विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
विशेष मथितार्थ
आपण इतिहास शिकतो तो केवळ गुण मिळवून उत्तीर्ण होण्यासाठी; तो खरा शिकायचा असतो तो त्यातून धडे घेण्यासाठी. ४० दिवसांचा आपला गृहवास (लॉकडाऊन) संपेल असे वाटत असतानाच त्यात वाढ झाली. एका बाजूला करोनाबाधितांची संख्या वाढतेच आहे, त्यामुळे हा गृहवासही वाढणारच की काय, असा प्रश्न सर्वानाच भेडसावतो आहे. पलीकडे हातातले पैसे संपत चालले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या जाण्याच्या बेतात आहेत. यापूर्वीच रोजगार गमावलेल्यांची संख्याही अधिक आहे. अर्थव्यवस्थेचे चाक आधीच रुतत चालले होते, त्यात करोनाने घाला घातला अशी अवस्था आहे. दीर्घकाळ गृहवास परवडणारा नाही हे सामान्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांच्यापर्यंत सर्वानाच कळून चुकले आहे; पण समोर एक यक्षप्रश्न आहे तो म्हणजे आरोग्य की अर्थव्यवस्था. खरे तर हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत. म्हणूनच आता धैर्याचा वेगळा मार्ग सर्वानाच शोधावा लागणार आहे. अन्यथा आपण गृहवास पाळत बसू आणि नंतर उपासमारीची वेळ आपल्यावर येईल. त्यामुळे येणाऱ्या काळात करोनासोबतच राहण्याची सवय आपल्याला करून घ्यावी लागेल आणि त्यासाठीचे बळ आपल्याला इतिहासातील धडय़ांमधून मिळवावे लागेल!
मोठय़ा प्रमाणावर जंतुसंसर्गाची झालेली लागण ही माणसाने प्राणी माणसाळवण्यास सुरुवात केल्यानंतर सुरू झाल्याचे आजवर पुराविदांना आणि जंतुसंसर्गावर काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या लक्षात आले आहे. त्याचा कालावधी सुमारे सनपूर्व नऊ हजार वर्षे मागे जातो. माणसाळवलेले बहुतांश प्राणी हे युरेशियामधील म्हणजेच युरोप व आशियातील आहेत. शेती करणे आणि प्राणी माणसाळवणे याचे पहिले पुरावे सापडले आहेत ते मध्यपूर्वेमध्ये.
अलीकडचा इतिहास असे सांगतो की, १६ व्या शतकाच्या सुमारास हे माणसाळवलेले प्राणी घेऊन युरोपियनांनी आफ्रिका अणि दक्षिण अमेरिका पादाक्रांत करण्याचा विचार केला आणि इंका साम्राज्यावर धडकले. तोपर्यंत युरोपात आलेल्या विविध साथींच्या आजारांतून मृत्यू पावणाऱ्यांची संख्या बराच काळ वाढती राहिलेली असली तरी युरोपीयन मंडळी त्या साथीच्या विकारांसोबत राहायला शिकली. वेगवेगळे धडे शिकून त्यांनी स्वत:च्या सवयी बदलल्या. ही मंडळी त्यानंतर इंका साम्राज्यात पोहोचली त्या वेळेस त्यांच्यासोबत देवीचा विषाणूही तिथे पोहोचला आणि त्याने तोवर विलग राहिलेल्या इंकावासीयांचा बळी घेण्यास सुरुवात केली. अर्थात प्रसिद्ध मनुष्यवंशशास्त्रज्ञ डॉ. जेरार्ड डायमंड यांच्या मते विषाणू आणि युरोपातून आलेल्यांकडे असलेले उत्तम तंत्रज्ञान (बंदुका) या दोन्हींनी नवप्रांतातील स्थानिकांचा बळी घेतला.
