसपर्यंत आकडा येईना. मग खिशातील यादी काढून हजेरी घेतली तेव्हा दोन मुली आणि दोन मुलगे आले नसल्याचं निश्चित झालं. ‘हळू चालणारी’ म्हणून प्रसिद्ध असलेली ती चौघं ‘येतील अध्र्या तासात’ म्हणून आम्ही प्लॅटफॉर्मवरच्या मोकळ्या जागेत सॅक डोक्याखाली घेऊन पाय लांब केले. अर्धा तास सरला, तास उलटला, सात वाजले. प्लॅटफॉर्मवरचे दिवे लागले तरी चौघेजणं आली नाहीत म्हटल्यावर डोक्यात प्रश्नांची गरगर सुरू झाली. ‘जंगलात वाट चुकले का? कडय़ाकडे गेले नसतील ना? एखादं सरपटणारं जनावर पायात आलं नसेल ना..? की..’ जसजसा वेळ पुढे सरकत होता तशी छातीतील धडधड वाढत होती. काळोख इतका झाला होता की, माथेरानचा अख्खा डोंगर त्यात विरून गेला होता. ‘त्यांना शोधण्यासाठी मागे जायचं तर कुठवर जायचं?’ शेवटी ‘आणखी अर्धा तास वाट पाहावी असं ठरलं. थट्टा-मस्करी करणारे सगळेच आता मुके झाले होते. मुदतीचा अर्धा तास संपला. आता लीडर म्हणून मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार होता. मी बरोबरच्या दोघांना म्हणालो, ‘चला रे..’ बॅटऱ्या हाती घेऊन आम्ही माथेरानच्या रस्त्याला लागलो. एखादा किलोमीटर गेलो असू आणि चार आकृत्या समोरच्या काळोखातून पुढे येताना दिसल्या. आम्ही नावानं हाका मारल्या तेव्हा त्यांनी क्षीण ‘ओ’ दिला. माझ्या जीवात जीव आला. ‘काय रे कुठे थांबला होता?’ ते चौघे जवळ आली तेव्हा मी दमात घेतलं.‘थांबलो कुठे? चालतोच आहेत.. रेल्वे ट्रॅकवरून.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा