डॉ. गिरीश महाजन / नंदिनी महाजन – response.lokprabha@expressindia.com

वार शनिवार. तारीख ४ एप्रिल २०२०. भारतातल्या करोनामुळे झालेल्या टाळेबंदीचा बारावा दिवस. रात्रीच्या जेवणानंतरची वेळ. माधव वेब मीटिंगसाठी लॅपटॉपसमोर बसून दहाच्या ठोक्याची वाट पाहत होता. महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागांतून त्याची मित्रमंडळी किरण, अविनाश, संतोष, सुहास, महेश, राजन, सीमा, काव्या, विद्या, गीतांजली आणि नम्रता दररोज वेब मीटिंगवर एकमेकांना अद्ययावत माहिती पुरवीत आणि त्यावर खुली चर्चा करीत. आज त्यांच्या विशेष आमंत्रणावरून माधवचे वर्गमित्र आणि सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ डॉ. वासुदेव म्हणजेच डीवी त्यांच्या वेब मीटिंगमध्ये सहभागी होणार होते. दहा वाजले आणि सर्व मित्रमंडळींचा वेब कलकलाट सुरू झाला. मिनिटभरात डॉ. वासुदेवही जोडले गेले. माधवने त्यांची औपचारिक ओळख करून दिल्यानंतर प्रत्येक जण त्यांना प्रश्न विचारण्यासाठी उत्सुक होता.

माधव : आता आपण कोरोना विषाणूविषयी आपल्या शंका विचारून अनौपचारिक चच्रेला सुरुवात करू या.

अविनाश : डीवी, ग्रुप मीटिंगमध्ये आल्याबद्दल तुमचे धन्यवाद. जगभरात पसरलेल्या या करोना विषाणूबद्दल जरा सांगा, म्हणजे त्याचा इतिहास, आकार आणि या त्याच्या विशिष्ट नावाबद्दल.

डीवी :  हो, सांगतो. या विषाणूबद्दल आणि आजाराबद्दल अचूक माहिती मिळवण्याची तुमची ही वेब मीटिंगची कल्पना छान आहे. करोना विषाणू हा अतिशय लहान सूक्ष्म जीव आहे. तो आपल्या अथवा इतर प्राण्यांच्या शरीरातल्या पेशी अथवा विशिष्ट वाहक मिळाल्यावर प्रेरित होतो. हा नवा कोरोना विषाणू म्हणजे ‘एस.ए.आर.एस-कोव्ह-२’ हा आकाराने ८० ते १४० नॅनोमीटर इतक्या व्यासाचा असतो. म्हणजेच, किती लहान ते समजावतो. आपले साध्या बॉलपेनचे टोक एक मिलिमीटर व्यासाचे असते. त्यावर १.७ करोड ते ३.९ करोड इतके विषाणू सहज मावतात. यावरून त्याच्या सूक्ष्मतेची कल्पना करता येईल तुम्हाला!

काव्या : काय? १.७ करोड ते ३.९ करोड, तेही बॉलपेनच्या टोकावर?

डीवी : हो, त्या विषाणूच्या आकारमानावर ते अवलंबून आहे. टायरेल डी. ए. आणि ब्यनोई एम. एल. यांनी मानवी करोना विषाणूचा १९६५ मध्ये सर्वप्रथम शोध लावला. त्यानंतर १९७५ मध्ये त्यांना नवीन प्रवर्गात गणले गेले. या विषाणूच्या पृष्ठभागावर असलेल्या प्रवध्रेयुक्त अंगकांमुळे ते मुकुटासारखे भासतात. यावरूनच त्यांना करोना हे नाव मिळाले. लॅटिन भाषेत करोना म्हणजे मुकुट होय.

संतोष : ही खूपच चांगली माहिती मिळाली, डीवी; पण मला एक सांगा, अशा किती करोना विषाणूंची लागण माणसांना होऊ शकते?

