वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com
यंदा करोनाने सगळ्याच गोष्टी मोडीत काढल्या आहेत. या करोनाकहराचा मोठा फटका यंदाच्या लग्नसराईला बसला आहे. एरवी दिवाळीनंतर काही दिवसांनी तुळशीचं लग्न लावलं की आपल्याकडची लग्नसराई धुमधडाक्यात सुरू होते ती जून- जुलैपर्यंत चालते. आपल्याकडे कुटुंबव्यवस्थेचं महत्त्व टिकून असल्यामुळे लग्न हे त्या दोघांपुरतं रहात नाही तर तो सगळ्या कुटुंबाचा इव्हेंट असतो. कुटुंबाचा इव्हेंट म्हणजे वधुवरांचे आईवडील, बहीणभाऊ एवढंच कुटुंब नाही, तर आज्या, काका-मामा, मावश्या, आत्या काकवा, माम्या, याचा हा आणि त्याचा तो असा सगळा गोतावळा लग्नाला जमतो.
करोनाकहराने यंदाच्या लग्नसराईवर बोळा फिरवला आहे. आता कुणी म्हणेल की त्यात काय एवढं? कित्येक लोकांनी पोलिसांची परवानगी घेऊन पाच पन्नास माणसांना बोलवून घरच्या घरी ठरलेली लगे्न करून टाकली आहेत. सगळे लोक त्या लग्नाला येऊ शकले नाहीत, आता या काळात सगळ्यांनी एकमेकांना समजून घेतलं आहे वगैरे.
पण मुद्दा फक्त लग्न ठरल्याप्रमाणे लग्न करून टाकण्याचा, अडून न राहण्याचा नाहीच आहे. लग्न जसा त्या कुटुंबाचा एकटय़ाचा नाही तर त्याच्याशी संबंधित सगळ्या गोतावळ्याचा सोहळा असतो तसंच लग्नाशी संबंधित सेवा पुरवणं हा समाजातल्या काही घटकांचा व्यवसाय असतो. लग्नात दोन्हीकडच्या लोकांना आपली हौसमौज पूर्ण करायची असते. लग्न सहसा एकदाच होणार असल्यामुळे दोन्हीकडचे लोक हात सैल सोडून खर्च करायच्या मानसिकतेमध्ये असतात. त्यांच्या हौसेमौजेवर तसंच लग्नात करायच्या आवश्यक गोष्टींवर आधारित एक मोठा उद्योगच समाजात कार्यरत असतो. त्याचे घटक सुटेसुटे असले तरी त्या सगळ्या एकाच चाकाच्या आऱ्या असतात. लग्न नावाच्या परंपरेसाठी ते एकाच वेळी समांतरपणे फिरत असतात. आता हेच बघा ना, लग्नासाठी खर्च करू शकतं अशा कुठल्याही कुटुंबात लग्न निघालं की कार्यालयवाले, केटरिंगवाले, सोनार, गुरुजी, बस्तावाले, कपडे शिवणारे, मेकपवाले, फुलंवाले, डेकोरेशनवाले, मंडपवाले, बॅण्डवाले, फोटोग्राफर, हनिमून पॅकेजवाले हे सगळे लागतातच. शहरात, निमशहरात, ग्रामीण भागात वेगवेगळ्या पद्धतीने लग्न होत असल्यामुळे कुठे कार्यालयवाले लागतील तर कुठे लॉनवाले आणि कुठे बँक्वेट हॉलवाले, पण अशी सगळी मंडळी लागतातच. सहसा लग्नाचं पॅकेज घेतलं जात असल्यामुळे वर उल्लेख केलेल्या बहुतांश सेवा एकाच ठिकाणी एकत्र मिळू शकतात. शिवाय या सगळ्या मंडळींकडे काम करणारी माणसं, त्यांना कच्चा माल पुरवणारी यंत्रणा असं सगळं आपल्याला थेट न दिसणारं मोठं जग लग्नव्यवहाराशी जोडलेलं असतं. या सगळ्यामधून लग्नसराईत मोठी उलाढाल होत राहते. त्या उलाढालीवर अनेकांचं जगणं अवलंबून असतं. अनेकजण लग्नसराईच्या सहा महिन्यात हे काम करून उरलेल्या सहा महिन्यात दुसरं काहीतरी करतात किंवा काहीजण सहा महिन्यात लग्नसराईशी संबंधित काम करून मग त्यावरच उरलेलं वर्ष काढतात.
यंदा करोनामुळे मार्चच्या मध्यापासून टाळेबंदी सुरू झाल्यामुळे तिथपासूनची म्हणजे निम्मी लग्नसराई हातची गेली. गर्दी होईल असे कोणतेही सणसमारंभ साजरे करायला बंदी असल्यामुळे अनेकांनी लग्नं पुढे ढकलली, काहींनी २५-५० जणांच्या उपस्थितीत ती घरच्या घरी उरकून घेतली. पण त्यामुळे लग्न म्हटल्यावर अपेक्षित असलेली उलाढाल झालीच नाही. एका कुटुंबात लग्न होतं तेव्हा त्याच्या ऐपतीप्रमाणे तीनचार लाख रुपयांपासून कोटय़वधी रुपयांपर्यंतची उलाढाल होत असते. मार्चपासून ती न झाल्यामुळे लग्नाशी संबंधित व्यवसाय करणारे ठिकठिकाणच्या लहानमोठय़ा व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. साहजिकच त्यांच्याकडे काम करणाऱ्या, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचा कच्चा माल पुरवणाऱ्यांनाही तो फटका बसला आहे. कोण आहेत ही सगळी मंडळी आणि त्यांचं या सगळ्या परिस्थितीबद्दल काय म्हणणं आहे याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न.
लग्नाची तारीख ठरली की सगळ्यात पहिला मुद्दा असतो कार्यालय किंवा बँक्वेट हॉलच्या बुकिंगचा. आपल्याला हव्या त्या भागात, हव्या त्या तारखांना ही सोय हवी असेल तर खूप आधीपासून बुकिंग करून ठेवावं लागतं. एरवी सीझनला गजबजणारी कार्यालयं मार्चच्या मध्यापासून ओस पडली आहेत. त्यासंदर्भात अहमदनगरमधल्या कोहिनूर मंगल कार्यालयाचे संचालक राजेंद्र उदागे सांगतात की नोव्हेंबर ते जुलै या लग्नाच्या सीझनमध्ये त्यांच्या कार्यालयात ६० ते ६५ लग्नसमारंभ होतात. त्याशिवाय लग्नाचं रिसेप्शन, एंगेजमेंट, वाढदिवस, डोहाळजेवण, बारसं असे समारंभही सुरू असतात. आजकाल सहसा कार्यालयांमध्ये पॅकेज असतं. म्हणजे त्या कार्यालयात समारंभासाठी बुकिंग केलं की त्या समारंभासाठी लागतील त्या सगळ्या सेवा त्या कार्यालयाकडूनच मिळतात. संबंधित यजमानांना त्या बाहेर जाऊन शोधाव्या लागत नाहीत. कोणत्याही अशा समारंभांना साधारणपणे हजार माणसं येणार असतील तर त्या संस्थेला १०० कर्मचारी लागतात. त्यात केटरिंगवाले, गुरुजी, मंडपवाले, सजावट डिझाइन करणारे, प्रत्यक्ष ती सजावट करणारे, फुलांची सजावट करणारे, इलेक्ट्रिक लायटिंग करणारे, बैठक मांडणारे, बॅण्डवाले, कार्यालयाचे कर्मचारी, घोडावाले, बग्गीवाले, भाज्या चिरणारे, पुऱ्या -चपात्या लाटणारे, झाडू मारणारे, टेबल लावणारे, बुफे मांडणारे, वाढणारे, भांडी घासणारे-पुसणारे असे हरतऱ्हेचे लोक लग्नकार्यासाठी लागतात. त्यातले काही लोक कुशल कामगार त्या त्या कार्यालयाशी संबंधित कायमस्वरूपी कर्मचारी असतात तर काही तात्पुरते काम करणारे असतात. अर्थात तात्पुरत्या कामगारांमधले बरेच कामगार हे ठेकेदार घेऊन येतो. आता करोनाकहरात ठेकेदाराची अवस्था वाईट त्यामुळे या कामगारांची अवस्थाही वाईट आहे. त्याशिवाय धान्य, भाज्या, डेअरी उत्पादन पुरवठादार असतात. पेपर ग्लास, पेपर डिश, पेपर नॅपकीन, सिल्व्हर फॉइल पुरवठादार असतात. त्यांचाही लग्नसराईत चांगला व्यवसाय होतो. पण आता या सगळ्यांचाच व्यवसाय ठप्प झाला आहे.
