गेली तीन वर्षे महाराष्ट्रात डच चित्रकाराने काढलेले शिवरायांचे चित्र म्हणून प्रसृत केले जात असलेले चित्र प्रत्यक्षात आहे मात्र सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी चितारलेले. म्हाडाच्या मालकीच्या या चित्रावर मालकी हक्क मिळवण्याचा अश्लाघ्य प्रकारही एका तथाकथित शिवप्रेमीने केला आहे. काय आहे हे सगळं प्रकरण? थेट वासुदेव कामत यांच्याच शब्दांत..
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे, आजवर जे जे कलावंत या महाराष्ट्रात झाले त्यातील प्रत्येकाने आयुष्यात दोन देवतांची चित्रे आवडीने काढलेली आहेत. ही दैवते म्हणजे गणपती आणि शिवछत्रपती. शिवछत्रपतींविषयी लहानपणापासून आदर आणि आकर्षण होते. त्यांच्या चरित्राविषयीही तेवढीच आपुलकी होती. हे चरित्र प्रेरणादायी आहे. त्यामुळेच शिवछत्रपतींची अनेक चित्रे आजवर काढली.
आज माझ्या परिचयातील एक महत्त्वाचा परिचय हा पोट्र्रेट आर्टस्टि असा आहे. अनेकदा मी कलावंत म्हणून विचार करतो की, शिवकाळामध्ये मी प्रत्यक्षात असतो तर.. महाराजांचे प्रत्यक्ष सिटिंग करून चित्र काढताना किती अभिमान वाटला असता. हा असा विचार करून अनेकदा चित्रेही काढली. १९७४ साली महाराजांच्या राज्याभिषेकाला ३०० वर्षे पूर्ण झाली, त्या वर्षी तर मी राज्याभिषेकाची विविध वर्णने वाचून राज्याभिषेकाच्याच सोहळ्याची चार चित्रे काढली. त्यातील एकामध्ये राज्याभिषेक होत असताना, दुसऱ्या चित्रात राज्यारोहण, इतर मिरवणुकीची अशी चित्रे समाविष्ट होती. यांपैकी कोणतेही चित्र काढताना मी माझ्या आधी काढलेल्या कोणत्याही चित्रकाराच्या चित्राची कॉपी केली नाही. आजवर महत्त्वाची अशी एकूण ८ शिवचित्रे मी चितारली. यात एकाही चित्रात कोणाचीही कॉपी केलेली नाही. प्रत्येकात वेगळेपण आहे पण कॉपी नाही. आजवर अनेक ऐतिहासिक किंवा पौराणिक चित्रे काढली. ही सर्व चित्रे काढताना मी कोणाचीही कॉपी न करण्याचे माझे तत्त्व कायम पाळत आलो आहे. इतर कुणी तरी काढले तसेच चित्र आपण का काढावे, आपल्याला काही वेगळे जमत नाही का? असा विचार नेहमी मनात यायचा. आणि कॉपी करणे कटाक्षाने टाळले. आपण एवढी वर्षे कलावंत म्हणून जगूनही केवळ कॉपीच करत असू तर मग अशा वेळेस कलावंतातील सृजनशीलतेला फारसा अर्थ राहत नाही.