अलीकडच्या काळातील इतिहासाबाबत म्हणजे गेल्या पाचशे वर्षांच्या इतिहासाबाबत बोलायचे तर मध्यपूर्वेतून जीवजंतू जगभरात पोहोचले, असे तज्ज्ञांचे मत आहे. यात ज्यांनी साथी वारंवार झेलल्या त्यांच्यामध्ये त्या साथींच्या विषाणूंप्रति असलेली प्रतिकारक्षमता वाढत गेली आणि पिढीदरपिढी ती संक्रमितही होत गेली. दक्षिण आफ्रिकेमध्ये मात्र युरोपियनांना तेथील उष्णकटिबंधीय विषाणूंना सामोरे जावे लागले ज्याची त्यांना सवयच नव्हती. तिथे मलेरियामुळे बळी गेलेल्या युरोपियनांची संख्या अधिक होती. उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये युरोपियनांनी जिवापाड जगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या वातावरणात ते तग धरू शकले नाहीत. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण त्या वातावरणात कार्यरत राहण्यासाठी म्हणून असलेली रोगप्रतिकारक शक्ती युरोपियनांकडे नव्हती. त्याच वेळेस तिथे स्थानिक असलेल्या उष्णकटिबंधीय आफ्रिकन सर्वच जमातींमध्ये ती प्रतिकारक्षमता अधिक होती. कारण वर्षांनुवर्षे त्यांच्या पिढय़ांनी मलेरियाच्या साथीकडून धडे घेतले आणि स्वत:च्या वस्त्या या मलेरियाच्या डासांची उत्पत्ती कमी असलेल्या, किंबहुना तुलनेने कोरडय़ा असलेल्या ठिकाणी नेल्या होत्या. उलटपक्षी इथे आलेल्या आणि तुलनेने प्रगत असलेल्या युरोपियनांनी मात्र नद्या, तळी यांच्या काठांवर आपल्या वस्त्या केल्या होत्या ज्या मलेरियाच्या डासांचे उत्पत्तिस्थान होत्या. यातील आणखी एक लक्षात घेण्याजोगा भाग असा की, आपण त्या कालखंडाबद्दल बोलत आहोत, ज्या वेळेस फारशा लशी उपलब्ध नव्हत्या, विज्ञान फारसे प्रगत नव्हते. मात्र त्याही काळी आफ्रिकेतील फारशी प्रगती नसलेल्या माणसांच्या असे लक्षात आले होते की, डास मोठय़ा प्रमाणावर चावले की, विशिष्ट प्रकारचा प्राणघातक ताप येतो. त्यानंतर त्यांनी वसतिस्थान बदलले. दरम्यानच्या काळात त्यांच्याही शरीरामध्ये स्थानिक असलेल्या अनेक विषाणूंच्या बाबतीत प्रतिकारक्षमता तयार झाली आणि त्याचा फायदा त्यांच्या संपूर्ण समाजालाच झाला.
मात्र साथीचे आजार हे काही फक्त गेल्या पाचशे वर्षांमध्येच आलेले नाहीत. तर त्याही पूर्वी म्हणजे अगदी इसवी सनपूर्व शतकांमध्येही ते अस्तित्वात होते. आपल्याकडे त्या वेळेस फारशी लेखन परंपरा नव्हती. मात्र युरोपातील साम्राज्यांमध्ये होती. त्यामुळे त्याच्या नोंदी त्यांच्याकडे सापडतात. त्यात निरीक्षणांनंतर बदललेले मानवी वर्तन म्हणजेच गोष्टी शिकल्यानंतर स्वत:चे बदललेले वर्तमान यावर त्यांनी भर दिलेला दिसतो. आपल्याकडे इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकानंतरचे पुरावे सापडतात. तेव्हापासून ते अगदी पोर्तुगीज भारतात येईपर्यंत म्हणजे १५५५ सालापर्यंतच्या इतिहासात हे लक्षात येते की, संपूर्ण जगभरामध्ये त्याही वेळेस साथीचे रोग होतेच. त्यांच्या प्रसाराचा मार्ग हा व्यापारी रेशीम मार्ग होता. माणूस कधीच एका ठिकाणी जखडून किंवा बसून राहात नाही. हा महत्त्वाकांक्षा असलेला