डीवी : चांगला प्रश्न आहे. माणसांना लागण करू शकतील, असे सात प्रकारचे करोना विषाणू आहेत. २२९ इ (आल्फा करोना व्हायरस), एन.एल.-६३ (आल्फा करोना व्हायरस), ओ.सी.-४३ (बीटा करोना व्हायरस), एच.के.यू.-१ (बीटा करोना व्हायरस), एम.ई.आर.एस.-कोव्ह (बीटा करोना व्हायरस) ज्यामुळे मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिन्ड्रोम हा रोग होतो, एस.ए.आर.एस.-कोव्ह (बीटा कोरोना व्हायरस) ज्याच्यामुळे  सिव्हिअर अ‍ॅक्युट रेस्पिरेटोरी सिंड्रोम होतो आणि  एस.ए.आर.एस.-कोव्ह-२ हा नवीन करोना विषाणू आहे, ज्याच्यामुळे ‘कोविड-१९’ होतो. कधी कधी प्राण्यांमध्ये लागण होऊन उत्क्रांत झाल्यावर असे विषाणू माणसांना बाधा करतात आणि त्यांची गणना मग मानवी करोना विषाणू म्हणून होते. २०१९-एन.कोव्ह, एस.ए.आर.एस.-कोव्ह आणि  एम.ई.आर.एस.-कोव्ह हे अशाच प्रकारचे आधुनिक विषाणू आहेत.

गीतांजली : असं आहे तर हे! मला तर वाटलं होतं, हा एकच विषाणू आहे जो वटवाघळाकडून माणसाकडे संक्रमित झाला. हे तुम्ही छान विवरण दिलेत. पण हा नवीन विषाणू वटवाघळाकडून आला हे खरे आहे का, डीवी?

डीवी : मी समजावतो ते. आरोग्यतज्ज्ञांच्या मते हा नवीन करोना विषाणू वटवाघूळ, पँगोलिन अथवा सागरी खाद्यपदार्थातून उद्भवलेला असू शकतो. पँगोलिन किंवा खवलेमांजर हा मुंग्या खाणारा, नामशेष होऊ पाहत असलेला प्राणी आहे. चीनमधील वुहान येथे या विषाणूचे सर्वप्रथम संक्रमण झाले. त्यानंतर हा विषाणू बहुतांशी मानवी संपर्काद्वारे सर्वत्र पसरला. आणखी सांगायचे तर, गुरे, उंट अशा विशिष्ट प्राणी प्रजातीत करोना विषाणू सामान्यत: असतोच. तरी, हा विषाणू माणसांमध्ये कुठून आला ते अचूकपणे सांगता येत नाही.

सुहास : पण मला नवल याचे वाटते की, हा विषाणू वटवाघूळ किंवा इतर प्राण्यांमध्येही रोग उत्पन्न करत असेल का?

डीवी : वटवाघळे म्हणजे करोनाच्या वर्गातील विषाणू तसेच निपाह, मारबर्ग आणि हेंड्रा, ऱ्हायनो व्हायरस, लिस्सा व्हायरस व अ‍ॅडिनो व्हायरस अशा अनेक विषाणूंचे भांडार असल्याचे मानले जाते. तसे असले तरी या विषाणूंचा परिणाम वटवाघळे रोखू शकतात. उडण्यामुळे त्या विषाणूंचा दाह कमी करण्याची शारीरिक यंत्रणा त्यांच्यात नसíगकरीत्या असते. त्यामुळे या विषाणूंपासून होऊ शकणाऱ्या कोणत्याही आजारापासून वटवाघळे स्वत:ला वाचवू शकतात.

किरण : वटवाघळांपासून माणसांपर्यंत या विषाणूंना संक्रमित करण्यासाठी काही मध्यस्थ प्राणीही कारणीभूत ठरले हे खरे आहे का डॉक्टर?

डीवी : अगदी खरे आहे. ‘एस.ए.आर.एस.’चा प्रादुर्भाव दक्षिण चीनमध्ये २००२ साली झाला. त्याला अंगावर ठिपके असणारे कस्तुरी मांजर कारणीभूत ठरले होते. सौदी अरेबियातून सुरू झालेल्या ‘एम.ई.आर.एस.-कोव्ह’साठी एक मदारीचा अरेबियन उंट हा मध्यस्थ प्राणी ठरला, घोडय़ामुळे हेंड्रा विषाणू पसरला. वुहानच्या मांस बाजारामार्फत माणसांपर्यंत कोविड-१९ विषाणू पसरवण्यास पँगोलिन हा मध्यस्थ प्राणी ठरल्याचे मानले जाते.

