69-lp-prashantआज उदयन खूप उदास होता. त्याच्या ऑफिसमध्ये घोषणा करण्यात आली होती की त्यांच्या कंपनीला दुसऱ्या एका मोठय़ा कंपनीने टेक ओव्हर केले आहे व त्यामुळे काही लोकांच्या कामाच्या स्वरूपात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. काही जणांना, ‘जे कधीही केले नाही ते शिकण्याची तयारी ठेवा’ असा निरोप देण्यात आला होता. नवीन काम शिकून घ्या, अन्यथा नोकरीलादेखील मुकावे लागेल अशी धोक्याची घंटादेखील वाजवण्यात आली होती. ज्यांना हा निरोप देण्यात आला होता त्यापैकी उदयन हा एक होता.

आपल्या पुढय़ात काय वाढून ठेवले आहे या विचाराने उदयन खूप अस्वस्थ होता. नवीन काम आपल्याला जमेल का, नाही जमले तर आपली नोकरी जाईल का? त्याच्या डोक्यात विचारांचे नुसते काहूर माजले होते. त्याची ही अवस्था त्याच्या आईने नेमकी हेरली होती. ‘उदयन तुझे मालिश करते’ असे सांगत आईने मुलाला स्वत:जवळ बोलाविले. आईच ती! गप्पांच्या ओघात तिने उदयनचे अंतरंग जाणून घेतलेच. त्याला आश्वस्त करण्यासाठी तिने काही गोष्टी त्याला सांगावयाचे ठरविले.

बदलाला सामोरे न जाणाऱ्या पोपटाची काय गत होते हे उदयनला सांगणे त्या क्षणी आईला जरुरीचे वाटले. आई उदयनला सांगू लागली, ‘पोपटांना पकडण्याची एक खास पद्धत आहे. एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच नळ्या ओवलेल्या असतात. या प्रत्येक नळीला पोपटाला आकर्षित करेल असे काहीतरी खाद्य चिकटवलेले असते. जेव्हा पोपट नळीवर बसतो, तेव्हा त्याच्या वजनाने नळी वेगाने गोल गोल फिरते व पोपट तोल न सांभाळू शकल्याने उलटा लटकू लागतो. उलटे लटकताच पोपट घाबरून पायात नळी गच्च पकडतो. आजूबाजूचे सर्व विश्वच उलटे झाल्याचे पाहून पोपट भीतीने गलितगात्र होतो. आपण नळी सोडली तर खालती पडू या विचाराने तो आपल्या पंखांवरचा विश्वासच गमावून बसतो. नळी सोडल्यास, आपण काही काळासाठी खाली पडलो तरी, एक गिरकी घेऊन पंखांच्या साहाय्याने परत वर भरारी घेऊ  शकतो याचे त्याला ना ज्ञान असते, ना प्रसंगावधान! त्यामुळे तो पारध्याच्या हातात नकळत सापडतो.’

आईने उदयनला समजावले, ‘कधी कधी आपल्या आजूबाजूची परिस्थितीदेखील अशीच अचानक बदलते. जिथे फुले वेचली तिथे गोवऱ्या वेचण्याची पाळी येते. राजाचा रंक होताना, हातातील सर्व अधिकार निसटत जातात. ज्यांच्या छत्रछायेत वाटचाल केली त्याच वरिष्ठांची उचलबांगडी झाल्याने आपण निराधार, पोरके होतो. तर कधी ज्या कामात आपण पारंगत होतो ते कामच कालबा झाल्याने आपली किंमत शून्य होते. ही अवस्था म्हणजे उलटय़ा लटकलेल्या पोपटासारखीच असते. अशावेळी काय करायचे ते सुचत नाही. तेव्हा तुला मी आता त्यावर उपायदेखील सांगणार आहे.’

