भक्ती बिसुरे – response.lokprabha@expressindia.com
२०१९ मध्ये करोना विषाणू संसर्गाच्या साथीने महासाथीचं रूप धारण करत जगभर थैमान घातलं आणि जणू मानवजातीचं जगणं ३६० अंशामध्ये बदललं. या विषाणूने जगाच्या कानाकोपऱ्यांत राहणाऱ्या सर्व वयोगटांतल्या व्यक्तींना तब्बल दीड वर्ष घरात कोंडलं. चेहऱ्यांवर मुखपट्टी बांधली. कामानिमित्त रोज घराबाहेर पडणारे कर्मचारी असोत की शाळेत जाणारी लहान मुलं — संगणकांचे पडदे आणि त्यावरच्या खिडक्या हाच बाहेरच्या जगाशी जोडलं राहण्याचा एकमेव पर्याय या विषाणूनं शिल्लक ठेवला. औषध नाही, प्रतिबंधात्मक लस नाही इथपासून आता प्रतिबंधात्मक लस आहे पर्यंतचा प्रवास करत आपण २०२१ च्या शेवटाशी येऊन पोहोचलो आहोत. काही जण अद्याप करोनाप्रतिबंधक लशीच्या प्रतीक्षेत आहेत. काही अजूनही लस हा पर्याय स्वीकारायला तयार नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लसीकरण झालेले काहीसे निर्धास्त होऊन दीड पावणेदोन वर्षांंच्या त्या व्हर्चुअल जगाची दारं थोडी किलकिली करून पुन्हा बाहेर येऊन, प्रत्यक्ष जगात पाय ठेवायचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्याच वेळी ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या उत्परिवर्तनाची कुवार्ता दक्षिण आफ्रिकेतून येऊन धडकली आहे. नुसती धडकली एवढंच नव्हे तर भारतात, अगदी महाराष्ट्रात, मुंबई—पुण्यातही ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. त्यांची संख्या सध्या तेवढी भीषण नसली तरी रुग्ण आहेत, ही माहितीही नव्याने धडकी भरवण्यास पुरेशी आहे. त्यातच या नव्या उत्परिवर्तनाबद्दल जगभरातून येणारी माहिती संभ्रम आणि संदिग्धता वाढवणारी आहे. त्यामुळे २०२२ चे स्वागत करतानाही अनिश्चिततेचं नवं सावट सर्वत्र व्यापून राहिलं आहे.

ओमायक्रॉनची सद्यस्थिती

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमायक्रॉनचे तब्बल २५ रुग्ण आता भारतात आहेत. सर्वात प्रथम नवी दिल्ली, मग कर्नाटक आणि आता महाराष्ट्रातही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण प्रामुख्याने दक्षिण आफ्रिका आणि ओमायक्रॉनग्रस्त देशांतून भारतात आलेले तसेच या प्रवाशांच्या नजिकच्या संपर्कातील आहेत. महाराष्ट्रात चार डिसेंबरला डोंबिवलीत ओमायक्रॉनचा सर्वात पहिला रुग्ण आढळला. हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमधून दुबई आणि नवी दिल्लीमार्गे मुंबईत आला. त्याचे करोना प्रतिबंधात्मक लसीकरण झालेले नाही. सौम्य ताप आल्यानंतर त्याची करोना चाचणी करण्यात आली. त्या चाचणीत करोनाचा संसर्ग आढळल्याने त्याचे जनुकीय क्रमनिर्धारण — जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले. त्यावेळी या रुग्णाला संसर्ग करणारा विषाणू हा करोनाचे नवे उत्परिवर्तन — बी.१.१.५२९ म्हणजेच ओमायक्रॉन असल्याचे स्पष्ट झाले. डोंबिवलीपाठोपाठ रविवारी पिंपरी चिंचवडमध्ये सहा आणि पुणे शहरात एका रुग्णाला ओमायक्रॉनचा संसर्ग झाला असल्याचे स्पष्ट झाले. पिंपरी चिंचवडमध्ये नायजेरियाहून आलेल्या महिलेला आणि तिच्या दोन मुलींना, तिच्या सहवासात आलेले तिचा भाऊ आणि दोन मुली यांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तरी, त्यांच्याही आजाराची लक्षणे सौम्य आहेत. फिनलंडहून पुणे शहरात आलेल्या एका व्यक्तीला ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे आढळले. त्यानंतर सोमवारी मुंबईत दोन रुग्णांना या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. हा रुग्ण जोहान्सबर्ग येथून मुंबईत आला आहे. त्याच्या निकटवर्तीयांपैकी अमेरिकेहून आलेल्या महिलेलाही ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे. मुंबईतील या दोन्ही रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. दिलासादायक बाब म्हणजे, सोमवारनंतर गुरुवापर्यंत महाराष्ट्रातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १० वर स्थिरावलेली आहे.