नम्रता : धन्यवाद. या विषाणूबद्दल बरीच विस्मयकारक माहिती कळतीये. या विषाणूचे चित्र पाहिले तर त्याचा आकार आणि पृष्ठभागावरचे दाते कसे मोहक आणि सुबक वाटतात. त्याच्या आकाराबद्दल, ठेवणीबद्दलही काही सांगा.

डीवी : तुझे निरीक्षण बरोबर आहे, नम्रता. एस.ए.आर.एस.-कोव्ह-२ विषाणू हा चेंडूसारखा गोल असतो आणि तू दाते म्हणालीस ना तशी तीक्ष्ण प्रवध्रे त्याच्या पृष्ठभागावर असतात. ग्लायकोप्रोटीन्स नामक, शर्करा आणि प्रथिनांच्या संयोगापासून ही बाह्य़ प्रवध्रे बनलेली असतात. हीच बाह्य़ प्रवध्रे माणसावर हल्ला करताना मानवी पेशींमध्ये अडकतात. या विषाणूंच्या गोलाकार भागाचा बाह्य़ थर हा विशिष्ट प्रथिने व स्निग्धांशाचा बनलेला असतो. त्या गोलाच्या आत असलेला आर.एन.ए. (रायबोज न्यूक्लीक आम्ल) हा त्या विषाणूचा सूत्रधार असतो. विषाणूचे जे चित्र आपण पाहतो ते इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेखाली दिसणारे १००००० पटीने वाढवल्यावर दिसणारे चित्र आहे. विषाणूच्या पृष्ठभागावरची ही प्रवध्रे मानवी पेशींवर हल्ला करण्याचे कार्य करतात आणि लस बनवण्यासाठीही उपयोगी ठरतात.

विद्या : माझा एक बाळबोध प्रश्न आहे डीवी. क्षयरोग, हिपॅटायटीस, विषमज्वर आणि कर्करोग यांसारखे रोगही जीवघेणे असताना या विषाणूबद्दलच इतकी भीती का?

डीवी : कोविड-१९ रोगाचा कारक विषाणू हा नवा आहे. याच्या विरोधात हवी तशी प्रतिकार क्षमता कोणाकडेच नाही. करोना प्रवर्गातल्या एस.ए.आर.एस.-कोव्ह तसेच एम.ई.आर.एस.-कोव्ह विषाणूंपेक्षा या नव्या विषाणूमुळे होत असलेल्या आजाराचा मृत्युदर कमी म्हणजे ३.४ टक्के इतका आहे; पण त्याची संसर्ग क्षमता जास्त आहे. स्पर्शाद्वारे तर तो पसरतोच, पण हवेतूनही त्याचा प्रादुर्भाव होत असल्याचे अलीकडच्या अभ्यासातून उघड झाले आहे. कोविड-१९चे रोगी, लक्षणे नसणारे विषाणूंचे वाहक आणि विषाणू वाहणारे प्राणी यांच्या संपर्कात असलेल्यांना संसर्ग होण्याची दाट शक्यता असते.

सीमा : माझ्याकडे एक गोड मांजर आहे. तिच्यामार्फतही कोविड-१९ होऊ शकतो का?

डीवी : भारतात आतापर्यंत अशी कोणतीही केस ऐकिवात नाही; पण कोविड-१९ बाधितांनी पाळलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या प्राण्यांनाही संसर्ग झाल्याची नोंद जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केलेली आहे; पण माणसामाणसांतील संपर्क हे या रोगाच्या प्रादुर्भावाचे प्रमुख कारण असल्याचेही या संघटनेने पुढे नोंदवले आहे. मांजरे किंवा इतर पाळीव प्राणी हे मध्यस्थ वाहक असू शकतात का, हे आताच सांगणे कठीण आहे.