आई उदयनला पुढे सांगू लागली, ‘पोपट व माणसात फरक आहे. त्यामुळे माणसाने आपली बुद्धी वापरून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून भरारी घेतली पाहिजे. होंडा कंपनीचे मालक सोयीचिरो होंडा हे एका गॅरेजचे मालक होते. साध्या गाडय़ांमध्ये थोडेसे फेरफार करून त्या रेसिंग कारमध्ये बदलणे हा त्यांचा छंद व व्यवसायदेखील होता. हळूहळू होंडा यांनी पिस्टन िरंग बनविण्याची कंपनी सुरू केली. त्यांना टोयोटा कंपनीची ऑर्डर पण मिळाली. पण होंडा यांचे उत्पादन क्वालिटी टेस्टमध्ये फेल झाल्याने ही ऑर्डर हातामधून निसटली. त्यांनी प्रयत्नपूर्वक आपल्या उत्पादनातील दोष दूर करून परत एकदा टोयोटा कंपनीची ऑर्डर मिळवली. पण इथेच त्यांचा घात झाला. टोयोटाने त्यांच्या कंपनीमध्ये हळूहळू करत ४० टक्के हिस्सा मिळविला व होंडा यांनाच पदावनती देऊन त्यांचे सर्व अधिकार कमी करून टाकले. हे कमी की काय, म्हणून दुसऱ्या महायुद्धात होंडा यांचा कारखाना पूर्णत: बेचिराख झाला. होंडा यांची स्थिती उलटय़ा लटकणाऱ्या पोपटासारखी झाली होती. पण त्यांनी हार मानली नाही. १९४६ मध्ये त्यांनी एक छोटी कंपनी चालू केली व मोटोराइज्ड बायसिकलचे उत्पादन चालू केले. मग जसजसा जम बसत गेला तसे त्यांनी मोटरसायकल, पिक अप व्हॅन उत्पादन चालू केले व सरतेशेवटी कार्सचे उत्पादन करून टोयोटा कंपनीच्याच तोंडाला फेस आणला.

‘मला, तुला अजूनदेखील काही तरी सांगायचे आहे. पण त्याआधी तुझ्या आवडीचे आईस्क्रीम खाऊन घे.’ असे सांगत उदयनच्या आईने क्षणभर पॉज घेतला.

आईने मग उदयनला त्याच्या आवडीचे केशर पिस्ता आईस्क्रीम खायला दिले. ते संपल्यावर ती म्हणाली, ‘अरे आता मी तुला जे दिले न तेच या परिस्थितीवरील उत्तर आहे. बघ ना, आ म्हणजे आत्मविश्वास, ई म्हणजे इच्छाशक्ती, स म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, क्री म्हणजे क्रियाशीलता व म म्हणजे महत्त्वाकांक्षा.

कितीही विपरीत परिस्थिती असो, मी यातून बाहेर पडू शकतो हा आत्मविश्वास स्वत:जवळ बाळग, नुसता आत्मविश्वास असून चालत नाही तर इच्छाशक्ती असणेही गरजेचे आहे. खरे तर आत्मविश्वास व इच्छाशक्ती हे दोन पंख आहेत. कोणत्याही विपरीत परिस्थितीला मी स्वत:साठी अनुकूल बनवू शकतो हा सकारात्मक दृष्टिकोन बाळगला की योग्य तो मार्ग सापडतोच. योग्य त्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी प्रत्यक्ष कृतीची (क्रियाशीलतेची) गरज असते हे वेगळे सांगायला नकोच. शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्त्वाकांक्षा. ज्या परिस्थितीने मी गांजलो आहे त्यातही मी माझे सर्वोत्तम देऊन सर्वोच्च पदावर विराजमान होईन ही महत्त्वाकांक्षा बाळगली तर आपला कधीच पोपट होणार नाही.’

उदयनला आता सर्व कोडे उलगडले होते. ‘आकाशी झेप घे रे’ याचा खरा अर्थ त्याला कळला होता.
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader