अंकिता द्विवेदी जोहरी – response.lokprabha@expressindia.com

सगळा देश टाळेबंदीमध्ये आहे. लोक आपापल्या घरी सुरक्षित आहेत; पण डॉक्टर आणि परिचारिकांचा मोठा ताफा कोविड-१९चा रात्रंदिवस मुकाबला करत आहे. कोविड-१९च्या त्यांना स्वत:ला असणाऱ्या धोक्याकडे दुर्लक्ष करून रुग्णांवर उपचार करताहेत.

दिल्लीमधलं सरकारी रुग्णालय. शारीरिक-मानसिक पातळीवर थकवणारी शिफ्ट करून घामाने थबथबून ती पन्नाशीची परिचारिका रुग्णालयाच्याच दंतचिकित्सा विभागात थोडी झोप घेण्यासाठी जाते. तिच्या चेहऱ्यावर दिवसभर लावलेल्या मास्क आणि गॉगलच्या खुणा उमटलेल्या आहेत. उष्णतेमुळे चेहऱ्यावर मुरुमं आली आहेत. तिच्या शरीराच्या तुलनेत लहान आकाराचा पीपीई सूट घालावा लागत असल्यामुळे तिचे हातपाय दुखतायत. तिला कधी एकदा आंघोळ करेन असं होतं; पण त्याचीही तिला भीती वाटते.

‘मला दिलेली खोली म्हणजे एक लॅबोरेटरी आहे. तिथे तीन टॉयलेट्स आहेत, पण बाथरूम नाहीत. मला आंघोळीसाठी टॉयलेटमधल्या जेट स्प्रेचा वापर करावा लागतो. टॉयलटेमध्येच माझे कपडे धुऊन मी ते तिथल्याच दांडीवर वाळत घालते. तिथे इतर १७ परिचारिकांचेही कपडे असतात. आम्ही सगळ्याच जणी दिवसभर कोविड-१९ च्या रुग्णांसाठी काम करतो. तेव्हा तिथे कपडे वाळत टाकताना माझा खरोखरच धीर खचतो,’ कोविड-१९ रुग्णांसाठी तयार केल्या गेलेल्या वॉर्डमध्ये काम करणारी ही पन्नाशीची परिचारिका सांगते. मला खरंच भीती वाटते, रडायला येतं; पण मी वेदनाशामक गोळी घेते आणि झोपते.

शहराच्या दुसऱ्या भागातल्या हॉस्पिटलमध्ये सुरू केलेल्या कोविड-१९ वॉर्डमध्ये काम करणारी २५ वर्षांची एक डॉक्टर सांगते, ‘कोविड-१९ पासून सुरक्षित राहण्यासाठी मी रोज हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची गोळी घेते आहे. त्या गोळीसाठी मी १५ दुकानं फिरले, पण ती कुठेच मिळाली नाही. शेवटी मी ती एका स्नेह्य़ाकडून मिळवली. ती कोविड-१९ वर खरंच गुणकारी आहे की नाही हे अजून सिद्ध झालेलं नाही; पण आम्हाला ती घ्यायला सांगण्यात आलं आहे. तिचे काही गंभीर दुष्परिणामही आहेत, गुवाहाटीमध्ये ती घेणारे एक डॉक्टर हकनाक गेले हे माहीत आहे; पण मी नशिबावर विश्वास ठेवून ती घेत आहे.’

पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या या निवासी डॉक्टरने कोविड-१९ वॉर्डमध्ये सलग १५ दिवस काम केलं आणि मग घरी स्वतचं विलगीकरण केलं. ती सांगते, ‘मला माझं काम आवडतं, पण त्यामुळे मी माझ्या वयस्कर पालकांचा जीव धोक्यात घालतेय का, अशी भीती सतत वाटते. कोविड वॉर्डमधला अतिदक्षता विभाग हा सगळ्यात संसर्गजन्य आहे. मला रुग्णाला औषधं, अन्न देण्यासाठी त्याच्या तोंडात नळ्या घालायच्या असतात. कॅथेटर लावायचं असतं. त्याच्या शरीरातल्या वेगवेगळ्या द्रवांशी माझा सतत संपर्क येतो. त्यामुळे धास्तावलेले माझे पालक आम्ही पण हायड्रोक्सीक्लोरोक्वीन घेऊ का; असं सतत विचारतात; पण मी त्यांना ते घेऊ देत नाही.’

