१९९७ साली प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी ‘म्हाडा’साठी शिवाजी महाराजांचे तैलचित्र तयार केले आणि आज तेच चित्र डच चित्रकाराचे चित्र म्हणून सर्वत्र प्रसिद्ध होऊन त्याच्या लाखो प्रती वितरित/विक्री होत आहेत. यातून इतिहासाचा विपर्यास तर झालाच आहे, पण स्वामित्वहक्काच्या उदासीनतेतून प्रतिमेचा बाजारदेखील मांडला गेला आहे..
राष्ट्रपुरुषांची प्रतिमा ही सार्वजनिक म्हणून आपल्याकडे काही गोष्टी अध्याहृत आहेत. त्यातूनच मग काही गृहीतकं तयार होतात आणि मूळ उद्देश बाजूला राहतो आणि शिल्लक राहतो तो केवळ त्या प्रतिमेचा वापर. मग कोणी स्वत:च्या राजकीय उत्कर्षांसाठी त्याचा वापर करतो, तर कोणी आणखीन कशासाठी. त्यातूनच एक व्यवस्था जन्माला येते जिचे स्वरूप वरकरणी जरी इतिहास प्रेमाचे असले त्यातूनच एक बाजारी व्यवस्था जन्म घेते..
प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांच्या प्रतिभेतून साकारलेल्या छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा वापर असाच काहीसा बाजार मांडण्यासाठी झालेला दिसतो. १९९६ च्या दरम्यान ‘म्हाडा’मध्ये मंत्रालयाच्या धर्तीवर शिवरायांचे चित्र असावे अशी संकल्पना पुढे आली. त्यानंतर हे चित्र कसे साकार झाले हे वासुदेव कामतांनीच याच अंकातील विस्तृत लेखात मांडले आहे. १९९७ साली हे चित्र ‘म्हाडा’च्या मुख्य प्रवेशद्वाराच्या व्हरांडय़ात स्थानापन्न झाले. सिंहासनावर बसलेले शिवराय समोरून दिसत आहेत असे हे एकमेव चित्र. त्यासाठी कामत यांनी अभ्यासपूर्ण मेहनत घेतली होती. किंबहुना म्हणूनच हे चित्र नंतर अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरले. नंतरच्या काळात हेच आकर्षण बहुधा या प्रतिमेचा बाजार करण्यास कारणीभूत ठरले असावे.
जुईनगर (मूळचे वांद्रे निवासी) येथील विजय खिलारे यांनी जेव्हा सर्वप्रथम हे चित्र पाहिले तेव्हा त्यांच्या मनात आदराची भावना उत्पन्न होऊन, त्यांनी हे चित्र घराघरात पोहचविण्याचा ध्यास घेतल्याचे ते स्वतच सांगतात. खिलारे यांनीच सांगितलेल्या माहितीनुसार, ‘म्हाडा’ने त्यांना या चित्राचा वापर करण्याची परवानगी नाकारली. फोटो काढण्यासही मनाई केली. पण त्यांनी उपलब्ध संधीचा फायदा घेत व्यावसायिक छायाचित्रकाराकडून या चित्रांचे फोटो घेतले. आणि नंतर त्याच फोटोंवर फोटोशॉपमध्ये काही सुधारणा करत त्यांनी या चित्राचे ते छायाचित्र वाटपासाठी सिद्ध केले, असे खिलारे स्वतच सांगतात.
१९९७ साली वासुदेव कामत यांनी ‘म्हाडा’साठी चितारलेल्या मूळ चित्राचे विजय खिलारे यांनी छायाचित्र काढून २०१० पासून त्याच्या प्रती वितरित करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी या छायाचित्राच्या स्वामित्व हक्काची नोंद २०१३ मध्ये केली. तसे करताना कामाच्या मालकी संदर्भात चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याचा आरोप आहे. शेजारच्या स्वामित्व हक्क प्रमाणपत्रातील अनेक कलमांमध्ये हे स्पष्टपणे जाणवते.
