एका महाविद्यालयात एक सुंदर प्रोफेसर सायन्स हा विषय शिकवायची. तिच्या क्लासमधील मुले मात्र खूप दंगेखोर होती. फळ्यावर लिहिण्यासाठी तिने वर्गाकडे पाठ करताच काही टवाळखोर मुले चक्क शिटय़ादेखील मारायची. आजच्या लेक्चरला देखील नेमके तसेच झाले. प्रोफेसरने वळून ‘शिटी मारली त्याने उभे राहा’ अशी ऑर्डर सोडली. कोणीही उभे राहिले नाही व इतरांनी कोणाचे नाव सांगण्यास नकार दिला. प्रोफेसर शिटी मारणाऱ्याला पकडू शकत नाहीत या विचाराने सर्व क्लास तिच्याकडे बघून कुत्सितपणे हसू लागला. प्रोफेसरने मात्र न रागावता आज मी खूप खूश असल्याने तुमच्यावर न रागावता क्लास सोडून जात आहे असे सांगितले.
क्लासला हे अनपेक्षित होते, मुलांनी प्रोफेसरला त्यांच्या खुशीचे कारण विचारण्याचे ठरविले. प्रोफेसर म्हणाली, ‘‘काल मी रात्री उशिरा पार्टीवरून घरी परतत होते. मला रिक्षा किंवा टॅक्सी मिळत नव्हती. अशा वेळी एक देखणा तरुण पोर्शे कारमधून जात असताना माझ्यापाशी थांबला व त्याने मला लिफ्ट देऊ केली. कारमध्ये बसल्यावर आमच्या गप्पा सुरू झाल्या व आम्ही दोघे प्रथमदर्शनी एकमेकांच्या प्रेमात पडलो. माझ्या कॉलेजबद्दल कळल्यावर तो देखणा तरुण सहज म्हणाला, अरे माझा धाकटा भाऊ पण तुमच्याच वर्गात शिकतो. मी त्याला विचारले, त्याला मी कसा ओळखू? त्यावर तो तरुण हसत म्हणाला, जो मोठय़ाने व वेगवेगळ्या शिटय़ा मारू शकतो तोच माझा भाऊ.’’
प्रोफेसरने बोलणे थांबविताच ज्याने शिट्टी मारली होती त्याच्याकडे काही लोकांनी चोरटा कटाक्ष टाकला तर त्याच्या जवळच्या मित्रांनी त्याच्या हातावर टाळी मारत कमेंट केली की ‘‘अरे क्या बात है, तू तर आता लाडका देवर बनलास.’’ तर काही जणांनी तक्रार केली, ‘‘अरे तुझ्या भावाकडे पोर्शे आहे सांगितले नाहीस कधी, एकदा तू पण घेऊन ये ती गाडी कॉलेजमध्ये.’’
त्या देखण्या प्रोफेसरने शिट्टी मारणाऱ्या विद्यर्थ्यांकडे मिश्किल कटाक्ष टाकत फर्मान सोडले, ‘‘जेंटलमन तू वर्ग सोडून गेलास तरच मी पुढे लेक्चर घेऊ शकेन.’’
सर्व वर्गाला काय तो इशारा मिळाल्यामुळे पुढे कधीच त्या प्रोफेसरला त्रास देण्यात आला नाही.
कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये म्हणा किंवा वैयक्तिक आयुष्यात म्हणा, समोरच्या आगाऊ व्यक्तीला सडेतोड उत्तर देऊन गप्प बसविणे आले पाहिजे. कधी कधी आपल्या चांगुलपणाचा फायदा घेत आगाऊ व्यक्ती आपल्या शेपटीवर मुद्दामहून पाय ठेवते अशा वेळी काही क्षणांमध्येच आपल्याला पलटवार करता आला पाहिजे.
टूथपेस्ट विकणाऱ्या मल्टिनॅशनल कंपन्यांनी भूतकाळामध्ये भारतीय संस्कृतीची यथेच्छ टिंगल टवाळी करण्यात धन्यता मानली होती. मीठ किंवा कोळशाच्या पावडरने दात घासणारे लोक म्हणजे चुकीचे असा प्रसार करणाऱ्या कंपन्यांना जेव्हा पतंजलीच्या रूपाने (आयुर्वेदिक उत्पादने) आव्हान प्राप्त झाले तेव्हा त्याच मल्टिनॅशनल कंपन्या आपल्या टूथपेस्टमध्ये मीठ आहे, चारकोल आहे हे गर्वाने सांगू लागल्या. पतंजलीने मल्टिनॅशनल कंपनीचे दात त्यांच्याच घशात टाकले हे आपल्याला मान्य करावेच लागेल.