कोरोना व्हायरसच्या संसर्गाची टांगती तलवार डोक्यावर असताना डॉक्टर्स आणि परिचारिका कोविड वॉर्डमध्ये त्यांचं काम करत आहेत. या सगळ्या उपचारांचा भार सध्या देशातल्या शासकीय रुग्णालयांतल्या आरोग्य व्यवस्थेवर पडला आहे. आजपर्यंत परिचारिका आणि डॉक्टर्ससह १५० आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. करोना रुग्णांवर उपचार करण्याचं आव्हान पेलत असतानाच करोनापासून संरक्षण करणाऱ्या उपकरणांचा अभाव, राहाण्याची व्यवस्था नाही, करोना पसरवणारे अशी जनमानसात होत असलेली प्रतिमा या गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागत आहे. सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन त्यांचे हात बळकट करण्याची वेळ आली आहे. अर्थात सरकारने गेल्या आठवडय़ात दिलेली १.७ कोटी पीपीईंची ऑर्डर हे त्या दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊलच आहे.

‘माझ्या रुग्णालयात सहाही मजले गर्दीने गजबजले आहेत. तिथे कसलं आलं आहे अंतर राखण्याचं भान? रुग्णवाहिकेतून करोना संशयितांची कुटुंबंच्या कुटुंबं येत आहेत. मी पूर्ण वेळ पीपीई किट घालून वावरत नाही. खूपदा मी या कुटुंबांना भेटते तेव्हा माझ्या अंगावर फक्त सर्जिकल गाऊन आणि तीन पदरी मास्क असतो. त्यांच्यातलं कुणी खोकलं तरी माझा थरकाप होतो; पण अशा वेळी मी सरळ माझा हेडफोन कानात घालते आणि काही मिनिटं मोहम्मद रफीची गाणी ऐकते, मन शांत करते आणि पुन्हा कामाला सुरुवात करते,’ पन्नाशीची ती परिचारिका सांगते.

पंचविशीच्या त्या डॉक्टरचा दिवस आई-वडिलांच्या व्हॉट्सअ‍ॅप कॉलने सुरू होतो. तिच्या हॉस्पिटलच्या कार्डिएक केअर युनिटचं रूपांतर कोविड-१९ अतिदक्षता विभागात केल्यापासून ती तिच्याच घरात वरच्या मजल्यावर वेगळी राहते.

मी त्यांना माझं जेवण दारात ठेवायला सांगते. मी हॉटेलात राहीन; असं माझं म्हणणं होतं, पण माझ्या कुटुंबाने ते धुडकावून मला घरीच राहायला सांगितलं. पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या या  डॉक्टर तरुणीला सध्या सकाळी नऊ ते दुपारी तीन, दुपारी तीन ते रात्री नऊ असं दोन शिफ्टमध्ये काम करावं लागतं आहे. दर तिसऱ्या दिवशी रात्रपाळी केल्यावर तिला सुट्टी मिळते आणि असं १४ दिवस काम केलं की काही दिवसांची सलग सुट्टी मिळते.

करोना संसर्गजन्य असल्यामुळे दिल्लीतल्या ४० वर्षांच्या हृदय शल्यविशारदाला इतर डॉक्टर्सप्रमाणे कुटुंबापासून दूर राहावं लागत आहे. तोही घरातच वेगळ्या मजल्यावर राहतो. ‘सकाळी पाच आणि आठ वर्षांच्या माझ्या दोन मुली बाल्कनीमध्ये उभ्या राहून मला हाका मारतात आणि तिथूनच माझ्याशी बोलतात. मी करोना आहे आणि त्या मला पकडायला येणार आहेत; असा खेळपण त्यांनी सुचवला आहे.’ या डॉक्टरने मार्चच्या सुरुवातीपासून स्वयंस्फूर्तीने कोविड-१९ वॉर्डाची जबाबदारी घेतली आहे.