या चित्राची मालकी ‘म्हाडा’कडे असताना क्रमांक तीनच्या कलमात स्वामित्व हक्काच्या अर्जदाराचे स्वरूप मालक असे दर्शविले आहे.
क्रमांक सातमध्ये मूळ मालकाचे नाव या ठिकाणी विजय खिलारे यांनी स्वत:चेच नाव टाकले आहे. पण या कामाचे मूळ मालक हे वासुदेव कामत असून त्यांनी ते चित्र ‘म्हाडा’साठी काढले असल्यामुळे आता मालकी ‘म्हाडा’ची आहे.
क्रमांक आठमध्ये सदर काम प्रकाशित आहे का, यावर अप्रकाशित असे दर्शविले आहे, वस्तुत: हे चित्र प्रकाशित आहे.
क्रमांक ११ आणि १२ मध्ये मालकीहक्का संदर्भात अन्य संस्था अथवा व्यक्तींचा समावेश आहे का, अधिकार आहे का, या संदर्भात माहिती देताना ‘म्हाडा’चा अथवा वासुदेव कामत यांचा कसलाही उल्लेख करण्यात आला नाही.
‘म्हाडा’ने चित्रासंदर्भात स्वामित्व हक्काची नोंद केली नसली तरीदेखील स्वामित्व हक्क ‘म्हाडा’कडेच आहे, कारण चित्र काढण्यासंदर्भात वासुदेव कामत आणि ‘म्हाडा’ यांच्यामध्ये करार झाला असल्यामुळे सदर चित्राचे मालकी हक्क म्हाडाकडे आहेत. थोडक्यात जाणीवपूर्वक माहिती दडवून मालकी हक्क मिळविल्याचा आरोप खिलारे यांच्यावर होत आहे.
इथपर्यंत गोष्टी सुरळीत होत्या. कोणताही वाद उसळला नव्हता. खिलारे यांच्याच म्हणण्यानुसार २०१० मध्ये त्यांनी फोटोशॉपमध्ये टचअपचे काम केले व प्रतिमा वितरित करायला सुरुवात केली. प्रतिमा छपाईचा खर्च मित्रमंडळी, नातेवाईक, तर समाजातून देणगी स्वरूपात जमा करायचा आणि प्रतिमा विनामूल्य वाटायच्या हा उपक्रम सुरू केल्याचे त्यांनीच स्वत: ‘लोकप्रभा’ला सांगितले.
या प्रतिमेचा प्रसार वाढला तशी ही प्रतिमा लोकप्रिय होत गेली. त्याचबरोबर या प्रतिमेला इतर लेबलं चिकटू लागली. मग कोणी या प्रतिमेला शिवरायांचे दुर्मीळ चित्र म्हणून संबोधू लागले, तर कोणी शिवरायांचे अस्सल चित्र म्हणू लागले. प्रतिमेवर असणारी मोडी लिपीतील अक्षरं म्हणजे महाराजांची सही आहे, तर कोणी त्याला महाराजांनी आपल्या हस्ताक्षरातील आपले नाव लिहिले आहे असे सांगू लागले. यामुळे या प्रतिमेची प्रसिद्धी होत गेली. या सर्वावर कडी झाली ती डच चित्रकाराच्या नावामुळे. सदरचे छायाचित्र डच चित्रकाराने काढलेले महाराजांचे अस्सल छायाचित्र असल्याचे जेव्हा प्रसिद्ध होऊ लागले तेव्हा त्याचे मोल आणि प्रसिद्धी प्रचंड वाढली. आणि हाच या चित्राच्या बाबतीत झालेला मोठा गोंधळ होता. प्रत्यक्षात वासुदेव कामतांनी काढलेलं मूळ चित्र म्हाडामध्ये उपलब्ध असतानाच त्यावरून तयार केलेल्या या प्रतिमेचा बाजार होऊ लागला होता.