सहसा लग्नाच्या चार ते पाच महिने आधी बुकिंग केलं जातं. उदागे सांगतात, या वर्षी नोव्हेंबरपासून मार्चच्या मध्यापर्यंतची लग्नंकार्य झाली, पण त्यानंतरची मात्र होऊ शकली नाहीत. काही लोकांनी सरकारने ५० जणांच्या उपस्थितीत लग्न लावायची परवानगी दिल्यावर घरच्या घरी लग्न लावली तर काही जणांनी ती पुढे ढकलली. काही जणांना त्यांचे बुकिं गचे पैसे परत दिले गेले तर काही जणांना ते नंतर द्यायचे आहेत. ५० जणांच्या उपस्थितीत लग्न लावायची परवानगी मिळाली म्हणून लोक कार्यालयात लग्न लावायला आले तर ते आम्हाला परवडण्यासारखंही नाही. सध्या आम्ही शिल्लक पैसे वापरून, उसने पैसे घेऊन चालवतो आहोत. या दरम्यानच्या काळात कायमस्वरूपी कामावर असणाऱ्यांचा पगार दिला जातो आहे. पण आता काही कुशल कामगारांनादेखील काम नसल्यामुळे भाजी-फळंविक्री, ओझी उचलणं यासारखी कामं करून उदरनिर्वाह चालवावा लागतो आहे.
केंद्र सरकारच्या पॅकेजनुसार लघु तसंच मध्यम उद्योगांना कर्ज दिलं जाणार आहे. त्यासाठी दोन महिन्यांपूर्वी हे पॅकेज जाहीर झाल्यानंतर बँकांनी बोलवून बोलवून फॉर्म भरून घेतले, कागदपत्रं घेतली पण त्यानंतर काहीच घडलं नाही. वरूनच पैसे आलेले नाहीत असं सांगितलं जातं आहे, असा त्यांचा अनुभव आहे.
ते सांगतात, अहमदनगरमध्ये नोव्हेंबर ते जुलै या काळात लग्नसराईत साधारण ७०० कोटींची उलाढाल होते. यावरून पुण्या- मुंबईत किती होत असेल याचा अंदाज करता येईल आणि संबंधित व्यावसायिकांचं, त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांचं किती नुकसान झालं असेल हे लक्षात येईल.
लग्नाचा सगळा व्यवसाय शो बिझनेसवर चालतो. हॉल, मंडप, बफे सजावट या सगळ्याबाबत दर सीझनला नवनवीन गोष्टी येत असतात आणि त्यानुसार ग्राहक मागणी करत असतात. प्लेट्स, बुफे, डोंगे यांचं डिझाइन दरवेळी बदलावं लागतं. एकदा त्यासाठीची गुंतवणूक केली आणि पाच वर्षे तिकडे बघितलंच नाही असं होत नाही. सध्या रंगाच्या थीमचा ट्रे्ण्ड सुरू आहे. म्हणजे वधूवराच्या स्टेजपासून वेटरच्या कपडय़ांपर्यंत एक रंग. कुणी पांढऱ्या रंगाची थीम निवडतं, तर कुणी पिवळ्या रंगाची, त्यानुसार फुलांपासून सगळ्या गोष्टी लागतात. अशी पाचसहा डिझाइन्स असतात. ग्राहक ती कॉम्प्युटरवर बघून निवडतो आणि ती सजावट केली जाते. या सगळ्याचं नियोजन आणि त्यासाठीची गुंतवणूक लग्नाच्या सीझनच्या खूप आधीपासून केलेली असते.
