अमृता दत्ता  कमल सैयद लक्ष्मण सिंग  अंकिता जोहरी गार्गी वर्मा  साक्षी दयाळ – response.lokprabha@expressindia.com

व्यवस्थेने विश्वास जिंकला
दिया नायडू, कोरिओग्राफर, बंगळूरु

कर्नाटकात बंगळूरुमध्ये कोरिओग्राफर म्हणून काम करणारी दिया (वय ३८ वर्षे) ९ मार्चला स्वित्र्झलड दौऱ्याहून परत आली तेव्हा फक्त चीन, सिंगापूर, इटली आणि इराणहून परतणाऱ्यांचंच विलगीकरण केलं जात होतं. घरी आल्यावर दियाला चव, वास या संवेदना जाणवत नव्हत्या. ही कोविड १९ ची लक्षणं असतील का याचा तिने नेटवर शोध घेतला. एका खासगी दवाखान्यातही गेली, पण स्वित्र्झलड करोनाबाधित देशांच्या यादीत नसल्याने आणि तिच्यात करोनाची लक्षणे दिसत नसल्याने संबंधित टेस्ट करण्याची गरज नसल्याचं तिला सांगण्यात आलं, पण चव नसल्याने ती परत हॉस्पिटलला गेली, तर तेव्हा इतर देशांमधून आलेल्या प्रवाशांचीही करोना तपासणी करणं सुरू झालं होतं. मग तिच्याही घशातून द्रव घेतला गेला आणि नंतर ती पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं. ती सांगते, मी पॉझिटिव्ह असल्याचं समजल्यापासून सारखा विचार करत होते की, मी कुणाकुणाला भेटले? मी त्यांनाही धोक्यात टाकलं का? या चार-पाच दिवसांत वेगवेगळ्या कार्यक्रमांना गेली होती, मित्रमैत्रिणींना भेटली होती, डान्स स्टुडिओंमध्ये गेली होती! तिने लगेचच ती पॉझिटिव्ह असल्याचं फेसबुकवर लिहिलं. ती ज्यांना ज्यांना भेटली त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप करून सगळ्यांना ती करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली. राजीव गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ चेस्ट डिसीजेसमध्ये  बंगळूरुमधले करोनाचे १९ रुग्ण ठेवले गेले होते. दियालाही तिथेच ठेवलं गेलं होतं. आपल्या अनुभवाबद्दल ती सांगते, मी माझं मनोबल टिकवण्यासाठी रोज तासभर योगा करत होते. नर्स मला तपासायला पीपीईमध्ये, हॅझमॅट सूटमध्ये येत. त्या अगदी ३० सेकंदांसाठी आल्या तरी काही तरी विनोदी बोलून वातावरणामधला ताण कमी करायचा प्रयत्न करत. तिथल्या सर्वच वैद्यकीय कर्मचाऱ्यांची त्यांच्या कामावरची निष्ठा अद्वितीय होती.

ती स्वित्र्झलडहून आल्या आल्या लगेचच आयसोलेशनमध्ये गेली नाही म्हणून लोकांनी तिला ट्रोल केलं. ती हॉस्पिटलमध्ये असतानाच तिच्या घरमालकाने तिला घर सोडायला सांगितलं. फेसबुक वॉलवर येऊन अनेक अनोळखी लोकांनी ती थंड रक्ताची खुनी व्यक्ती असल्याचं लिहिलं. काहींनी तर तिला अटक करायला हवी, अशीही मागणी केली. लोकांनी करोना रुग्णांचा असा दुस्वास करणं थांबवलं नाही तर यापुढचे रुग्ण आपण पॉझिटिव्ह आहोत हे लपवून ठेवतील, असं ती सांगते.

पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी, राज्य सरकारची देखरेख यंत्रणेचे अधिकारी स्वित्र्झलडहून आल्यापासून ती कुठे कुठे गेली, कुणाकुणाला भेटली याची ते तपशीलवार माहिती घेत होते. ओला ड्रायव्हर, खाद्यपदार्थाची डिलिव्हरी करणारे, ती काम करत असलेला डान्स स्टुडिओ या सगळ्यांचा माग काढण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजवरू न तिने दिलेल्या माहितीची  खातरजमा करून घेतली गेली. ती एका रात्री किराणा मालाच्या दुकानात गेली होती. तिने मास्क घातलेला असल्याने त्यांना तिला फुटेजमध्ये चेहरा ओळखता आला नाही तर त्यांनी कपडय़ांवरून ती तीच आहे याची खात्री करून घेतली. त्या वेळेला तिच्या बँक  खात्यातून पेमेंट झालं आहे हे बघितलं. ते किराणा दुकान बंद करायला लावलं. सुदैवाने या सर्वाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. आता उपचारांनंतर तीही बरी झाली आहे. दियाला आता लवकरात लवकर घरी जायचं आहे. नेहमीचं रुटीन, नृत्य सुरू करायचं आहे, पण सध्या तरी लगेचच ते शक्य नाही. सध्या तिला तिच्या एका मित्राने त्याचं रिकामं ऑफिस राहण्यासाठी दिलं आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, धोरणं, काळजी घेणं या सगळ्यामुळे माझा आपल्या यंत्रणांवरचा विश्वास पुन्हा दृढ झाला आहे, असं ती सांगते.

हा माझा पुनर्जन्मच
रीटा बचकनीवाला

सुरतमधली रीटा बचकनीवाला (२१ वर्षे) ब्रुसेल विद्यापीठात आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनाचं शिक्षण घेते. ती लंडनहून परतल्यानंतर १९ मार्च रोजी तिला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. विद्यापीठ बंद झाल्यानंतर बराच काळ मी माझ्या रूमवर विलगीकरणातच घालवला. त्यामुळे मला बहुधा हिथ्रोच्या किंवा मुंबईच्या विमानतळावर हा संसर्ग झाला असावा, ती सांगते.

भारतात आल्यावर लगेचच तिला ताप आला आणि खोकला झाला. तिला करोना व्हायरसची माहिती असल्यामुळे आपण पॉझिटिव्ह असल्याचं कळल्यावर अजिबात धक्का बसला नाही, कारण तिची त्यासाठी मानसिक तयारी झाली होती. ती पॉझिटिव्ह झाल्यामुळे तिचे आईवडील, भाऊ यांनाही विलगीकरणात ठेवलं गेलं. त्यांच्या टेस्ट नंतर निगेटिव्ह आल्या. ती सांगते, हॉस्पिटलमध्ये मला तोंडावाटे औषधं दिली गेली, इंजेक्शनं दिली गेली. तिथले कर्मचारी दिवसातून पाच वेळा तपासायचे. रक्तदाब, ताप, श्वसन या सगळ्यावर सतत देखरेख ठेवली जायची. नाकातून नळी घालून घशातून द्राव घेतला जायचा ते सगळ्यात वेदनादायक होतं. डिस्चार्जनंतर रिटाने तिच्या फेसबुक पेजवर एनसीएचच्या डॉक्टरांचे आभार मानणारा आणि सरकारी दवाखान्यांवर विश्वास ठेवण्याचं आवाहन करणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

विलगीकरणाच्या काळात कुटुंबामधलं कुणीही जवळ नसणं हे तिच्यासाठी खूप जड गेलं. तिथे टीव्ही नव्हता. त्यामुळे फोन हाच जगाशी जोडून घेण्याचा एकमेव आधार होता. तिला घरच्यांशी, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारता आल्या, पण तिथे इंटरनेट नसल्यामुळे करोनाबाबत जगात काय सुरू आहे त्याच्या बातम्या तिला समजू शकल्या नाहीत. त्यामुळे त्या भीतीपासून ती दूर राहू शकली. या काळात तिने पुस्तकं वाचली, मोबाइल गेम्स खेळले, अभ्यास केला. डिस्चार्जनंतर तिला सुरत महापालिकेच्या एका फ्लॅटमध्ये तिच्या कुटुंबीयांपासून वेगळं ठेवण्यात आलं. २९ मार्चला हे विलगीकरण संपून संपूर्ण कुटुंब एकत्र आलं. या अनुभवाबद्दल रीटा सांगते, या आजारपणामुळे मी आयुष्याकडे अधिक गंभीरपणे पाहू लागले. त्याने मला जगण्याचं महत्त्व समजलं. मला माझं कुटुंब, मित्रमैत्रिणी यांच्याशी असलेलं नातं याविषयीची नवीन दृष्टी मिळाली. हा माझा पुनर्जन्मच आहे.