अनिश्चितता का?

करोनाच्या महासाथीने लाटांच्या स्वरूपात जगाच्या वेगवेगळ्या भागांत एका विशिष्ट काळात थैमान घातल्याचे आपण गेल्या दीड पावणेदोन वर्षांंपासून पाहिले आहे. दक्षिण आफ्रिकेत सध्या ओमायक्रॉनची लाट असली तरी विषाणू संसर्गाचा वेग आणि आजाराची तीव्रता यांचे परस्पर प्रमाण व्यस्त आहे. दक्षिण आफ्रिकेत रुग्ण वाढीचा वेग लक्षणीय असला तरी रुग्णांना असलेली लक्षणे सौम्य आहेत. त्यामुळे रुग्णांना रुग्णालयात दाखलही करावे लागलेले नाही. किंवा ओमायक्रॉनचा रुग्ण दगावल्याचीही नोंद नसल्याचे तेथील अहवालांमधून समोर आले आहे. ही माहिती अर्थातच दिलासादायक आहे. दक्षिण आफ्रिकेतील करोना संसर्गाचा आतापर्यंतचा आलेख पाहिला तर ओमायक्रॉन रुग्णांच्या दुपटीचा वेग आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. ‘द लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकाने याबाबत प्राथमिक माहिती दिली आहे. दरम्यान, जगातील ५७ देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. करोना महासाथीने जगभर थैमान घालणाऱ्या डेल्टा या उत्परिवर्तनाच्या तुलनेत ओमायक्रॉन चौपट वेगाने पसरत असल्याचे जपानमध्ये झालेल्या एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. दक्षिण आफ्रिकेतील ओमायक्रॉन रुग्णांच्या जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्यांतून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे जपानमधील क्योतो विद्यापीठाचे आरोग्य आणि पर्यावरण विभागाचे प्राध्यापक हिरोशी निशिउरा यांनी आपले निष्कर्ष गणितीय मांडणीद्वारे स्पष्ट केले आहेत.

ओमायक्रॉन नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती किंवा लसीकरणाद्वारे तयार होत असलेले सुरक्षा कवच भेदण्यात यशस्वी होत असल्याची भीती या संशोधनातून व्यक्त करण्यात आली आहे. ओमायक्रॉन उत्परिवर्तनाचा आढावा घेण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. ओमायक्रॉनचा शोध लागल्यानंतर अवघ्या दोन आठवडय़ांत दक्षिण आफ्रिकेतील रुग्णसंख्या दिवसाला २० हजापर्यंत वाढल्याचे दिसते. तेथील प्रसारावर काळजीपूर्वक लक्ष ठेवून तिथून हाती येणाऱ्या माहितीनुसार संपूर्ण जगाने आपले धोरण ठरवणे आवश्यक आहे.

करोना महासाथीने वेठीस धरण्यापासून ते नुकताच थोडा मोकळा श्वास घेण्याएवढी उसंत मिळण्याच्या अनुभवापर्यंत आपण पोहोचलो आहोत. तशातच, ओमायक्रॉनचं रूप घेऊन करोनाने पुन्हा आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे. पुन्हा एकदा अनिश्चिततेचं सावट पसरलं आहे. हे सावट दूर करायचं असेल, तर किमान काही वर्षे नागरिक म्हणून थोडी स्वयंशिस्त आपण अंगीकारणार का, हा प्रश्न आहे. बाजारपेठा, गर्दीने ओसंडून वाहणारे रस्ते अशा अनेक ठिकाणी आजही सर्रास मुखपट्टी न लावलेले चेहरे दिसतात. सार्वजनिक ठिकाणे ही शिस्तभंगासाठीच आहेत, अशा आविर्भावात थुंकणारी माणसे दिसतात. प्रतिबंधासाठी लशीसारखा एक पर्याय उपलब्ध असताना, तो नाकारणाऱ्या सुशिक्षित व्यक्तीही दिसतात. आपण थोडी स्वयंशिस्त पाळणार नसू तर महासाथीच्या काळाने आपल्याला काही शिकवलं की नाही याचं आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे.