डिस्प्ले संगणकावर बघून ग्राहक त्याला हव्या असलेल्या सजावटीची निवड करतात. हा डिस्प्ले डिझाइन करणारे डिझायनर असतात. आता मटेरियल पुरवणाऱ्या कंपन्यांकडेच असे डिझायनर असतात. डिस्प्लेसाठी जे कापड लागतं ते मेरठ, अहमदाबाद, सुरत, दिल्ली, मुंबई अशा ठिकठिकाणाहून येतं. मार्च महिन्यात दिल्लीत प्रगती मैदानात ऑल इंडिया केटरिंग असोसिएशनचं मोठं देशव्यापी प्रदर्शन असतं. त्यात वेगवेगळी डिझाइन्स पाहायला मिळतात. यंदा ते प्रदर्शन झालेलं नाही. त्याशिवाय गुजरात, बंगलोर, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी वर्षभरात प्रदर्शनं होतात. डिस्प्लेची नवनवीन डिझाइन्स बघायला मिळतात. हॉल, मंडप आणि केटरिंग यांच्या डिस्प्लेसाठी जे कापड लागतं ते सुरतमधल्या काही कंपन्या तयार करतात. त्यांची तीच स्पेशालिटी आहे.
केटरिंगच्या बाबतीत राजेंद्र उदागे सांगतात, केटरिंगच्या व्यवसायात हल्ली लग्नात लोकांना बफेमध्ये वेगवेगळ्या कुझिनचं जेवण लागतं. एकच कूक सगळे प्रकार करत नाही. त्यामुळे राजस्थानी, बंगाली, पंजाबी, गुजराती, दक्षिण भारतीय, मिझोरामचे, सिक्कीमकडचे कूक असतात. ही २०-२२ पासून पन्नाशीपर्यंतची माणसं लग्नाच्या सीझनमध्ये त्यांच्या त्यांच्या राज्यातून एकेकटी येऊन राहतात आणि सीझन संपला की परत जातात. त्यांना ३० ते ४० हजार रुपये पगार असतो. तर जेवण सव्र्ह करणाऱ्यांचा ५०० रुपयांचा रोज असतो. या सगळ्यांनाच करोनाचा फटका बसला आहे. केटरिंगसाठी लागणारा माल आधीच भरून गोडाऊनमध्ये ठेवून दिला जातो. टाळेबंदीच्या काळात शेवटी अनेकांनी त्याची पॅकेट्स करून गरजूंना विकून टाकली.
ते सांगतात, मागच्या वर्षी जुलै महिन्यातच मी केटरिंगसाठी ६० ते ७० रुपये दराने कांद्याची खरेदी केली होती. आता तो दहा रुपये किलोने मिळतो आहे. व्यवसायच नसल्याने त्या कमी दराचा काही उपयोग नाही पण दुसरीकडे इतक्या कमी दराने उत्पादन विकावं लागत असेल तर शेतकऱ्याचं काय होत असेल, पुढच्या वर्षी तो उत्पादन घेण्याच्या स्थितीत तरी असेल का असा प्रश्न पडतो आणि या सगळ्यामुळे पुढच्या वर्षीचे दर काय असतील याची कल्पनाच न केलेली बरी.
ते म्हणतात आत्ताच्या परिस्थितीत सगळ्यांचीच कोंडी झाली आहे. पण ती इतक्यात सुटण्याचीही शक्यता दिसत नाही, कारण मागचा निम्मा सीझन तर गेलाच आहे. नोव्हेंबरमधल्या पुढच्या सीझनच्या बुकिंगची सुरुवात साधारणपणे जूनपासून होते. आता जुलै निम्मा गेला तरी अजून एकही बुकिंग आलेलं नाही. त्यामुळे पुढच्या सीझनचंही काही सांगता येत नाही. सगळं पूर्वपदावर यायला आणखी दोन वर्षे लागतील असा अंदाज आहे.
