आपल्या मराठीत एक म्हण आहे, ‘पेव फुटले आहे.’ एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ही म्हण आपण वापरतो. पेव या शब्दाचा अर्थ धान्य साठवायची कणगी असा असला तरी पेव ही एक औषधी वनस्पतीही आहे हे अनेकांना माहीत नसेल. पेन्वा असेही हिचे आणखी एक नाव आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला कोकणातल्या अनेक रानावनांतून हिचे कोंब एकाच वेळी जमिनीतून फुटून बाहेर पडू लागतात. सर्वत्रच पेवाचे छोटे छोटे कोंब दिसू लागतात. यावरूनच तर ‘पेव फुटणे’ ही म्हण प्रचारात आली असेल का? या कोंबाची वाढ इतकी जलद होते की

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२ ते ३ आठवडय़ांतच पेवाची साधारण ३ फूट उंचीची डौलदार रोपे दिमाखात उभी रहिलेली दिसतात. साधारणपणे गणेश चतुर्थीच्या वेळी हिला रक्तवर्णी बोंडे दिसू लागतात. या बोंडांतून शुभ्र धवल अशी अत्यंत
नाजूक परंतु आकाराने बऱ्यापकी मोठी फुले अशी फुले डोकावू लागतात. हा लाल व सफेद रंगांचा संयोग फारच मनमोहक असतो. पेवाचे शास्त्रीय नाव आहे Costus speciosus.
या कोस्टसची इतरही अनेक भावंडे आहेत. त्यांचीही फुले खूपच आकर्षक असतात. त्यांच्या आकर्षक रंगांमुळे व टिकाऊपणामुळेही पुष्परचनेसाठी त्यांना चांगलीच मागणी असते. पेव आणि त्याची इतर काही भावंडेही पावसाळ्यानंतर, साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात, सुप्तावस्थेत जातात. जमिनीबाहेरील सर्व शाकीय भाग वाळून जातात. असे असले तरी त्या वनस्पती मरून जात नाहीत. त्यांचे हळदीसारखे कंद असतात ते जमिनीत सुप्तावस्थेत राहतात. मग ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या न्यायाने पुढच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला पुन्हा नव्या जोमाने आपले आयुष्य पुन्हा सुरू करतात.
कोस्टसच्या सर्व जातींना अर्धवट उन्हाची गरज असते. कडक उन्हात पाने करपून कोस्टसच्या झाडांना फार हानी पोहचू शकते. लागवडीसाठी खत-मातीचे मिश्रण सम प्रमाणात घ्यावे. कोस्टसला माती नेहमीच आद्र्र ठेवणे इष्ट असते. त्याच वेळी पाण्याचा निचरा न झाल्याने, त्याच्या कंदासभोवार पाणी साचून राहिल्यास कंद कुजण्याची दाट शक्यता असते. कोस्टसची अभिवृद्धी कंदांना विभागून करावी. काही कोस्टसच्या जातींमध्ये एक गमतीदार गोष्ट घडते. त्यांना फुले येऊन गेली की त्यांच्या बोंडाखालून काही रोपे फुटू लागतात. ही छोटुकली रोपेही त्यांना मुळे फुटू लागलेली दिसताच खुडून काढून वेगळी लावावीत. एका कंदापासून जमिनीतून अनेक शाखा बाहेर पडतात. एका शाखेला फक्त एकदाच फुलांचे बोंड येते. त्यानंतर तिला परत फुले येत नाहीत. मोठय़ा कुंडय़ांतूनही कोस्टस लावू शकतो.
हल्ली ‘इन्सुलिन प्लांट’ नावाने कोस्टसची एक जात (Costus pictus) काही नर्सरींमधून विकली जात आहे. हिचे पान दर दिवशी खाल्ल्याने मधुमेहावर मात करता येते असे सांगितले जाते. परंतु यावर अजूनही काही ठोस असे संशोधन झालेले नसल्याने त्यावर किती भरवसा ठेवायचा हे ज्याचे त्याने ठरवावे. हे आंबट पान खाल्ल्याने काही इजा होत नसली तरीही मधुमेहावरची डॉक्टरांनी योजलेली इतर औषधे बंद न करणेच इष्ट.
नंदन कलबाग

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Costas plant