आशुतोष बापट

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवाळीचा फराळ आणि फटाक्यांचा जल्लोष संपताच येणाऱ्या गुलाबी थंडीबरोबरच करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या धास्तीने सरकार आणि लोकांच्याही मनात हुडहुडी भरली आहे. गेले महिना-दोन महिने थंडावलेला करोनाचा विषाणू पुन्हा एकदा डोके  वर काढू लागला आहे. ग्रामीण भागात अजूनही सर्व काही आलबेल असले तरी मुंबई महानगर प्रदेश, पुणे, नागपूर अशा शहरी भागांतील नव्या करोनाबाधितांचा आलेख हळूहळू उंचावू लागला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून करोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याने सुटके चा नि:श्वास सोडणाऱ्या आरोग्यासह सर्वच यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन आता  पुन्हा एकदा कामाला लागल्या आहेत. करोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असेल असा धोक्याचा इशारा खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच जनतेला दिला आहे. एवढेच नव्हे तर ही त्सुनामी रोखण्यासाठी सरकारने तयारी सुरूही केली आहे. करोना उद्रेकाचा पूर्वानुभव पाठीशी असल्याने सरकारने संभाव्य दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. मात्र सरकारच्या नियोजनाला, प्रयत्नांना गरज आहे ती जनतेच्या पाठिंब्याची आणि सहकार्याची. लोकांनीच ‘माझं कु टुंब माझी जबाबदारी’चे भान ठेवून करोनापासून दूर राहण्याचा आणि करोनाला घरात प्रवेश करण्यापासून रोखण्याचा निर्धार करून तशी कृती के ल्यास ही दुसरी लाट किमान आपल्या राज्यात नक्कीच रोखली जाऊ शकते.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेवरून जोरदार चर्चा सुरू आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये करोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अन्य देशांप्रमाणेच भारतात आणि पर्यायाने राज्यात पुन्हा करोनाचा पूर्वीपेक्षा अधिक पटींनी (पान १२ वर)

फैलाव होण्याची भीती तज्ज्ञांनी, आरोग्य विभागाने आणि राज्याच्या प्रमुखांनी- मुख्यमंत्र्यांनी व्यक्त के ली आहे. गणेशोत्सवानंतर राज्यात करोनाचा उद्रेक  झाला होता. त्या वेळी आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती. ग्रामीण भागांत तर अनेकांना या आजाराचे निदान होण्यापूर्वीच उपचारांअभावी आपला जीव गमवावा लागला. मात्र हळूहळू स्थिती नियंत्रणात आली. गेल्या काही महिन्यांत एकीकडे करोनाबाधितांचा आलेख घसरत असताना दुसरीकडे सरकारनेही ‘मिशन बिगिन अगेन’ अर्थात ‘पुनश्च हरिओम’ म्हणत जनजीनव पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न के ला आहे. टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथिल करताना सर्वच गोष्टी कमी-अधिक प्रमाणात सुरू के ल्या आहेत. अजूनही शाळा-महाविद्यालये, तरण तलाव, सर्वसामान्यांसाठी उपनगरीय रेल्वे, मनोरंजन उद्याने, राजकीय कार्यक्रम सुरू झालेले नाहीत. नाटय़गृह, सिनेमागृह, विवाह समारंभ यांवर अजूनही काहीप्रमाणात र्निबध आहेत. तरीही राज्यातील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागल्याने, उद्योग-व्यवसाय पुन्हा उभारी घेऊ लागल्याने, बांधकाम तसेच अन्य क्षेत्रांत पुन्हा एकदा तेजीचे वातावरण दिसू लागल्याने, सरकारी तिजोरीतील आवक वाढल्याने सरकारला मोठा दिलासा मिळाला होता. त्यातूनच येत्या काही दिवसांत हे र्निबध अधिक शिथिल करताना शाळा-महाविद्यालये, सर्वासाठी उपनगरीय रेल्वे सुरू करण्याच्या हालचाली शासनदरबारी सुरू झाल्या होत्या. मात्र दिवाळीतील लोकांच्या बेफिकिरीने सरकारच्या या सर्व मनसुब्यांवर पाणी फेरले आहे. एवढेच नव्हे तर राज्यावर पुन्हा एकदा टाळेबंदीचे संकट घोंगावू लागले आहे.