लग्न ठरत असतानाच लक्षात घेतला जाणारा महत्त्वाचा घटक म्हणजे दागिने. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीनुसार लग्नासाठी सोन्याची खरेदी केली जाते. १५ मार्चनंतरच्या काळात असलेली काही लग्न कशीबशी पार पडली, बरीच पुढे ढकलली गेली. पण मेपासून ठरलेले मुहूर्त साधण्याच्या मूडमध्ये लोक आले. सरकारनेही ५० जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालून दिली. पण सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीचं काय? त्याबाबत घारे ज्वेलर्सचे उदय घारे सांगतात, एखाद्या कुटुंबात लग्न असेल तर त्या कुटुंबाशी संबंधित जवळच्या इतर १५-२० कुटुंबांमधले सदस्य दागिने घेतात. आता लग्नाला उपस्थित राहण्यासाठीच ५० जणांची मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळे आता त्या कुटुंबाशी संबंधित जवळची फक्त तीनचार कुटुंबेच लग्नासाठी दागिन्यांची खरेदी करत आहेत. त्यात आता लोकांचं उत्पन्न कमी झालं आहे आणि सोन्याचे भाव वाढले आहेत. या परिस्थितीशी जमवून घेण्याची लोकांची मानसिकता तयार होते आहे. हातात असलेले पैसे जपून ठेवण्याकडे त्यांचा कल आहे. लोकांचं घराबाहेर पडणंही कमी झालं आहे. या सगळ्याचा सोनंखरेदीवर परिणाम झाला आहे.
उदय घारे सांगतात, सराफी पेढय़ांशी संबंधित ८० ते ९० टक्के कारागीर वर्ग अजून कामावर रुजू झालेला नाही. फार पूर्वी एकच कारागीर सगळी कामं करत असे. पण आता तशा पद्धतीने काम केलं जात नाही. कारागीरांची साखळी असते. दागिन्यांवरच्या दहा प्रक्रिया दहा वेगवेगळे कारागीर करतात. त्यामुळे एक जण नाही आला तरी काम अडून राहत.ं सध्या कारागीरांची ही साखळीच तुटलेली आहे. आमचे सहासात कारागीर विरारला राहतात. ट्रेन बंद असल्यामुळे रोज रस्तामार्गे दोन अडीच तासांचा प्रवास करून येणंजाणं त्यांना शक्य होत नाही. झवेरी बाजारात काम करणारे अनेक जण पश्चिम बंगालमधले होते. ते आपापल्या गावी निघून गेले आहेत. त्यामुळे तिथूनही कामं करून मिळत नाहीत.
आम्ही गुढीपाडव्यासाठी जी तयारी केली होती, तेच दागिने टाळेबंदीच्या काळात विकले. लग्नासाठी लोकांना नवीन दागिने घडवून हवे असतात. पण सध्या कारागीर नसल्यामुळे तेवढय़ा वेळेत घडवणं शक्य नाही. त्यामुळे ते तयार आहे, उपलब्ध आहे तेच लोकांना विकत घ्यावं लागत आहे. या सगळ्या परिस्थितीचा पुढच्या सीझनवरही परिणाम होणार आहे. टाळेबंदी शिथिल केल्यावर आम्ही दुकानं उघडली तेव्हा दागिने विकायला येणाऱ्यांचंही प्रमाण बऱ्यापैकी होतं. आता जागतिक परिस्थितीमुळे सोन्याचे दरही वाढले आहेत. शिवाय सोन्याच्या खाणी बंद आहेत. आपण वर्षांला जवळपास ८०० टन सोनं आयात करतो. त्यातला ८० टक्के पुरवठा सध्या बंद आहे. हे सगळं बदलायला आणि परिस्थिती सुधारायला सप्टेंबर उजाडेल असं त्यांना वाटतं.
