अर्जुन नलवडे – response.lokprabha@expressindia.com

स्मशानशांतता पसरलेल्या रस्त्यावरून दुचाकी वाशीमधील (नवी मुंबई) सिडको प्रदर्शन केंद्राच्या दिशेने जात होती. मुंबईला जोडणाऱ्या वाशीच्या उड्डाणपुलाखालून उजव्या दिशेला असणाऱ्या केंद्राच्या गेटजवळ दुचाकी थांबवून उतरलो आणि गेटवर पहारा देणाऱ्या वॉचमनला विचारलं, ‘‘बहार के लोगों को किधर रखा है’’ त्याने ‘चलो मेरे साथ’ म्हणत एका भल्या मोठय़ा सभागृहाजवळ नेलं. तिथे उभ्या असलेल्या पोलिसांशी औपचारिक चर्चा झाली आणि सभागृहात जाण्याची परवानगी मिळाली. हे सिडकोचं प्रदर्शन केंद्र प्रशस्त आहे. एरवी केंद्राभोवती असणारी आकर्षक झाडं केंद्राची शोभा वाढवितात. आता मात्र त्या झाडांवर चिमुरडय़ांची झबली-दुपटी, साडय़ा, पुरुषांचे फाटकेतुटके रंगबेरंगी कपडे, टॉवेल, अंथरुण-पांघरुण असं बरंच काही धुऊन वाळत टाकलेलं. काही स्त्रिया गवतावर साडय़ा अंथरून त्यावर चिमुरडय़ांना पाजत बसल्या होत्या. ८-९ वर्षांच्या मुली एकमेकींचे केस विंचरत वेणी घालत होत्या. वृद्ध आपापले चष्मे सावरत बसले होते. सभागृहात डोकावलं तर लांबच्या लांब हिरव्या ताडपत्रीवर अनेक तरुण मजूर आपापलं बिऱ्हाड उशाला घेऊन पहुडलेले होते. हातात मोबाइल घेऊन कोणी गेम खेळत होतं, तर कोणी गावाकडील नातलगांना फोन करून भावविवश होऊन बोलत होतं. सभागृहातल्या पंख्यांच्या वाऱ्यामध्ये पहुडलेलं स्थलांतरितांचं चित्र करोनाच्या परिस्थितीचं गांभीर्य ठळकपणे अधोरेखित करत होतं.

Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
Rajasthan Candidate Who Slapped sdm
‘थप्पड’ प्रकरणाने राजस्थानात तणाव; सरकारी कर्मचाऱ्यांचा संप; अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांना अटक, समर्थकांकडून जाळपोळ
Garbage piles up in various places in the city due to the recruitment of election workers Mumbai news
शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग; निवडणूक कामातील कामगारांच्या नियुक्त्यांमुळे कचरा व्यवस्थापनाची घडी विस्कटली
bjp leader ashish shelar article allegations on shiv sena ubt for plot grab in dharavi
पहिली बाजू : भूखंड खादाडांचा डाव उद्ध्वस्त
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात टाळेबंदी घोषित झाली अन् हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या, कामगारांच्या हातचं काम गेलं. अशा परिस्थितीत लवकरात लवकर गाव जवळ केलेलं बरं.. म्हणून मुंबईतल्या स्थलांतरित मजुरांच्या झुंडीच्या झुंडी चालत निघाल्या. तोपर्यंत राज्यांच्या, जिल्ह्य़ांच्या आणि गावांच्याही सीमा बंद करण्यात आल्या होत्या. तरीही या स्थलांतरितांच्या झुंडी आपल्या उघडय़ानागडय़ा मुलांना कडेवर घेऊन, पाठीवर आपलं बिऱ्हाड घेऊन डोंगरदऱ्यांतून, आडमार्गाने, शेतांतून प्रवास करू लागल्या. मात्र ही बाब प्रशासनाच्या लक्षात आली तसं स्थलांतरितांना गाठत सर्वाची समजूत काढून सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात भरती केलं. चालत गुलबग्र्याला (कर्नाटक) जायला निघालेल्या आणि इथं येऊन पडलेल्या पार्वती चव्हाण यांनी करोनामुळे आपल्यापुढे उभ्या ठाकलेल्या प्रश्नांचा पाढाच वाचून दाखवायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, ‘गावाकडे होळी झाली अन् पोट भरण्यासाठी मुंबईचा रस्ता धरला. पण काही दिवसांतच करोनाची साथ पसरली आणि हातात असलेलं काम गेलं. त्यात टाळेबंदी सुरू झाली. मग इथे थांबून काय उपयोग? म्हणून गावाकडे परत जाऊ या, या विचाराने आम्ही सर्वानी चालत घरी जाण्याचा निर्णय घेतला. पहाटे चार वाजता वांद्रे पूर्वेच्या बीकेसीपासून चालायला सुरुवात केली आणि रात्री १२ वाजता पनवेलपर्यंत पोहोचलो. पण तिथे काही पोलीस आणि इतर मंडळी आली. त्यांनी सांगितलं की, तुम्हाला तुमच्या घरी जाता येणार नाही. कारण,तुमच्या राज्याच्या सीमा बंद केल्या आहे. सरकारने तुमच्या जेवणाखाण्याची आणि राहण्याची सोय केली आहे, तिथे चला. त्यानंतर आम्हाला इथे आणलं. आमच्या पोटाची सोय झाली खरी पण, गावाकडे आमची लहान पोरं हॉस्टेलला राहून शिकताहेत. त्यांच्या शाळा, हॉस्टेलदेखील बंद झाली आहेत. ती पोरं घरी आली आहेत आणि आम्ही इथे अडकून पडलो आहे. त्या पोरांच्या खाण्यापिण्याची सोय नाही. शेजारचे किती दिवस सांभाळतील? रोज त्यांचा फोन येतो, रडत-रडत म्हणतात की, ‘आई.. तू कधी येणार?’ हे ऐकून जीव रडकुंडीला येतोय. काम नाही, त्यामुळे हातात पैसा नाही. मोबाइलमधला बॅलन्स संपला की मुलांशी बोलणंदेखील होणार नाही. काय करावं कळत नाही. आमची सरकारला एकच विनंती आहे, काहीही करून आम्हाला आमच्या मुलाबाळांकडे पोहोचवा. खूप उपकार होतील.’ घरची परिस्थिती सांगताना पार्वतीबाईंच्या डोळ्यांत पाणी येत होतं आणि आपल्या पदराने डोळे पुसत त्या अडचणी सांगतच होत्या.

करोनामुळे आजूबाजूची परिस्थिती आणखीच गंभीर होत चालली आहे. अशात या स्थलांतरितांना इथे राहणं त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेचं आहे. पण प्रश्न असा आहे की, गावाकडे असणाऱ्या त्यांच्या मुलांबाळांचं काय? त्या मुलांना शेजारचे किती दिवस सांभाळणार आहेत? कामधंदा बंद पडल्यामुळे त्यांच्याही घरी आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असतील आणि मुलांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होईल. एकीकडे उपाशी मुलं आणि दुसरीकडे आईबाप परगावी, अशा परिस्थितीत स्थलांतरित अडकलेले आहेत. सिडकोच्या केंद्रात ६-७ महिन्यांची, वर्षांची लहान लेकरं घेऊन राहणाऱ्या स्त्रियांच्या शारीरिक अडचणी गंभीर आहेत. १५-२० दिवसांपासून या चिमुरडय़ांना थंड पाण्याने आंघोळ घातल्यामुळे सर्दी, ताप, खोकला झालेला आहे. सकाळी एक ग्लास आणि संध्याकाळी एक ग्लास दूध यावरच या मातांना आपल्या लेकरांची भूक भागवावी लागत आहे. आजूबाजूला माणसं असल्याने स्तनपान करणंही जिकिरीचं होऊन बसलं आहे. कपडेही वेळच्या वेळी बदलता येत नसल्यामुळे अंगाला दरुगधी येत आहे, अशा व्यथा या स्त्रियांनी मांडल्या. कर्नाटकच्या इलाबाई सांगतात की, ‘आमची लहान मुलं थंड पाण्याने आंघोळ केल्याने आजारी पडत आहेत. इथं येतात ते डॉक्टर एकाच प्रकारचं औषधं सर्वाना देतात. सर्दी, ताप, खोकला सर्वावर एकच गोळी दिली जाते. गावाकडे माझी तीन मुलं आहेत. आई येईल, म्हणून ती वाटेकडे डोळे लावून बसली आहेत. इथं लहान मुलांसाठी साडय़ांचा पाळणा करून लेकरांना हलवत झोपवता येत नाही, त्यामुळे मुलं सतत रडत असतात. ग्लासभर दुधात त्यांची भूक कशी भागवता येईल? जो नाश्ता दिला जातो, त्याने पोट भरत नाही. आमची सरकारला हात जोडून विनंती आहे, काहीही करून आम्हाला आमच्या घरी सोडा.’ या स्त्रियांचं म्हणणं एकच आहे. आमच्या सर्व तपासण्या केल्या आहेत. त्यात आम्हाला काहीही झालेलं नाही. तर कशाला आम्हाला इथं आणून ठेवलं आहे. आम्हाला इथून घरी सोडलं तर आमच्या मुलांकडे जाता येईल. गर्दीच्या ठिकाणी स्त्रिया राहू शकत नाहीत. त्यांच्या शारीरिक अडचणी असतात. मुलांच्या आरोग्याची तपासणी करायला बालरोगतज्ज्ञ येत नाही की स्त्रियांची तपासणी करायला स्त्री-रोगतज्ज्ञ येत नाही. करोना नाही, पण इतर आजार त्यांना नक्की होतील, असे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे.