बाजार हाच शब्द वापरण्याचे कारण असे की डच चित्रकाराचे चित्र आपल्या घरी असावे असे अनेकांना वाटू लागले. खिलारे यांची संस्था छायाचित्रं वाटत असताना काही लोकांनी त्याला आकर्षक फ्रेममध्ये बसवून त्याची विक्री सुरू केली, तीदेखील अवाच्या सव्वा किमतीत. खिलारे यांच्या संस्थेनेही फ्रेमसह चित्रविक्री केली. साताऱ्यातील एका संस्थेने चक्क तीन ते पाच हजार रुपयांमध्ये विविध आकारांतील फ्रेम्स विकल्या. त्यातूनच एक समांतर बाजार व्यवस्था आकार घेत गेली. खिलारे जेव्हा छायाचित्रांच्या प्रतिमांसाठी प्रायोजकांकडे जात तेव्हा प्रायोजकांनी आपलं नाव त्यावर टाकण्याचा अट्टहास धरला. आणि जो तो शिवरायांच्या प्रतिमेचा वापर आपली प्रतिमा मांडण्यासाठी करू लागला. यामध्ये नवी मुंबईचे माजी खासदार संजीव नाईक, बिल्डर सुरेश हावरे यांचाही समावेश होता. विविध कार्यक्रमांतून सदर प्रतिमांचे वितरण वाढू लागले, त्याचबरोबर वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाची जोड त्या प्रतिमेला मिळत गेली.
दरम्यानच्या काळात खिलारे यांनी ‘राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ (ट्रस्ट)’ ही संस्था स्थापन करून नोंदणीकृत करून घेतली आणि या नोंदणीकृत संस्थेचे नावदेखील या प्रतिमांच्या बरोबर सर्वत्र पसरू लागले. विजय खिलारे यांच्या म्हणण्यानुसार, हे चित्र वासुदेव कामतांनीच काढलेले असून, ही प्रतिमा एकदम वेगळी आहे. प्रस्तुत चित्र डच चित्रकाराचे असल्याचा उल्लेख त्यांच्याच कार्यक्रमात झाल्याचे त्यांना लक्षात आणून दिल्यानंतर ते म्हणाले की, डच चित्रकाराचा संदर्भ नेमका कोठून आला हे आम्हालादेखील माहीत नाही. तर चित्रांच्या विक्रीच्या मुद्दय़ावर ते सांगतात की आम्ही केवळ फ्रेम बनविण्याचेच पैसे घेत होतो. त्याव्यतिरिक्त कधीही पैसे घेतले नाहीत. चित्राबाबत ते पुढे सांगतात की आम्ही कामतांना भेटून परवानगी मागितली होती. तेव्हा परवानगीसाठी त्यांनी ‘म्हाडा’शी बोलण्यास सांगितले.
‘म्हाडा’तील मूळ चित्राचे छायाचित्र काढल्यानंतर त्यावर फोटोशॉपमध्ये काम करुन २०१३ मध्ये स्वामित्व हक्कासंदर्भात दाखल केलेले हे छायाचित्र. या छायाचित्रात ‘लेखनसीमा’ हे मोडी लिपीतील शब्द घुसडण्यात आले आहेत. स्वामित्व हक्कासाठी सादर केलेल्या छायाचित्रावर संस्थेचे नाव, शिक्का आणि सहीदेखील दिसून येते.