सीमा : धन्यवाद डॉक्टर, कोविड-१९ च्या उपचारासाठी कोणतेही प्रमाणित औषध वा लस आजघडीला उपलब्ध नाही, असं ज्ञान आम्हाला समाजमाध्यमातून मिळालं; पण या कोविड-१९च्या प्रतिबंधासाठी भविष्यात काय उपाय होतील?

डीवी : हा प्रश्न नेहमी विचारला जातो. हॅड्रॉक्सिक्लोरोक्वीन, क्लोरोक्वीन, लॉपिनावीर, रिटॉनाविर, रेमडेसीवीर आणि फॅव्हीपिरावीर इत्यादी प्रति सूक्ष्मजीवी रसायनांमध्ये एस.ए.आर.एस.-कोव्ह-२ चा प्रतिकार करण्याची क्षमता दिसून आली आहे. अझिथ्रोमायसिन, प्रतिकार क्षमता संवर्धके, कोविड-१९ पुनरुज्जीवक प्लाविका, घनीभवन टाळणारी औषधे, आणि टोसिलिझुमॅब आणि सारीलुमॅबसारखी इंटरल्यूकिन्स इत्यादींचा पूरक उपचार म्हणून उपयोग होतो. याखेरीज यशस्वी लस शोधण्यासाठी अनेक देशांतून मोठय़ा प्रमाणावर आणि जलद गतीने संशोधन चालू आहे. प्लाज्मा थेरपी आणि स्टेम सेल यांच्या वापराचेही प्रयत्न मोठय़ा प्रमाणावर सुरू आहेत.

महेश : इतके सारे प्रयत्न चालू आहेत हे पाहून खूप सकारात्मक वाटते. करोना विषाणू या सूक्ष्म राक्षसाचा बंदोबस्त करण्यासाठी माणसाने आता कंबर कसली आहे; पण एक गोष्टीचे कुतूहल अनेक दिवसांपासून मनात आहे.

डीवी : बोल ना महेश, काय आहे ते?

महेश : करोना विषाणूचा संसर्ग झालेले काही जण मरतात, पण अनेक वाचतातही, ते कसे?

डीवी : असं पाहा, सगळ्यात आधी आपल्या शरीराची रोगास प्रतिरोध करण्याची क्षमता म्हणजे प्रतिकारशक्ती ही फार महत्त्वाची आहे. ही प्रतिकारशक्ती व्यक्तीचे वय, आहार, ती व्यक्ती किती व्यायाम करते, तिला कोणते दीर्घकालीन आजार आहेत का आणि ती व्यक्ती कोणती नियमित औषधे घेत आहे, यासारख्या घटकांवर अवलंबून असते. संसर्गक्षम गोष्टींच्या संपर्कात आल्यानंतर संसर्ग होईल किंवा नाही, हे या प्रतिकारशक्तीच्या बळावर ठरते. संपर्कात आलेल्या संसर्गक्षम गोष्टींची बाधा करण्याची ताकद, संसर्ग करू शकणाऱ्या कणांची संख्या यावरही ते अवलंबून असते. आता पुढच्या टप्प्यावर, एखाद्याला विषाणूंचा संसर्ग झाला आणि सुरुवातीला सौम्य लक्षणे दिसू लागली तरी त्याची प्रतिकारशक्ती हा हल्ला परतवून लावू शकते आणि काही दिवसांत रुग्ण पूर्ववत होऊ शकतो. जर रुग्णाची लक्षणे तीव्र स्वरूपाची असतील तर त्या लक्षणांवर आधारित उपाय योजले जातात. या आधी सांगितलेली प्रतिजैविके आणि पूरक औषधे योजली जातात. हा निर्णय पूर्णपणे चिकित्सा करणाऱ्या तज्ज्ञांचा असतो. या उपाययोजना प्रतिकारशक्तीला पूरक ठरतात आणि रुग्ण लवकर बरा होतो. संसर्ग झालेल्यांपकी फार कमी म्हणजे साधारण ३.४ टक्के रुग्ण पुढच्या दु:खद पायरीपर्यंत जातात. हा विषाणू नवीन असल्याने हा आमच्यासाठी नवीन अनुभव आहे. मला वाटते मी पुरेसे स्पष्ट केले आहे आता.