सध्या वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये १४२ पुरुष, ५७ स्त्रिया आणि २७ लहान मुले आहेत. त्यामध्ये कर्नाटक प्रांतातील गुलबर्गा, यादगीरमधील सर्वात जास्त स्थलांतरित आहेत. तर उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, मध्य प्रदेशातील स्थलांतरितदेखील आहेत. यांना देण्यात येणाऱ्या सुविधांबद्दल निवारा प्रमुख, मंडल अधिकारी, आर. बी. बोऱ्हाडे सांगतात की, ‘स्थानिक व्यावसायिक भूपेश गुप्ता यांच्याकडून या स्थलांतरितांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. त्यात सकाळी नाश्त्यामध्ये वडा, कचोरी, उपमा, दुपारी जेवणात डाळभात, चपाती, पुन्हा संध्याकाळी साडेसात वाजता डाळभात दिला जातो. लहान मुलांना दूध दिलं जातं. प्रत्येकाला औषध पुरवलं जातं. प्रत्येकासाठी ताट, वाटय़ा, चादर देण्यात आलेली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रात येऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.’ ही झाली प्रशासनाची बाजू. मात्र, आर. बी. बोऱ्हाडे यांच्यासमोर असणारे दोन-तीन औषधांचे बॉक्स आणि त्यात असणारी दोन-चार गोळ्यांची पाकिटेच एकूण परिस्थिती सांगत होती. चार दिवसांपासून ताप, सर्दी, खोकल्याने आजारी पडलेल्या एका अशक्त दिसणाऱ्या मुलाची आई सांगत होती, ‘आम्हाला घरी जाऊ द्या. आमच्या लेकराबाळांचे खूप हाल होत आहेत. आम्ही इथे आमची आणि बाळाची काळजी कशी घ्यायची? आम्हाला जाऊ द्या घरी.’ तिच्या कुशीत निजलेलं आणि कण्हत असलेलं बाळ खरंच गैरसोय होतेय, याची साक्ष देत होतं.