लग्नाचे फोटो हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. नटलेले, सजलेले आणि मनाने वेगळ्याच जगात वावरणारे वधूवर, जबाबदारीच्या ओझ्याने वाकलेले त्यांचे आईवडील, नटून मिरवणाऱ्या करवल्या, गुडघ्याला बाशिंग बांधून आलेले आणि लग्नाच्या मंडपातच आपला भावी जोडीदार शोधू पाहणारे विवाहेच्छुक तरुणतरुणी, आशीवार्दाच्या मोडमध्ये असलेल्या आज्या, मावशा, आत्या, छान कपडे घालून गोंधळ करत बागडणारी लहान मुलं.. कॅण्डिड, पारंपरिक, स्टेजवरचे असे सगळे फोटो काढण्यासाठी हा एकदम उत्तम माहोल असतो. मुख्य म्हणजे दुसऱ्या दिवसापासून या सगळ्याचं आठवणींमध्ये रूपांतर होणार असल्यामुळे या सोहळ्याचे फोटो हा नंतरच्या काळात मोठा ठेवा ठरणार असतो. काळाचा एक तुकडाच जणू. त्यामुळे लग्नाच्या समारंभामध्ये फोटोग्राफीला भरपूर वावही असतो आणि महत्त्वही असतं. पण करोनाकहरात लगे्नच पुढे ढकलली गेली आहेत किंवा जेमतेम ५० माणसांच्या उपस्थितीत केली जात आहेत. लग्नाच्या फोटोग्राफीचा व्यवसाय करणाऱ्यांवर त्याचा काय परिणाम झाला आहे?
ठाण्यामधल्या अंजू मानसिंग गेली १५ -२० वर्षे लग्नासाठीची फोटोग्राफी करतात. त्या सांगतात, लग्नाच्या फोटोग्राफीमध्ये वधूवरांचे सगळ्या विधींचे फोटो, पारंपरिक फोटो, स्टेजवरचे फोटो, कॅण्डिड फोटो, नातेवाईकांचे वैयक्तिक फोटो, ग्रुप फोटो असे वेगवेगळे फोटो काढायचे असतात. आजकाल लोकांना व्हिडीओदेखील करून हवा असतो. त्यामुळे लग्नाचे फोटो काढणं हे एकटय़ादुकटय़ाचं काम नसतं. मुख्य फोटोग्राफर, व्हिडीओग्राफर, बाकीचे फोटो काढण्यासाठीचे मदतनीस अशी तीनचार जणांची तरी टीम असतेच. आता करोनाच्या काळात लोकांनी लग्नं पुढे ढकलली किंवा सरकारी निर्देशांप्रमाणे ५० माणसांमध्ये करायला सुरुवात केली आहे. दरम्यानच्या काळात लोकांचं उत्पन्न कमी झाल्यामुळे लग्नांवरचा खर्चही कमी होण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच फोटोंचं बजेटही कमी होण्याची शक्यता आहे. पण गोष्ट अशी आहे की लग्नाला कमी माणसं आली तर केटरिंगचं वगैरे काम कमी होतं पण फोटोग्राफरचं काम कमी होत नाही. त्याला सगळे वधूवरांचे, सगळ्या विधींचे, उपस्थित नातेवाईकांचे फोटो काढावेच लागणार आहेत. गर्दी कमी असल्यामुळे ती मजा जाईल, पण एरवी जास्त लोक असल्यामुळे निवांतपणा मिळत नाही तो मिळू शकेल. एरवी लोक फोटोच्या बजेटमध्ये काटछाट करायचा प्रयत्न करतात. पण आता तसं करणार नाहीत असं मला वाटतं, कारण आता जे लोक लग्नाला येऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी हे फोटो महत्त्वाचे ठरणार आहेत.
लग्नाचे फोटो हा नंतरच्या काळात आठवणींचा ठेवा होऊन राहणार असल्यामुळे विशेषत: उत्सवमूर्तीसाठी ते महत्त्वाचे असतात. तो दिवस त्यांचा दोघांचाच असतो. त्या दिवशी चांगलं तयार होणं ओघानेच आलं. नववधूचा मेकअप हा त्या तयारीतला महत्त्वाचा भाग. ब्रायडल मेकअपला आजच्या काळात त्यामुळेच खूप महत्त्व आहे. तो करण्यासाठीची ब्युटिशियन खूप काळजीपूर्वक निवडली जाते. तिच्या सेवेसाठी भरपूर पैसे मोजले जातात. अर्थात नववधूच नाही तर घरातल्या इतर स्त्रियादेखील मेकअप करून घेतात. त्यामुळे ब्युटी इंडस्ट्री देखील लग्नसराईशी अतिशय जवळून संबंधित आहे. गल्लीमधल्या ब्युटिशियनपासून ते मोठमोठय़ा सलोनपर्यंत सगळ्यांचाच लग्नसराईत चांगला व्यवसाय होतो. करोनाकहराचा मोठा फटका या सगळ्यांनाच सहन करावा लागला आहे.