कुटुंबात परतल्याचा आनंद
मौलाना असद कासमी

मुंबईत गोवंडी इथं स्थानिक मशिदीमध्ये गेली २० वर्षे मौलवी म्हणून काम करत असलेले मौलाना असद कासमी (वय ४३) श्रीलंका, बँकॉक, कंबोडिया आणि मलेशिया या देशांना भेट देऊन १७ मार्चला मुंबईत आले. परदेशातून परतल्यानंतर त्यांना सारखा ताप येऊ लागला. तो कमी होत नाहीये हे दिसल्यावर ते हॉस्पिटलला गेले. २२ मार्च रोजी ते करोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं आणि त्यांना चिंचपोकळीच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये त्यांना असं वाटायला लागलं की, आता आपलं आयुष्य संपलं. आता आपण काही आपल्या कुटुंबाला पुन्हा बघू शकणार नाही. याचा त्यांच्या मनावरही खूप परिणाम झाला. त्यांना मधुमेह होताच. या ताणाचा परिणाम होऊन त्यांच्या रक्तामधली साखर वाढली. एवढं सगळं होऊनही सुदैवाने मी वाचलो, ३० मार्चला मला डिस्चार्ज मिळाला, पण हॉस्पिटलने मला पुढचे १४ दिवस विलगीकरणात राहायला सांगितलं आहे, ते सांगतात. सध्या ते त्यांच्या घरात पहिल्या मजल्यावरच्या एका लहानशा खोलीत राहतात, तर त्यांची बायको आणि मुलं खालच्या खोलीत राहतात.

ते सांगतात, मी इतर ठिकाणच्या बातम्या वाचतो आहे, पण तसा अनुभव मला किंवा माझ्या कुटुंबाला अजिबात आलेला नाही. आम्हाला आमच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून अजिबात वाईट वागणूक मिळालेली नाही. माझ्या आसपासच्या लोकांना उलट माझ्या तब्येतीची काळजी वाटली. कुणीही मला आमच्या परिसरात तू हा व्हायरस आणलास, असा दोष दिला नाही. उलट मी हॉस्पिटलमधून परत आल्यावर अनेक जण मला भेटू इच्छित होते. त्यासाठी ते आलेही, पण माझ्या घरच्यांनी मी विलगीकरणात असल्याचं सांगून त्यांना परत पाठवून दिलं. मी मौलवी असल्यामुळे लोकांना माझ्याविषयी आदर आहे. त्यांच्या कुटुंबीयांची करोना टेस्ट निगेटिव्ह आल्याचं त्यांना समाधान आहे.

