अर्जुन नलवडे

महाराष्ट्रात ‘मार्च, एप्रिल आणि मे’ या तीन महिन्यांमध्ये लग्नसराई, मुंज, बारसे आणि इतर तत्सम कार्यक्रमांची घाईगडबड असते. बाजारपेठाही गजबजलेल्या असतात. ग्राहकांची गर्दी असते. विविध वस्तूंची खरेदी करण्यापासून पाहुण्यांना आमंत्रण देण्यापर्यंत सगळीकडे नातेवाईकांची वर्दळ असते. परतुं, करोना आणि टाळेबंदीमुळे यंदाचे हे तीन महिने अगदीच शांततेच चालले आहेत. असे असले तरीही काहींचे विवाह हे डिसेंबर, जानेवारी महिन्यांमध्ये ठरलेले होते. मुलांची सुट्टी आणि मुहूर्त पाहता एप्रिल-मे महिना फार महत्त्वाचा असतो. मग, ठरलेल्या विवाहाचा मुहूर्त टाळायचा कसा, लोकांना आमंत्रण कसे द्यायचं, यातून मार्ग कसा काढायचा, अशा प्रश्नांच्या गोंधळात आताचे पालक आहेत.

मात्र, यावर किरण निंभोरे या सुशिक्षित तरुणाने आपला विवाह फेसबुक आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून करण्यात यावा, अशी विनंती आई-वडिलांना आणि वधूकडील नातेवाईकांना केली. आणि सद्यस्थिती पाहता नातेवाईकांनीही त्याच्या विचाराला दुजोरा दिला. किरणला यासंदर्भात विचारले असता तो म्हणाला, “विवाह २७ एप्रिलला होणार असे  जानेवारीमध्ये ठरलेले होते. मात्र, करोना आणि टाळेबंदीमुळे सामाजिक परिस्थिती गंभीर झाली. सुरुवातीस १४ एप्रिलला टाळेबंदी उठेल आणि २७ एप्रिलचा मुहूर्त सापडेल, असा विचार होता. परंतु, टाळेबंदी आणखी वाढली. अशा परिस्थितीत माझ्या आणि मुलीच्या आईवडिलांना २७ एप्रिलला घरातच ऑनलाईन विवाह पार पाडू शकतो, अशी विनंती केली. टाळेबंदीमुळे विवाहाला येऊ न शकणाऱ्या नातेवाईक आणि आप्तस्वकियांपर्यंत आपण पोहोचू शकतो, असे सांगितले. त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ठरलेला मुहूर्तदेखील गाठू शकतो. दोन्ही घरातील लोकांना माझा विचार पटला आणि त्यांनी ऑनलाईन विवाहाला मान्यता दिली.”

किरण निंभोरे आणि त्याचा मित्र महेश बडे हे दोघे पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांच्या हक्कांसाठी एमपीएससी विद्यार्थी हक्क आणि वास्तव कट्टा युट्यूब या चॅनेलच्या माध्यमातून लढा देत असतात. आणि आता टाळेबंदीच्या काळात पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांच्या जेवणाखाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून त्यात हे दोघे आणि त्यांचे काही सहकारी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या व अडकलेल्या मुलांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या संदर्भात महेश बडे सांगतो, “टाळेबंदीमुळे स्पर्धा  परीक्षेच्या मुलांच्या खाणावळी बंद झाल्या. मुले सुरुवातीला मॅगी आणि इतर पदार्थ खाऊन दिवस काढत होती. १४ एप्रिलनंतर टाळेबंदी उठली की, घरी जाता येईल, ही त्यांची अपेक्षा होती. मात्र, टाळेबंदी वाढली. आता त्यांच्या जेवणाचा खरा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या स्वयंसेवी संस्था आणि दानशूरांच्या मदतीने दररोज ११०० मुलांच्या जेवणाची सोय कशीबशी केली जाते. मात्र, ३ मेनंतर जेवण मिळेल का, हा प्रश्न मुलांसमोर आ वासून उभा आहे.” पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांची संख्या अधिक आहे. ३ मेनंतर घरी जाण्यासाठी शासनाने मदत करावी, ही विनंती मुले करत आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर किरणने घरातील सदस्यांना समजावून ऑनलाईन विवाह करण्याची आणि लग्नात जेवणासाठी येणारा खर्च स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी करण्याची परवानगी घेतली. इथून पुढे ४ दिवस ११०० मुलांच्या जेवणाचा खर्च किरण आपल्या लग्नाच्या खर्चातून करणार आहे. किरणची ही कल्पना खरंच कौतुकास्पद आहे. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून समाजसेवेसाठी पाऊल उचलणाऱ्या किरण निंभोरेच्या ऑनलाईन विवाहाला आपण उपस्थिती दर्शवून शुभेच्छा आणि आशीर्वाद जरूर द्यावेत.