अॅटिटय़ूड सलोन अॅकॅडमीच्या आमिशा साळुंके त्याबद्दल सांगतात की करोना प्रादुर्भावाचा खूप मोठा परिणाम यंदाच्या लग्नसराईवर झाला आहे. आपल्याकडे लग्नाचा सीझन नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि एप्रिल ते जून अशा दोन टप्प्यांमध्ये असतो. यंदा पहिला टप्पा नीट पार पडला, पण मार्चच्या टाळेबंदीनंतर ९० टक्के लोकांनी लग्नं रद्द केली. त्यामुळे ब्युटी इंडस्ट्रीशी संबंधित लोकांचा खूप मोठा आर्थिक स्त्रोत गेला आहे. आता नोव्हेंबरपासून पुढचा सीझन सुरू होईल, पण त्याच्याबाबतही फार वेगळी परिस्थिती असेल असं वाटत नाही. त्यात लग्नसमारंभासाठी ५० माणसांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आलेली आहे. उत्पन्न कमी झाल्यामुळे लोकांनी लग्नाचं बजेट कमी केलं आहे. सगळे घरचेच आहेत, तर इतक्या कमीतकमी गर्दीच्या लग्नात कशाला हवाय महागडा मेकअप आसाही विचार केला जाण्याची शक्यता आहे. अर्थात काहीजणी अशाही असतील की एवीतेवी बाकी खर्च कमी झालेच आहेत आणि या दिवसाच्या आठवणी फोटोंमधून कायमस्वरूपी राहणार आहेत, तर चांगला मेकअप करून आपण लग्नाच्या फोटोंमध्ये चांगलं दिसलं पाहिजे. बाकीचे खर्च कमी केलेत तर हा खर्च तरी मनापासून करू असा विचार काहीजणींकडून केला जाईल, असं मला वाटतं.
त्या सांगतात की लग्नात लोक खर्च कमी करतील हे गृहीत धरून ब्रायडल मेकप करणारे मोठमोठे सलोन आपले दर कमी करण्याची शक्यता आहे. त्यांनी दर कमी केले तर त्या खालच्या स्तरांवरच्या सलोनना, ब्युटिशियनना आपोआपच आपले दर कमी करावे लागतील. त्यामुळे पुढच्या काळात या क्षेत्रात मंदी येण्याची शक्यता आहे. मोठमोठय़ा ब्रॅण्ड्सची गुंतवणूकही मोठी असते आणि त्यामुळे त्यांच्याकडे होल्िंडग कपॅसिटी असते. लहान लहान सलोन्सच्या बाबतीत असं होत नाही. त्यामुळे त्यांच्यावरचं संकट अधिक गहिरं असेल अशी शक्यता आहे.
या क्षेत्राला असलेल्या ग्लॅमरमुळे गेल्या चार पाच वर्षांमध्ये वेगवेगळ्या विद्याशाखांमध्ये शिकलेले लोक या क्षेत्रात शिरताना दिसत होते. त्यामुळे आधीच इथली स्पर्धा वाढलेली होती. आता करोनामुळे परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. ब्रायडल मेकपला ३५ हजार घेणारं ब्रॅण्डेड सलोन आता २० हजार घेणार असेल तर २० हजार घेणाऱ्या ब्युटिशियनला तिचे दर आणखी खाली आणावे लागतील. नवशिक्यांना तर कामच राहणार नाही. शिवाय लोकांची क्रयशक्ती कमी होणार आहे.
