मोबाइलच्या संदर्भात कॉर्निग ग्लास हा शब्द आपण अलीकडे खूपदा ऐकतो. या कॉर्निग ग्लासचं वैविध्य दाखवणारं एक संग्रहालयच कॉर्निग या अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यातल्या गावामध्ये आहे.
सध्या मोबाइल विकत घ्यायला गेल्यावर विक्रेता आपल्याला आवर्जून सांगतो. या मोबाइलची स्क्रीन ‘‘कॉर्निग गोरिला ग्लासने’’ बनवलेली आहे. या काचेवर गोरिलाने नखाने खरवडलं तरीही यावर एकही चरा उमटणार नाही. मोबाइलच्या संदर्भात वापरला जाणारा हा शब्द सर्वसामान्यांच्या आता परिचयाचा झालाय. त्यातील ‘गोरिला ग्लास’ म्हणजे काय ते पण नीट कळलंय, पण कॉर्निग म्हणजे काय, हा प्रश्न मला छळत होता. कॉर्निग ग्लास म्युझियम पाहिल्यावर या प्रश्नाचं उत्तर सापडलं.
अमेरिकेत गेल्यावर नायगरा धबधबा पाहायला जाणार होतो. न्यूयॉर्क ते नायगरा हा ६ ते ८ तासांचा प्रवास सलग न करता मध्ये एखादं ठिकाण पाहावं असं ठरवलं तेव्हा माझ्या अमेरिकेत राहणाऱ्या बहिणीने ‘कॉर्निग ग्लास म्युझियमचा’ पर्याय सुचवला. अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यात कॉर्निग नावाचं एक टुमदार खेडं आहे. चारही बाजूंनी हिरव्यागार डोंगरांनी वेढलेलं हे खेडं एखाद्या बाऊलमध्ये ठेवल्यासारखं दिसत होतं. या शांत खेडय़ात १८६८ मध्ये खळबळ उडाली. हे खेडं झोपेतून जागं झालं आणि एक औद्योगिक नगरी म्हणून नावारूपाला आलं. गेली १४६ र्वष ‘कॉर्निग ग्लास इन्कॉर्पोरेशनचं’ मुख्य कार्यालय आणि रिसर्च सेंटर कॉर्निग गावातच आहे. इ.स.१८५१ आमोरी हॉगटन यांनी ‘कॉर्निग ग्लास फॅक्टरीची’ स्थापना केली. त्यानंतर आजपर्यंत कंपनीने अनेक चढ-उतार पाहिले. पण गेली १५० हून जास्त र्वष टिकून राहिलेल्या या कंपनीचं रहस्य त्यांच्या रिसर्च लॅबला जातं. इ.स. १९०८ मध्ये कंपनीने रिसर्च लॅबची स्थापना केली. एडिसनच्या बल्बसाठी लागणारी काच बनविण्यापासून ते आजच्या टेलिव्हिजनची टय़ूब, बोरोसिल ग्लास, ऑप्टिकल फायबर, सिरॅमिक ग्लास, एलसीडी ग्लास, कॉर्निग गोरिला ग्लासपर्यंत आपलं जीवनमान बदलून टाकणारे शोध या कंपनीच्या खात्यावर जमा आहेत.
कॉर्निग गावात शिरल्यावर मोठा पाìकग तळ आहे. त्याच्या बाजूला असलेल्या बस स्टॉपवरून कॉìनग ग्लास म्युझियमसाठी मोफत एसी बससेवा आहे. मोजून दुसऱ्या मिनिटाला म्युझियमच्या दारात पोहोचलो. म्युझियममध्ये शिरताच समोरच काचेचा सुंदर ‘फर्न ग्रीन टॉवर’ आपलं लक्ष वेधून घेतो. कोवळ्या पोपटी रंगात बनवलेलं हे काचशिल्प साडेपंधरा फूट उंचीचं आहे. डाले चिहुली या कलाकाराने काच गरम करून, फूंकनळीतून फुंकर मारून, विविध प्रकारे वाकवून, वळवून वेलीला फुटलेल्या धुमाऱ्यासारखे ७१२ विविध आकार देऊन हे काचशिल्प तयार केलेलं आहे. दिवसाच्या विविध वेळी त्यावर पडणारा प्रकाश आणि रात्रीच्या वेळी त्यावर टाकला जाणारा कृत्रिम प्रकाश यामुळे हे शिल्प प्रत्येक वेळी वेगळंच भासतं. नंतर म्युझियममध्ये काच तापवून त्यात फुंकर मारून विविध आकार निर्माण करण्याचं प्रात्यक्षिक पाहिलं तेव्हा हे काम किती कठीण आहे आणि उच्च दर्जाचं आहे याची जाणीव झाली.