कुणालाच कळणार नाही
शांबली, वैद्यकशास्त्राची विद्यार्थिनी, नोएडा

मूळची नोएडामधली शांबली (वय २२) जॉर्जियामधल्या स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकशास्त्राची विद्यार्थिनी आहे. ती आपल्या मित्रमंडळींबरोबर सुट्टी घालवायला फ्रान्सला गेली होती. तिथून दिल्लीला आल्यावर ती थेट नोएडामधल्या घरी गेली, पण तिला लगेचच अशक्तपणा जाणवायला लागला. सर्दी झाली, खोकला झाला, डोकेदुखी सुरू झाली. ती लगेचच ग्रेटर नोएडामधल्या गव्हर्मेट इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये गेली. तपासण्या झाल्या आणि १७ मार्च रोजी ती करोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. अ‍ॅडमिट झाल्यावर पुढचे तीन-चार दिवस तिला ताप येत राहिला. तिला दिल्या गेलेल्या औषधांच्या साइड इफेक्टमुळे तिला उलटय़ा होत होत्या. श्वास घ्यायला त्रास होत होता. तिथे बाकीचे सगळेच रुग्णही धास्तावलेले वाटायचे. डॉक्टर आणि नर्सनादेखील रुग्णांमुळे आपल्याला आणि पर्यायाने आपल्या घरच्यांनाही धोका निर्माण होईल का, अशी धास्ती वाटायची, पण तिला मात्र एकदाही असं वाटलं नाही की, आता ती काही जगत नाही. इतर कोणत्याही तापासारखाच हा ताप आहे असंच तिला वाटत होतं. शांबली सांगते, २६ मार्च रोजी मला डिस्चार्ज मिळाला, पण आधी हॉस्पिटलमधल्या आणि नंतर घरातल्या विलगीकरणाच्या काळात अँग्री बर्ड हा गेम खेळून आणि चेतन भगतची पुस्तकं वाचून मी वेळ घालवला. जालंधरला राहणारे तिचे आईवडील तिचं घरातलं विलगीकरण सुरू झालं तेव्हा आले, पण तुमच्या मुलीने पुरेशी काळजी घेतली नाही आणि आमचाही जीव धोक्यात घातला, असे टोमणे त्यांना शेजाऱ्यांकडून ऐकून घ्यावे लागले. शांबलीला मात्र हे मान्य नाही. ती म्हणते, मी स्वत:हूनच मी करोना पॉझिटिव्ह असल्याचं सगळ्यांना सांगितलं आणि कुणालाही भेटले नाही. त्यामुळे त्यांनी असे टोमणे मारणं चुकीचं आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि फक्त मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याशी बोला, असं मी माझ्या वडिलांना सांगितलं. मला २६ मार्चला डिस्चार्ज मिळून मी घरी आले तेव्हाही रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनच्या प्रमुखाने तिथे राहण्याबाबत आक्षेप घेतला, पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. मी माझ्या घरी विलगीकरणात राहते आहे. माझे आईवडील मला खायला-प्यायला देतात, बाकी माझा त्यांच्याशी कसलाही संपर्क येत नाही, ती सांगते. तिचं कॉलेज सध्या बंद आहे. ऑनलाइन क्लासेस लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिच्या या करोना संसर्गाबद्दल तिच्या विद्यापीठाला कळवणं तिला गरजेचं वाटत नाही. या आजाराचा आपल्या भविष्यावर परिणाम होईल असंही तिला वाटत नाही. ती सांगते, तसंही इथे नोएडामध्ये मला फारसं कुणी ओळखत नाही. विलगीकरणानंतरच्या काळात मी घराबाहेर पडले तरी कुणाला कळणारही नाही की मला करोना झाला होता.

लोक त्रास देणार

छत्तीसगडच्या रायपूरमधल्या ६५ वर्षांच्या गृहस्थांना मार्चच्या तिसऱ्या आठवडय़ात सर्दी-खोकला झाला. त्यांना तो साधाच आजार वाटला, पण एक दिवस आशादीदी (आरोग्यसेविका) घरी आली आणि तिने कुणी आजारी आहे का विचारलं तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी तिला त्यांच्या सर्दी-खोकल्याबद्दल सांगितलं. पुढच्या ४८ तासांमध्ये या १५ जणांच्या कुटुंबाला त्यांच्या दोन खोल्यांच्या घरामधून रायपूरमधल्या सरकारी विलगीकरण कक्षात हलवण्यात आलं. २५ मार्च रोजी या ६५ वर्षांच्या गृहस्थांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. ती राज्यामधली तिसरी केस होती. त्यांना रायपूरमधल्या एम्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. कुटुंबातल्या सगळ्यांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांचीही करोना टेस्ट करण्यात आली, पण सुदैवाने ते सगळे निगेटिव्ह निघाले. आश्चर्य म्हणजे हे आजोबा कुठेही परदेशात वगैरे गेले नव्हते. २ एप्रिलला ते बरे होऊन त्यांच्या कुटुंबाबरोबर विलगीकरण कक्षात गेले आहेत. तिथे १४ दिवस घालवल्यावर ते त्यांच्या घरी जाऊ शकतील, पण या आजोबांची चिंता वेगळीच आहे. ते म्हणतात, या जीवघेण्या आजारातून जगल्यावाचल्याचा आनंद आहेच, पण आता आम्ही परत जाऊ तेव्हा आसपासचे लोक आम्हाला अस्पृश्यासारखी वागणूक देतील. माझ्या कुटुंबातल्या कुणालाही करोना झाला नाही, पण माझ्यामुळे त्यांना त्रास भोगावा लागणार आहे.