तो सांगतो, ‘असं अंतर पाळणं गरजेचं होतं, कारण माझे सत्तरीचे वडील हृदयाच्या आणि फुप्फुसाच्या विकाराने ग्रस्त आहेत. मी यापूर्वी टीबी वॉर्डमध्ये काम केलं आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबाला मी अशा पद्धतीने काळजी घेण्याची सवय आहे; पण या वेळी ही साथ आहे आणि तिचा ताण किती तरी जास्त आहे.’

पन्नाशीची परिचारिका सांगते, ‘माझ्या घरी क्षयरोग असलेली आई आणि दहा वर्षांचा मुलगा आहे. त्यामुळे मला रुग्णालयात राहाणंच जास्त योग्य वाटतं. मी गेली २२ र्वष हे काम करत आहे. शिफ्ट उशिरा संपली, उशिरा घरी गेले असं माझं नेहमी व्हायचं; पण घरापासून एवढे दिवस लांब राहिले आहे असं पहिल्यांदाच झालं आहे. सकाळी थोडा वेळ मिळतो तो मी नवरा आणि मुलाबरोबर बोलण्यात घालवते. वर्तमानपत्र वाचून ते मला सतत वेगवेगळे प्रश्न विचारत राहतात, पण मी माझ्या अडचणींचा त्यांना पत्ता लागू देत नाही. त्यांना काळजी वाटू नये म्हणून मी त्यांना फक्त सकाळच्या वेळेतच माझ्याजवळ फोन असतो; असं सांगते. मी थोडी फळं आणि सुकामेवा आणून ठेवला आहे. माझी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मी तो रोज खाते,’ ती सांगते. तिला रोज घरी जावं लागत नाही याचं तिला बरं वाटतं, कारण तिच्या रुग्णालयातल्या दोन परिचारिका रोज नोएडाला जातात. त्यांच्या कुटुंबीयांना करोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे.

हे डॉक्टर्स आणि परिचारिका सांगतात त्यानुसार दिल्लीतले कोविड-१९ वॉर्ड्स भरपूर मोठे आहेत. सहा फूट अंतर राखून बेड ठेवलेले आहेत. तिथे उजेड भरपूर आहे. ते दिवसभरातून अनेकदा सोडियम हायपोक्लोराइडने र्निजतुक केले जातात. प्रत्येकासाठी वेगवेगळे टॉयलेट शक्य नसल्याने तीन ते सहा रुग्ण एक टॉयलेट वापरतात. हे वॉर्ड वातानुकूलित नाहीत, पण तिथे हवा खेळती राहते. आपल्याकडे परदेशाच्या तुलनेत हवा उष्ण असल्याने डॉक्टर किंवा परिचारिका पीपीई सूट दोन तासांपेक्षा जास्त काळ घालू शकत नाहीत. त्यांच्यासाठी असे वॉर्ड्स तुलनेत बरे आहेत. चाळिशीचा डॉक्टर सांगतो. तो काम करत आहे, त्या ४५० बेडच्या रुग्णालयात कोविड-१९चे २०० रुग्ण आहेत. कोविड वॉर्डमध्ये कोणत्याही वेळेत परिचारिका, सुरक्षारक्षक, स्वच्छता कर्मचारी धरून सात जण असतात. डॉक्टर कोविड वॉर्डमध्ये नसतात तेव्हा या साथीदरम्यान सुरू करण्यात आलेल्या विशेष कोविड-१९ कार्यालयात असतात. ते वॉर्डमध्ये दिवसभरातून दोन फेऱ्या मारतात.

हा डॉक्टर सांगतो, ‘मी काम करायला सुरुवात केली तेव्हा पीपीई किट किती आहेत याचा आढावा घेतला होता. प्रत्येक शिफ्टमध्ये १५ किट वापरली जात असल्याचं तेव्हा लक्षात आलं. मग रुग्णांच्या फाइल्स पाहिल्या आणि मग परिचारिका, वॉर्डबॉय, स्वच्छता कर्मचारी या सगळ्यांशी करोनाचे रुग्ण कसे हाताळायचे आणि या साथीत कसं वागायचं याविषयी बोललो. त्यांच्यापैकी कुणी घाबरलेलं असेल तरी ते लगेच त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं. ते लगेच समजतं. मी त्यांना ते सांगतोही. मी त्यांच्याशी मजेदारच्या गप्पा मारतो, त्यामुळे खूप फरक पडतो.’