आणि नवनवीन प्रांत शोधणारा, प्रयोग करणारा प्राणी आहे. इसवी सनपूर्व दुसरे ते अगदी सोळाव्या शतकापर्यंत चीन- भारतातून युरोपापर्यंत जाणारा रेशीम मार्ग हा जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा होता. याच मार्गावरून जगभरातील सर्वात मोठी ये-जा सुरू होती. या मार्गाला काही ठिकाणी आव्हान मिळाल्यानंतर भारतीय व्यापाऱ्यांनी त्यावर मात करत सागरी रेशीम मार्ग शोधून काढला. लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे मानवाने वेळोवेळी संकटांवर मात केली आहे. याच दोन्ही म्हणजे जमीन आणि सागरी अशा दोन्ही मार्गानी साथीचे रोग पसरत गेले. संपूर्ण मानव जात नष्ट होईल की काय, असा प्रश्न पडावा, असे प्रसंग आणि क्षण इतिहासात अनेकदा येऊन गेले आहेत. मात्र मानव त्याला सामोरा गेला आहे. कधी त्याने निरीक्षणानंतर स्वत:च्या सवयी बदलल्या, तर कधी त्याने त्याच्यासोबत जगण्याचा मंत्र स्वीकारून आपली प्रतिकारशक्ती वाढवत नेली. त्या त्या कालखंडातील लिहिल्या गेलेल्या नोंदींमधून आपल्याला याची पावती मिळते. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते अगदी मुस्लीम आक्रमणापर्यंत म्हणजे सुमारे एक हजार वर्षे बौद्ध धर्म हा जगातील महत्त्वाचा धर्म राहिला. त्याचाही प्रसार या रेशीम मार्गानेच झाला आणि प्रसारार्थ निघालेल्या बौद्ध भिक्खूंना त्याच साथींना सामोरे जावे लागले. आपल्याकडील म्हणजेच बहुतांश आशिया खंडातील तत्कालीन साथींची व त्यावरील उपायांची सहज येणारी माहिती इसवी सनाच्या आठव्या शतकापासून तिबेटमधील किंवा तिथे गेलेल्या भिक्खूंनी केलेल्या नोंदींमधून पाहाता येते. या नोंदी प्रामुख्याने धर्मप्रसार आणि त्याच्याशी संबंधित आहेत. मात्र अनुषंगाने येणाऱ्या बाबींमध्ये ही माहिती येते.
एकुणात काय, तर विषाणू किंवा रोगाची साथ ही काही या जगाला नवी नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत करोनाला घाबरून जाण्याचे कारण नाही. तर इतिहासातील या धडय़ांकडून प्रेरणा घ्यायला हवी. ती घेतली तर असे लक्षात येईल की, निरीक्षणांती आपल्याला सवयी बदलाव्या लागतील. ज्या शतकांतील माहिती आपण घेतली त्या वेळेस तर विज्ञान आजच्या इतके प्रभावी किंवा प्रगतही नव्हते. आज प्रभावी वैज्ञानिक मार्ग आपल्या हाती आहे. करोनाच्या निमित्ताने आपण विज्ञानवादी होत आचरण करायला हवे. स्वत:मध्ये वर्तनात बदल करायला हवेत. कदाचित यापूर्वी शालेय क्रमिक पुस्तकातील ‘सामुदायिक जीवन’ आपण फारसे गांभीर्याने घेतलेले नसेल तर आता हीच वेळ आहे, ते गांभीर्याने घेण्याची. सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, खोकताना किंवा िशकताना नाका-तोंडावर रुमाल ठेवणे किंवा प्राप्त परिस्थितीत मुखपट्टी वापरणे अशा शिस्तपूर्ण सवयी लावाव्या लागतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतिहासाकडून प्रेरणा घेत शिस्त पाळू, फक्त आपलीच नव्हे तर संपूर्ण समाजाची प्रतिकारशक्ती वाढवू आणि निधडय़ा छातीने करोनाला सामोरे जाऊ.
पाळू शिस्त, राहू मस्त!