राज्यात सेना-भाजप युतीचे सरकार सत्तारूढ झाले, त्या वेळेस एक वेगळा योगायोग जुळून आला. म्हाडा इमारतीत शिवछत्रपतींचे एक चित्र लावण्याचा निर्णय युती शासनान घेतला. दिलीप (विश्वनाथ) नेरूरकर हे त्या वेळेस मुंबई म्हाडाचे सभापती होते तर मधुकर सरपोतदार म्हाडाचे अध्यक्ष होते. नेरूरकरांच्या विनंतीवरून सरपोतदार यांना भेटलो त्या वेळेस ते म्हणाले की, मंत्रालय आणि आपल्या म्हाडाच्या इमारतीमध्ये साम्य आहे. मंत्रालयात जी. ए. कांबळेंनी चितारलेले शिवरायांचे चित्र आहे. तसेच गडावरून महाराज उतरतानाचे उपळेकरांचेही चित्र आहे. तसे चित्र म्हाडामध्ये असावे. त्यावर मी त्यांना म्हणालो, दोन्ही चित्रे चांगली आहेत. पण तीच कॉपी करून इथे का लावायची? इतर कुणी तरी काढलेल्या चित्राची मी कॉपी करणार नाही. आपण वेगळे चित्र करू या. आजवर महाराजांची काढलेली सर्व चित्रे ही चित्रकारांनी एका बाजूंनी चितारलेली चित्रे आहेत. समोरच्या बाजूने काढलेले महाराजांचे चित्र माझ्या पाहण्यात नाही. त्यातही मेघडंबरीमध्ये महाराज सिंहासनावर बसले आहेत, अशी सारी चित्रे एकाच बाजूने चितारलेली आहेत. या पाश्र्वभूमीवर राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळेस महाराज सिंहासनाधिष्ठित असून मेघडंबरीमध्ये बसले आहेत आणि समोरून येणाऱ्यांचा मुजरा स्वीकारत आहेत त्या वेळेस त्यांच्या चेहऱ्यावर काय भाव असतील, ते आपण चितारावेत, असे माझे मत मी नेरूरकरांना सांगितले. त्यानंतर पुन्हा एकदा नेरुरकरांबरोबर एक मीटिंग झाली. वेगळं काही करणार असाल तर आधी स्केच करून दाखवा, असे मला सांगण्यात आले. मी तिथल्या तिथेच बसून एक स्केच केले. लोकांना ते नक्कीच आवडेल, असे मला त्याही वेळेस वाटले होते. त्यानंतर ते स्केचमध्ये मला रंगवून आणण्यास सांगण्यात आले. ऑर्डर लेटर मिळाल्यानंतर मी केलेले चित्र मेघडंबरीचे एक फायबर मॉडेल करून त्यात बसविले. तुम्हाला कुणाकडून अप्रूव्ह करून घ्यायचे असेल तर करून घ्या, असेही मी त्यांना म्हणालो.
दरम्यान, स्टेट बँकेत काम करणारे पद्माकर महाजन यांचा इतिहास व पुरातन बाबींवरचा दांडगा अभ्यास होता त्यांना मी गाठले. शिवाय विष्णू गंगाधार आगरकर या अभ्यासकांशीही संवाद साधून मी शिवाजी महाराजांविषयी आणि एकूणच त्या प्रसंगाविषयीची ऐतिहासिक माहिती जाणून घेतली होती. त्याशिवाय बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेले पुस्तक होतेच. या सर्वाच्या माहितीतून ज्या सामायिक बाबी दिसल्या-जाणवल्या त्यातून सारे बारकावे उभे केले. आम्ही जेजेमध्ये असताना खानविलकर यांनी मेघडंबरीचे काम केले होते, त्याचेही फोटो घेतले आणि प्रत्यक्ष समोरून महाराज दिसताहेत असे मेघडंबरीमध्ये बसलेले मॉडेल तयार केले.
या चित्राचे वैशिष्टय़ म्हणजे या चित्रामध्ये शिवाजी महाराज खुरमांडी घालून भारतीय बैठकीच्या पद्धतीने बसलेले दाखवले आहेत. मांडी घालून बसलेल्या महाराजांचे हे असे पहिलेच चित्र होते. शिवाजी महाराज भारतीय पद्धतीनेच बसत असतील, असा विचार त्या मागे होता. त्यावर शिवसेनेच्या नेत्यांपैकी काहींनी हे चित्र साहेब म्हणजेच शिवसेनाप्रमुख अप्रूव्ह करतील का, अशी शंकाही घेतली. ते मॉडेल घेऊन आम्ही शिवसेनाप्रमुखांकडे गेलो. त्या वेळेस सेना नेते सुभाष देसाई व नेरूरकरही माझ्यासोबत होते. आधी हे चित्र उद्धव ठाकरे यांना दाखविले तेव्हा ते म्हणाले, छत्रपतींची अशी बैठक असलेले चित्र मी पाहिलेले नाही. साहेबच काय ते फायनल करतील, हा त्यांचा विषय आहे.
