वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com
कोविड १९ च्या संसर्गाला बळी पडलेल्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या व्यक्तींपैकी एक धुळ्याच्या लक्ष्मण पाटील यांचा संपर्क मिळाला होता. रात्री नऊच्या सुमारास त्यांना फोन लावला. त्यांच्याशी बोलणं सुरू असतानाच त्यांनी फोन थांबवला आणि अचानक व्हिडीओ कॉल लावला. हे काय यांचं असं मनात येईपर्यंत त्यांनी कॅमेरा फिरवला आणि मागे दिसल्या पेटलेल्या सहा चिता. रात्री नऊचा अंधार, साताठ फुटांचं अंतर ठेवून धडधडणाऱ्या त्या सहा चिता आणि पार्श्वभूमीवर कुत्र्यांचा रडण्या-ओरडण्याचा आवाज… मन विषण्ण करणारं दृश्य होतं ते.
लक्ष्मण पाटील धुळे महापालिकेत साहाय्यक आरोग्य अधिकारी म्हणून काम करतात. ते आणि त्यांचे पाच सहकारी गेले वर्षभर कोविडग्रस्तांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणं हेच काम करत आहेत. गेल्या वर्षभराच्या काळात त्यांनी एकूण ५३५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. ‘सुरुवातीच्या काळात तर कोविड संसर्ग होऊन मरण पावलेल्यांचे नातेवाईक इतके घाबरलेले असत की ते हा आपल्याच माणसाचा मृतदेह आहे ही ओळख पटवून देण्यासाठी, अंत्यदर्शनासाठी देखील पुढे येत नसत. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची आई गेली तर ते बघायलासुद्धा आले नाहीत. आता गेल्या दोन-तीन महिन्यांत लोकांनी पुढे यायला सुरुवात केली होती तर आता पुन्हा ते बॅकफूटवर गेले आहेत’, लक्ष्मण पाटील सांगतात.
लक्ष्मण पाटील आणि त्यांचे सहकारी गेले वर्षभर दिवसाचे २४ तास मृत्यूच्या छायेतच वावरत आहेत. ते कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नाहीत. ‘रोज दिवसरात्र हे दृश्य बघून बघून माझ्या संवेदना बधिर झाल्या आहेत. मला कशातच आनंद वाटत नाही. माझं काम देखरेखीचं आहे, पण मी इथं थांबलो तरच माझी टीमदेखील थांबेल आणि काम करेल म्हणून मी हे काम करतो. अगदी रात्री दोन-तीन वाजतादेखील आम्हाला मृताच्या नातेवाईकांचा फोन येतो आणि मग आम्ही रुग्णालयात जाऊन मृतदेह ताब्यात घेतो. मग चिता रचणं, अग्नी देणं, नातेवाईकांना अस्थी देणं ही सगळी पुढची सगळी कार्यवाही करतो’ असं ते सांगतात. सुरुवातीच्या काळात काळजीपोटी त्यांचे कुटुंबीय त्यांना हे काम करू नका असं म्हणत. पण लक्ष्मण पाटील यांना ती आपलीच जबाबदारी वाटते. आता त्यांच्या कुटुंबीयांनीही ते स्वीकारलं आहे.
या महासाथीच्या काळात लोकांनी बेजबाबदारपणे वागू नये, काळजी घ्यावी, मास्क वापरावा, उगीचच बाहेर पडू नये असं आवाहनही ते करतात. मृत्यूच्या छायेत रात्रंदिवस वावरणाऱ्या या माणसाचा असं आवाहन करण्याचा अधिकार आपण मान्यच केला पाहिजे.