या प्रकरणी आणखीन दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. ठाणे आणि नेरुळ येथे माजी खासदार संजीव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या शिवगौरव महोत्सव या जाहीर कार्यक्रमात या प्रतिमेला दुर्मीळ प्रतिमा म्हणून संबोधण्यात आले आणि मोठय़ा प्रमाणात प्रतिमा तयार करून वाटण्यासाठी खासदारांनी निधी दिला. तसेच दोन्ही ठिकाणाच्या कार्यक्रमासाठी एकूण चाळीस हजार फ्रेम्स (ए ५ आकाराच्या) वितरित करण्यासाठी निधी मिळाल्याचे संस्थेचे कार्यकर्ते सांगतात. याच कार्यक्रमात संस्थेच्या वितरण केंद्रावरील कार्यकर्ते ही प्रतिमा डच चित्रकाराची असल्याचे सांगत होते. त्यावरून वासुदेव कामत यांचे शिष्य आणि आयोजक यांच्यात वादंग होऊन बराच बोलबाला झाला.
प्रतिमेचा इतरांकडून होणार वापर पाहून या संस्थेने आणखीन एक मोठे पाऊल उचलले आणि ती या सर्व घटनाक्रमांतील धक्कादायक बाब ठरली. संस्थेने सदर चित्राची फोटोशॉपवर केलेली फ्रेम कॉपीराइट करून घेतली आणि तीदेखील संस्थेच्या नाही तर खिलारे यांच्या वैयक्तिक नावावर. म्हणजेच मूळ चित्रकार वासुदेव कामत, त्यांनी म्हाडाच्या मागणीनुसार चित्र काढून दिले, त्यावर हक्क म्हाडाचा आहे. तर त्या चित्राचे विनापरवानगी छायाचित्र घेऊन देणग्या, स्वत:चा निधी, संस्थेचा निधी, प्रायोजक यांच्या माध्यमातून लाखो प्रतिमा काढल्या आणि वितरित केल्या विजय खिलारे यांनी. त्यातीलच अनेक चित्रांचा बाजार होत गेला, असा आरोप आहे. आता फ्रेममध्ये असलेल्या चित्राचा स्वामित्व हक्क कागदोपत्री खिलारे यांच्याकडे आहे, असा हा नवा तिढा दिसून येतो.
या सर्व घटनाक्रमामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही प्रतिमा ज्यांच्या अखत्यारीत आहे त्या ‘म्हाडा’ला याची कसलीही गंधवार्तादेखील नाही. नुकतेच यावर प्रसिद्धिमाध्यमातून बातम्या आल्यानंतर ‘म्हाडा’च्या कार्यालयात ‘लोकप्रभा’ने विचारणा केली असता अनेक अधिकाऱ्यांना याबाबत काहीच माहिती नव्हती. आपल्याच कार्यालयातील मूळ चित्राच्या छायाचित्रावरून कोणीतरी लाखो प्रतिमा वितरित करत आहे, तर कोणी विक्री करत आहे, तर कोणी मूळ चित्रकारच बदलून टाकला आहे याची काडीमात्रही कल्पना म्हाडाला नाही.
याबाबत म्हाडाच्या मुख्य जनसंपर्क आधिकारी वैशाली संदानसिंग यांची भेट दिली असता, सदर प्रतिनिधीने सांगेपर्यत त्यांना माध्यमातील चर्चेची कल्पनाही नव्हती. इतकेच नाही तर या चित्रावर म्हाडाचा अधिकार आहे की नाही याचीदेखील कसलीच ठाम माहिती त्यांना देता आली नाही. ‘आम्ही चौकशी करू आणि ‘म्हाडा’कडे कॉपीराइट असल्याचे लक्षात आल्यास पुढील कार्यवाही करू’ असे त्यांनी नमूद केले. याचसंदर्भात ‘म्हाडा’चे दक्षता अधिकारी जितेंद्र मिसाळ यांनीदेखील अशाच प्रकारचे उत्तर दिले. चित्राचे छायाचित्र कोणी काढत असेल तर त्यावर बंधन घालणे कसे अवघड आहे, याचेच समर्थन त्यांनी केले.
