वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com
करोना विषाणू संसर्गाच्या भीतीमुळे जगात सगळीकडेच अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आजवर संपामुळे, पाऊसपाण्यामुळे, क्वचित कधीतरी दंगलीमुळे एकदोन दिवस ठप्प होणारं जनजीवन या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेले आठ दिवस ठप्प झालं आहे. दिवसेंदिवस करोनाबधित रुग्णांचा आकडा वाढतो आहे. एरवी माणसाच्या आयुष्यात संकटं येतात, तो वेगवेगळ्या वेदना सहन करत असतो, दु:खांना सामोरा जात असतो. ते खूपदा वैयक्तिक असतं किंवा कौटुंबिकही असतं. सामूहिक संकटाच्या बाबतीत खूपदा हळूहळू काळाबरोबर त्याची तीव्रता कमी होत जाते. पण करोना हे संकटच अभूतपूर्व आहे. कामधंदे सोडून लोकांना घरी बसावं लागतं आहे, मुलांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा ठप्प आहेत. या नंतरच्या काळात आर्थिक फटका बसणार आहे तो वेगळाच. अशा या करोनाचं वादळ आपल्या मुलाबाळांपर्यंत येऊन तर पोहोचणार नाही ना, या भीतीची टांगती तलवार पालक वर्गाला सातत्याने सतावते आहे.
हे झाले करोनाचे वरवर दिसणारे मानसिक परिणाम. पण त्याचे मानसशास्त्रीय परिणाम आज दिसत आणि जाणवत नसले तरी ते अधिक गंभीरअसणार आहेत. ते नेमके काय असतील आणि त्यांच्याशी मुकाबला कसा करायचा या विषयावर काही मानसोपचारतज्ज्ञांशी चर्चा केली असता काही महत्त्वपूर्ण मुद्दे पुढे आले. सुगत आचार्य, डॉ. राजेंद्र बर्वे सांगतात की, ‘‘कोणतीही साथ पसरते तेव्हा लोकांना धक्का बसतो, त्यांच्या मनात भीती निर्माण होते. या भीतीच्या चार पातळ्या असतात. कोणतीही वाईट बातमी, मग ती व्यक्तिगत पातळीवरची असो की सामाजिक; पहिली प्रतिक्रिया ती नाकारण्याची असते. ‘ते इतर कुणाला तरी झालं असेल, आपल्याला असं काही होणार नाही’, असंच लोकांना वाटत असतं. दुसरी प्रतिक्रिया चिंतेची असते. करोनाच्या बाबतीत सध्या आपण त्या टप्प्यावर आहोत. मृत्युदर कमी असला तरी करोनाची लागण होण्याची भीती प्रत्येकाच्या मनात आहेच. त्यापुढची पातळी आपल्याकडे येणार आहे, ती आहे रागाची. भीती संपून राग निर्माण होणार आहे. आणि रागानंतर औदासीन्य. लोकांनी आप्तस्वकीय गमावले असतील, रोजगार गमावला असेल, हातातले पैसे संपले असतील. या साथीला तोंड देणारा प्रत्येक देश सहसा या चार परिणामांमधून जाणार आहे. या प्रत्येक टप्प्यावर काळजी घेणं आवश्यक आहे. माझ्याकडे नुकतीच एका नऊ वर्षांच्या मुलीची केस आली आहे. सततच्या या करोनामय वातावरणामुळे तिच्या मनात इतकी भीती निर्माण झाली आहे की तिला झोपच येत नाहीये. जराशी झोप लागली तरी ती दचकून उठते आहे. तिला उपचारांची गरज होती. यापुढच्या काळात लोकांचं हे असं होण्याची शक्यता आहे. आपल्या माणसांचं, विशेषत: मुलांचं असं होत आहे हे लक्षात आलं तर पालकांनी त्याची वेळेवर दखल घ्यायला हवी. करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची चिंता, तिचं गांभीर्य मुलांपर्यंत अनेक मार्गानी सतत पोहोचतं आहे. पण करोना पसरण्याचा वेग जास्त आहे, पण त्याचा मृत्युदर कमी आहे, योग्य काळजी घेतली तर आपण त्यातून सुखरूप बाहेर पडू हे मुलांना आत्ता कळणार नाही. चुकीच्या माहितीच्या प्रसाराला ती पटकन बळी पडतात. म्हणूनच त्यांना कोणतीही माहिती पारखून घेण्याची सवय लावायला हवी.’’