चित्र पाहताच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एकदम खूश झाले आणि म्हणाले, ही खरी भारतीय बैठक! सर्व जण महाराजांना खुर्चीत बसवल्यासारखे दाखवतात. महाराज अस्सल भारतीय होते.. त्या चित्रामध्ये काही चांगल्या बारीकशा सुधारणाही बाळासाहेबांनी सुचविल्या. शिवाय त्यांच्या संग्रहामध्ये असलेले प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांचे चित्रही दाखविले. शिवसेनाप्रमुखांनी चित्राला मंजुरी दिली. त्यानंतर मी स्वत: त्याची मेघडंबरी तयार केली. पुन्हा एकदा काम पाहण्यासाठी सुभाष देसाई, मधुकर सरपोतदार घरी आले होते.. सर्व अंतिम झाले आणि मग १५ मार्च १९९७ रोजी मेघडंबरीमध्ये बसविलेल्या त्या चित्राचे अनावरण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याची सजावट प्रसिद्ध कलावंत रघुवीर तळाशिलकर यांनी केली होती. हे पूर्ण होत असतानाच म्हाडासोबत झालेल्या करारानुसार चित्रांचे कॉपीराईटस् मी म्हाडाकडे दिले होते. नंतर हे चित्र अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरले.
बनवेगिरीचे चित्र ‘सिंघम’मध्येही!
अलीकडे गाजलेला ‘सिंघम’ नावाचा चित्रपट पाहिल्यानंतर माझ्याच एका चित्रकार मित्रांनी फोन केला, त्यातही पोलीस ठाण्यात लावलेल्या चित्रांमध्ये माझ्याच चित्रातील शिवाजी कटकाऊट करून लावलेले दिसले! हे सारे प्रकार चित्रकारासाठी अतिशय वेदनादायी असतात, एवढेच मी सांगू शकतो!
त्यानंतर काही वर्षांनी विजय खिलारे नावाचे गृहस्थ माझ्याकडे आले. त्यांची एक संस्था असून या संस्थेमार्फत ते चित्र छापण्याची तयारी त्यांनी दाखवली. चित्र घरोघरी गेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. त्यावर मी त्यांना म्हणालो की, शिवाजी महाराजांचे चित्र घरोघरी जावे, यात काहीच वाद नाही. पण या चित्राचे कॉपीराईटस् मी म्हाडाकडे दिलेले आहेत. त्यावर मी त्यांना एवढेही म्हणालो की, महाराष्ट्रात एवढे चित्रकार आहेत तर मग तुम्हीच शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी दुसरे एखादे इतर चित्रकाराकडून का नाही काढून घेत? या प्रसंगानंतर मात्र त्या व्यक्तीशी माझी गाठभेट झालेली नाही.
त्यानंतर अलीकडेच ठाण्याला शिवगौरव नावाचा मोठा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र वाटण्यात आले. या कार्यक्रमामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचाही सत्कार हे चित्र देऊन करण्यात आला. त्या कार्यक्रमाची व्हिडीओ फितही माझ्याकडे संग्रहामध्ये आहे. म्हाडासाठी काढलेल्या त्या चित्राच्याच प्रती या कार्यक्रमामध्ये वाटण्यात आल्या होत्या. शिवाय धक्कादायक बाब म्हणजे हे चित्र हे डच चित्रकाराने काढलेले महाराजांचे प्रत्यक्ष चित्र आहे, असे सांगून त्याचे वाटप-विक्री करण्यात येत होती. प्रत्यक्षात डच चित्रकाराने काढलेले महाराजांचे चित्र हे एकाच बाजूचा चेहरा दिसणारे आहे. म्हणून तर आजवर कोणत्याही चित्रकाराने समोरून दिसणारे महाराजांचे चित्र काढलेले नाही. दुसरा एक बदल या चित्रामध्ये करण्यात आला होता तो म्हणजे यावर महाराजांची स्वाक्षरी आहे, असे भासविण्यासाठी मोडीमधील एक शब्द त्यावर टाकण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे हा मोडी शब्द ‘लेखनसीमा’ असा आहे. पण इथे मोडी येते कुणाला? अनेकांनी ती महाराजांची मोडीमधील स्वाक्षरीच आहे, असे समजून ते चित्र विकतही घेतले. त्यात माझ्या एका चित्रकार मित्राचाही समावेश होता. त्याला तर हे सारे पाहून धक्काच बसला होता. कारण हे डच चित्रकाराचे नाही तर माझे चित्र आहे, हे त्याला ठाऊक होते. कार्यक्रमाच्या उद्घोषणेतही वारंवार हाच डच चित्रकाराचा उल्लेख सुरू होता.