थोडक्यात काय, तर ‘म्हाडा’ आपल्याच हक्कांबाबत अनभिज्ञ आहे. हे छायाचित्र वासुदेव कामतांकडून तयार करून घेण्यात आले तेव्हा या साऱ्या प्रक्रियेत सहभागी असणारे ‘म्हाडा’चे तत्कालीन कार्यकारी अभियंता अनंत हुले यांनाही ‘लोकप्रभा’ने गाठले. त्यांनी सारा घटनाक्रम ‘लोकप्रभा’ला सांगितला. ते सांगतात, ‘‘हे चित्र तयार करायचे ठरले तेव्हा त्यावर भरपूर अभ्यास आणि चर्चा झाल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत तब्बल पाच तासांची बैठकदेखील झाली होती. त्या बैठकीत चित्राची संकल्पना स्पष्ट होऊन त्यानुसार वासुदेव कामत यांनी कामाला सुरुवात केली. या कामाच्या संदर्भात वासुदेव कामत आणि ‘म्हाडा’मध्ये करार करण्यात आला होता. या करारावर चित्रकार म्हणून वासुदेव कामत तसंच ‘म्हाडा’तर्फे माझी सही आहे. या करारानुसार हे चित्र कामतांनी ‘म्हाडा’साठी तयार केले असल्यामुळे आता ते ‘म्हाडा’ची मालमत्ता आहे.’’ या करारानुसार हे चित्र ‘म्हाडा’च्या मालकीचे आहे, पण ‘म्हाडा’ला त्याबाबत सध्या तरी काहीच माहीत नाही असेच दिसून येते. कारण कोणीतरी आपल्या चित्राची छायाचित्रे विकत आहे हे ‘म्हाडा’च्या गावीदेखील नाही. इतकेच नाही तर हुले यांनी सांगितलेल्या एका घटनेवरून ‘म्हाडा’ची या चित्रासंदर्भात उदासीनताच दिसून येते. चित्र तयार करण्यापूर्वी तयार केलेले मॉडेल अनंत हुले यांना एका वर्षांनंतर जनसंपर्क कार्यालयातील अडगळीच्या जागी धूळ खात पडलेले दिसले होते..
दुसरे असे की ‘म्हाडा’ने या चित्राच्या स्वामित्व हक्काबाबत काहीच पावले उचलली नसल्याचे दिसून येते. स्वामित्व हक्कासंदर्भात जेव्हा विजय खिलारे यांनी अर्ज केला होता तेव्हा स्वामित्व हक्कासंदर्भात ‘म्हाडा’च्या नावे या चित्राची नोंद नसल्याचे त्यांना सांगण्यात आले, असे खिलारे यांचे म्हणणे आहे. एकंदरीत ‘म्हाडा’या चित्राबाबत अतिशय उदासीनच असल्याचेच जाणवते.
दुसरे असे की पंधरा दिवसांपूर्वीच म्हाडाने सदर चित्र तेथून हलवले असून त्या जागी शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा बसवला आहे. हा पुतळा कोणी केला, तो तेथे बसविण्यामागचे कारण काय या प्रश्नावर ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांकडे काहीही उत्तर नाही. वासुदेव कामतांचे चित्र आता चौथ्या मजल्यावर ठेवण्यात येणार असल्याचे जनसंपर्क आधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र हे सारे सुरू असताना, मूळ चित्राच्या बाजूस असणारी अनावरण नामफलकपट्टिका अजूनही त्याच जागी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या झाल्याप्रकारामागेही काही गौडबंगाल आहे का, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
आपल्याकडे आजदेखील स्वामित्व हक्कांसदर्भात फारशी जागृती नाही हे तर यातून दिसून येते. पण चित्रावरून छायाचित्रांच्या प्रतिमा वितरित करणाऱ्या संस्थेस ही जाणीव का आली या भूमिकेबाबतदेखील शंका घेण्यास वाव राहतो. या प्रकरणी स्वामित्व हक्काचा मुद्दा नेमका कसा आहे या संदर्भात अॅडव्होकेट आनंद माहुरकर यांनी ‘लोकप्रभा’ला सांगितले, ‘‘म्हाडा आणि वासुदेव कामत यांच्यात करार झाला असेल आणि चित्राची मालकी ‘म्हाडा’कडे असेल तर त्या चित्राचे स्वामित्व हक्क पुढील साठ वर्षे ‘म्हाडा’कडेच राहतील. ‘म्हाडा’ने जरी स्वामित्व हक्कासंदर्भात कोणताही अर्ज केलेला नसला तरी कायद्याने हे हक्क साठ वर्षे त्यांच्याकडे राहतात. असा करार झाला नसता तर स्वामित्व हक्क चित्रकाराकडेच राहिले असते आणि त्याच्या मृत्यूनंतर साठ वर्षांपर्यंत त्याच्या कुटुंबीयांकडे राहिले असते.”