बाळासोबत वेळ घालवणार

ती सहा महिन्यांच्या बाळाची आई, वय वर्षे ३७, गुरगावमधल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करते. करोनाबाधित असण्याची शक्यता असलेल्या रुग्णांचे फॉर्म भरून त्यांच्या प्रवासाचा तपशील नोंदवणे हे काम तिला दिलं गेलं होतं, पण २० मार्च रोजी तिलाच करोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. घशात खवखव आणि जुलाब सुरू झाल्यावर तिची तपासणी झाली. तिचे रिझल्ट पॉझिटिव्ह आल्यावर मुलाची आणि नवऱ्याचीही चाचणी झाली. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तिला हॉस्पिटलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलं. आपल्या सहा महिन्यांच्या बाळापासून लांब राहणं तिच्यासाठी हे दहा दिवस खूपच खडतर होते. या काळात ती सतत फोनवरून तिच्या कुटुंबाच्या संपर्कात होती. २ एप्रिलला डिस्चार्ज मिळून घरी आल्यावर तिच्या कुटुंबासमोर वेगळंच संकट उभं राहिलं. त्यांनी तिथे राहू नये, दुसरीकडे निघून जावं, असं त्यांच्या काही शेजाऱ्यांचं म्हणणं होतं. त्यांची समजूत घालून तो प्रश्न सोडवला गेला. अर्थात ती घरी नसतानाच्या आणि तिचा नवरा आणि बाळ विलगीकरणात असतानाच्या काळात काही शेजाऱ्यांनी खाणंपिणं, आवश्यक वस्तू आणून देणं अशी मदतही केली. तिला दोन चाचण्या सलग निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज मिळाला असला तरी औषधांच्या साइड इफेक्टमुळे तिला नॉशिया, थोडं पोटात दुखणं असा त्रास आहे. तिला आठवडाभर विश्रांतीही घ्यायला सांगितली आहे. त्यामुळे आता तिला घरी बाळाबरोबर वेळ घालवायचा आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर विसंबून राहू नका

