अर्जुन नलवडे – response.lokprabha@expressindia.com
करोना विषाणुने सुमारे १०० देशांमध्ये आपले हातपाय पसरलेले आहेत. अशा परिस्थितीत परदेशात वास्तव्यास असणाऱ्या भारतीय नोकरदारांना, महिलांना, व्यावसायिकांना आणि विद्यार्थ्यांना अनेक चांगल्या-वाईट अनुभवांना सामोरे जावे लागत आहे. त्यांचे अनुभव त्यांनी ‘टीम लोकप्रभा’सोबत शेअर केले..
अमेरिकेतील सर्वच राज्यांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद करण्यात आले आहे. अमेरिकेत चीनसारखी परिस्थिती होऊ नये म्हणून राज्य आणि केंद्रीय पातळीवर अत्यंत प्रभावीपणे काळजी घेतली जात आहे. चीनमधील भयानक अवस्था जगाने पाहिल्यानंतर अमेरिकेत तशी परिस्थिती निर्माण होऊ नये याची अत्यंत प्रभावीपणे काळजी घेतली जात आहे. सार्वजनिक कार्यक्रमांवर पूर्णत बंदी घालण्यात आली आहे. सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. करोनाची लागण झालेल्यांमध्ये वयस्कांचा समावेश अधिक असल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुरेपूर काळजी घेतली जात आहे, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मदतदेखील पुरविली जात आहे. सद्यस्थितीत विमानसेवा बंद करण्यात आल्यामुळे काही भारतीयांची गैरसोय झाली आहे. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आली आहेत, परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ‘ऑनलाईन क्लासेस’ सुरू करण्यात आले आहेत. कदाचित यंदाचे शालेय वर्ष रद्द करण्यात येईल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकास्थित भारतीयांना भारतात राहणाऱ्या नातेवाईक आणि आप्तस्वकियांच्या आरोग्याची काळजी मात्र आता सतावू लागलेली आहे.
– श्वेता चक्रदेव, पेन्सिलव्हेनिया, अमेरिका.
१५ वर्षांपासून मी आणि माझे पती आम्ही दोघे जण फिनलॅण्डमधील शिक्षणपद्धतीची माहिती देण्याचे काम करतो. फेब्रुवारीपासून करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन फिनलॅण्डमधील अनेक शिक्षणसंस्थांनी आपापल्या शाळा सरकारी आदेशाची वाट न पाहताच बंद केल्या. त्यामुळे आमच्याही काही ठरलेल्या शाळाभेटी रद्द कराव्या लागल्या. तसेच १८ मार्चपासून आणीबाणी कायदा लागू करण्यात आला. सरकारी आदेशानुसार अत्यावश्यक सेवा, अन्नधान्यांची दुकाने आणि औषधाची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आलेली आहेत. दहापेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास मज्जाव केल्याने फिनलॅण्डमधील नागरिकांनी घरातच बसणे पसंत केले आहे. मुलांच्या शाळा बंद असल्याने १४ मार्चपासून ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तसेच वयोवृद्ध नागरिक आणि संशयित रुग्णांसाठी विशिष्ठ वेळेतच अत्यावश्यकच सेवा पुरविल्या जात आहेत. विद्यापीठांना सुट्टय़ा जाहीर केल्यामुळे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे विद्यार्थी ‘स्टुडिओ अपार्टमेंट’मध्ये राहत आहेत. त्यामुळे तूर्तास तरी विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय झालेली आहे. भारतीय दूतावासांकडून काही दिवसांसाठी फिनलॅण्डमध्ये आलेल्या भारतीयांच्या राहण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे.
– शिरीन कुलकर्णी, फिनलॅण्ड.