हे प्रकरण म्हणजे स्वामित्व हक्क आणि शिवप्रेमींच्या भावनांचा बाजार मांडण्याचा प्रकार आहे. ही शिवप्रेमींचीदेखील घोर फसवणूक असल्याची भावना आता व्यक्त होत आहे. गेल्या चार वर्षांत या चित्राच्या सुमारे सव्वातीन लाख प्रतिमा भारतासहित १४ देशात विजय खिलारे यांच्या संस्थेने वितरीत केल्या आहेत. त्यासाठी साडेबावीस लाख रुपये खर्च झाल्याचे ते स्वत सांगतात. त्याशिवाय साताऱ्यात ज्याप्रमाणे विक्री झाली तशी विक्री आणखीन कोठे झाली आहे का याचाही शोध घेणे गरजेचे आहे..
डच चित्रकाराने काढलेले महाराजांचे मूळ चित्र
डच चित्रकाराने काढलेले महाराजांचे मूळ चित्र ही संकल्पना रुजण्यामागे जे कारण आहे ते म्हणजे सुरत लुटीच्या वेळेस डच चित्रकाराने महाराजांचे चित्र रेखाटले होते. यासंदर्भात विकास जयवंत सांगतात की वा. सी. बेंद्रे हे संभाजी महाराजांच्या चरित्राचे लेखन करत असताना सुरत लुटीसंदर्भात मॅकेन्झी या डच वखारीतील गव्हर्नरचे पत्र मिळाले, ज्यामध्ये महाराजांनी डच चित्रकाराकडून चित्र काढून घेतल्याचा संदर्भ आहे. त्यानुसार वा. सी. बेंद्रे यांनी इंग्लडला जाऊन या चित्राची प्रत महाराष्ट्रात आणली आणि ते चित्र समारंभपूर्वक प्रसिद्ध केले.
हे सारे होत असताना सव्वातीन लाख जनतेमध्ये डच छायाचित्रकाराने महाराजांचे काढलेले छायाचित्र अशी प्रतिमा रूढ झाली आहे. त्यामध्ये अनेक राजकारणी आहेत, तसेच ज्येष्ठ कलाकार, उद्योजकदेखील आहेत. किंबहुना डच छायाचित्रकाराचे चित्र हे सूत्र या चित्राच्या प्रसिद्धीला आणि त्याच्या व्यापाराला जास्तीत जास्त पूरक ठरल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे हे सारे होत असताना या छायाचित्राच्या प्रतिमेला कोणाही इतिहासकारांनी जाहीर आक्षेप घेतल्याचे दिसून येत नाही.
थोडक्यात काय तर एक उत्तुंग प्रतिभेने साकारलेल्या प्रतिमेची अक्षम्य हेळसांड तर सरकारी यंत्रणांनी केलीच आहे, पण अनेकांनी त्याचा थेट लाभ उठवत त्याचा बाजारच मांडला आहे. आणि हे सारे सुरू असताना इतिहासाचीही फसवणूक होत आहे हे कोणाच्याही ध्यानीमनी आलेले नाही.