पन्नाशीच्या त्या परिचारिकेच्या रुग्णालयात कोविड-१९ चा संसर्ग झालेले तसेच संशयित मिळून ६०० रुग्ण आहेत. तर तिच्या वॉर्डमध्ये कोविड-१९ संसर्ग झालेले सहा रुग्ण आहेत. आम्ही एका शिफ्टला चार परिचारिका असतो. जी वॉर्डमध्ये जाते तिला पीपीई किट दिलं जातं. बाकीच्या सगळ्या सर्जिकल गाऊन आणि मास्क घालतात. ती सांगते, तिच्या रुग्णालयात सध्या १२० परिचारिका आहेत. त्या तीन शिफ्टमध्ये काम करतात.

१४ दिवसांची शिफ्ट संपवून घरी आलेल्या एका ३२ वर्षीय परिचारिकेसाठी पीपीई घालणं-काढणं हेच भयंकर वैतागाचं होतं. ‘आम्हाला कपडे बदलण्यासाठी वेगळी खोली नव्हती. आम्ही सहाही जणी एकाच ठिकाणी कपडे बदलायचो. पीपीईचा एकेक घटक काढला की मी माझे हात धुवायचे,’ ती सांगते. १४ दिवसांची शिफ्ट संपवून घरी आल्यावर ती वेगळ्या खोलीत राहते, स्वतंत्र टॉयलेट वापरते. तिच्या चपलाबुटांवर, कपडय़ांवर रोज डेटॉल ओतते. त्याचं कारण ती सांगते, नर्सेसची १४ दिवसांची शिफ्ट संपली की, डॉक्टरांची करतात तशी त्यांची रुग्णालयात करोना टेस्ट केली जात नाही की थर्मल स्क्रीनिंग केलं जात नाही. त्यामुळे त्या स्वत:च जमेल तेवढी काळजी घेतात.

तर पदव्युत्तर शिक्षण घेणारा  तरुण डॉक्टर सांगतो, ‘मी दिवसातून २०-२५ वेळा हात धुतो. पीपीई किट घालायला जी २० मिनिटं लागतात, त्यातही मी पाच वेळा हात धुतो आणि मगच रुग्णांना बघायला जातो. मला सुरुवातीपासून संसर्गजन्य आजारांच्या वॉर्डमध्येच काम करायला पाठवलं; पण मी काही घाबरत नाही. एकदा एका एचआयव्ही एड्स झाल्याची शक्यता असलेल्या रुग्णाला टोचलेल्या इंजेक्शनची सुई चुकून माझ्या शरीरात घुसली. तेव्हा पहाटेचे ३ वाजले होते. मी ताबडतोब माझीही चाचणी केली. तिला निकाल यायला सहा तास लागले. सुदैवाने ती निगेटिव्ह आली. अशा गोष्टी घडतात. तुम्ही त्या टाळू शकत नाही. आताही माझी १४ दिवसांची डय़ुटी संपली की माझी करोना चाचणी होईल,’ तो सांगतो.

या सगळ्यात व्हीआयपी रुग्णांना ‘झेलणं’ ही एक मोठीच गोष्ट असल्याचं पन्नाशीची परिचारिका सांगते. ‘खासगी रुग्णालयात जाता येत नाहीये म्हणून त्यांच्यापैकी बरीच मंडळी चिडचिड करत असतात. जेवणाबद्दल त्यांच्या सतत तक्रारी असतात. त्यांच्या मोबाइल फोनवरून ते आम्हाला लॅण्डलाइनवर, मोबाइलवर कॉल करून चहा, फळांचा रस, चाचण्यांचे रिपोर्ट मागत राहतात. एका रुग्णाने तर मी त्याचे रिपोर्ट दडवून ठेवत असल्याचा आरोप केला. क्लीनर, इलेक्ट्रिशियन, वॉर्डबॉय या सगळ्यांबद्दल त्यांच्या तक्रारी असतात. सगळ्या गोष्टींचा दोष ते परिचारिकेलाच देतात; पण आम्ही कुणाला बोलणार?’ ती विचारते.