लोक तर केवळ शिवप्रेमापोटी चित्र विकत घेतात. लोकांची चूक काहीच नाही. पण हा चित्रकार आणि शिवप्रेमी या दोघांचाही त्या संस्थेने आणि संबंधितांनी केलेला विश्वासघातच होता. आता तर हेच चित्र कृष्णधवल करण्यात आले असून त्याला थोडा सेपिआ टोन देण्यात आला आहे. कारण जुनी चित्रे-फोटो अशा सेपिआ टोनमध्ये असतात. आणि आता तेच माझे चित्र कृष्णधवल रूपात डच चित्रकाराने काढलेले महाराजांचे चित्र म्हणून विक्रीही होते आहे. आणि व्हॉटस् अॅप, फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग माध्यमांतूनही फिरते आहे.
श्रीकांत महाजन या तज्ज्ञांनी हे चित्र माझे आणखी एक चित्रकार मित्र त्यांच्याकडे पाठवले. ते म्हणाले, चित्राचा विषय आहे. तर तुम्हीच ते पाहून हे डच चित्रकाराचे चित्र आहे का, ते सांगा. त्या चित्रकार मित्रालाही चित्र पाहून धक्का बसला. त्याने झाला प्रकार महाजन यांच्या लक्षात आणून दिला आणि सांगितले की, हे वासुदेव कामत यांचे चित्र आहे. त्यानंतर महाजन यांचा मला फोन आला आणि त्यांनीही झाल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. एवढेच नव्हे तर त्यानंतर शिवप्रेमींना ही फसवणूक लक्षात यावी, यासाठी एक लेखही लिहिला. या ढोंगीपणावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला.
दरम्यान, माझे दूरदर्शनशी संबंधित असलेले आणखी एक मित्र महेश गुजर यांच्याही हा प्रकार लक्षात आला. त्यांनी शिवगौरव या संस्थेने लावलेले कटआऊटस् पाहिले होते. हे चित्र माझे आहे, याची त्यांनाही कल्पना होती. याच शिवगौरवच्या कार्यक्रमाला गेलेल्या माझ्या चित्रकार मित्राने तिथे चित्राची प्रत विकत घेतली आणि तिथल्या कार्यकर्त्यांशी वादही घातला. हे चित्र डच चित्रकाराचे नाही तर कामत यांचे आहे, हे त्यांनी सांगितले. तर त्यावर कार्यकर्त्यांपैकी एकाने त्यांना सांगितले की, तुमच्या सरांनी रशियात जाऊन मूळ चित्र पाहून ते काढले असेल. त्यावर तो मित्र म्हणाला, आमचे सर कुठे कुठे गेले हे आम्हाला पक्के ठाऊक आहे. तुम्ही चित्रचोरी केली आहे. त्यानंतर खिलारे यांनी सारवासारव करणारा फोन केला, तेव्हा मी त्यांना सांगितले की, ‘माझे चित्र तुम्ही डच चित्रकाराचे चित्र म्हणून विकणे ही माझीच नव्हे तर शिवप्रेमींचीही घोर फसवणूक आणि विश्वासघात आहे.’ त्यावर ते म्हणाले की, ‘आम्ही चित्रविक्रीमध्ये नफा कमवत नाही.’ ‘पण तुम्ही माझे चित्र डच चित्रकाराचे म्हणून विकणे ही फसवणूकच आहे..’