एकदा फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ गुजरातमध्ये गेले होते. तिथे त्यांनी इंग्रजीमध्ये भाषण चालू केले. तेथील श्रोतृवृंदाने त्यांना गुजरातीमध्ये बोलण्यासाठी सांगितले. सॅम गुजरातीमध्ये जोपर्यंत बोलणार नाहीत तोपर्यंत आपण त्यांची हुर्यो उडवायची असे त्या सर्वानी ठरविले होते. माणेकशॉदेखील सर्वाना पुरून उरतील असेच होते. त्यांनी श्रोत्यांना सांगितले, ‘‘त्याचे काय झाले मी आर्मीमध्ये असताना अनेकांच्या संपर्कात आलो. राजपुताना रायफल्सकडून मी मारवाडी शिकलो, शीख रेजिमेंटकडून पंजाबी शिकलो, बिहार रेजिमेंटकडून हिंदी, गोरखा रायफल्सकडून नेपाळी, मराठा लाइट इनफंट्रीकडून मराठी शिकलो; पण काय करू तिथे गुजराती शिकवायला कुणीच नव्हतं!’’ त्यांच्या या उत्तराने श्रोते निरुत्तर झाले.
मर्सिडीझ व जग्वारमध्ये असेच पलटवारांचे युद्ध चालू आहे. आपल्या इंटेलिजंट ड्राइव्ह मॅजिक बॉडी कंट्रोलचे गुणगान करण्यासाठी मर्सिडीझने आपल्या गाडीची तुलना कोंबडीशी केली. ‘व्हॉट डू चिकन्स अॅण्ड मर्सिडिझ बेन्झ हॅव इन कॉमन? स्टॅबिलिटी अॅट ऑल टाइम्स’ अशी त्यांची जाहिरात होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जॅग्वारने जाहिरात केली, ‘जग्वार विरुद्ध चिकन’ व त्यात त्यांनी म्हटले, ‘मॅजिक बॉडी कंट्रोल? वुई प्रीफर कॅट लाईक रिफ्लेक्सेस, डोन्ट यू?’ त्यावर मर्सिडीझने परत पलटवार केला, ‘बिकॉज कॅट लाईक रिफ्लेक्सेस आरन्ट पास्ट इनफ. द प्रीसेफ ब्रेक’ इथे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवणे गरजेचे आहे व ती म्हणजे पलटवार हा एकदाच करावा. तो जर वारंवार होऊ लागला तर ती शाब्दिक मारामारीचे रूप घेऊ शकते.
काही वर्षांपूर्वी अमेरिकेने भारताला क्रायोजेनिक इंजिन्स मिळू नयेत, यासाठी जंगजंग पछाडले होते. रशियाने भारताला ती इंजिन्स विकू नयेत म्हणून त्यांनी रशियावर देखील आर्थिक र्निबधांचा दबाव आणला होता. क्रायोजेनिक इंजिन्समुळे भारत अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या प्रक्षेपकांचे निर्माण करेल या भीतीपोटी अमेरिकेची ही धडपड होती. पण झाले उलटेच भारताची चहूबाजूंनी कोंडी केल्यामुळे भारतीय शास्त्रज्ञांना देशातच क्रायोजेनिक इंजिन्स निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळेच भारताने स्वबळावर पहिल्याच प्रयत्नामध्ये व सर्वात स्वस्त दरात मंगळ मोहीम यशस्वी करून दाखविली. इतर अनेक प्रगत राष्ट्रांचे उपग्रह आज भारतीय भूमीवरून अवकाशामध्ये उड्डाण करत आहेत. कधीकाळी भारताला प्राणपणाने विरोध करणारी अमेरिका, आज भारताला ‘एमटीसीएर’ तसंच ‘एनएसजी’ ग्रुपमध्ये प्रवेश मिळावा म्हणून जगभर आपला शब्द टाकत आहे.
भारताच्या संरक्षण व अंतराळ विज्ञान शास्त्रज्ञांनी ‘स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन’चा पलटवार करून हे साध्य केले आहे. थोडक्यात काय तर आपल्याला कोणी जाणीवपूर्वक कमी लेखल्यास पूर्ण विचारांती पलटवार करून आपली योग्यता जगाला सिद्ध करून दाखवावी व त्याचसोबत आपण देखील कोणाला कमी लेखून इतरांना पलटवारची संधी देऊ नये.
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com