पूर्वग्रह किंवा परसेप्शन हा शब्द, मोठा भूलभुलैय्या निर्माण करू शकतो. लोकांच्या मनातील पूर्वग्रह, एखाद्या नराला नारायण करू शकतात किंवा एखाद्या वाल्मीकीला वाल्यादेखील करू शकतात.
एकदा ट्रेनमध्ये एक गृहस्थ आपल्या ३५ वर्षांच्या मुलासोबत प्रवास करत असतात. त्यांच्या मुलाचे वर्तन पाहून सहप्रवासी मात्र अचंबित असतात. खिडकीपाशी बसलेला मुलगा, उलटी पळणारी झाडे, घरे बघून आनंदाने उडय़ा मारत असतो, चित्कारत असतो. लोकांना त्या वेडय़ा मुलाचे वर्तन पाहून मजा वाटत असते. गाडीतला एक सहप्रवासी शेवटी न राहवून त्या गृहस्थांना सल्ला पण देतो की त्यांनी या मुलाचे उपचार वेडय़ांच्या रुग्णालयात करून घ्यावेत.
आता दुसरे उदाहरण बघूया; एखाद्याने २०० रुपये दान दिले व दुसऱ्याने २०,००० रुपये; तर आपण सर्व जण दुसऱ्यालाच अधिक दानशूर म्हणू, नाही का?
या दोन्ही प्रकरणांमध्ये आपल्या मनातील पूर्वग्रह, आपला रिस्पॉन्स किंवा प्रतिक्रिया ठरवितात. आता आपण या कथांचा पुढला भाग बघू या.
ते गृहस्थ सल्ला देणाऱ्या सहप्रवाशाला म्हणाले, ‘माझा मुलगा जन्मत: आंधळा होता. आजच त्याला दृष्टिदान मिळाल्याने तो हा निसर्ग, हा ट्रेनचा प्रवास पहिल्यांदा अनुभवत आहे. तेव्हा त्याला हे सर्व नवीन आहे व त्याने हा आनंद पहिल्यांदा उपभोगला आहे.’ तर दुसऱ्या प्रकरणामध्ये जेव्हा आपल्याला कळते की, ज्याची आयुष्यभराची पुंजीच २०० रुपये आहे, त्याने ती सर्व दान केली आहे व ज्याने २०००० दिले त्याची कमाई २ कोटी आहे तेव्हा आपले मत एकदम उलटे होते. म्हणूनच अल्दोस हक्सली म्हणतात की, ‘काही गोष्टी आपल्याला ज्ञात असतात तर काही अज्ञात. आणि ज्ञात व अज्ञात यांच्या मध्येच पूर्वग्रहरूपी दरवाजा असतो.’
आता तिसरे उदाहरण बघू या; बंगल्यात राहणारी एक बाई, बंगल्यासमोरील झोपडीत राहणाऱ्या आपल्या शेजारणीला, नेहमी कपडे धुताना व वाळत घालताना न्याहाळत असते. गटाराच्या जवळ असलेल्या नळातून पाणी घेऊन ती गरीब बाई कपडे धुवायची. तिने वाळत घातलेले कपडे, बंगल्यातील बाईला नेहमी कळकट मळकट वाटायचे. एक दिवस ती आपल्या नवऱ्याला म्हणालीदेखील, ‘बघा त्या समोरच्या बाईला! तिला काहीच कसे कळत नाही? घाणेरडय़ा पाण्याने कपडे धुतल्यावर ते कळकटच राहणार. हिचा नवरा तिला काहीच कसे ओरडत नाही यासाठी?’
बंगल्यातील बाईचा नवरा नुसताच हसतो व घरातून ओले फडके आणून खिडकीच्या तावदानावर फिरवितो. तावदानावरची धूळ धुतली गेल्याने समोरील कळकट मळकट कपडे आता मात्र पांढरे शुभ्र दिसू लागले. बंगल्यातील बाई ओशाळते, तिला तिची चूक उमजून येते.
थोडक्यामध्ये काय तर, कधी कधी आपल्याला जज करणाऱ्या (पारखणाऱ्या) माणसाचा दृष्टिकोनच आपल्याबद्दल पूर्वग्रहदूषित असतो, तर कधी कधी संपूर्ण परिस्थितीचा अंदाज किंवा ज्ञान नसल्याने आपल्या कृतीबद्दल लोकांचा गैरसमज होतो. कॉर्पोरेट जगातदेखील असेच असते. आपल्या कामापेक्षा आपल्याबद्दलचे इतरांचे पूर्वग्रहच, आपले यश व नशीब ठरवत असतात.
तुम्ही कामात कितीही हुशार असलात किंवा हार्ड वर्किंग असलात तरी रिसर्च अनुसार आठ प्रकारचे पूर्वग्रह आपल्याबद्दलचे मत ठरवत असतात. हे पूर्वग्रह म्हणजे १. आपण उशिरा येतो. २. आपण आळशी आहोत ३. आपण टीम प्लेयर नाही ४. आपण अनैतिक वागतो. ५. आपण अनप्रोफेशनल आहोत. ६. आपण मौजमजाच मारण्यात गर्क असतो. ७. आपण मुलींच्या मागे असणारे बाईलवेडे आहोत व ८. आपण सदैव हास्यविनोद करत असतो व कामाप्रति कधीच गंभीर नसतो.
वॉरेन बफे यांच्या मते, आपली प्रतिष्ठा प्रस्थापित करण्यासाठी जर २० वर्षे लागत असतील, तर तीच प्रतिष्ठा धुळीत मिळायला फक्त ५ मिनिटे पुरेशी असतात. त्यामुळे आपल्याविषयीचे वरील पूर्वग्रह वेळीच दूर करायला आपण शिकले पाहिजे.
तुम्ही जर बहुतेकवेळा आरामात, सुस्तावलेल्या पोझिशनमध्ये खुर्चीत बसत असाल तर लोकांना तुम्ही आळशी आहात असे वाटते. त्यामुळे काम करत असताना ऊर्जेने रसरसलेले राहा, तुमच्या चालीमध्ये चपळता असू देत. आपल्याकडे पुरेसे काम असले तरी नवीन काम मागण्यास कचरू नका. त्यामुळे तुम्ही आळशी नाहीत हा समज दृढ व्हायला मदत होते.
तुम्ही जर लोकांशी ऊठसूट, रूक्षपणे व अहंकार दाखवत वागलात तर तुम्ही अनप्रोफेशनल आहात असा गैरसमज निर्माण होतो. तुमच्यावर होणारी टीका तुम्ही जर योग्य रीतीने स्वीकारली नाहीत तरीदेखील तुमच्यावर हा शिक्का बसू शकतो. तुम्ही ऑफिससाठीचा ड्रेस कोड धुडकावून लावला तरी अनप्रोफेशनल असाच शिक्का बसतो. तेव्हा अंगी नम्रता बाळगा, टीकेचा स्वीकार करायला घाबरू नका, टेबलवर पसारा करू नका. पेहराव सभ्यतेला अनुसरून करा. प्रोफेशनल माणूस हा वागण्यात, बोलण्यात व दिसण्यात रुबाबदार असतो.
सदानकदा प्रत्येक वेळी हास्यविनोद करत राहणे, कामाच्या वेळात गंभीर न राहणे यामुळे तुम्हाला ‘ऑफिस जोकर’ म्हणून उपाधी मिळू शकते. तुमच्या थट्टामस्करीमुळे इतरांचे लक्ष विचलित होऊ शकते. त्यामुळे असे वागणे कटाक्षाने टाळाच.
कोणत्याही प्रोजेक्टमध्ये स्वत:हून पुढाकार घ्या, सहकाऱ्यांना नावानीशी ओळखा, सहकाऱ्यांच्या कल्पना आपल्या नावावर खपवू नका, अडचणीत असणाऱ्या सहकाऱ्यांना मदत करा. मग कोण कशाला म्हणेल की तुम्ही टीम प्लेयर नाही आहात म्हणून?
लाच देणे, घेणे, प्रतिस्पर्धी कंपनीची माहिती किंवा माणसे चुकीच्या पद्धतीने फोडणे, अशा अनैतिक गोष्टींचे समर्थन करू नका. कंपनीने दिलेल्या सवलती चुकीच्या प्रकारे उकळू नका. याउलट समाजसेवा करण्याचे नवनवीन मार्ग सुचवा व अवलंबा. तुमच्या प्रतिष्ठेला, मूल्यांना धक्का लागेल असे निर्णय घेऊ नका.
महिला सहकाऱ्यांशी अदबीने वागा, त्यांच्याशी चावट बोलणे टाळा. स्वत:च्या प्रेमप्रकरणांची वाच्यता करून आपण कसे मुलींना पटवू शकतो, अशा फुशारक्या मारू नका.
लेटलतीफ हा शिक्का बसल्यास आपल्या करिअरचे न भरून येणारे नुकसान झालेच म्हणून समजा. तेव्हा वक्तशीरपणा आपली ओळख असू द्या.
सर्वात शेवटी पण महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही चांगले काम करत आहात हे तुमच्या वरिष्ठांच्या वरिष्ठांना कळेल याची तजवीज करा. तिसऱ्या कथेतील त्या माणसाने जर ओल्या कपडय़ाने काच पुसली नसती तर बंगल्यातील बाईचे त्या गरीब बाईबद्दलचे पूर्वग्रहदूषित मत बदलले नसते. असेच काहीसे आपल्याबाबतीत घडू शकते. जर वरिष्ठांच्या वरिष्ठांना आपले काम, आपले कौशल्य ज्ञात असेल तर आपल्या योगदानाकडे, पूर्वग्रहदूषित नजरेने पाहणारा आपला वरिष्ठ, करिअरमध्ये आपले फारसे बिघडवू शकत नाही, कारण त्याला आपली खरी योग्यता दाखविणारे हुकमाचे पान आपल्याकडे असते ना!
(समाप्त)
प्रशांत दांडेकर –