सोशल मीडियामध्ये बनवेगिरीला आळा हवा
गेल्या वर्षी केदारनाथला मोठा प्रलय झाला त्या वेळेस इतर कुठल्या तरी देशात आलेल्या प्रलयाच्या क्लिप्स त्याला जोडून महाप्रलय दाखविण्यात आला. त्यानंतर बिहारमध्ये झालेल्या दंगलीच्या वेळेस इतर भावना भडकावणाऱ्या क्लिप्स बनावट तयार करून सोशल मीडियावरून प्रसारित करण्यात आल्या. आता शिवचित्रांच्या बाबतीतही असेच प्रकार केले जात आहेत. हे सारे थांबायला हवे. समाज दूषित करणारी ही प्रवृत्ती या सोशल मीडियाबरोबर वाढते आहे. या प्रकारांना आळा बसायला हवा!
शिवगौरवच्या त्या कार्यक्रमाला राज्य सरकारमधील मंत्री गणेश नाईकही उपस्थित होते. या चित्राच्या ज्या प्रतींचे वाटप करण्यात आले, त्यावर संजीव नाईक यांचे नाव चित्रावरच खालच्या बाजूस छापले आहे. त्यानंतर खिलारे यांना मी बजावले की, आता माझ्या घराची पायरीही चढू नका. त्यावर ते म्हणाले की, आमची चूक झाली. त्यावर मी पुन्हा त्यांना सांगितले की, महाराज आज असते तर त्यांनी तुम्हाला या अपराधासाठी काय शिक्षा केली असती त्याचा विचार करा.. हा कार्यक्रम राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळाने आयोजित केला होता. त्याचे प्रसारण नंतर झी वाहिनीवरही करण्यात आले. त्यातही स्पष्टपणे दिसते आहे की, चित्रांची विक्री करताना डच चित्रकाराने काढलेले चित्र असे म्हणून त्याचा उल्लेख वारंवार केला जात होता. त्याचे रेकॉर्डिगही मी ठेवले आहे.
या प्रकरणात आजवर कोणाही आयोजकांनी झाल्या प्रकाराबद्दल माझ्याकडे माफी मागितलेली नाही. गेल्याच आठवडय़ात सदानंद कदम या इतिहासाच्या अभ्यासकांचा फोन आला. त्यांनी माझ्या मित्राला चित्र पाठवले, खातरजमा करण्यासाठी त्यावर त्याने हे चित्र कामत सरांचे आहे, असे सांगितले. त्यानंतर त्यांचे माझे बोलणे झाले व त्यासंदर्भातील वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्धही झाले. चित्रकाराचा हक्क अशा प्रकारे डावलण्याचा आणि शिवप्रेमींच्या भावनांशी आणि पर्यायाने इतिहासाशी खेळण्याचा हा प्रकार अतिशय िनदनीय आहे. जी मेहनत घेऊन चित्रकार चित्र काढतो, त्यामागे त्याची अभ्यासपूर्ण तपश्चर्या असते. या अशा बनवेगिरीने चित्रकाराच्या तपश्चर्येला तडे जातात. अशाच प्रकारे लोकांच्या मनातील श्रद्धेचा गैरवापर करून मग प्रगत टेक्नॉलॉजीच्या आधारे त्या शिवप्रेमींच्या श्रद्धेचे अंधश्रद्धेमध्ये रूपांतर केले जाते. या प्रकरणी अनेकांनी मला पोलिसांकडे जाण्याचे, गुन्हा दाखल करण्याचे तर काहींनी थेट कोर्टात जाण्याचे सल्ले दिले. पण वर्षांनुवष्रे पोलीस आणि कोर्टाच्या वाऱ्या करण्याइतका वेळ चित्रकाराकडे नसतो. आपण सृजनात्मक कामात वेळ घालवावा, असेच कोणत्याही चित्रकाराला वाटते. तसेच ते मलाही वाटते आहे. फक्त अशा बनवेगिरीला लोकांनी खास करून शिवप्रेमींनी बळी पडू नये, एवढेच मनोमन वाटते, त्यासाठी हा लेखनप्रप्रंच.