चाळिशीच्या डॉक्टरच्या मते, ‘रुग्ण वैतागलेला असतो. कुटुंबापासून दूर असतो. त्याला भावनिक आधार हवा असतो, तो मिळत नाही. माझ्या शिफ्टच्या काळात मी थोडा वेळ समुपदेशकाचीदेखील भूमिका निभावतो. अलीकडेच एक तरुण करोनारुग्ण खिडकीच्या काठावर बसला आणि उडी मारायची धमकी दिली. त्याला ओढून घ्यावं लागलं. नंतर कळलं की, त्याला अमली पदार्थाचं व्यसन होतं आणि बरेच दिवस ते न मिळाल्याने तो विथड्रॉवल सिण्ड्रोममध्ये होता. असे प्रकार आम्हाला हाताळावे लागतात. या सगळ्यात माझ्या सहकाऱ्यांची प्रकृती नीट राहावी यासाठी मी त्यांना वेळच्या वेळी खाऊन घ्यायला सांगतो.’

पन्नाशीची परिचारिका सांगते, ‘आम्हाला ताजकडून जेवण मिळतं. ते उत्तम असतं; पण मी सारखं टॉयलेटला जावं लागू नये यासाठी पाणी जास्त पिणं टाळते, कारण टॉयलेटला जायचं असेल तर आम्हाला सगळा वैद्यकीय सूट उतरवावा लागतो. पुन्हा र्निजतुक करावा लागतो. बाकी सहकारी वापरतात तेच टॉयलेट वापरावं लागतं. या सगळ्याचा खूप ताण येतो. कोविड शिफ्टमध्ये काम करणं शारीरिकपेक्षा मानसिक पातळीवर जास्त थकवणारं आहे.’

पंचविशीची ती डॉक्टर १४ तासांची शिफ्ट संपली, की घरी परत जाण्यासाठीची तयारी सुरू करते. ती सगळ्यात आधी आंघोळ करते. आपण निघत असल्याचं आईवडिलांना कळवते. मग ते तिचं जेवण तिच्या रूमच्या बाहेर ठेवतात. तिच्या बॅगेत, कारमध्ये, घराच्या प्रवेशदारापाशी, तिच्या रूमच्या दारात, तिच्या बाथरूममध्ये सगळीकडे सॅनिटायझर ठेवलेला असतो. ती सगळीकडे सॅनिटायझरचा वापर करते. तिने वापरलेल्या प्लेट्स, कपडे ती प्लास्टिक बॅगेत घालून तिच्या रूमच्या बाहेर ठेवते. ते सगळं धुण्यासाठी एक स्वतंत्र बाथरूम वापरली जाते. हे एवढं सगळं करणं गरजेचं आहे का, असा प्रश्न तिचे पालक सतत तिला विचारतात; पण तिला असं वाटतं की, ते सगळंच गरजेचं आहे. ती म्हणते, ‘मलाही कोविड-१९ चा संसर्ग होऊ शकतो असं अनेकदा माझ्या मनात येतं; पण तसं काही झालं तर मी जाऊन रुग्णालयात दाखल होईन.’

डय़ुटी संपवून रूमवर आलेली पन्नाशीची परिचारिका सांगते, ‘आमच्या आधी १४ दिवसांची डय़ुटी संपवून गेलेल्या परिचारिकांनी राहण्याची नीट सोय व्हावी यासाठी निदर्शनं केली. डॉक्टरांची सोय फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये केली जाते, मग आमची का नाही? त्यामुळे आज आम्हाला सांगितलं गेलं आहे की, लवकरच आमच्यातल्या काही जणींची सोय इतरत्र केली जाईल. तिथे एका खोलीत दोन परिचारिका असतील. अ‍ॅटॅच्ड टॉयलेट असेल. हे लवकर व्हायला हवं आहे. कारण मला नीट, स्वच्छ आंघोळ करायची आहे. तोपर्यंत तिला वेदनाशामक गोळ्या आणि मोहम्मद रफीच्या गाण्यांचाच आधार आहे.’

‘द इंडियन एक्स्प्रेस’मधून साभार

(अनुवाद- वैशाली चिटणीस)