कॉर्निग म्युझियम आठवडय़ाचे सातही दिवस चालू असतं. एकदा काढलेलं तिकीट दोन दिवसांसाठी चालतं आणि १९ वर्षांखालील मुलांना मोफत प्रवेश आहे. अमेरिकेतील जवळपासच्या शहरापासून कॉर्निगचं अंतर पाहता तिथे पोहोचायला दुपार होतेच. त्यानंतर दोन-तीन तासांत म्युझियम बघून होत नाही म्हणून ही सोय केलीय. तिकीट काढून आत शिरल्यावर समोरच एक अवाढव्य काच लावलीय. त्यावर काचेसंबंधी जागतिक साहित्यात आलेली अनेक वचनं उधृत केलेली आहेत. त्यातील ”Don’t throw stones at your neighboures if your own windows are Glass” हे बेंजामिन फ्रँकलिनने १७७४ साली लिहिलेलं वचन वाचून तर मी चाटच पडलो. हे वाक्य म्हणजे आपल्या हमराज चित्रपटातला राजकुमारचा प्रसिद्ध डॉयलॉग ‘‘जिनके घर शिशे के होते है वो दुसरों पर पत्थर नहीं फेका करते.’’ हिंदी सिनेमाच्या उचलेगिरीला सलाम करून पुढे पाहायला सुरुवात केली.
काचेचे विविध प्रकार, त्यात होत गेलेला बदल आणि त्याचे दैनंदिन जीवनात होणारे उपयोग यावर प्रकाशझोत टाकणारे प्रदर्शन तेथे मांडलेले आहे. ते नीट समजावे म्हणून त्याच्या बाजूला स्क्रीन लाऊन त्यावर त्यासंबंधीची माहिती रंजक पद्धतीने सतत दाखवली जात होती. तिथे लावलेल्या पेरीस्कोपमधून कॉर्निग गावातील विविध ठिकाणं पाहता येतात. या प्रदर्शनात एक काचेचा डोम बनवलेला आहे त्याच्या दोन टोकाला दोन जणांनी उभं राहून कुजबुज केली तरी एकमेकांच्या कानात बोलल्यासारखा स्पष्ट आवाज येतो. यामागील शास्त्रही येथे उलगडून दाखवलेले आहे. अशाच एका डिस्प्लेमध्ये दोन आरसे / भिंग बसवलेले आहेत. त्या आरशांच्या मधोमध आपण उभं राहून पुढे पुढे चालत गेल्यावर आपली प्रतिमा मोठी मोठी होत जाते आणि एका बिंदूपाशी आपली प्रतिमा चक्क उलटी दिसायला लागते. अशा प्रकारचे अनेक प्रयोग मांडून त्याद्वारे पाहणाऱ्यांची उत्कंठा वाढवून त्याला त्यामागचं शास्त्र जाणून घ्यायची इच्छा व्हावी असं वातावरण इथे निर्माण करण्यात आलं आहे.
याशिवाय दर तासाला इथे काचेशी संबंधित विविध प्रात्यक्षिकं दाखवली जातात. त्यासाठी वेगवेगळी दालनं आहेत. ‘ब्रेकिंग द ग्लास’ या प्रात्यक्षिकात प्रेक्षकातल्या एखाद्याला बोलवून त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या काचा फोडून घेतात. ती फोडण्यासाठी लागलेला जोर, त्याच्या तुकडय़ांचा आकार, त्यामागील कारणं, शास्त्र समजावून दिली जातात. यातून वेगवेगळ्या उपयोगांसाठी काचा बनवताना त्यात कसे बदल होत गेले याची माहिती देतात. ‘फ्लेमवर्क डेमो’ या शोमधील कलाकार काचेची छोटीशी कांडी तापवून त्याच्या छोटय़ा वस्तू बनवतात. वस्तू बनवताना ते आपल्याला माहितीही देत असतात. आम्ही पाहिलेल्या प्रात्यक्षिकात त्याने चार सेमी उंचीचा पेंग्विन बनवला होता. यातील कलाकार त्या मानाने नवखे म्हणजे पाच ते दहा वर्षांचा अनुभव असलेले असतात. पण ‘हॉट ग्लास शो’ या शोमधले कलाकार २५ ते ३० वर्षांचा अनुभव असलेले असतात. या शोसाठी एक खास मिनी थिएटर बनवलेलं आहे. स्टेजवर काचेचा रस तापवण्यासाठीची भट्टी व इतर सामुग्री ठेवलेली असते. कलाकार स्टेजवर आल्यावर निवेदिका त्याची त्याच्या अनुभवाची आणि त्याला मिळालेल्या पारितोषिकांची माहिती देते. त्यानंतर तो कलाकार