या सर्व माणसांनी भुकेपोटी मुंबई गाठलेली आहे. त्याच मुंबईमध्ये करोनाने कहर केला आहे. गावाकडच्या नातलगांना यांच्या आरोग्याची काळजी लागून राहिलेली आहे. ही कैफियत सांगताना उत्तर प्रदेशचा श्रीधर लोधी म्हणतो की, ‘गावाकडे फोन करतो तेव्हा घरातले एकच सांगतात की, काहीही करून घरी ये. गाडीची व्यवस्था नसेल तर चालत ये. पण, घरी निघून ये. राहू नको मुंबईत. आमची तपासणी झालेली आहे, त्यात आम्हाला काहीही झालेलं नाही, असं सांगितलं आहे. मग, आम्हाला घरी पाठविण्याची सोय का करत नाहीत? मला तर वाटतं की मी करोनाने नाही तर, गावाकडच्यांच्या विचाराने, चिंतेनेच मरून जाईन.’ पंजाबचा गुरप्रीत सांगतो की, ‘मी ट्रक ड्रायव्हर आहे. गावाकडे आई असते. तिचं वय झालं आहे. ती सतत आजारी असते. आता मी इकडे अडकलो आहे. मला काहीतरी होईल, अशी काळजी तिला वाटते. म्हणून ती म्हणते लवकर घरी निघून ये. फोन केला तर कधी येतोयस, असं विचारते. आता आईला काय सांगायचं, हा प्रश्न पडतो. त्यामुळे फोन करणंच टाळतो.’ केंद्रात प्रशासनाकडून महाराष्ट्रातले स्थलांतरित आणि परप्रांतातले स्थलांतरित यांच्यामध्ये भेदभाव केला जातो असा काहीजणांचा आरोप आहे. त्याबद्दल उत्तर प्रदेशचा इंद्रजीत जैसवाल सांगतो की, ‘केंद्रात  आम्हाला आणलं गेलं तेव्हा इथे महाराष्ट्रातले स्थलांतरित होते. पण, हळूहळू इथल्या प्रशासनातील माणसांबरोबर संगनमत करून घरी जाण्याची व्यवस्था त्यांनी करून घेतली. मात्र, आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. मी गॅरेजमध्ये मेस्त्री आहे. जवळचे पैसे संपले आणि टाळेबंदीमुळे दुकानंही बंद झाली आहेत. मोबाइलमधला बॅलन्स संपला आहे. घरच्यांना फोन करू शकत नाही. इथे प्रत्येक जण काळजीत आहे. त्यातून भांडणं होतात. पोलीस येऊन आम्हालाच रागावतात. गरिबांचे कोणी ऐकून घेत नाही. महाराष्ट्रातील लोक एक-एक करून घरी गेले आणि आम्ही अजून इथेच आहोत. आम्हालाही घरी जाऊ द्या.’ वैतागलेल्या सुरात तो बोलत असतानाच लुंगी आणि बंडी घातलेले कर्नाटकचे हरिश्चंद्र जाधव नाकावरचा चष्मा डोळ्यांकडे सरकवत समोर आले आणि घरातील  अडचण सांगू लागले, ‘आम्ही मजुरीची कामं करतो. र्अध कुटुंब इकडे तर र्अध तिकडे, अशी अवस्था असते. पोटापाण्याचा आणि मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवता यावा, म्हणून दोन महिन्यांपूर्वीच मुंबईत आलो. करोना आणि टाळेबंदीने हातातले कामच हिसकावून नेले. आमची मुलं शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये आहेत. आम्ही इकडे आलो होतो. आता, धड इकडचे नाही आणि तिकडचेही नाही, अशी परिस्थिती झाली आहे. सगळीकडेच टाळेबंदी झाल्यामुळे हॉस्टेलमधील मुलं गावाकडे घरी आली आहेत आणि आम्ही त्यांचे आईबाप मात्र इथे अडकून पडलेलो आहोत. मुलं दररोज फोन करून विचारतात की, कधी येणार घरी? या ठिकाणी आम्हाला आणून आमच्या पोटापाण्याची सोय तुम्ही केली. पण, घरी असलेल्या मुलांच्या भुकेचं काय? त्यांना कोण देणार? मोबाइलमुळे तेवढीच त्यांची समजूत काढता येते. पण, तोही बॅलन्स संपला की बंद होईल. घरातले सगळे कमवणारे इकडे अडकलेत आणि त्यांचं सगळं लक्ष त्यांच्या गावाकडच्या मुलांबाळांकडे लागून राहिलं आहे. शासनाकडे विनंती आहे की, आम्हाला घरी जाण्याची सोय करून द्या.’’