जागतिक आरोग्य संघटना म्हणते…

‘जगातील ५७ देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. करोना विषाणूच्या या नव्या उत्परिवर्तनातील काही बाबींचा विचार करता ही संख्या वाढण्याचीच शक्यता अधिक दिसते. त्या पाश्र्वभूमीवर सर्वतोपरी खबरदारी घेणे आपल्या हातात आहे. जागतिक महासाथीचे चित्र बदलवण्याची क्षमता या नव्या उत्परिवर्तनामध्ये असल्याचे दिसून येत आहे. ओमायक्रॉन रुग्णांच्या वाढीच्या वेगाचा नेमका अंदाज लावणे कठीण आहे. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन वाढीचा वेग प्रचंड आहे. डेल्टा विषाणूच्या संसर्गाचा वेग मंदावलेला असताना ओमायक्रॉनने मुसंडी मारली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर इतरत्र डेल्टा आणि ओमायक्रॉन उत्परिवर्तनांचा परस्पर संबंध लावण्यासाठी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी जगातील सर्व देशांना आम्ही करोना चाचण्या वाढवण्याचे तसेच संपूर्ण खबरदारीचे आवाहन करत आहोत,’ असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

‘दक्षिण आफ्रिकेतून हाती आलेल्या माहितीवरून ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य असल्याचे दिसते, मात्र, त्याबाबत काही भाष्य करण्यासाठी अधिक माहिती मिळवणे आणि तिचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जगातील अधिकाधिक देशांनी आपल्याकडील माहिती जागतिक आरोग्य संघटनेला पाठवण्याचे आवाहन आम्ही करत आहोत. सध्या उपलब्ध असलेल्या लशी ओमायक्रॉनवर परिणामकारक आहेत की नाहीत याचेही विश्लेषण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. पुरेशा माहितीचा अभाव असला तरी ओमायक्रॉनचा मुकाबला करण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी आपण घेत आहोत. रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढण्याची वाट न पहाता देशांनी खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात करावी. मुखपट्टी, गर्दी टाळणे, अंतर राखणे, हात धुणे, बंद जागांमध्ये एकत्र येणे टाळणे या ज्ञात उपायांची अंमलबजावणी कटाक्षाने करणे आपल्या हातात आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नये. तसेच, शक्य असेल त्या सर्वांनी करोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी,’ असेही जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या आवाहनात म्हटले आहे.

लसीकरण आणि मुखपट्टीला अंतर नको!

ओमायक्रॉन या नव्या करोना उत्परिवर्तनावर सध्या उपलब्ध असलेल्या लशी परिणामकारक ठरणार आहेत की नाहीत याबाबत अद्याप संशोधनावर आधारित माहिती समोर आलेली नाही. मात्र, संसर्ग झाला तरी त्याची तीव्रता कमी करण्याची क्षमता लशींमध्ये असल्याने नागरिकांनी लसीकरणाबाबत गाफील राहू नये, असे आवाहन वैद्यकीय वर्तुळातून करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही या बाबीला दुजोरा दिला आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्याप लस घेतलेली नाही त्यांनी तातडीने लसीकरण पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या विषाणूंपासून संरक्षण देण्याची क्षमता मुखपट्टी या उपायमध्ये बऱ्याच प्रमाणात आहे. मुखपट्टीचा वापर करणे हा करोना किंवा त्याच्या उत्परिवर्तनांपासून सुरक्षित राहण्याचा सर्वात सोपा, सोयीस्कर आणि परवडणारा उपाय आहे. त्यामुळे आणखी काही वर्षे तरी मुखपट्टीसंदर्भातला निष्काळजीपणा आपल्याला परवडणारा नाही, हे आपण लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

तज्ज्ञ म्हणतात…

राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणतात, ‘सोमवार ६ डिसेंबपर्यंत महाराष्ट्रातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १० पर्यंत गेली. त्यानंतर गुरुवापर्यंत यात कोणतीही वाढ झालेली नाही. विषाणूंचे उत्परिवर्तन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मुखपट्टी, गर्दीत न जाणे, अंतर राखणे, हात धुणे, विषाणूजन्य आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे या बाबी यापुढे नेहमीच आपल्या जीवनशैलीचा भाग म्हणून अंगीकारणे आवश्यक आहे. मागील महिन्याभरात आंतरराष्ट्रीय विमानप्रवास करून आलेल्या प्रवाशांनी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहावे. तसेच, आजाराची लक्षणे दिसल्यास योग्य खबरदारी घ्यावी.’

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणतात, ‘ओमायक्रॉनबाबत उपलब्ध माहितीनुसार त्याचा वेगाने प्रसाराचा गुणधर्मच स्पष्ट झाला आहे. त्याव्यतिरिक्त प्रामुख्याने तो सौम्य लक्षणे निर्माण करणारा आहे, असे दिसते. मात्र, सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये, विशेषत: ६० वर्षांंवरील रुग्णांमध्ये तो गंभीर होण्याची शक्यताही आहे. त्यामुळे खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या उपलब्ध असलेल्या लशी परिणामकारक ठरतील की नाही याची माहिती मिळण्यास थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळे लस घेतली म्हणून गाफील राहणेही योग्य नाही. महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत मोठी वाढ अद्याप दिसत नाही, ही बाब सकारात्मक आहे. हे चित्र असेच राहिले तर तिसऱ्या लाटेचा धोका टळू शकेल.’