अलीकडेच लग्न झाल्यानंतर इंडोनेशियात बायकोबरोबर सुट्टी घालवून परतलेल्या अनुग्रह पंडय़ा (वय २७) दिल्ली विमानतळावर थर्मल स्क्रीनिंगमधून नॉर्मल म्हणून पार झाला. १४ दिवसांचं स्वत:च स्वत:हून केलेलं घरातलं विलगीकरण संपवून कामावर जायच्या दिवशी त्याच्या ऑफिसने त्याने करोना चाचणी करून घ्यावी, असा आग्रह धरला म्हणून तो बायकोला घेऊन चाचणी केंद्रात गेला. या चाचणीत तो पॉझिटिव्ह निघाला आणि त्याची बायको निगेटिव्ह. मार्च १८ रोजी त्याला ग्रेटर नोएडामधल्या गव्हर्नमेंट इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सव्‍‌र्हिसेसमध्ये दाखल करण्यात आलं. तो सांगतो, मी करोनाबाधित रुग्णांच्या पहिल्या फळीमधला होतो असं म्हणता येईल. तिथल्या वॉर्डमध्ये आम्ही तिघे होतो. तिघंही एकच स्वच्छतागृह वापरायचो. सुरुवातीला तिथे आंघोळीची व्यवस्थाच नव्हती. त्यांनी एक शॉवर आणून बसवला, पण तो लगेच तुटला. प्लंबरने तो येऊन लावून द्यायला नकार दिला. त्यामुळे मी १४ दिवस आंघोळीशिवाय सॅनिटायझर अंगाला चोपडून काढले. आमचं नेमकं काय करायचं याबाबत तिथले वैद्यकीय साहाय्यकदेखील चाचपडतच होते. रोज आम्हाला स्वच्छ धुतलेली बेडशीट्स दिली जाई, पण ती बेडशीट आम्हालाच बदलावी लागे. तीन वेळा खायला दिलं जात असे आणि काही औषधं दिली जात. आमच्या रोज तपासण्या होत. सुरुवातीला वाटला नाही तरी नंतर हॉस्पिटलमधला काळ अवघड होताच, त्याच्यात करोनाची कोणतीच लक्षणं दिसत नव्हती. त्यामुळे वाचन, वेगवेगळे व्हिडीओ बघणं, यात तो वेळ घालवायचा, पण आपण एखाद्या तुरुंगात बंदिस्त आहोत असंच वाटायचं. तो सांगतो, माझ्यामध्ये त्यांना करोनाची कोणतीही लक्षणं आढळली नाहीत, तेव्हा म्हणजे २६ मार्चला मला घरी सोडण्यात आलं. १० एप्रिलनंतर मी अधिकृतपणे करोनामुक्त झालेला असेन. गेला महिनाभर त्याचा इतर माणसांशी काहीही संपर्क नाही. तो घरून काम करतो आहे.  सकस आहार आणि व्यायामावर भर देतो आहे. त्याचे आईवडील राजस्थानातील खेडय़ात राहतात. तो करोना पॉझिटिव्ह झाला आहे हे त्यांच्या घरच्यांना सांगितलं नाही. गावात आधीच खूप गैरसमज, अफवा आहेत. त्यात त्यांच्या काळजीत आणखी भर घालायची नाही असं त्या दोघांनी ठरवलं आहे. त्याच्या आजारपणामुळे त्यांच्या नोएडामधल्या घराच्या परिसरातही शेजारीपाजारी खूप घाबरले आहेत. सुरुवातीला त्यांनी तुम्ही इथं राहण्यापेक्षा एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन राहा, असं सुचवलं होतं, पण आता वातावरण ठीक आहे. काही मदत लागली तर सांगा, असंही आता ते फोन करून सांगतात. पंडय़ाने व्हॉट्सअ‍ॅपवर यादी पाठवली की, सरकारी कर्मचारी त्यांना आवश्यक त्या वस्तू आणून देतात. पंडय़ा सांगतो, मला कोणताही शारीरिक त्रास झाला नाही, पण यापुढच्या काळातही तो होऊ नये यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर द्यावा लागेल. मी करोना रुग्णांना सांगू इच्छितो की, प्रतिकारशक्ती कशी वाढवायची याबाबतचे व्हॉट्सअ‍ॅपवर येणारे मेसेज अजिबात वाचू वा अमलात आणू नका. ते घरगुती उपचार चांगले असतीलही, पण ते करोना बरा करू शकत नाहीत.

विलगीकरणाचा सदुपयोग केला

करोना व्हायरसची साथ इंग्लंडमध्ये पसरायला लागली तशी तिथे शिकायला गेलेल्या गुरगावच्या २२ वर्षीय विद्यार्थिनीने तिच्या इतर सहाध्यायींप्रमाणे मार्चच्या मध्यावर भारतात परत येण्याचा निर्णय घेतला, पण घरी परतल्यावर काही दिवसांतच तिला ताप आणि घसादुखी सुरू झाली. तिने १६ मार्चला गुरगावच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये घशातल्या द्रावाचे नमुने दिले आणि १९ मार्चला ती करोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. मग तिचा भाऊ, वडील आणि आजीचेही घशातल्या द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आणि तेही करोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं. ती सांगते, मी लंडनहून आले तेव्हा परिस्थिती गंभीर आहे हे मला माहीत होतं, पण मी परतल्यानंतर लगेचच मला आणि माझ्या कुटुंबीयांना या परिस्थितीला सामोरं जावं लागेल असं मला वाटलं नव्हतं.  आधी तिला आणि तिच्या कुटुंबीयांना गुरगावमधल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आणि नंतर खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. विलगीकरणाचा काळ कठीण गेला असला तरी या काळात तिने तिचा अभ्यास पूर्ण करून घेतला. मित्रमैत्रिणींशी, नातेवाईकांशी, प्राध्यापकांशी व्हिडीओ कॉल करून गप्पा मारल्या, टीव्ही बघण्यात वेळ घालवला. तिला आणि तिच्या भावाला २८ मार्चला, तर तिच्या वडिलांना आणि आजीला १ एप्रिलला डिस्चार्ज मिळाला आहे. आता तिला त्यांच्यासोबत मजेत वेळ घालवायचा आहे.

अनुवाद : वैशाली चिटणीस