जपानमध्ये इतर देशांच्या तुलनेत फारसे भितीदायक वातावरण नाही. कारण, सरकारला जाणीव झाल्याक्षणीच त्यांनी आवश्यक सूचना, आदेश आणि योग्य ती काळजी घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, चीन, सिंगापूरमधून येणारे डायमंड जहाज जपानकडे वळले तेव्हा जपानमधील भारतीय नागरिकांना भीती वाटू लागली. कारण, त्या जहाजामध्ये सर्वाधिक प्रवाशी करोनाबाधित होते. ते प्रवासी आले तर त्यामुळे विषाणू मोठय़ा प्रमाणात पसरू लागेल, असा भारतीयांचा समज झाला होता. हे जहाज मी जिथे योकोहामामध्ये राहतो तेथून केवळ ६ किलोमीटर अंतरावर थांबले होते. मात्र, सुदैवाने जपान सरकारने डायमंड जहाजातील प्रवाशांना जहाजामध्येच विलगीकरणात ठेवले त्यामुळे धोका टळला. जहाजातील महिला, लहान मुले आणि इतर परदेशी नागरिकांना आवश्यक खाण्याचे पदार्थ पुरविण्यात आले. त्याचवेळी भारत सरकारने जहाजावरील भारतीयांची सुटका करण्यासाठी विशेष विमान पाठवले. नोकरदारांचा विचार केला तर, येथील कंपन्यांनी स्वतहून आपापल्या कामगारांना मास्क पुरविले आहेत. तसेच ज्यांना घरून काम करणे शक्य आहे, त्यांना घरातून काम करण्यास प्रवृत्त केले आहे. माझ्या घरातील परिस्थिती सध्या तरी गोंधळाची आहे. कारण, माझी पत्नी गरोदर आहे. भारतात राहणारे आई-वडील वयस्क असल्यामुळे इकडे येवू शकत नाहीत. म्हणून आम्ही बाळंतपण भारतात करता येईल, असा विचार केला होता. मात्र, भारतात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतात जायचे की, जपानमध्ये राहायचे या गोंधळात आम्ही आहोत. तूर्तास तरी जपानमध्येच राहण्याचा विचार आम्ही केला आहे.
– योगेश नक्षीणे, जपान.
अमेरिकेत अध्यक्षांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आणि चीन, दक्षिण कोरिया, इटली, जर्मनी आणि इराण या पाच देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, भारतातील प्रवाशांसदर्भात कोणताही निर्णय अमेरिकेने घेतलेला नव्हता. त्यामुळे इथल्या भारतीयांमध्ये गोंधळाची परिस्थिती होती. सुदैवाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भात निर्णय घेतला आणि गोंधळाची परिस्थिती निवळली. १५ एप्रिलला पुतणीचे लग्न असल्यामुळे भारतात येण्याचे कुटुंबाचे नियोजन होते. तिकिटेही काढून ठेवली होती. मात्र, भारतीय वाणिज्य दूतावासाच्या सल्ल्यानुसार घरातील वयस्क मंडळींचे आरोग्य आणि जगाबरोबरच भारतातही बदलत जाणाऱ्या परिस्थितीचा विचार करता आम्ही भारतात येणे रद्द केले. भारतीय वाणिज्य दूतावासांने अमेरिकेतील भारतीयांची मने गुंतून राहावी यासाठी हॉलिवूड-बॉलिवूडचे सिनेमे, गाणी, धार्मिक मंत्र-पारायणांच्या संकेतस्थळांच्या लिंक्स पाठवून देण्यास सुरुवात केली आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भात लक्षात घेता खासगी कंपन्यांनी सरकारच्या आदेशाची वाट न पाहता अगोदरच कर्मचाऱ्यांनी ३० एप्रिलपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ची सूचना दिलेली आहे. त्याचबरोबर आवश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकानेही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, फक्त सहा तासांसाठीच दुकाने खुली राहतील. अमेरिकन सरकारने आठवडा पगारावर उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांना १५ दिवसांचा पगार देण्याचे आश्वासन दिले आहे. तशा सूचना संबंधित कंपन्यांना आणि इन्शुरन्स कंपन्यांनादेखील दिलेल्या आहेत. महाविद्यालये आणि विद्यापीठांना सुट्टय़ा जाहीर करण्यात आल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
– नितीन नारखेडे, अमेरिका.
जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर कॅनडामध्येही नागरिकांनी हॅण्ड सॅनिटायझर्स खरेदी करण्याासाठी औषधांच्या दुकानांमध्ये तुडूंब गर्दी केली होती. करोनाबाधीत रुग्णांच्या केसेस वाढू लागल्या, तसतसे कॅनेडियन नागरिक त्रस्त होऊ लागले. त्यात बहुतांश कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ची घोषणा केल्याने टॉयलेट पेपर्स, लॅपटॉप्स आणि मॉनिटर्स घेण्यासाठीही दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या. परिणामी, वाढत्या मागणीचा विचार करून दुकानदारांनी आवश्यक वस्तू चढय़ा दराने विकण्यास सुरूवात केली. असे असतानाही दुकानांतील रेडी-टू-कूक, कॅन्ड फूड, दूध, तांदूळ आणि इतर आवश्यक वस्तू दुकानांमध्ये आजमितीस शिल्लक नाहीत. ऑनलाईन दरांमध्येही मोठय़ा प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. काही नागरिक तर, आवश्यक खाण्याच्या वस्तू साठवून ठेवण्याकरिता म्हणून चक्क फ्रिज खरेदी करण्यासाठी दुकानांसमोर गर्दी करताना दिसून येत आहेत. भारतीय स्वयंपाकाच्या सवयीमुळे किराणा साहित्यासाठी भारतीय नागरिकांना फारसा त्रास होताना दिसत नाही. अशा परिस्थिती वयोवृद्ध लोकांसाठी काही तरुणांनी पुढाकार घेत आवश्यक वस्तू घरपोच देण्याचे काम सुरू केले आहे. आवश्यक वस्तूंचा तुटवडा जाणविणार नाही, याची दक्षता घेऊन स्थानिक प्रशासनाकडून कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. कॅनडामध्ये अजूनतरी संपूर्णपणे ‘लॉकडाऊन’ झालेले नसले तरी, शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांना सुट्टय़ा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. रेस्टॉरंट, जीम, लायब्ररी आणि मॉल्स बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे पालन करण्याच्या अटीवर लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.
– पूजा लबडे-देसाई, व्हॅनकुवर-कॅनडा.
करोनाचे वाढते गांभीर्य लक्षात घेऊन कुवेतवासी भारतीय मंडळी एकमेकांना आधार देऊन उभ्या ठाकलेल्या परिस्थितीला सामोरे जात आहेत. कुवेतमध्ये १२ मार्चपासून शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, सरकारी संस्था बंद करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मॉल्स, सिनेमागृहे, व्यायामशाळा आणि हेल्थक्लब्स पूर्णत बंद आहेत. विमानसेवा बंद करण्यात आली आहे, त्याचबरोबर सर्वाधिक कोरोनाबाधित देशांतून आलेल्या प्रवाशांच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या आहेत. चाचण्यांच्या निकालानुरुप प्रवाशांना घर किंवा इस्पितळात विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोकरदांना संबंधित कंपन्यांनी घरातून काम करण्यास सांगितलेले आहे. विशेष म्हणजे योग्य ती खबरदारी घेऊन बॅंकांनी ग्राहकांना अधिकाधिक सेवा पुरविण्याचे काम हाती घेतले आहे. अन्नधान्याचा तुटवडा पडणार नाही, याची काळजी सरकारने घेतलेली आहे. तसेच हॅण्ड सॅनिटायझर्स सर्वाना सक्तीचे करण्यात आले आहे. सरकारी अधिकारी आणि मंत्री दवाखाने, विमानतळे आणि वैद्यकीय चाचणी केंद्रांना भेटी देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत. कुवेतमध्ये ‘महाराष्ट्र मंडळां’सारखी दूतावासाशी संलग्न असणारी अनेक भारतीय नागरिकांची मंडळे भारतीय राजदुतांकडून आलेले सावधानतेचे संदेश सर्व सदस्यांकडे पोहोचविण्याचे काम करत आहेत.
– मिलिंद कुलकर्णी, कुवेत.