भट्टीत तापत असलेल्या काचेच्या रसाचा गोळा एका धातूच्या नळीभोवती गुंडाळून बाहेर काढतो. त्या नळीत फुंकर मारून त्याला हवा तसा आकार देतो. त्याच वेळी तो नळी हवेत किंवा समोरच्या टेबलावर ठेवून त्याला सर्व बाजूंनी हवा तसा आकार देतो. हे करत असताना काचेचं तापमान कमी होतं, मग तो आकार आलेला गोळा पुन्हा भट्टीत टाकतात. काच मऊ झाली की सुबक आकार (फाइन टच) दिला जातो. मग वेगवेगळ्या रंगांची ऑक्साइड्स वापरून त्या काचेत रंग भरण्यासाठी परत भट्टीत टाकतात. या सर्व क्रिया तो कलाकार इतक्या सहजतेने करत होता की, असं वाटत होतं हे सगळं करणं किती सोपं आहे. पण काचेची पारंपरिक पद्धतीने भांडी बनवण्याची कला अतिशय क्लिष्ट आहे. काचेचा रस योग्य प्रमाणात तापवणं, त्याला आकार देणं हे मातीची भांडी बनवण्यापेक्षाही कठीण काम आहे. हा सर्व निर्मिती सोहळा नीट पाहता यावा यासाठी ठिकठिकाणी, अगदी भट्टीतही कॅमेरे लावलेले आहेत. थेटरमध्ये लावलेला स्क्रीन आणि निवेदिकेने दिलेली त्या निर्मिती प्रक्रियेची शानदार माहिती यामुळे हा शो ठसा उमटवून जातो. या कलाकारांनी बनवलेल्या कलाकृती विकतही मिळतात. चौथा शो हा ‘ऑप्टिकल फायबरवर’ आहे. कॉर्निगने लावलेल्या या शोधामुळे दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती झाली. त्या सगळ्या प्रक्रियेबद्दल सांगणारा हा शो मात्र खूपच टेक्निकल होता.
म्युझियममधला या माहितीपूर्ण विभागानंतर पुढच्या भागात देशोदेशीच्या काचेच्या वस्तूंचा संग्रह आहे. त्यात सुरुवातीला लाव्हा रस थंड होताना नैसर्गिकरीत्या तयार झालेली काच, निसर्गात विविध स्वरूपात सापडणारी काच ठेवली आहे. काच बनविण्याच्या पारंपरिक पद्धतींची मातीची मॉडेल्स बनवलेली आहेत. त्यात कॉर्निग कंपनीचं सुरुवातीच्या काळातलं मॉडेल पण आहे. याशिवाय रोमन, इस्लामिक काळातील काचेच्या विविध वापरातल्या वस्तू ते आजच्या कलावंतांनी बनवलेल्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. या संग्रहात एक काचेची सुंदर बोट ठेवलेली आहे. तशीच दुसरी बोट राजस्थानमधल्या बिकानेरच्या लालगढ पॅलेसमध्ये ठेवलेली आहे. याशिवाय काचेचे कपडे, काचेचं पिस्तूल या वस्तूही पाहण्यासारख्या आहेत.
म्युझियम पाहून झाल्यावर बाहेर पडण्याअगोदर डिझाइन आणि सजेशन रूम आहे. येथे कागद, विविध रंग, कॉम्प्युटर्स ठेवलेले आहे. म्युझियम पाहून जर एखाद्याला काही कल्पना सुचली तर त्याने ती येथील कागदावर/कॉम्प्युटर्सवर उतरवावी, असं आवाहन तिथे केलं जातं. तसंच ‘मेक युवर ओन ग्लास’ या कार्यशाळेत भाग घेऊन आपण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काचेची वस्तू बनवून घरी नेऊ शकतो. म्युझियममधील शेवटचं दालन हे विक्रीचं दालन आहे. यात एक डॉलरपासून लाखभर डॉलर्सच्या काचेच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. त्यातील वस्तूंच वैविध्य पाहिलं की पुन्हा एकदा जाणीव होते की काचेने आपलं जीवन कसं व्यापून टाकलंय.
जाण्यासाठी :- कॉर्निग ग्लास म्युझियम, न्यूयॉर्कपासून २५० किमीवर (४ तासांवर) आणि नायगरापासून १५० किमीवर (४ तासांवर) आहे. कॉर्निगमध्ये राहण्यासाठी हॉटेल्स आहेत. जेवणासाठी तिथे चक्क एक भारतीय रेस्टॉरंटसुद्धा आहे.
अमित सामंत