विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
करोनाचा उद्रेक, प्रसार आणि त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या वाढल्यानंतर जगभरात त्या विषाणूसंदर्भातील संशोधनाने वेग घेतला. महत्त्वाचे म्हणजे २०१९ सालच्या डिसेंबर महिन्यापासून या उद्रेकास सुरुवात झालेली असली तरी ज्या साथीच्या रोगांचे पर्यवसान महामारी स्वरूपाच्या आजारांमध्ये होते, त्यासंदर्भात संशोधन करणाऱ्यांनी करोनासदृश विषाणूच्या उद्रेकाची भीती चीनमधील वातावरण पाहून सहा महिने आधीच व्यक्त केली होती. पण ही वस्तुस्थिती मान्य करेल तर ते चीन सरकार कसले! त्यांनी तर डिसेंबर महिन्यात झालेल्या उद्रेकानंतरही तेथील परिस्थिती जगासमोर येण्यापासून दडपण्याचाच प्रयत्न अधिक केला. मात्र सिंगापूरमध्ये झालेल्या परिषदेच्या निमित्ताने त्याची दाहकता जगासमोर आली आणि जगानेच या विषाणूचा संसर्ग अधिक गांभीर्याने घेतला.
गेल्या ३०-४० वर्षांत अनेक साथी आल्या. त्यात फ्लूपासून ते हवेमार्फत आणि श्वसनाद्वारे येणाऱ्या सार्ससारख्या साथींचा समावेश आहे; यातील बहुसंख्य विकारांचे विषाणू हे प्राणी- पक्ष्यांमार्फत माणसांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे आता प्राणी-पक्ष्यांवर आपण सर्व दोषारोप टाकून मोकळे होणार आहोत. त्यातही वटवाघळांना लक्ष्य केले जात आहे. वटवाघळांच्या शरीरात लाखो विषाणू असतात, त्यामुळे त्यांना मारून टाकायला हवे, अशी मोहीम सोशल मीडियावर सुरू आहे. गेली लक्ष वष्रे वटवाघळे या भूतलावर आहेत. किमान यानिमित्ताने तरी आपण त्यांची माहिती करून घ्यायला हवी. या वटवाघळांचे ढोबळ दोन प्रकार आहेत. त्यातील काही फळे खाऊन जगतात ती बहुसंख्येने आपल्याला झाडावर लटकलेली दिसतात. तर दुसऱ्या प्रकारची वटवाघळे अंधाऱ्या जागेमध्ये राहतात खास करून गुहा-गुंफांमध्ये, ती कीटकभक्ष्यी असतात. आपल्या आजूबाजूला असलेले कीटकांचे प्राबल्य कमी करण्यात त्यांचा वाटा मोलाचा आहे. पण आता त्यांच्या अंधाऱ्या जागांवर माणसानेच अतिक्रमण केल्याने गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी सोसायटय़ा-इमारतींमधील अंधाऱ्या जागांमध्ये वास्तव्य केलेले दिसते. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये गेली किमान ५० वष्रे तरी वटवाघळे वास्तव्यास आहेत. मात्र त्यांच्यामुळे या ठिकाणी कोणताही साथीचा मोठाच काय लहान आजारदेखील पसरलेला नाही. उलट आपण जंगले कमी करून त्यांच्या जागांवर गंडांतर आणले आहे, हे आपणच लक्षात घ्यायला हवे. काही ठिकाणी तर वटवाघळांचा वापर जंगल वाढविण्यासाठी करून घेतला आहे. कारण फळांवर जगणाऱ्या वटवाघळांच्या विष्ठेमधून पडणाऱ्या बियांमधून झाडेनिर्मिती प्रक्रिया वेगात होते, असे लक्षात आले. त्यामुळे खरे तर त्यांचे आपण आभारच मानायला हवेत. मात्र आपण त्यांच्याच जिवावर उठलेलो आहोत.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो साथीच्या विकारांचा ज्यांचा संबंध अस्वच्छतेशी आहे. आता आफ्रिकेतील काही देशांमध्ये परत आलेल्या पटकीसारख्या साथी या प्रामुख्याने अस्वच्छतेशी संबंधित आहेत. आपल्याकडील अनेक विकारांचा संबंध आपल्या आजूबाजूला असलेल्या अस्वच्छतेशी आणि अव्यवस्थेशी आहे. स्वच्छता राखली तरी हे विकार होणार नाहीत. गेल्या काही वर्षांमधील आरोग्यविषयक अहवाल पाहिले तर असे लक्षात येते की, विविध विषाणूंपेक्षाही अस्वच्छतेमुळे गेलेले बळी अधिक आहेत. आपल्याकडे सर्वाधिक बळी हगवणीच्या विकारामुळे गेले आहेत, हे धक्कादायक आहे. त्यास पक्षी-प्राणी नव्हे तर माणूसच जबाबदार आहे. त्यामुळे साथीच्या विकारांबद्दल बोलताना सर्वप्रथम भान राखावे, अफवा पसरवू नयेत. कुणीतरी वटवाघूळ असा संशय व्यक्त केला म्हणून आता त्यांना मारून टाका, अशी भूमिका घेऊ नये. माणसाच्या मनात भीती बसली की तो विवेक हरवतो. त्यामुळे भीती आणि स्थिती समजून घेऊन विवेकयोग्य कृती करणेच सद्य:स्थितीत इष्ट ठरेल, याचे भान राखावे इतकेच!