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. यश वेलणकर समाजमनातील चिंतेचा हाच धागा पकडून पुढे सांगतात, ‘‘माणसाच्या मनात चिंतेचे विचार भरून राहतात तेव्हा त्याचा दुष्परिणाम त्यांच्या रोगप्रतिकारकशक्तीवर होतो. ताणतणावामुळे ती कमी होत जाते. या साथीत आपलं काय होणार, आपण वाचणार का ही भीती, चिंता सध्या सतत लोकांच्या मनात आहे. एरवी सर्दीतापाचे जंतू आपल्या शरीरात असतात. पण चांगल्या रोगप्रतिकारकशक्तीमुळे आपण त्यांना बळी पडत नाही. पण आताच्या काळात साधा सर्दीताप आला तरी करोना तर झाला नसेल ना, ही भीती निर्माण होऊ शकते आणि तिचाही प्रतिकारकशक्तीवर परिणाम होऊ शकतो. करोनाच्या काळात ओसीडीच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. यापुढच्या काळात ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा लोकांच्या मनावर निश्चितच परिणाम झाला आहे, होतो आहे. जास्तीतजास्त काळ घरी राहणं, करोनाच्या संसर्गाची भीती यामुळे अस्वस्थ झालेलं मन नियंत्रणात ठेवण्यासाठी काही गोष्टी ठरवून कराव्या लागणार आहेत. लक्षात ठेवणं आणि अनुभव घेणं या दोन पातळ्यांवर आपला मेंदू काम करत असतो. आताच्या काळात आपण अनुभव घेण्याच्या पातळीवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपणच आपल्या मेंदूला प्रशिक्षण द्यावं लागेल. सतत वर्तमानात वावरायला शिकवावं लागेल. करोनाच्या तणावामुळे आपला मेंदू रिमेंबरिंग म्हणजे लक्षात ठेवण्याच्या पातळीवर आहे. त्याची ही स्थिती टाळून त्याला अनुभव घेण्याच्या म्हणजे वर्तमानाच्या पातळीवर आणण्यासाठी काय करायचं तर आपण जे काही करत असू त्याचा पूर्णपणे अनुभव घ्यायचा. म्हणजे तुम्ही आंघोळ करत असाल तर त्या वेळी तुमचा मेंदू मागचं काहीतरी आठवत असतो त्यामुळे पाण्याचा स्पर्श, साबणाचा गंध, आपल्या त्वचेचा पोत या सगळ्याकडे आपलं लक्ष नसतं. आपण सवयीने आंघोळ करत असतो. तसं न करता त्या प्रक्रियेतल्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करायचं. तिचा अनुभव घ्यायचा.’’
तणावाखाली असताना आपल्या मनात जे विचार येतात, त्या विचारांच्या मेंदूमधल्या फायली आपण ठरवून बंद कराव्या लागतील. सावध राहणं, काळजी घेणं, न घाबरणं हे सगळं आपल्याच हातात आहे. आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टी आणि नसलेल्या गोष्टी यांचा आपल्याला फरक करता येणं आवश्यक आहे. आपलं मन अनिश्चिततेचा स्वीकार करायला तयार होत नाही आणि त्यामुळे आपल्याला भीती वाटते. आपल्याला प्रत्येक गोष्ट निश्चित हवी असते. पण आपणच आपल्या मनाला सांगायला हवं की आपल्या आयुष्यात निश्चितता कधीच नव्हती, उलट होती ती अनिश्चितताच. आता त्यात करोनामुळे भर पडली आहे. घराबाहेर न पडण्याचं बंधन आपल्यावर आहे. पण ती सुट्टी नाहीतर विराम आहे. भावना, बुद्धी, कृती सतर्क ठेवून उत्पादकतेवर काम करण्यासाठी त्या विरामाचा वापर करायचा आहे. एखाद्या विषयाचा, कलेचा, भविष्यकालीन योजनांचा अभ्यास करायचा आहे. एरवी घरातल्या इतरांशी संवाद साधता येत नाही. आता घरात बसून सगळ्यांशी संवाद साधणं शक्य होणार आहे. कौटुंबिक नात्यांना वेळ देण्याची ही संधी आहे. एकत्र बसून काय अॅक्टिव्हिटी करता येईल याचा विचार करा. जाणीवपूर्वक मन वर्तमानात गुंतवा. या वेळेचा सदुपयोग करून घ्या.