गेल्या आठ-नऊ महिन्यांत करोना नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यावर भर देणाऱ्या सरकारी यंत्रणांनी दिवाळीसाठी काही प्रमाणात दिलेली ढिलाईच आता महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवाळीच्या निमित्ताने लोक मोठय़ा प्रमाणात घराबाहेर पडल्याने, बाजारपेठांमध्ये गर्दी उसळली. परिणामी करोनावर प्रभावी ठरणाऱ्या सामाजिक अंतराचा पुरता फज्जा उडाला. हे कमी म्हणून की काय गेल्या काही दिवसांपासून लोकांमधील बेफिकिरी वाढू लागली असून आरोग्यासाठी महत्त्वाच्या नियम-तत्त्वांना तिलांजली देत लोक तोंडाला मुखपट्टी न लावता फिरत आहेत. रिक्षा, गाडय़ा, वाहनांमध्ये प्रवासी कोंबून भरले जात आहेत. फे रीवाले आणि खाऊ गल्ल्यांमध्ये लोकांची गर्दी उसळल्याचे आणि पोलीस, प्रशासनाचा धाक उरला नसल्याचे चित्र दिसत आहे. यातून पन्हा एकदा करोनाचा विस्तार होऊ लागला आहे. बाधितांचा आलेख उंचावू लागला आहे. डिसेंबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवडय़ात करोनाच्या दुसऱ्या लाटेचे धक्के बसायला सुरुवात होतील आणि जानेवारीत ही लाट त्सुनामीत परिवर्तित होईल या धास्तीने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. या पाश्र्वभूमीवर सरकारची झोप उडाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या आनंदावर करोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचे सावट आहे.

राज्यात करोनाचा पुन्हा उद्रेक झालाच तर शहरी भागात आता पुरेशी तयारी आहे. गेल्या नऊ महिन्यांत आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यात आली आहे. मात्र ग्रामीण भागांत आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही. अशा परिस्थितीत हा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला आहे. करोनाचा उद्रेक होत असलेल्या राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्यांवर र्निबध घालण्यात आले असून त्यांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. एकीकडे जनजागृती, लोकांना घरी बसण्यास, मुखपट्टीचा वापर करण्यास, कु टुंबाची काळजी घेण्यास प्रवृत्त करायचे तर दुसरीकडे कायदा आणि कारवाईचा बडगा उगारायचा अशा दुहेरी मार्गाचा अवलंब करण्यावर भर दिला जात आहे. येत्या काही दिवसांत रात्रीच्या फिरण्यावर, विनाकारण शहरात फे रफटका मारण्यावर, नाक्यावर गप्पा मारणाऱ्यांवर, बाजारपेठा, मंडईत होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठीही र्निबध लादण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी कारवाईचा बडगाही उगारण्यावर भर दिला जात आहे. राज्यात पुन्हा टाळेबंदीच्या चर्चेला उधाण आले असले तरी विस्कटलेली घडी पुन्हा रुळांवर येण्यासाठी आता टाळेबंदी नको अशीच प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचीही भूमिका आहे. त्यामुळे  डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ातील करोनास्थितीचा विचार करून गरज वाटल्यास कमी-अधिक प्रमाणात कठोर र्निबध लागू के ले जातील. मात्र सरसकट टाळेबंदी होणार नसल्याचे सांगितले जात आहे. करोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना लोकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादावरच टाळेबंदीचे भवितव्य ठरणार एवढे मात्र निश्चित.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus pandemic should we again go for lockdown coverstory dd70