महेश : नक्कीच! डीवी सर, माझी एक साधी शंका आहे. घराबाहेर असताना, दोन व्यक्तींमधील एक मीटर अंतरामागे काय शास्त्र आहे?

डीवी : या नव्या करोना विषाणूच्या विरोधात शारीरिक अंतर हा सर्वात परिणामकारक उपाय आहे. जागतिक आरोग्य परिषदेचेही असेच मत आहे. एखादी व्यक्ती खोकत किंवा िशकत असेल तर अशा व्यक्तीपासून कमीत कमी एक मीटर (अथवा तीन फूट) अंतर राखणे गरजेचे आहे. तुम्ही अशा व्यक्तीच्या जवळपास असाल तर हे विषाणू श्वसनमार्गातून तुमच्या शरीरात पोचू शकतात. ती व्यक्ती कोविड-१९ चा रुग्ण किंवा वाहक असू शकते.

काव्या : डीवी, ऐकिवात आलेल्या आणखी एका गोष्टीबद्दल विचारते तुम्हाला. ‘बी.सी.जी.’ची लस आणि करोना विषाणू यांचा काय संबंध आहे?

डीवी : भारतात जन्मलेल्या करोडो मुलांना ‘बी.सी.जी.’ची ही लस जन्मल्यानंतर लगेचच दिली जाते. ती क्षय रोगापासून वाचवण्यासाठी; पण अमेरिकन शास्त्रज्ञांना असे वाटते की, ही लस करोना विषाणूच्या विरोधातल्या लढय़ात तारणहार ठरू शकते. न्यूयॉर्क इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी इटली व अमेरिकेतील उदाहरणांवर आधारित अद्यापि अप्रकाशित अशा एका शोधनिबंधात, करोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि बी.सी.जी. लसीकरण धोरण यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या देशांमध्ये बी.सी.जी. लसीकरणाचे धोरण आहे त्यांच्या तुलनेत इटली, नेदरलॅण्ड, अमेरिका इत्यादी बी.सी.जी. लसीकरण धोरण नसणारी राष्ट्रे जास्त प्रमाणात कोरोनाच्या प्रादुर्भावाला बळी पडली आहेत, असे दिसत आहे. तांत्रिकदृष्टय़ा हे अजून सिद्ध व्हायचे आहे.

राजन : बरं डॉक्टर, हे चौदा दिवसांचेच विलगीकरण का असते? दहा, एकवीस किंवा तीस दिवस का नाहीत?

डीवी (हसून) : सांगतो, हे चौदा दिवसांचं गूढ काय आहे ते सांगतो. विषाणूचा संसर्ग झाल्यावर त्या आजाराची लक्षणे दिसू लागण्यापर्यंतच्या कालावधीला उष्मायन (इन्क्युबेशन) काळ म्हणतात. कोविड-१९साठी हा काळ एक ते चौदा दिवसांचा असून, सामान्यत: हा कालावधी पाच दिवसांचा आहे. एखाद्याला कोविड-१९ची लागण झाल्याचा संशय आला तर त्याचे चौदा दिवस विलगीकरण करण्यात येते. त्या दरम्यान जर त्याला कोविड-१९ची लक्षणे दिसली नाहीत तर त्याला लागण झालेली नाही असे निश्चितपणे म्हणता येते. जशी जास्त माहिती उपलब्ध होत जाईल तसा हा आकडा बदलू शकतो.

माधव : मला वाटते डॉ. वासुदेव यांचा निरोप घ्यायची आता वेळ आली आहे. उद्या सकाळी त्यांना त्यांच्या रुग्णांच्या तपासणीसाठी हॉस्पिटलला जायचे आहे. तुमचे खूप आभार, डीवी, आमच्या वेब मीटिंगमध्ये सहभागी होऊन आमचे शंकानिरसन केल्याबद्दल.

डीवी : मलाही तुम्हाला भेटून आनंद वाटला. तुम्ही सर्व घरी राहा, सुरक्षित राहा आणि आम्हाला ही करोना विषाणूची साखळी भेदून ही वैश्विक समस्या सोडवण्यास मदत करा.

Story img Loader