लोकांनी आपला वेळ चांगल्या प्रकारे वापरावा, पॅनिक होऊ नये हीच गोष्ट वेगवेगळ्या पातळ्यांवर सांगितली जात आहे. या परिस्थितीचा लोकांच्या मनावर होऊ शकणारा परिणाम लक्षात घेऊन युनिसेफने तर मानसिक स्वास्थ्यावर व्हच्र्युअल मीटिंग्ज घ्यायला सुरुवात केली आहे. त्यातल्या एका मीटिंगमध्ये त्यांचे पदाधिकारी सांगतात, ‘‘वर्क फ्रॉम होममुळे घरीच आहात तर नीट रुटीन लावून घ्या. पुरेशी विश्रांती घ्या, व्यायाम करा. वेळच्या वेळी आंघोळ करा. नीटनेटके राहा. चांगले, सकस पदार्थ तयार करा. ते करताना त्यात मुलांना सामावून घ्या. मित्रमंडळी, नातेवाईक, सहकारी यांना नियमित फोन करा. व्हिडीओ कॉल करा. एकमेकांशी मोकळेपणाने बोला. एकटे राहणाऱ्यांना नियमित फोन करून त्यांच्याशी बोला. तुमच्या आवडत्या छंदात मन रमवा, वाचा, लिहा, सिनेमे बघा, कोडी सोडवा. संगीत ऐका. डायरी लिहा. ध्यानधारणा करा. ज्यांच्याविषयी कृतज्ञता वाटते अशा किमान दोन तरी गोष्टींविषयी दररोज लिहा. अशा रीतीने सकारात्मक राहायचा प्रयत्न करा.
मानसोपचाराच्या क्षेत्रामधली मंडळी अशा रीतीने या कठीण काळात लोकांनी काय करायला हवं याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी समाजमाध्यमांचा चांगला वापर करत आहेत. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी नुकताच करोनाच्या संदर्भात मानसिकदृष्टय़ा खंबीर राहण्यासाठी लोकांनी काय करायला हवं हे सांगणारा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये अपलोड केला आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘असा वेळ मिळणं ही स्वतबरोबर राहण्याची संधी आहे. आताच्या काळात चांगलं संगीत ऐकणं, गप्पागोष्टी, चांगले सिनेमे बघणं हे तर कराच, पण त्याचबरोबर आज जो वेळ मिळतो आहे, त्याचा उद्याच्या उत्पादकतेसाठी कसा वापर करता येईल याचाही विचार करा. आज देशाच्या प्रगतीला खीळ बसली आहे. तिला आपल्याला उद्या गती द्यायची आहे. इतिहास हेच सांगतो की विराम मिळतो तेव्हा जो पुढच्या झेपेची तयारी करतो, तोच पुढे जातो, तोच प्रगती करतो.’’
या वातावरणामुळे असहायतेची भावना येऊ शकते. पण तिचा सामना करत जमेल ते केलं पाहिजे. घरी राहून स्वतला उत्पादक ठेवणं हे आजच्या घडीला राष्ट्रकर्तव्य आहे. कधी कधी मागे खेचणारे विचारही मनात येतील तेव्हा त्यांना सांगा की भरतीला ओहोटीदेखील असते. सकारात्मक राहिलं तर आपण सगळे मिळून या परिस्थितीवर मात करू शकतो. डॉ. नाडकर्णी सांगतात त्याप्रमाणे सकारात्मक राहूनच या संकटावर मात करता येणार आहे. त्यासाठी आपणच आपलं मनोबल वाढवण्याची आणि त्याबरोबरच इतरांचंही मनोबल वाढवण्याची गरज आहे.