हतबुद्ध झालेला बाप पोरांच्या काळजीत आपली कहाणी सांगत होता. हे ऐकणाऱ्या वयस्क धर्माबाई चव्हाण म्हणाल्या की, ‘सरकारने आरोग्याच्या काळजीपोटीच आम्हा सर्वाना इथं आणून ठेवलं आहे. सरकारला आपण कमवून दिलं आहे का, तरीही आपल्या पोटाची काळजी त्यांना आहे. पण, आम्ही आडाणी लोक आहोत. आम्हाला मोबाइल चालवता येत नाही. गावाकडे मुलंबाळं आहेत. त्यांना फोन करायचा म्हटलं तर आमच्याकडे फोन नाही. ते कसे आहेत, काय खाताहेत, कसे राहाताहेत, काहीही चौकशी करता येत नाही. कागदावर लिहिलेला मोबाइल नंबर घेऊन मोबाइल असणाऱ्यांकडे जायचं आणि त्याला फोन लावण्याची विनंती करायची. पण तोही एखाद वेळेला देतो. कारण बॅलन्स संपायची त्यालाही भीती असते.’ लीलाबाई राठोड म्हणाल्या की, ‘आमच्याकडे कपडे नाहीत. एकाच कपडय़ावर आम्ही चार-चार दिवस राहात आहोत. एकाला कोलगेट मिळते, तर एकाला नाही. आंघोळीचा साबण मिळणं कठीण झालं आहे. बायकांच्या शारीरिक अडचणी निर्माण होत आहेत. इथं एकच डॉक्टर येतो आणि तोच मुलांना, पुरुषांना आणि बायकांना तपासतो. आणि एकाच प्रकारच्या गोळ्या देतो. खरं तर दिवसभर काम केलं तर संध्याकाळी आमची चूल पेटते. गावाकडे असलेल्या म्हाताऱ्या माणसांच्या आणि लहान मुलांच्या मनात भीती पसरली आहे. सरकारने आम्हाला लवकर घरी सोडावं, हीच विनंती आहे.’ या सगळ्यांशी बोलून, त्यांच्या समस्यांची नोंद घेऊन सभागृहाच्या बाहेर येत असताना एका वयस्क आजींकडे लक्ष गेलं.

विस्कटलेले केस, रापलेला चेहरा, अंगात काळ्या रंगाचा गाऊन, त्यावर तपकिरी रंगाचा मळकटलेला स्वेटर, गळ्याभोवती निळ्या रंगाची शाल, हात-पाय सुजलेले, हातात मळलेली उशी घेऊन बसलेल्या सत्तरीच्या या आजी आपल्या आजूबाजूला घोंगावणारे डास हाकलत होत्या. त्यांना बघून वाटलं की, वय झाल्यामुळे घरातल्या लोकांनी बाहेर काढलं असावं आणि भीक मागून त्या जगत असाव्यात. जवळ जाऊन विचारपूस केली तर आश्चर्याचा धक्काच बसला. त्या अस्खलीत इंग्रजीमध्ये गेल्या २३ दिवसांत टाळेबंदीच्या काळातली परिस्थिती थरथरत्या आवाजात सांगू लागल्या की, ‘आम्ही नातवाच्या परीक्षेसाठी सुनेसोबत अजमेरला गेलो होतो. अजमेर ते तमिळनाडू रेल्वेचं तिकिटही बुक करून ठेवलं होतं. ऐन वेळी करोनामुळे रेल्वे रद्द झाली. आम्ही मुंबईत वांद्रे रेल्वे स्टेशनला आलो आणि इथेच अडकून पडलो.’ आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा संपूर्ण हकीकत समोर आली. या आजींचे नाव दौलथ बेकुम ए.! त्या तमिळनाडूच्या एका सरकारी महाविद्यालयातून प्राचार्य पदावरून निवृत्त झालेल्या आहे. त्या अपस्माराच्या (आकडी) रुग्ण आहेत. तसेच रक्तदाब, मधुमेह याचाही त्रास आहे. सून, नातू आणि आजी असे तिघे जण केंद्रात २३ दिवस अडकून पडले आहेत.

खरं तर अशा वयस्कर रुग्णांची काळजी एरवीही घेतली जायलाच हवी. मात्र करोनाच्या साथीत तर विशेष काळजी घेतली जायला हवी. मात्र ती घेतली गेलेली दिसत नाही. खरं तर करोना विषाणूंच्या प्रादुर्भावात या आजींचं वय पाहिले असता, धोकादायक गटात त्यांचा समावेश होतो. अनेक आजार आणि प्रतिकारशक्ती कमी, अशा या आजी आहेत. त्यांच्या बाबतीत प्रशासनाकडून हलगर्जीपणा केला जात आहे, हे स्पष्ट दिसते. या सर्व परिस्थितीत उच्चशिक्षित आणि सरकारी सेवेत आपले जीवन व्यतीत केलेल्या आजींच्या वाटय़ाला हे दिवस यावेत, हेच क्लेशकारक आहे. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच निवारागृहाला भेट देऊन गेले. पण त्यांच्यापर्यंत या आजींची व्यथा पोहोचली की नाही ते कळायला मार्ग नाही. या करोनाकहरात या आजींना त्यांच्या नशिबाने तरी साथ द्यावी, इतकीच अपेक्षा!!

छायाचित्र : नरेंद्र वास्कर