सलोन हा लक्झरी सेगमेंट आहे. आजच्या काळात चांगली नोकरी करणारी स्त्री महिन्याला दोन ते अडीच हजार रुपये सलोनवर खर्च करते. नजीकच्या काळात ती असा खर्च करण्याची शक्यता कमी आहे. शिवाय घराबाहेरच पडावं लागत नसेल तर तितकं प्रेझेंटेबल राहण्याची एखादीला गरजही वाटणार नाही. लग्नाच्या बाबतीत सांगायचं तर आधी नवरीबरोबर तिची आई, बहीण, काकू, मामी याही मेकप करून घ्यायच्या. आता बजेटच्या कारणामुळे आणि फारसा मोठा समारंभ होणार नसल्यामुळे त्याही करून घेणार नाहीत. हा सगळा मोठा फटका आहे. तो पुढे बराच काळ जाणवण्याची शक्यता आहे. सलोन चालवणाऱ्या अनेकींनी पुढचा काळ गृहीत धरून पर्सनल ग्रुमिंगचे ऑनलाइन क्लासेस करणं, आणखी काही करणं असं सुरू केलं आहे. ज्यांना इतर काही शक्य नाही त्यांनी टिफिन सव्र्हिस सुरू केली आहे. काहीजणी आधीच्या बचतीवर दिवस काढत आहेत. पण ते किती दिवस पुरणार? अनेकींना काय करावं ते समजत नाहीय. कारण त्यांचं कौशल्य या क्षेत्रापुरतंच आहे. त्यांना डिप्रेशन यायची शक्यताही आहे. पण ही परिस्थितीच अशी आहे की त्यातून बाहेर कसं पडायचं यासाठीची ब्ल्यू प्रिंट कुणाकडेच नाही.
त्या सांगतात, सलोन हा व्यवसाय लघु तसंच मध्यम उद्योगांमध्ये समाविष्ट होत असला तरी सरकारी योजनांचा फायदा गल्लीबोळातल्या लहानलहान पार्लर्सना होणार नाही. तो मोठय़ा ब्रॅण्डवाल्यांना होईल. दहीहंडीमध्ये वरच्या थरातला कन्हैय्या लोणी खातो तसं ते आहे. इथे असंघटित असणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. त्यांना सरकारी योजनांचा फायदा मिळत नाही. आपण अ, ब, क, ड अशा चार श्रेणी धरल्या तर अ श्रेणीमधलं सलोन लग्नाच्या एका सीझनमध्ये अंदाजे १५ ते २० लाख रुपये कमावतं तर ड श्रेणीमधलं सलोन लग्नाच्या सीझनमध्ये ४० ते ५० हजार रुपये कमावतं. असे लग्नाचे वर्षांला दोन सीझन असतात. यावरून या क्षेत्राच्या उलाढालीची आणि त्याचं करोनामुळे किती नुकसान झालं असेल याची कल्पना येईल. हे सगळं पूर्वपदावर यायला एक ते दीड वर्ष जाऊ शकतं.
लग्नसराईशी संबंधित याशिवायही अनेक व्यवसाय आहेत, रोजगार आहेत. त्यावर आधारित कुटुंबं आहेत. त्यांची बायका-मुलं, घरातली वृद्ध माणसं, कदाचित गावाकडचं कुणी अशा सगळ्यांच्या आयुष्यावर या टाळेबंदीचा परिणाम होतो आहे, होणार आहे. राजेंद्र उदागे, आमिशा साळुंके यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपापल्या क्षेत्रातलं कौशल्य असणाऱ्या कुशल कामगारांवर सध्या भाजी विकणं, डबे करून देणं ही कामं करण्याची वेळ आली आहे. ही कामं कमी महत्त्वाची आहेत असं नाही, पण एखाद्या भाजीविक्रेत्याला जशी मोटार ड्रायव्हिंगमधल्या क्लृप्त्या माहीत असू शकत नाहीत, तशाच मोटार ड्रायव्हरला भाजीविक्रीतली मेख माहीत असू शकत नाही. सलोनमध्ये ग्राहकाची उत्तम केशरचना करून देणारीला डबे करून देण्याचा व्यवसाय मनापासून आवडेलच, त्यातले श्रम आणि कौशल्य जमेलच असं नाही. पण करोनाने सोन्याचे दागिने घडवणाऱ्यांपासून ते मेकअप करणाऱ्यांपर्यंत सगळ्यांवरच ही वेळ आणली आहे.