बाबा मिस्त्री हे गेली २५ वर्षे सोलापूरमध्ये नगरसेवक आहेत. गेली २० वर्षे ते रुग्णसेवेचं काम अविरत करत आहेत. आता कोविडकाळात तर आपली जबाबदारी आणखीनच वाढली आहे असं त्यांना वाटतं. १२ एप्रिल रोजी सोलापुरात कोविड १९ चा पहिला रुग्ण सापडला. त्याला रुग्णालयात दाखल करण्याचं आणि त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्काराचं काम बाबा मिस्त्री यांनी स्वत: केलं होतं. त्या दिवशी मला प्रचंड भीती वाटली होती. रात्रभर झोपही आली नव्हती. उद्या आपल्याला काय होईल असं सारखं मनात येत होतं. पण सकाळी काहीच झालं नाही हे बघितल्यावर भीती पळाली ती कायमची. तेव्हापासून बाबा मिस्त्री आणि त्यांच्या जावेद, डी बागवान, यासीन रंगरेज या सहकाऱ्यांचं मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम अखंड सुरू आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी ३०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.
कोविड १९ च्या संसर्गाने एखादी व्यक्ती दगावली की तिचे नातेवाईक महापालिकेत तिच्या मृत्यूची नोंद करतात. मग बाबा मिस्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या जमेतुल उलमा या संस्थेला मृताच्या नातेवाईकाचा फोन येतो. संस्थेची शववाहिका जाऊन मृतदेह घेऊन येते. मृतदेहाला गुंडाळण्यासाठी कापडही तेच आणतात. महापालिकेने या कामासाठी खड्डे खणायला त्यांना एक जेसीबी दिला आहे. त्याच्या साहाय्याने आठ फुटांचा खड्डा खणला जातो. कापडात गुंडाळलेल्या मृतदेहाचं दफन केलं जातं. मृतदेह हिंदू व्यक्तीचा असेल तर विद्युतदाहिनीत ठेवून दहन केलं जातं.
स्वत:च्या पायांनी चालत जाऊन रुग्णालयात दाखल झालेला रुग्ण त्यानंतरच्या एकदोन दिवसांत दगावतो हे अक्षरश: बघवत नाही, बाबा मिस्त्री सांगतात. सुरुवातीच्या काळात त्यांना हे सगळं बघून त्रास व्हायचा, कधी कधी पीपीई किट घातलेल्या मृतदेहातून रक्त बाहेर यायचं ते बघून भीती वाटायची. घरातले लोकही हे काम करू नका असा आग्रह धरायचे. पण आता तसं होत नाही. दुसरीकडे सुरुवातीच्या काळात मृतदेहाची ओळखदेखील पटवायला न येणारे नातेवाईक आता येऊन आपल्या आप्ताचा चेहरा लांब थांबून का होईना बघतात असं बाबा मिस्त्री सांगतात.
रोहित अरखेल नागपूर महापालिकेत त्यांच्या शिफ्टनुसार मृतदेह उचलण्याचं काम करतात. करोना महासाथीच्या आधीच्या काळात खूपदा बसून राहावं लागायचं. पण आता रोज चार ते पाच मृतदेहांचं काम असतं असं ते सांगतात. एखाद्या रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्यांना फोन येतो. मग पीपीई किट घालून मृतदेह ताब्यात घेतला जातो. नातेवाईकांना चेहरा दाखवून ओळख पटवली जाते. कधी कधी मृताचे नातेवाईक खूप विचित्र वागतात असं रोहित सांगतात. आपला माणूस गमावल्याचं द:ुख ते आमच्यावर काढतात. हे का केलं, ते का केलं असा आरडाओरडा करतात. अंगावर धावून येतात. पण त्यांचं दु:खही समजून घ्यावं लागतं. रोजचं असं मरण बघून वाईट वाटतं. आपल्या घरी वृद्ध आईवडील, पत्नी, लहान मूल आहे, त्यांना काही होणार नाही ना असं वाटत राहतं. सुरुवातीला घरचे लोकही हे काम करू नका असं म्हणायचे. पण हा पोटापाण्याच्या कामाचा भाग आहे, काम म्हणून ते केलंच पाहिजे असं रोहित सांगतात.