एचआर विभागात काम करणे म्हणजे सुळावरची पोळीच असते. खास करून पदोन्नती व वार्षिक पगारवाढ देताना या विभागातील लोकांवर खूप प्रेशर असते. माझ्या कंपनीमध्ये पण परिस्थिती काही वेगळी नव्हती. वेगवेगळ्या विभागांतील मोठय़ा हुद्दय़ावर असलेले अनेक डायरेक्टर आपापल्या माणसांना पुढे आणण्यासाठी नियम डावलून शिफारशी करत होते. खुशमस्करे लोक, बॉसचे पर्सनल काम करणारे लोक लायकी नसताना बरेचदा घसघशीत वार्षिक पगारवाढ व पदोन्नतीचे फायदे उकळत होते. याला चाप लावण्यासाठी माझे वरिष्ठ, विश्वनाथन साहेबांनी एक योजना आखली होती. काही झाले तरी या पुढे कोणालाही तीन वर्षे पूर्ण झाल्याशिवाय प्रमोशन द्यायचे नाही व कोणालाही २० टक्क्यांपेक्षा जास्त पगारवाढ द्यायची नाही, अशी आचारसंहिताच त्यांनी लागू केली. आचारसंहितेमुळे कोणालाही कितीही उत्तम काम केले तरी वेळेआधी प्रमोशन व गलेलठ्ठ पगारवाढ मिळत नव्हती. हो पण लायक कर्मचाऱ्यांचे उत्तम काम इतर प्रकारांनी मात्र गौरवण्यात येत होते. डायरेक्टर कितीही मोठा असो त्याच्या नियमबा शिफारशींना आता थारा देण्यात येत नव्हता. सगळेच डायरेक्टर त्यामुळे विश्वनाथन साहेबांवर खार खात होते. त्यामुळे जेव्हा एक दिवस विश्वनाथन यांनीच नियम तोडला तेव्हा सर्वच जण त्यांच्यावर तुटून पडले.
साहेबांनी एका युनियन श्रेणीत येणाऱ्या कर्मचाऱ्याला दोन वर्षांतच ३० टक्के पगारवाढ देऊन मॅनेजमेंट श्रेणीमध्ये प्रमोट केले होते व तेही त्या कर्मचाऱ्याच्या वरिष्ठाने शिफारस केलेली नसताना; स्वत:च्या अधिकार क्षेत्रामध्ये.
त्यामुळे मला सगळ्यांचे वाग्बाण ऐकावे लागत होते. ‘बघ, बघ.. तुझा साहेब कसा, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण’. मला खूप वाईट वाटत होते. माझा साहेब कधीच वावगे वागणारा नाही याची माझ्या मनाला १०० टक्के खात्री होती. पण वस्तुस्थिती वेगळी होती. मी खूप बेचैन झालो होतो. विश्वनाथन साहेबांनी हे ओळखले होते. त्यांनी मला जवळ बोलाविले व म्हणाले, ‘‘प्रशांत तुला आज एक मी गोष्ट सांगतो. एक साधू महाराज होते. ते आपल्या शिष्यांसोबत गावोगाव भटकत असत व धर्माचा प्रसार करत असत. आपल्या शिष्यांनी नेहमी सदाचाराने वागावे यासाठी त्यांनी काही नियम बनविले होते. दारूला स्पर्श करू नये, भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या पैशाकडे पाहूदेखील नये, परस्त्रीकडे वासनेच्या नजरेने पाहू नये, तिच्याशी कारणाशिवाय अघळपघळ बोलू नये, तिला स्पर्शदेखील करू नये, वगैरे वगैरे यातील काही नियम होते. एकदा असेच धर्मोपदेश करून साधू आपल्या शिष्यांबरोबर दुसऱ्या गावी चालले होते. वाटेत एक नदी ओलांडावी लागणार होती. ते पावसाळ्याचे दिवस होते. नदीपाशी आल्यावर पाण्याच्या खोलीचा अंदाज घेऊन सर्व जत्था पाण्यात उतरला. त्याच वेळी नदीच्या काठावर एक सुंदर युवती वस्त्रे काढून पाण्यात आंघोळीला उतरली होती. काही शिष्यांनी गुरूंची नजर चुकवून त्या दिशेला चोरून एक कटाक्षही टाकला. गुरूंच्या लक्षात ही गोष्ट आल्याने त्यांनी नजरेच्या धाकानेच शिष्यांना दटावले होते.
एवढय़ात कुठूनसा पाण्याचा एक वेगवान लोंढा नदीच्या पात्रात घुसला. अचानक आलेल्या आपत्तीने ती तरुणी घाबरली व पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली, ओरडू लागली. साधू महाराजांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून पोहत जाऊन त्या तरुणीला वाचविले व आपल्या दोन्ही हातांनी त्या नग्न तरुणीला कवेत घेऊन नदीच्या किनाऱ्यावर अलगद आणून सोडले. शिष्यांना गुरूचे वर्तन म्हणजे फार मोठा धक्का होता. गुरूला या गोष्टीचा जाब तरी कसा विचारावा या गोंधळातच ते गुरूमागे मार्गक्रमण करू लागले. या वैचारिक गोंधळामुळेच साधू व त्यांच्या शिष्यांमध्ये अंतर वाढत चालले होते. चालता चालता पाठी पडत असलेल्या शिष्यांकडे वळून बघत गुरू म्हणाले, ‘‘मी त्या मुलीला कधीच पाठी सोडून आलो आहे, पण तुम्ही मात्र त्या मुलीला अजून सोबत घेऊन चालला आहात. पाप हे कृतीमध्ये नसते तर विचारांमध्ये असते. त्याचप्रमाणे नियम हे माणसांसाठी असतात, माणसे नियमांसाठी नसतात. मी परस्त्रीला स्पर्श करू नका, तिच्याकडे वासनेच्या नजरेने पाहू नका असे सांगितले होते पण एका जीवाला माणुसकीच्या नात्याने मदत करू नका असे सांगितले नव्हते.’’
साहेबांनी मला ही गोष्ट का सांगितली याचा थोडासा उलगडा झाला होता, पण पूर्ण मात्र झाला नव्हता. तेव्हा ते म्हणाले, ‘‘त्या दिवशी मी रुटीनप्रमाणे कंपनीमध्ये कामाच्या वेळात कोण काय करत आहे हे बघण्यासाठी चक्कर मारत होतो. तेव्हा शरदला फोनवर बोलताना ऐकले. तो पार कोलमडून गेला आहे हे जाणवत होते. फोन घरून आला होता व काही तरी चिंताजनक प्रकरण होते. एक-दोन दिवसांनी मी माझ्या परीने शरदबद्दल माहिती काढली. त्याच्या तीन वर्षांच्या चिमुरडय़ाला रक्ताचा कर्करोग झाला होता. त्यामुळे दर आठवडय़ाला ब्लड ट्रान्स्फ्युजन करावे लागणार होते. ही फार खर्चीक बाब होती.
युनियन श्रेणीमध्ये असल्याने शरदला हॉस्पिटलसंबंधित खर्च ऑफिसकडून मिळणार नव्हता तसेच पगारदेखील कमी असल्याने रोज औषधांवर होणारा खर्चदेखील त्याच्या आवाक्याबाहेरचा असणार होता. पण तेच तो मेनेजमेंट श्रेणीमध्ये गेल्यास त्याला कंपनीच्या मेडिक्लेम योजनेचे कवच लाभणार होते व घसघशीत पगारवाढ दिल्याने रोजच्या औषध पाण्याची पण चिंता काहीशी दूर होणार होती व म्हणूनच मी त्याचे प्रमोशन करण्याचे ठरविले. आपण त्याला नुसता मानसिक आधार देऊन चालणार नव्हते तर त्याला आर्थिक आधार देणेही तेवढेच गरजेचे होते. मी क्षणभर विचार केला की, आपण शरदला वन टाइम बोनस दिला तर? पण त्याने काहीही फायदा होणार नव्हता. शरदला येणारा खर्च हा आता आयुष्यभरासाठी होता त्यामुळे प्रमोशन व पगारवाढ देणेच क्रमप्राप्त झाले होते.’’
विश्वनाथन साहेबांचे बोलणे पूर्ण झाले होते. नियम डावलल्याची कोणतीही बोच त्यांच्या नजरेमध्ये किंवा बोलण्यात नव्हती; असलेच तर डोळ्यात एक समाधानाची झलक होती. माझे डोळे पाण्याने डबडबले होते, पण उरात एक समाधान होते की मी योग्य त्या माणसाची आदर्श म्हणून निवड केली आहे.
‘आपल्याला मिळालेले विशेषाधिकार योग्य त्या ठिकाणी वापरावेत, विशेषाधिकाराद्वारे नियमांना अपवाद करण्यासाठी कारणदेखील तेवढेच योग्य असावे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आंधळेपणाने नियम पाळणे टाळावे,’ हा मोठ्ठा धडा आज मला माझ्या गुरूंकडून मिळाला होता.
अशीच एक कथा युनायटेड एअरलाइन्सच्या इतिहासात घडली होती. कोणत्याही एअरलाइन्सच्या दृष्टीने त्यांच्या विमानांचे आगमन व प्रस्थान वेळेवर होणे ही गौरवशाली परंपरा असते, कारण त्यावरच तर ग्राहक समाधान ठरत असते. पण एकदा युनायटेड एअरलाइन्सच्या केबिन क्रूनेच विमानाच्या प्रस्थानाला विलंब केला आणि त्यासाठी त्यांचे कौतुकदेखील झाले. त्याचे असे झाले की, केरी ड्रेक हा प्रवासी मरणासन्न असलेल्या आपल्या आईला भेटायला चालला होता. त्याला दोन फ्लाइटचा प्रवास करून आईला पाहायला जावे लागणार होते. दुर्दैवाने त्याच्या पहिल्या विमानाला उशीर झाला होता व त्यामुळे त्याचे दुसरे कनेक्टिंग विमानपण चुकणार होते व ते विमान चुकल्याने आईला जिवंत पाहणे जवळपास अशक्यप्रायच वाटत होते, कारण नंतरचे विमान सात तासांनी होते. आईशी बोलणे होऊ शकणार नाही या विचारानेच तो विमानात रडू लागला. केबिन क्रूला जेव्हा त्याच्या रडण्याचे कारण कळले तेव्हा त्यांनी कनेक्टिंग विमानाच्या क्रूला विनंती करून ते विमान एक तास रोखून धरले. एका भावविवश मुलाला त्यामुळे आपल्या आईशी शेवटचे दोन बोल बोलता आले.
मग काय तुम्हीदेखील करिअरमध्ये नियमांचा बागुलबुवा करून योग्य तो निर्णय न घेण्याचा मूर्खपणा करणार नाहीत ना? कारण समझनेवाले को इशारा काफी है.
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com